भोपाळ: लवकरच येणाऱ्या रामनवमी आणि हनुमानजयंती या सणांच्या दिवशी रामलीला, सुंदरकांड आणि हनुमानचालीसाचे पठण आदी कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना मध्यप्
भोपाळ: लवकरच येणाऱ्या रामनवमी आणि हनुमानजयंती या सणांच्या दिवशी रामलीला, सुंदरकांड आणि हनुमानचालीसाचे पठण आदी कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना मध्यप्रदेश काँग्रेसने आपले पदाधिकारी, आमदार व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. पुढील वर्षी मध्यप्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्याची चर्चा आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून जनाधार पक्का करण्याचे उद्दिष्ट काँग्रेसने ठेवले आहे.
सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने मात्र काँग्रेसच्या या सूचनांवर टीका केली आहे. याच काँग्रेसने भगवान राम आणि रामसेतू आदी बाबी काल्पनिक आहेत असे म्हटले होते याची आठवण भाजपाने करून दिली आहे.
१० एप्रिल रोजी रामनवमी आहे, तर १६ एप्रिलला हनुमानजयंती आहे. यानिमित्ता धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करावे अशी सूचना देणारे पत्र, मध्यप्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व संघटन प्रभारी चंद्रप्रभाष शेखर यांनी २ एप्रिल रोजी, सर्व जिल्हा व शहर अध्यक्ष, पक्षाचे आमदार, पक्षाचे संसदेतील प्रतिनिधी, जिल्हा प्रभारी, आघाडी प्रमुख तसेच पक्षाच्या विविध विभागांचे अध्यक्ष यांना पाठवले आहे. ही सूचना मध्यप्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमल नाथ यांनी केल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
रामनवमीच्या निमित्ताने रामायणातील कथांचे वाचन, रामलीलेचे प्रयोग तसेच भगवान रामाच्या पुजेचे कार्यक्रम घेतले पाहिजेत, तर हनुमानजयंतीच्या निमित्ताने सुंदरकांड तसेच हनुमानचालीसा पठण हे कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत, असे शेखर यांनी म्हटले आहे.
मध्यप्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमल नाथ रामनवमीच्या निमित्ताने शुभेच्छा संदेश पाठवतील, तर हनुमानजयंतीच्या दिवशी आपल्या छिंदवाडा मतदारसंघात पूजा करतील, असेही पत्रात नमूद आहे.
काँग्रेसच्या या निर्णयाबद्दल विचारले असता, काँग्रेसद्वारे हे कार्यक्रम घेण्याची सूचना केली जाण्याची ही पहिली वेळ नाही, असे काँग्रेसचे सरचिटणीस व माध्यम प्रभारी के. के. मिश्रा यांनी सांगितले.
“कमल नाथ भगवान हनुमानाचे भक्त आहेत आणि छिंदवाडामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून असे कार्यक्रम होत आहेत, गेल्या वर्षीही झाले होते,” असे मिश्रा यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस नेहमीच तुष्टीकरणाचे राजकारण करत आली आहे हे यावरून स्पष्ट होत असल्याची टीका भाजपा प्रवक्ते पंकज चतुर्वेदी यांनी केली आहे. एकीकडे काँग्रेस नेत्यांनी राममंदिर बांधण्याला विरोध केला होता, रामायण काल्पनिक आहे असे विधान केले होते, काँग्रेसच्या एका नेत्यांनी हिंदुत्ववाद्यांची तुलना आयएसआय व बोको हरामशी केली होती. ही जनतेची दिशाभूल आहे, असे चतुर्वेदी म्हणाले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी आपल्या ‘सनराइज ओव्हर अयोध्या: नेशनहूड इन अवर टाइम्स’ या पुस्तकात हिंदुत्वाच्या अतिरेकी स्वरूपाची तुलना आयएसआय व बोको हरामशी केली होती. त्यांच्या या पुस्तकाच्या प्रकाशन, प्रसार व विक्रीवर बंदी आणण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली होती. मात्र, न्यायालयाने यावर सुनावणी करण्यास नकार दिला.
COMMENTS