भाजपला राष्ट्रवादीने रोखले

भाजपला राष्ट्रवादीने रोखले

२२० ते २५० जागांवर विजय मिळविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजप-शिवसेनेला राष्ट्रवादी-काँग्रेसने रोखल्याचे आत्ताचे चित्र असून, काही निकाल धक्कादायक लागले आहेत.

लोक आपला कौल मागे घेतात तेव्हा
राज्यसभा निवडणुका : गुजरात काँग्रेस आमदारांची चौकशी शक्य
शिवराजसिंह यांना ज्योतिरादित्यांचेच आव्हान

भाजप आणि शिवसेना महायुती राज्यामध्ये सत्ता स्थापन करणार असली तरी भाजपचे आकडे कमी झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला रोखल्याचे चित्र आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आलेल्या कल आणि निवडणुकीच्या निकालावरून भाजप १०० ते १०५ जागांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. शिवसेना ५५ ते ६० जागांच्या आसपास राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ५५ ते ६० जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला ४३ ते ४५ पर्यंत जागा मिळण्याची शक्यता आहे.

भाजप-सेना महायुतीला २२० ते २५० जागा मिळतील असा भाजपचा कयास होता. आज सकाळीही इतक्याच जागा मिळतील असा विश्वास भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी व्यक्त केला होता. पण संध्याकाळपर्यंत निकाल जसजसे येऊ लागले तसे राज्याचे चित्र बदलत गेले.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने २०१४ च्या निवडणुकीमध्ये गेलेले आपले बहुतांशी मतदारसंघ परत मिळविले आहेत. राष्ट्रवादीने पुणे, कोल्हापूर, सातारा, उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठे विजय मिळविले. विशेषतः साताऱ्यामध्ये भाजपचे उद्यनराजे भोसले पराभूत झाले. तेथे लोकसभेसाठी पोट निवडणूक झाली. त्या ठीकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे श्रीनिवास पाटील यांनी मोठा विजय मिळविला.

राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी कर्जत जामखेडमधून, परळीमधून धनंजय मुंडे, बारामतीमधून अजित पवार, नाशिकमध्ये छगन भुजबळ, श्रीवर्धनमध्ये अदिती तटकरे या विजयी झाल्या.

पंकजा मुंडे, उदयनराजे भोसले, राम शिंदे, मुक्ताईनगर मधून माजी मंत्री एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे यांचे पराभव झाल्याने भाजपला धक्का बसला आहे.

भोकरमधून ८७ हजार मतांनी अशोक चव्हाण विजयी झाले तर ८ हजार मतांनी पृथ्वीराज चव्हाण कराड मधून जिंकले. काँग्रेससाठी हे विजय मोठे होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये १५ हजार मतांनी विजयी झाले, आशिष शेलार २५ हजार मतांनी विजयी झाले तर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील २१ हजार मतांनी कोथरूडमधून विजयी झाले.

कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे प्रमोद पाटील यांचा विजय झाल्याने मनसेला एक जागा मिळाली. .

ठाकरे कुटुंबातील पहिला सदस्य आदित्य ठाकरे ६२ हजार मतांनी वरळीतून विजयी झाले. तर कणकवली येथे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा मुलगा नितेश राणे २३ हजार मतांनी विजयी झाले आहेत.

दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.

संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की भाजपचा स्ट्राईकरेट वाढला आहे. ते म्हणाले, “यावेळी आम्ही केवळ १६४ जागा लढवल्या, त्या तुलनेत आमच्या चांगल्या जागा आल्या आहेत. आमचा स्ट्राईकरेट ७० टक्के आहे. पण विरोधकांच्या जागा फार काही वाढलेल्या नाहीत. आम्हाला उदयनराजे भोसले आणि पंकजा मुंडे यांच्या पराभवाचा धक्का आहे. आमचे काही मंत्री पराभूत झाले आहेत, त्याचं आम्ही विश्लेषण करू, दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरी झाली, त्याचा फटका आम्हाला बसला.” फडणवीस म्हणाले, की अपक्ष निवडून आलेल्या १५ जणांनी आपल्याशी संपर्क साधला आहे.

ते म्हणाले, “२२० जागा मिळविण्याचे जे चित्र उभे करण्यात आले होते, ते महाराष्ट्रातील जनतेने नाकारले आहे. सत्तेमध्ये गेल्यानंतर पाय जमिनीवर ठेवायचे असतात. सत्तेचा दुरुपयोग करायचा नसतो. डोके ताळ्यावर ठेऊन निर्णय घ्यायचे असतात. पण विरोधी पक्षाच्या नेत्यांवर वैयक्तिक हल्ला करण्याचा जो प्रकार झाला, त्याला जनतेने नाकारले आहे. हे शासन आणि मुख्यमंत्री याना लोकांनी नाकारले आहे” मात्र आम्हाला विरोधी पक्षामध्ये बसण्याचा कौल मिळाला असल्याचेने सहकारी काँग्रेस आणि इतर पक्षांशी विचारविनिमय करून पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पवार म्हणले, की आम्ही सगळे मित्रपक्ष बहुमताच्या आसपास जाऊ ही अपेक्षा होती, पण अधिक प्रयत्न करायला हवे होते.

ते म्हणाले, “जे यश मिळाले त्याचा आनंद आहे. तरुणांचा आम्हाला खूप मोठा पाठींबा मिळाला. बदलाची प्रक्रिया सुरु झाली आहे. जनमत पाहता पक्ष पुन्हा जोमाने उभा करणार आहे. नवे नेतृत्त्व उभे करणार आणि ही लढाई पुढे नेणार.”

महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी कलम ३७० चा मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता. त्याविषयी बोलताना पवार म्हणाले, की शेतीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, उद्योग- कारखाने बंद पडत आहेत. बेरोजगारी वाढत आहे. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आणि कलम ३७० जे संसदेने रद्द केले आहे. ते परत आणण्याचा प्रश्नच नाही, तरी पंतप्रधान आव्हान देत होते.

पवार म्हणले, “देशाचा पंतप्रधान विरोधी पक्षाच्या नेत्यांना, ‘डूब मरो’, असे जे म्हणतात ते त्यांना त्यांच्या पदाला शोभा देत नाही.”

साताऱ्यामध्ये भाजपचे लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा मोठ्या फरकाने पराभव होत असल्याचे चित्र आहे. त्याविषयी बोलताना ते म्हणाले, “गादीची प्रतिष्ठा न ठेवण्याची काही जणांची भूमिका असेल, तर लोक काय करतात याचे सातारा, हे उत्तम उदाहरण आहे. श्रीनिवास पाटील यांना मोठ्या प्रमाणावर जनतेने पाठींबा दिला.” पवार म्हणाले, की काही अपवाद वगळता, पक्षांतराला लोकांनी पाठींबा दिला नाही. पक्ष सोडून गेलेल्या लोकांविषयी जनतेची प्रतिक्रिया नकारात्मक होती.

पवारांचे राजकारण आता संपेल, असे जे देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा म्हणत होते, त्याविषयी बोलताना पवार म्हणाले, की त्यांचे ज्योतिषशास्त्राचे ज्ञान किती आहे, याची मला कल्पना नव्हती. पण पंतप्रधान आणि गृहमंत्री आता महाराष्ट्राला सहकार्य करतील, अशी आशा आहे.

भाजपच्या जागा कमी झाल्याने शिवसेनेचा आवाज वाढला आहे. शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, की जनतेने सगळ्यांचेच डोळे उघडले आहेत. ते म्हणाले, “जी काही भाजप बरोबर चर्चा होईल, ती पारदर्शकपणे केली जाईल.” सत्ता एकत्रितपणे राबविण्यासाठी ५०-५० टक्के सहभाग ठरविला जाईल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0