मध्य प्रदेशात ‘लव्ह जिहाद’ विधेयक

मध्य प्रदेशात ‘लव्ह जिहाद’ विधेयक

नवी दिल्लीः ‘लव्ह जिहाद’ या शब्दाचा भारतीय कायदा व्यवस्थेत उल्लेख नाही पण मध्य प्रदेश सरकारने ‘लव्ह जिहाद’ला कायद्याच्या कक्षेत आणण्याचे प्रयत्न सुरू केले असून बळजबरीने, फसवणूक करून, धर्मांतराच्या उद्देशाने हिंदू-मुस्लिम विवाह केल्याचे आढळून आल्यास संबंधितांना ५ वर्षांची कडक शिक्षा ठोठावण्याबरोबर असे गुन्हे दखलपात्र व अजामीनपात्र असतील अशा तरतुदींचे एक विधेयक मध्य प्रदेशमधील भाजप सरकार विधानसभेत लवकरच आणणार आहे. राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी मंगळवारी हे सरकार लव्ह जिहाद रोखणारे विधेयक आणणार असल्याचे जाहीर केले.

या विधेयकात असा विवाह बळजबरी, फसवणूक, धर्मांतराच्या दृष्टीने केल्याच्या तरतुदी असतील पण अशा विवाहाला साह्य करणार्या अन्य जणांवरही कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे मिश्रा यांनी सांगितले. प्रेमाच्या नावाखाली असा लव्ह जिहाद खपवून घेतला जाणार नाही असे यापूर्वी म. प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी स्पष्ट केले होते. असे विवाह होऊ नये म्हणून कायदेशीर तरतुदी केल्या जातील असे ते म्हणाले होते.

म. प्रदेशच्या अगोदर हरयाणा व उ. प्रदेशमधील भाजप सरकारनेही लव्ह जिहादसंदर्भात कायदे करणार असल्याचे जाहीर केले होते. जौनपूर येथे एका जाहीर सभेत उ. प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी, केवळ लग्नासाठी धर्मांतर करणे हे अयोग्य असल्याचे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मत उद्धृत केले आणि आपले सरकार असे विवाह होऊ नये म्हणून कडक कायदे करेल अशी घोषणा केली होती.

भाजपशासित कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनीही राज्यात असा कायदा आणणार असल्याचे सूचित केले होते. राज्यातल्या मुलींना प्रेम व पैशाचे आमिष दाखवून भूलवले जाते व त्यांचे धर्मांतर केले जाते, हा मुद्दा सरकारने गंभीरपणे घेतला आहे, असे ते पक्षाच्या कार्यकारणीच्या बैठकीत म्हणाले होते.

गेल्या महिन्यात राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांची देशातल्या वाढत्या लव जिहाद प्रकरणाविषयी चिंता व्यक्त केली होती.

पण माहिती अधिकारात महिला आयोगाकडून देशात किती लव जिहादची नोंद आहे, अशी माहिती विचारली असता, तशी माहिती आयोगाकडे नसल्याचे दिसून आले होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण व्हावी व मतांचे ध्रुवीकरण व्हावे या उद्देशातून हिंदू मुलगी व मुस्लिम मुलगा यांच्यातील विवाहाला ‘लव्ह जिहाद’ असे म्हणण्यात सुरूवात केली होती व असा प्रचार गेले कित्येक वर्षे सुरू आहे.

मूळ बातमी

COMMENTS