“टाइगर अभी जिंदा है" अशी एक प्रतिक्रिया भाजपवासी काँग्रेसचे बंडखोर नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिलेली आहे. ही प्रतिक्रिया ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आगामी महत्त्वाकांक्षांना अधोरेखित करणारी आहे.
भोपाळः मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी गुरुवारी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. या मंत्रिमंडळात ज्योतिरादित्य शिंदे गटाच्या आमदारांची संख्या अधिक दिसून आली. आपले सरकार अधिक स्थिर राहावे या उद्देशाने ज्योतिरादित्य गटाला चौहान यांनी मंत्रिमंडळात स्थान दिले आहे.
२४ मार्चला देशव्यापी लॉकडाऊन पुकारल्यानंतर दोनएक दिवसांत शिवराजसिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांनी कॅबिनेटची घोषणा केली नव्हती. गेले तीन महिने हे सरकार मोजक्याच मंत्र्यांच्या भरवशावर काम करत राहिले. आता मंत्रिमंडळात काँग्रेसमधून बंडखोरी करून भाजपमध्ये सामील झालेले बिशाहूलाल सिंग, एदाल सिंग कानसाना, हरदीप सिंग डांग व ज्योतिरादित्य यांचे कट्टर पाठिराखे असलेल्या सहा आमदारांना कॅबिनेट दर्जाची मंत्रिपदे दिली आहेत.
बिशाहूलाल सिंग व कानसाना यांना मागील कमलनाथ सरकारमध्ये स्थान मिळालेले नव्हते. पण हे दोघे आमदार या पूर्वी दिग्विजय सिंह यांच्या १९९८-२००३ या काळातल्या सरकारमध्ये मंत्रिपदावर होते. या दोघांना कॅबिनेट तर डांग यांना राज्यमंत्रीपद मिळालेले आहे.
एकूणात २८ मंत्रिपदांपैकी २० मंत्रिपदे कॅबिनेट दर्जाची तर ८ राज्यमंत्रीपदे आहेत. २१ एप्रिलला शिवराजसिंह चौहान यांनी आपले मिनी मंत्रिमंडळ तयार केले होते. यात ५ खात्यांची मंत्रिपदे जाहीर करण्यात आलेली होती. त्यात दोन खाती ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नजीकचे तुलसी सिलावत व गोविंद सिंग राजपूत यांना देण्यात आली होती. आता ३३ मंत्र्यांचे मंत्रिमंडळ तयार झाले असून मर्यादा ३४ इतकी आहे. २३० विधानसभा सदस्यांच्या म. प्रदेश मंत्रिमंडळात १५ टक्केच सदस्यांना मंत्रिपद मिळू शकते.
काँग्रेसच्या २२ आमदारांनी बंडखोरी केली होती त्यातील १४ जणांना मंत्रिपदे बहाल करण्यात आली आहेत. या मंत्रिपद वाटपावरून स्पष्ट दिसतेय की ज्योतिरादित्य शिंदे यांचा वरचष्मा चौहान यांच्या सरकारवर राहणार आहे. आणि हे एका अर्थाने चौहान यांच्या विधानातून दिसून आले.
ते म्हणाले, “मंथन से तो अमृत ही निकलता है, विष तो शिव पी जातें है”. या विधानावरून स्पष्ट लक्षात येते की ज्योतिरादित्य शिंदे यांनी सरकारमध्ये आपले स्थान बळकट केले आहे. आणि शिवराज सिंह चौहान यांना आपल्या सहकार्यांना सरकारमध्ये फारसा वाटा देता आलेला नाही.
गुरुवारी चौहान यांनी एक ट्विट केले, या ट्विटमध्ये त्यांनी आपल्या सर्व मंत्रिमंडळ सदस्यांचे अभिनंदन केले, आपण सर्वजण एकत्रित काम करू व राज्याच्या विकास व कल्याणकारी कार्यक्रमांना प्राधान्य देऊ. मला आत्मविश्वास आहे की तुम्हा सर्वांचा मला पाठिंबा मिळेल, असे ते म्हणाले.
चौहान यांच्या या ट्विटनंतर काँग्रेसने लगेचच भाजपवर प्रहार करण्याची संधी सोडली नाही. माजी मुख्यमंत्री कमल नाथ यांनी एकाही ज्येष्ठ भाजप नेत्याला चौहान यांच्या मंत्रिमंडळात स्थान नाही व त्याचे मला दुःख होत असल्याचा टोला मारला.
चौहान आपल्या कॅबिनेट विस्तारासाठी काही महिने थांबले होते. दोनदा कॅबिनेट विस्तार ढकलण्याची वेळ त्यांच्यावर आल्याने काँग्रेस आक्रमक झाली होती. अखेरीस दोन दिवसांपूर्वी त्यांनी नवी दिल्लीत जाऊन एक दिवस तळ ठोकला. यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर कॅबिनेटची नावे निश्चित झाली.
मध्य प्रदेशच्या राजकारणात अनेक वर्षे शिवराजसिंह चौहान यांचे स्थान बळकट होते. या अगोदर त्यांना एकदाही मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी एवढा वेळ थांबावे लागले नव्हते. एवढ्या राजकीय अडचणीही त्यांच्यापुढे नव्हत्या. दिल्लीशी सल्लामसलतीचा सवालच आला नव्हता. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.
कॅबिनेटमधून वगळण्यात आलेले गौरी शंकर बिसेन, पारस जैन, रामपाल सिंग, जलाम सिंग पटेल, सुरेंद्र पटवा व राजेंद्र शुक्ला यांनी अद्याप आवाज उठवलेला नाही. पण भाजपामध्ये मंत्रीपदाची इच्छा बाळगून असलेले अनेक नेते आहेत. या नेत्यांचा असंतोष व संताप सरकारला झेलावा लागणार आहे.
राज्यात सत्तेची दोन केंद्रे
ज्योतिरादित्य सिंग यांचा मंत्रिमंडळातील वरचष्मा पाहता या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून चौहान व ज्योतिरादित्य शिंदे अशी दोन सत्ता केंद्रे निर्माण झाली आहेत हे स्पष्ट दिसत आहे.
राज्यात आता कोणी कोणती जबाबदारी पार पाडायची आहे, याची निश्चिती केली गेलेली नाही.
एका भाजप आमदाराची प्रतिक्रिया बोलकी आहे, ते दूरध्वनीवरून म्हणाले, पूर्वी आम्ही सहजपणे मुख्यमंत्र्यांना भेटत होतो. आता सत्तेच्या नव्या समीकरणात आम्हाला मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचण्यासाठी सावधानता बाळगावी लागेल. हा जो काही बदल झाला आहे तो आम्हाला मान्य नाही.
राज्यातल्या भाजपच्या नेत्यांना ज्योतिरादित्य शिंदे व त्यांच्या काँग्रेस बंडखोर समर्थकांच्या सध्यातरी नाकदुर्या काढाव्या लागणार आहेत. काही महिन्यांनी ही नवी समीकरणे जुळली आहेत की नाही हे लक्षात येईल.
जर बंडखोर काँग्रेसच्या आमदाराला उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यास मुख्यमंत्री चौहानांना तो एक शह असेल. कारण तो ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिलेला असेल. आणि तसे वक्तव्य त्यांनी केलेले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर लगेचच त्यांनी “अन्याय के खिलाफ लड़ना हमारा कर्तव्य है, यहां तक कि अगर इसका मतलब युद्ध है, तो ज्योतिरादित्य सिंधिया अग्रिम पंक्ति में होंगे. पिछले दो महीनों से लोग मेरे चरित्र को कलंकित करने की कोशिश कर रहे हैं. मैं उन्हें बताना चाहता हूं – टाइगर अभी जिंदा है” अशी एक प्रतिक्रिया दिली आहे.
ही प्रतिक्रिया ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आगामी महत्त्वाकांक्षांना अधोरेखित करणारी आहे.
एकंदरीत काँग्रेस आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवराज सिंह चौहान यांना सत्ता स्थापन करण्यास फारसे कष्ट पडले नाहीत. पण आता सत्ता चालवताना त्यांना मोठीच कसरत करावी लागणार आहे. त्यांनी अपेक्षा केले नसेल एवढे राजकीय आव्हान त्यांच्यापुढे उभे ठाकले आहे.
मूळ लेख
COMMENTS