केंद्रातील भाजपचे सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सतत टीका केल्यामुळे १०२ वर्षांचे स्वातंत्र्यसैनिक व कर्नाटकाच्या राजकीय क्षेत्रातील एक आदरणीय व्यक
केंद्रातील भाजपचे सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सतत टीका केल्यामुळे १०२ वर्षांचे स्वातंत्र्यसैनिक व कर्नाटकाच्या राजकीय क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्व असलेल्या एच. एस. दोराईस्वामी यांच्यावर कर्नाटकातल्या भाजपच्या एका आमदाराने ते ‘फेक फ्रीडम फायटर’ (खोटारडे स्वातंत्र्य सैनिक) व ‘पाकिस्तानी एजंट’ असल्याचा आरोप केला आहे. या आरोपाचे समर्थन भाजपचे एक बडे नेते व केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह अनेक नेत्यांनी केल्याने कर्नाटकात राजकीय गदारोळ उडाला आहे.
विजापूर येथील भाजपचे आमदार बसवगौडा पाटील यत्नाळ यांनी दोराईस्वामींवर यांच्यावर टीका केली आहे. दोराईस्वामी यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभागी असलेले पुरावे द्यावेत असे आव्हान बसवगौडा पाटील यत्नाळ यांनी दिले आहे. या आव्हानाला उत्तर म्हणून दोराईस्वामी यांचा १९४२च्या ‘चले जाओ’ चळवळीतला सहभाग, त्या संदर्भातील पुरावे, त्यांनी भोगलेल्या कारावासाचे दाखले, गेले ६० वर्षे त्यांचे कर्नाटकातल्या सार्वजनिक जीवनात असलेले काम याचीच माहिती काँग्रेस व अन्य नागरी संघटना, विचारवंतांनी जाहीर केली आहे. कर्नाटकातल्या अनेक नागरी संघटनांनी भाजपच्या आमदारांच्या अशा आरोपाचा निषेध करत कर्नाटकातील एका उत्तुंग व्यक्तीचा अपमान झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
तर ज्येष्ठ इतिहासकार व विचारवंत रामचंद्र गुहा यांनी दोराईस्वामींविरोधात भाजप आमदारांकडून होणारे असे आरोप धक्कादायक व निंदनीय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दोराईस्वामी हा कर्नाटकाचा आवाज आहे. अत्यंत शालीन, प्रामाणिक असलेले हे व्यक्तिमत्व कर्नाटकाच्या सामाजिक, पर्यावरण चळवळीतील एक अग्रेसर नाव आहे, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी जमिनीवर लढणारा हा कार्यकर्ता असून काँग्रेस सत्तेवर असतानाही दोराईस्वामींनी जमिनीच्या प्रश्नांवर रस्त्यावर येऊन संघर्ष केला होता, अशा व्यक्तिमत्वाला पाकिस्तानचा एजंट म्हणणे हे धक्कादायक तर आहेच पण अशी टीका झाल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मौन का पाळले आहे, असा सवाल गुहा यांनी केला आहे. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना शेतकऱ्यांच्या हिताचे राजकारण करण्याचे कबूल केले होते पण शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यावर अशी टीका ते कशी सहन करू शकतात, असा सवालही गुहा यांनी येडीयुरप्पांना उद्देशून केला आहे.
कर्नाटकातल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातील एक कार्यकर्ते एस. आर. हिरेमठ यांनीही म. गांधींच्या मूल्यांचा वारसा जपणाणाऱ्या वंदनीय व्यक्तीला पाकिस्तानचा एजंट म्हणणे, दंगल पेटावी म्हणून ते चिथावणीखोर विधाने करतात असा आरोप करणे हे हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे.
दोराईस्वामी यांना पाकिस्तानचा एजंट म्हणण्यामागे आणखी एका घटनेचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटकात सीएए विरोधी आंदोलनात पाकिस्तान व हिंदुस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या अमुल्या नरोन्हा या तरुणीच्या अटकेला दोराईस्वामींनी विरोध केला होता. त्यावेळेपासून बसवगौडा यत्नाळ यांनी दोराईस्वामींना आपले लक्ष्य केले आहे. दोराईस्वामी अमूल्याच्या घरात गेले होते असाही एक आरोप बसवगौडा यत्नाळ यांनी केला आहे.
दरम्यान, भाजप नेत्याच्या या आरोपाला उत्तर देताना दोराईस्वामी यांनी ही माझी वैचारिक लढाई असून भाजप व संघात माझे अनेक मित्र आहेत. पण भाजपकडून मला पाकिस्तानी एजंट म्हटले जाईल याची मनात कधीही शंका आली नव्हती. आजपर्यंत मी अनेक सत्ताधाऱ्यांवर टीका केली. एका नागरिकाचे कर्तव्य म्हणून ते बजावत आलो आहे. मी आणीबाणीत इंदिरा गांधी सरकारवर टीका केली होती. आपण हुकुमशाहसारखे वागू शकत नाही असे मी त्यांना पत्रात लिहून पाठवले होते. आणीबाणीच्या काळात मी चार महिने तुरुंगात होतो. टीका करणे हा नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे, असे दोराईस्वामी म्हणाले. नक्षल्यांना लोकशाही प्रक्रियेत आणावे अशी माझी पूर्वीपासून भूमिका आहे पण मला भाजपकडून नक्षली ठरवले जाते. मी चिंतेत नाही. पण आपला आवाज दाबला जातो हे महत्त्वाचे आहे. राज्यघटना आपले संरक्षण करेल पण माझे जीवन हे काचेसारखे पारदर्शक आहे, जोपर्यंत जनता माझ्यासोबत आहे तोपर्यंत भूक, रोजगार, शिक्षणावर माझा संघर्ष सुरूच राहील, असे दोराईस्वामी म्हणाले.
मूळ बातमी
COMMENTS