मध्य प्रदेशमधील विजय रा.स्व.संघामुळे

मध्य प्रदेशमधील विजय रा.स्व.संघामुळे

रा.स्व.संघाच्या नेत्यांनी भाजपच्या प्रचार मोहिमेपेक्षा स्वतंत्र धोरण आखलेले होते. भाजप ज्या ज्या मतदारसंघात कमजोर होता, त्या मतदारसंघांची त्यांनी यादी बनवली आणि तेथेच आपली सर्व ऊर्जा लावली.

‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटांचे खेळ : एक प्रचारकी खेळी
‘जूनचा पगार द्या’ बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांचे पंतप्रधानांना पत्र
मगरमच्छके आंसू …

व्ही.डी.शर्मा या बुंदेलखंडमधल्या भाजपच्या फारशा प्रसिद्ध नसणाऱ्या नेत्याने निवडणुकीच्या रिंगणात काहीसा उशीरा प्रवेश केला, तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. खजुराहोमध्ये तर त्यांच्या उमेदवारीला उघड उघडच विरोध करण्यात आला होता. तिथं अगदी त्यांच्या प्रतिमेचे दहनही करण्यात आले होते. त्यावेळी भाजप नेते आणि कार्यकर्ते ‘व्ही.डी. शर्मा वापस जाओ’ अशा घोषणाही देत होते.

बाजूच्याच टिकमगड मतदारसंघातदेखील स्थानिक नेत्यांनी वीरेंद्र खटिक यांच्या उमेदवारीला असाच विरोध केला होता. या विरोधकांमध्ये तर त्या परिसरातले निर्वाचित आमदारही होते. त्यांपैकी आर.डी. प्रजापती या आमदाराने पदाचा राजीनामा देऊन समाजवादी पक्षाच्या उमेदवारीवर लोकसभेची ही निवडणूकदेखील लढवलेली होती.

आदिवासी समाजाचे वर्चस्व असणाऱ्या बालाघाट या मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार बोधसिंग भगत यांच्याऐवजी फारशा कुणाला नसणाऱ्या धालसिंग बिसेन यांना तिकिट दिले होते. अखेर पक्षाने तिकिट न दिल्यामुळे नाराज झालेल्या भगत यांनी ही निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवली.

भोपाळमध्ये कुणीच प्रज्ञा ठाकूर यांच्या उमेदवारीला प्रकटपणे विरोध जरी केलेला नसला, तरी स्थानिक भाजप नेत्यांनी त्यांच्या प्रचारमोहिमेत मनाविरुद्धच भाग घेतल्याचे दिसत होते. शिवाय त्यांच्या प्रचारमोहिमेत अनेक भाजप नेत्यांची गैरहजेरी अगदीच उघड उघड दिसून येत होती.

राज्यांतल्या अर्ध्या डझनांहून अनेक उमेदवारांविरुद्ध नेते व कार्यकर्त्यांत अशी नाराजीची भावना दिसून येत होती. मात्र निवडणुकीअखेर या सर्व उमेदवारांनी दोन लाखांहून अधिक मताधिक्यानं विजय मिळवल्याचे दिसून आले. या विजयामागचे रहस्य काय होते? याचे उत्तर आहे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (रा.स्व. संघ).

मोदी लाट तर होतीच, पण त्यासोबतच रा.स्व. संघाने सगळा परिसर पिंजून काढल्यामुळे तेथे एक अभूतपूर्व रसायन तयार झाले होते. – हे मतदारसंघ होते धर, रतलाम, खारगान, बेवास, बालाघाट, खजुराहो आणि काही अन्य.

या सगळ्या प्रचारमोहिमेच्या हंगामादरम्यान संघाशी संलग्न असणाऱ्या चार संस्थांनी, म्हणजे वनवासी कल्याण आश्रम, विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान, भारतीय मजदूर संघ आणि विश्व हिंदू परिषद या साऱ्यांनीच अगदी तळागाळात मोठ्या प्रमाणावर काम करून भाजपची मते दुसरीकडे जाणार नाहीत याची काळजी घेतली.

रा.स्व. संघाशी संबंधित वेगवेगळ्या संस्थांनी दररोज स्त्रिया आणि तरूण मतदार यांसोबत अनेक बैठका घेतल्या. रा.स्व. संघाच्या एका कार्यकर्त्याच्या म्हणण्यानुसार, अशा मतदारांना ’तुमच्यामध्ये बदल घडवून आणण्याची व इतिहास बदलण्याची शक्ती आहे’ असे सातत्याने सांगितले जात होते. रतलाम, धर आणि खारगान इथे तर वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्यांच्या टीमने उमेदवार घोषित होण्याआधीच प्रचारमोहिमेला सुरुवात केलेली होती.

माळवा इथल्या रा.स्व.संघाच्या एका उच्चपदस्थाने सांगितले, “आमचे काम सहा महिन्यांपूर्वीच सुरू झालेले होते. आम्ही बोलताना कुठल्याच राजकीय पक्षाचा किंवा जातीचा उल्लेख केला नाही, तर केवळ राष्ट्रीयत्वाच्या, राष्ट्रीय सुरक्षेच्या आणि सर्व क्षेत्रातल्या सामाजिक विकासाच्या मुद्द्यांवरचा आम्ही बोलत होतो. जो पक्ष देश आणि देशबांधव यांच्याकरता ठामपणे उभा राहील अशाच पक्षाची नीटपणे पारख करून त्याला मत द्यायला आम्ही लोकांना सांगत होतो.

“रा.स्व. संघाच्या वरिष्ठ पातळीवर असणाऱ्या कार्यकर्त्यांनी पडद्याआडून आपली भूमिका बजावली. त्यांनी स्थानिक पातळीवरील नेत्यांसोबत अनेक बैठका घेतल्या आणि त्या सगळ्यांना एकत्र आणले,” असे काँग्रेसचा एक प्रवक्ता सांगतो. भिंडसारख्या मतदारसंघात भाजपच्या उमेदवार संध्या राय यांना कुणी साधे ओळखतदेखील नव्हते, मात्र रा.स्व. संघाच्या प्रचारामुळे त्या विजयी झाल्या, असे या काँग्रेस नेत्याने दाखवून दिले.

आपल्या विजयानंतर व्ही.डी. शर्मा म्हणाले, “मी रा.स्व. संघाचा आणि मोदीजींचा आभारी आहे. अर्थातच माझ्या मतदारसंघातल्या ज्या लोकांनी मला आशीर्वाद दिले त्यांचा तर मी ऋणी राहीनच.”

राजगड इथल्या एका काँग्रेस नेत्याने सांगितले, “मोदी लाटेसोबतच रा.स्व. संघाने मोठा बदल घडवून आणला. येथे प्रस्थापित उमेदवाराविरुद्ध जनमत आहे, असे वरकरणी वाटत असतानाही अखेर या मतदारसंघात भाजपचेच रोडमल नागर मोठ्या मताधिक्यानं निवडून आले.

भोपाळमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंग यांना मोठा पराभव पत्करावा लागला. प्रज्ञा ठाकूर यांच्या प्रचारासाठी रा.स्व.संघाचे स्वयंसेवक दारोदार फिरून प्रचार करत होते. अनेकदा तर ते संघाच्या गणवेशातही दिसत असत.

“येथे रा.स्व. संघाकडेच सगळ्याचे नियंत्रण होते,” काँग्रेसच्या प्रचारप्रमुखाने सांगितले.

माळवा – निमरमध्येदेखील आधीपासून काँग्रेसची पाळंमुळं खोलवर रुजलेली असतानादेखील रा.स्व. संघाने सहा महिन्यांत मोठा चमत्कार घडवून आणला. एकीकडे पक्षाचे उमेदवार आणि त्यांच्या टीम बैठका घेण्यात मग्न असतानाच दुसरीकडे रा.स्व. संघाचे कार्यकर्ते मात्र मतदारसंघ अगदी खोलवर पिंजून काढून मतदारांना चहापानाच्या निमित्ताने भेटत होते.

सरसंघचालक मोहन भागवत यांनीही १९ – २२ फेब्रुवारी या काळादरम्यान इंदौर येथेच तळ ठोकलेला होता. तेथे त्यांनी वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन निवडणुकीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी त्यांना अधिक प्रोत्साहित केले होते.

आपले नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर रा.स्व. संघाचा एक वरिष्ठ नेता म्हणाला की, भाजपला इंदोरमधली ७०% मतं संघाच्या कामामुळे मिळाली. “आमचे स्वयंसेवक त्या दिवशी मतदारसंघात अगदी पहाटेपासून फिरून कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला मतदान करण्याचे आवाहन करत होते. आम्ही इंदौरवर संपूर्णपणे लक्ष केंद्रित केलेले होते. आम्ही व्यवस्थित योजना बनवलेली होती आणि त्यानुसार दारोदार फिरून नीट प्रचार केला होता,” असे त्यांनी पुढे सांगितले.

इंदोरमधल्या भाजपच्या उमेदवाराला,  म्हणजे शंकर ललवाणी यांना ते रा.स्व.संघाचे स्वयंसेवक असूनही एका निष्ठावंताच्या गटाच्या क्षोभाला सामोरे जावे लागलेले होते. या मतदारसंघात सुमित्रा महाजन यांना उमेदवारी देण्यात आलेली नव्हती, हे यामागचे कारण होते.

रा.स्व. संघाने येथे राष्ट्रीय सुरक्षा, देशाचा विकास आणि सुरक्षितता यांबाबतची मतदारांची मते जाणून घेण्यासाठी त्यांना भरण्यासाठी काही फॉर्मही वाटलेले होते.

“जेव्हा उमेदवार जेव्हा झोपी गेलेले असायचे, त्या वेळीदेखील आम्ही मतदारांशी संवाद साधतच होतो. मग ती भली पहाट असो की उत्तररात्र झालेली असो,” असे एका रा.स्व. संघाच्या नेत्याने सांगितले.

काशीफ कक्वी हे दिल्लीस्थित पत्रकार असून ते मध्य प्रदेशचे वार्तांकन करतात.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: