बौद्ध की महार वाद : स्वाभिमान हवा की सवलती ?

बौद्ध की महार वाद : स्वाभिमान हवा की सवलती ?

सध्या देशात धर्मांतरीत बौद्धांनी शाळेच्या दाखल्यावर जात कोणती लिहायची ? की लिहायचीच नाही ? यावर वाद सुरू आहे. या प्रश्नावर टाकलेला हा प्रकाश झोत...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हिंदू धर्मास चार इमल्याची माडी म्हणतात. जो ज्या इमल्यावर जन्मला त्याने त्याच इमल्यावर मरायचे. वरच्या इमल्यावरील व्यक्ती कितीही नालायक असला, तरी त्याला खालच्या मजल्यावर ( इमल्यावर) ढकलून देण्याची त्यात तरतूद नाही. तसेच खालच्या मजल्यावरील माणूस कितीही विद्वान किंवा लायक असला, तरी त्यास वरच्या मजल्यावर जाण्यास शिडीच अस्तित्वात नाही. हे इमले म्हणजे  ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चार वर्ण आहेत. पूर्वी हिंदू धर्म चार वर्णात विभागलेला होता. सध्या वर्णाचे रूपांतर जातप्रथेत झालेले आहे आणि जातव्यवस्था प्रबळ आहे

धर्म मग तो कोणताही असो. धर्मात जात आली की, जो ज्या जातीत जन्मला त्याने त्याच जातीत मरायचे, हे ठरलेलेच असते. तसेच जो ज्या जातीचा असेल, त्याचे पोटी जन्मलेले अपत्य देखील त्याच जातीचे असते. म्हणजे कोण – कोणाच्या पोटी जन्माला यावरून जात ठरते. जातव्यवस्थेत गुणवत्तेला थारा नसतो. जातीवरच गुणवत्ता ठरवली जाते. जात हाच श्रेष्ठता किंवा कनिष्ठतेचा मापदंड असतो. वर्णाश्रमाप्रमाणे जातीची देखील उतरंड आहे. एक जात दुसऱ्या जातीस कनिष्ठ समजते. विशेष म्हणजे प्रत्येक जात स्वतःस श्रेष्ठ समजते. हे ही विशेषच. गेली अनेक वर्ष ही रचना चालू आहे. यात कोणासही आपण भरडले जातोय, आपले शोषण होत आहे, असे वाटत नाही. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल, असे म्हटले आहे. असे बंड त्यांनी घडवून आणलेले आहे.

आंबेडकरांचे सर्वात महत्त्वाचे बंड म्हणजे, धम्म (धर्म) प्रवर्तनाच. धर्म बदलाच्या या बंडाने हिंदू धर्मीय नव्हे तर, इतर धर्मीय, सर्व जगच हादरून गेले. बदल हा निसर्गतः घडतो. उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो. पावसाळ्यानंतर हिवाळा येतो. कळीचे रूपांतर फुलात होते. या बदलास परिवर्तन म्हणतात. परंतु, बाबासाहेबांनी घडवलेला बदल निसर्गनिर्मित नव्हता तो मानवनिर्मित होता. म्हणून ते परिवर्तन नव्हे तर प्रवर्तन होते. ठरवून केलेले वर्तन. यात वर्तन महत्त्वाचे आहे.

मुस्लिम धर्मीयांना ते मुस्लिम व्हावेत, ख्रिश्चनांना ते ख्रिश्चन व्हावेत, शिखांना ते शीख व्हावेत असे वाटत होते. अनेकांनी त्यांना आपल्या धर्मात यावे, म्हणून आमिषही दाखविले होते. मात्र, ६ लाख अनुयायांसह बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. अशा धम्माचा त्यांनी स्वीकार केला की, ज्यात नशीब, स्वर्ग, कर्म, मोक्ष, कर्मकांड किंवा पुनर्जन्म अशा भाकड कल्पनांना थाराच नाही.  विशेष म्हणजे जातीचा तर लवलेशही नाही. जात विरहित धम्म त्यांनी आम्हाला दिला.

धम्म प्रवर्तनाला आता ६० वर्षे पूर्ण झाले आहेत. बाबासाहेबांचा लढा म्हणजे जातीअंताचा लढा आहे. जातीचा अंत करण्याची एक पद्धती म्हणून देखील बौद्ध धम्माकडे बाबासाहेब पाहतात. अनेक नद्यांचे पाणी समुद्रात मिळाल्यानंतर हे पाणी कोणत्या नदीचे हे जसे सांगता येत नाही. तसेच कोणत्याही जातीचा किंवा वर्णाचा मनुष्य बौद्ध धम्मात आल्यास त्याची पूर्वीची ओळख संपते, असे बुद्ध म्हणतात. परंतु, आम्ही बाबासाहेबांच्या धम्म चक्र प्रवर्तनानंतर देखील आमची ओळख पुसू नये म्हणून दक्षता घेत आहोत. समाजात वावरताना स्वतःस अनेक जण बौद्ध म्हणून घेतात. परंतु, शाळेच्या दाखल्यावर मात्र, हिंदू-महार लिहितात किंवा काही महाभाग तर बौद्ध-महार असेही लिहितात.

असे का? तर दाखल्यावर बौद्ध म्हणून लिहिल्यास शासकीय सवलती मिळणार नाहीत. पूर्वी महारांना वतनाचे प्रेम अधिक होते. वतनातून मिळणाऱ्या उत्पन्नास लाथ मारण्यास महार तयार नव्हते. वतनामुळे महार स्वाभिमानशून्य झाले होते. त्यामुळे महार वतन खालसा करण्याचा लढा बाबासाहेबांना उभारावा लागला. तशीच काहीशी परिस्थिती आज आहे. सवलतीच्या वतनासाठी अनेक जण पूर्वाश्रमीच्या महार जातीला चिकटून आहेत. या विद्वान महाभागांना हे अद्यापही माहीत नाही की, महाराष्ट्रातील धर्मांतरित बौद्धांचा (पूर्वाश्रमीचे महार) समावेश अनुसूचित जातीत आहे. ज्या सवलती महार, मांग, चांभार आदींना आहेत त्याच सवलती बौद्धांना आहेत. केंद्र सरकारच्या दृष्टीने देशातील बौद्ध अल्पसंख्यांक आहेत. तसेच धर्मांतरित बौद्ध अनुसूचित जातीत येतात. अल्पसंख्यांकांना, बौद्धांनाही सेवा सवलती आहेत. आणि अनुसूचित जातीत गणल्या जाणाऱ्या बौद्धांनाही सवलती आहेत.

असे असले तरी, महार वतन नष्ट करण्यासाठी आंबेडकरांनी शेवग्याच्या शेंगाचे परिणामकारक उदाहरण सांगितले होते. त्या उदाहरणाची आठवण या अनुषंगाने होते. एका कुटुंबाच्या दारात शेवग्याचे झाड असते. या झाडास येणाऱ्या शेंगा विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे ते इतर कोणतेही काम करत नाहीत. सर्व कुटुंबच आळशी बनते. पुढे कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढते. उपासमारीची वेळ येते. परंतु, तरीही कुटुंबातील कोणीही काम करीत नाहीत. एक दिवस एक पाहुणा त्यांच्याकडे रात्री मुक्कामास येतो. कुटुंबातील सर्व लोक झोपल्यानंतर पाहुणा गुपचूप शेवग्याचे झाड तोडून टाकतो आणि निघूनही जातो. सकाळी ही बाब कुटुंबियांच्या निदर्शनास येते. ते त्या पाहुण्यास शिव्या- शाप देतात. तो दिवस कसाबसा जातो. रात्री सर्व कुटुंबीय एकत्र जमतात आणि उदरनिर्वाहाचे साधन राहिले नाही, म्हणून आता घर सोडले पाहिजे, असे ठरवतात. सर्वांनी घर सोडले. त्यांना व्यवस्थित रोजगार मिळाला. वर्ष दोन वर्षात घर सुधारले. नंतर सर्व कुटुंबीय दिवाळीच्या निमित्ताने घरी एकत्र येतात. त्यांना झाड तोडणाऱ्या पाहुण्याची आठवण येते. ते त्या पाहुण्यास घरी बोलावून आणतात. त्याचे पाय धरतात आणि कबूल करतात की, तुम्ही झाड तोडले नसते, तर आम्हाला घर सुटले नसते, आणि दारिद्र्य नष्ट झाले नसते. अशीच काहीशी परिस्थिती शासकीय सवलतींमुळे होत तर नाही ना?

बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जातीचा अंत करणारी आहे. जातीला चिटकून राहणारी किंवा जात बळकट करणारी नाही. म्हणूनच जात नाकारणारा धम्म बाबासाहेबांनी आम्हाला दिला आहे. पण, आमच्याकडून धम्माला धर्म करण्याची प्रक्रिया होत आहे. बाबासाहेब मी भारत बौद्धमय करेन म्हणाले होते. बौद्धमय भारताचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. ते आता हयात नाहीत. त्यामुळे बाबासाहेबांचे वैचारिक वारसदार म्हणून ती जिम्मेदारी आम्ही घेण्यास तयार आहोत काय? याचे उत्तर नकारार्थीच अधिक मिळत आहे.

बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून माणुसकी, नीती, सेक्युलॅरिझम, आदींवर आम्ही मोठमोठ्या गप्पा मारतो. पण, ‘मी हिंदू म्हणून जन्मलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही’, ही बाबासाहेबांनी घोषणा केली होती. त्यानुसार ते वागले देखील. आम्ही किती दिवस अनुकरणाने किंवा जात म्हणून हिंदू राहणार आहोत?

बाबासाहेबांच्या जातीत जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती स्वतःस बौद्ध समजतो. खरेच ते बौद्ध आहेत काय? बौद्ध बनणे इतके सरळ आणि सोपे आहे का? बौद्ध म्हणजे एक जात नाही, हे समजून घेणे गरजेचे आहे. ज्या जातीच्या व्यक्तीच्या पोटी तुम्ही जन्माला येतात, त्या व्यक्तीच्या जातीचे तुम्ही आपोआप बनता. मात्र, हे सूत्र बौद्ध धम्मास लागू होत नाही. कोणी बौद्ध कुटुंबात जन्मला म्हणून तो स्वतःस बौद्ध म्हणवून समाधानी होऊ शकेल. परंतु, याने तो बौद्ध ठरत नाही. तसेच कोणी निरीश्वरवादी आहे म्हणून बौद्ध ठरत नाही. कोणी (धम्म) दान करतो म्हणून बौद्ध ठरत नाही. बौद्ध धम्म हा आचरणाचा भाग आहे. आणि आचरणात नीती महत्त्वाची आहे. बौद्ध धम्माचा केंद्रबिंदू ‘नीती’ हा आहे. नीतिमत्तेचे धडे दुसऱ्यास देणे सोपे असते. स्वतःस नीतिमान बनवणे कठीण असते. नीतिमान माणूस बनणे म्हणजेच बौद्ध धम्मीय बनणे होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजेच नीती असे म्हटलेले आहे.

आचरणाचा आणि नीतीचा घनिष्ट संबंध आहे. निळा टिळा कपाळी लावून मी बौद्ध आहे हे गर्जून सांगायचे, आणि शाळेच्या दाखल्यावर मात्र महार लिहायचे. हे लाचारीचे, दुबळेपणाचे आणि भिकारपणाचे लक्षण आहे. त्यामुळे शाळेच्या दाखल्यावर जात लिहायची की नाही? हिंदू -महार लिहायचे की बौद्ध-महार, की फक्त बौद्ध हे ज्याने त्याने ठरवावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शाळेच्या दाखल्यावर काय लिहावे ही समस्या सवलतीमुळे निर्माण झाली आहे!

मुक्ती हवी की सवलत, स्वाभिमान हवा की गुलामी, अशी ती समस्या आहे. बाबासाहेबांनी निर्विवाद मुक्ती आणि स्वाभिमानाकडे बोट दाखवले आहे ! तेव्हा हा प्रश्न आता ज्याने त्याने सोडवायचा आहे!

युवराज सोनवणे ( बीड) हे परिवर्तवादी साहित्याचे अभ्यासक आणि आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते आहेत.

COMMENTS