एकीचे ‘उत्तर’

एकीचे ‘उत्तर’

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांनी मोठे मताधिक्य घेत भाजपचे सत्यजित कदम यांना धूळ चारली. महाविकास आघाडीमधील ही एकी आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा प्रभाव पाडणार हे यामध्ये स्पष्ट होते. या विजयामुळे यापुढे भाजपविरोधात एकत्र राहण्याशिवाय पर्याय नाही असेही चित्र पुढे आले आहे.

साम, दाम, भेद, दंड आणि सोबतीला ईडीची काडी घेऊन भाजपने कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणूक कोणत्याही प्रकारे जिंकण्याचा प्रयत्न केला असला तरी महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांनी एकदिलाने आणि एकीने काम करत हे मोठे आव्हान मोडीत काढले आहे. काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांनी मोठे मताधिक्य घेत भाजपचे सत्यजीत कदम यांना धूळ चारली. महाविकास आघाडी मधील ही एकी आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा प्रभाव पाडणार हे यामध्ये स्पष्ट होते. वास्तविक उद्धव ठाकरे सरकार विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्यातलाच सामना म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात होते. त्यामुळे महाविकास आघाडी आणि फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने ही पोटनिवडणूक घेण्यात आली. सुरुवातीला गृहराज्यमंत्री आणि पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले होते. मात्र भाजपकडून प्रतिसाद मिळाला नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी ही पोटनिवडणूक आम्ही कोणत्याही स्थितीत जिंकणारच असा विश्वास व्यक्त करीत व्यूहरचना आखली होती. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. ज्या जागेवर ज्या पक्षाचा आमदार होता. त्याच पक्षाकडे ती जागा कायम राहणार असल्याचं महाविकास आघाडी सरकारचे सूत्र आहे. असं असतानाही या मतदार संघात सुरुवातीला काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा संघर्ष निर्माण होणार असल्याची चिन्ह होती. त्याचे कारण शिवसेनेचे माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ही जागा कॉंग्रेसकडे जाण्यावरून नाराजी व्यक्त केली होती. आणि हा मतदार संघ कॉग्रेसला सोडण्यावरून क्षीरसागर यांनी माध्यमांसमोर नाराजी व्यक्त केली होती. या मतदार संघात भाजपचा पराभव करण्यासाठी शिवसेनेचा उमेदवार असावा अशी मागणी करत शिवसेना समर्थकांनी क्षीरसागर यांच्या घरासमोर घोषणाबाजीही केली होती. त्यानंतर राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणा असा आदेश दिल्याने या वादावर पडदा पडला. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे आणि एकीने काम करीत ही विजयश्री खेचून आणली.

महाविकास आघाडी सरकारमधील या तिन्ही पक्षात काही बेबनाव असल्याचे कायम पाहावयास मिळत होते. त्यातच येथे उमेदवारी वरून स्थानिक शिवसेना नेत्यांमध्ये असलेल्या नाराजीचा आणि कुरबुरीचा फायदा घेण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला. पण त्यात ते अयशस्वी ठरले. या तिन्ही पक्षातील अनेक नेत्यांवर ईडीची कारवाई होत असल्याने एक प्रकारे चलबिचलता होती. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीची कारवाई झाल्यानंतर शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादीने सुद्धा आपली संपूर्ण ताकद जाधव यांच्या मागे लावली होती. मंत्री हसन मुश्रीफ हे स्वतः यामध्ये लक्ष ठेवून होते.

ही निवडणूक म्हणजे भाजपसाठी २०२४ पूर्वीची लिटमस चाचणी होती असे मानले जाते. कारण पहिल्यांदाच शिवसेनेला सोबत न घेता भाजप निवडणुकीच्या मैदानात उतरली असल्याने ते सुद्धा एक आव्हानच होते. या मतदार संघात १९९० पासून २००४ आणि २०१९चा अपवाद वगळता या जागेवर कायम शिवसेना निवडून आली आहे. २०१४मध्ये शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांनीच काँग्रेसचे सत्यजित कदम यांचा पराभव केला होता. हेच कदम सध्या भाजपचे उमेदवार होते हे विशेष.

गेल्या डिसेंबरमध्ये झालेली विधान परिषद निवडणूक बिनविरोध करत भाजपने आपला उमेदवार मागे घेतला. पण या वेळी मात्र सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या बिनविरोध करण्याच्या प्रयत्नाला भाजपने साथ दिली नाही. उलट सत्यजित कदम यांच्या रूपाने तुल्यबळ उमेदवार दिला होता. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात भाजपच्या ताब्यात एकही जागा नाही त्यामुळं भाजपकडून ही निवडणूक जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात आले. चंद्रकांत पाटील यांनी पुणे आणि अन्य ठिकाणाहून प्रचारसाठी भाजपच्या हजारो कार्यकर्त्याना मतदार संघात पाचारण केले होते. हर घर प्रचारक अशी ही रचना होती. पण कोल्हापूरकरांनी त्याला काहीही प्रतिसाद दिला नाही.

पाटील-महाडिक संघर्ष

या निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरमधील पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाटील आणि महाडिक गटामध्ये पुन्हा संघर्ष पाहावयास मिळाला. भाजपचे उमेदवार सत्यजित कदम हे महाडिक यांचे जवळचे नातेवाईक असल्याने साहजिकच धनंजय महाडिक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी सर्व तंत्रांचा वापर केला. कोल्हापूरच्या राजकारणात महादेवराव महाडिक गटाचे अस्तित्व गेल्या काही काळापासून आहे. जिल्ह्यातील सर्व बलाढ्य सत्तास्थाने एकेकाळी महाडिक गटाकडे होती. तसेच महापालिका, स्थानिक स्वराज संस्था यावरही हुकूमत होती. पण राज्यमंत्री सतेज पाटील यांचा गटही सध्या तेवढाच प्रभावशाली आणि आक्रमक असल्याने या दोन्ही गटांमध्ये कायम सत्ता संघर्ष पाहावयास मिळतो. तो या निवडणुकीच्या निमित्ताने सुद्धा समोर आला.

आता काँग्रेस उमेदवाराच्या विजयामुळे पाटील गटाची ताकद वाढली असून त्यांचे थेट परिणाम येत्या काही काळात होणाऱ्या कोल्हापूर महापालिका निवडणुकीत पाहावयास मिळतील. महापलिकेत सध्या राष्ट्रवादीची आणि पाठोपाठ शिवसेनेची ताकद असली तरी काँग्रेसचा हात त्यांना आणखी भक्कम करू शकतो. त्यामुळे महाडिक गटाच्या ताराराणी आघाडीला त्याचा जबर फटका बसण्याची चिन्हे आहेत. याचवेळी भाजपचे राष्ट्रपती नियुक्त खासदार छत्रपती संभाजी राजे यांची या निवडणुकीत असलेली अलिप्तता आगामी वेगळ्या राजकारणाचे आणि वाटचालीचे संकेत देत आहेत. कारण संभाजी राजे यांची खासदारकीची मुदत ३ मे रोजी संपत असून पुन्हा संधी मिळण्याची शक्यता धूसर आहे.

ही निवडणूक भाजपाकडून प्रतिष्ठेची करण्यात आली होती. खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापुरात प्रचारासाठी तळ ठोकून होते. मतदानापूर्वी दोन दिवस इथल्या मंगळवार पेठेत चंद्रकांत पाटील प्रचारासाठी पोहोचले असता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि जिजाऊ यांच्या नावाचा यावेळी जयघोष करण्यात आला. दादा हिमालयात जावा अशीही घोषणा यावेळी तरुण देत होते. अखेर कार्यकर्त्यांचा हा संताप पाहून चंद्रकांत पाटील यांनी समर्थकांसोबत तिथून काढता पाय घेतला. चंद्रकांत पाटील यांच्याविषयी असलेली नाराजी अनेकदा पाहावयास मिळत होती. या सर्वांचा परिपाक मतदानात दिसून आला आहे. पोट निवडणुकीमधील ही हार चंद्रकांत पाटील यांच्या आगामी राजकारणाला ब्रेक लावण्याची शक्यता आहे. भाजपच्या एकूण विस्तारावर या पराभवामुळे पाणी फेरले गेले आहे.

यानिवडणुकीत काँग्रेसला सहकारी पक्षांच्या एकीचा तसेच सहानुभूतीचा फायदा मिळाला. चंद्रकात जाधव यांच्या अकाली निधनाने त्यांची अपूर्ण कामे पूर्ण करण्याची साद काँग्रेसकडून घातली गेली होती. या सहानुभूतीला खास करून महिला वर्गाने चांगला प्रतिसाद दिला. चंद्रकांत जाधव यांना अण्णा म्हणून ओळखलं जायचे. कोरोना काळात आरोग्य सुविधांसाठी जीव धोक्यात घालणाऱ्या जाधव यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा दाखला देत काँग्रेसक़डून भावनिक आवाहन करण्यात आले होते. यासाठी अण्णांच्या माघारी आता आपली जबाबदारी अशी टॅगलाईन प्रचाराचे आकर्षण ठरली होती. पण केवळ सहानुभूतीच्या जोरावर विजय मिळण्याबद्दल फारशी खात्री नसल्याने शिवसेनेची आणि राष्ट्रवादीकडून मिळालेली साथ फायद्याची ठरली.

गेल्या वर्षी मंगळवेढा मतदार संघात दिवंगत आमदार भारत भालके यांच्या मुलाचा भाजपने पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं या मतदार संघात मोठं नाव होते. त्यांनी तिथं कामंही केली होती. पण असे असताना भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांचा भाजपच्या समाधान आवताडे यांनी पराभव केला होता. महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का होता. गाफीलपणा तेथे नडला होता. हा अनुभव पाहता ही पोटनिवडणूक काँग्रेस, शिवसेना तसेच राष्ट्रवादीने फार सावधपणे घेत लढवली. निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या दिग्गजांनी प्रचार सभा घेतल्या. आरोप प्रत्यारोपांच्या तोफा धडाडल्या. पण कोल्हापूरकरांनी अखेर एकीचे बळ स्वीकारून त्यांच्या पदरात मतांचे दान घातले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

COMMENTS