हिंदुत्ववादी विचारप्रवाहाच्या बांधणीसाठी गीता प्रेसने सुमारे शंभरवर्षे सातत्याने चिकाटीने केलेले काम नक्कीच नोंद घेण्यासारखे आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या कालखंडात आणि स्वातंत्र्यानंतर पहिली तीस-पस्तीस वर्षे राजकीय परिस्थिती अनुकूल नसताना गीता प्रेसने भारतातील सर्व हिंदुत्ववादी विचारप्रवाह एकत्रित बांधून ठेवण्याचे कार्य केले. तुम्ही त्या विचारप्रवाहाचे समर्थक असा वा विरोधक त्यांच्या या चिकाटीची दखल घ्यायलाच हवी.
साधारण दोन वर्षांपूर्वी एका स्नेह्यांनी अक्षय मुकुल यांचा ‘गीता प्रेस अॅण्ड द मेकिंग ऑफ हिंदू इंडिया’ हा हार्पर कॉलिन्स पब्लिशर्स इंडिया यांनी प्रसिद्ध केलेला इंग्रजी ग्रंथ दिला. हिंदुत्ववादी विचारप्रवाहाचा आलेख मांडणारा हा एक अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे. भारताच्या सामाजिक राजकीय इतिहासाचा विचार केला तर १८५७च्या ब्रिटिशविरोधी उठावापासून स्वातंत्र्य चळवळीचा आरंभ झाला असे म्हणता येते. जागतिक पातळीवर बदलत्या आधुनिक राजकीय-सामाजिक विचारांचा प्रभाव याच काळात भारतात दिसू लागला. स्वातंत्र्य, समता आणि लोकशाही मूल्यांचा पुरस्कार करणार्या समाज रचना या जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त झाल्या होत्या. याच उदारमतवादी लोकशाहीचा पुरस्कार करणार्या काँग्रेसची १८८५ साली भारतात स्थापना झाली. विसाव्या शतकाच्या पहिल्या, दुसर्या दशकात गांधीवाद, समाजवाद आणि मार्क्सवाद अशा आधुनिक राजकीय विचारसरणी देशात प्रभावी होत गेल्या. त्याच काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती-वर्णाच्या अमानुष जोखडाखाली भरडल्या जाणार्या दलितांचा एल्गार पुकारला. या आधुनिक, समतावादी आणि सर्वसमावेशक विचारप्रणाली भारतात रुजत असतानाच देशातील हिंदुत्ववादी विचारप्रवाह राजकीयदृष्ट्या संघटित होत गेला.
हिंदुत्ववादी विचारप्रवाहाच्या बांधणीसाठी गीता प्रेसने सुमारे शंभरवर्षे सातत्याने चिकाटीने केलेले काम नक्कीच नोंद घेण्यासारखे आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या कालखंडात आणि स्वातंत्र्यानंतर पहिली तीस-पस्तीस वर्षे राजकीय परिस्थिती अनुकूल नसताना गीता प्रेसने भारतातील सर्व हिंदुत्ववादी विचारप्रवाह एकत्रित बांधून ठेवण्याचे कार्य केले. तुम्ही त्या विचारप्रवाहाचे समर्थक असा वा विरोधक त्यांच्या या चिकाटीची दखल घ्यायलाच हवी. गीता प्रेसचे संस्थापक हनुमानप्रसाद पोद्दार आणि जयदयाल गोयंका यांनी मिशनरी वृत्तीने केलेल्या प्रयत्नांची आणि दूरदृष्टीची दखल घेणे अपरिहार्य ठरते ! देशातील बहुसंख्य तरूण,तरुणींना आणि मध्यमवर्गाला (मुख्यत: उच्च आणि मध्यम जातींमधील समाज समूह) आज या हिंदुत्ववादी विचारप्रवाहाने दिलेली ‘आम्ही हिंदू’ ही अस्मिता आपली वाटत आहे.‘आम्ही’ (म्हणजे हिंदू) आणि विरुद्ध ‘ते’ (म्हणजे मुस्लिम) हा युक्तिवाद म्हणजे प्रभावी ‘राजकीय तत्त्वज्ञान’ वाटत आहे. ते तत्त्वज्ञान आपले वाटत आहे! या हिंदुत्ववादी अस्मितेबाबत सहानुभूती असणार्या लोकांशी कोणताही अर्थपूर्ण राजकीय संवाद करण्यासाठी हिंदुत्ववादी विचारप्रवाहाची गेल्या शंभर-सव्वाशे वर्षातील ही वाटचाल समजून घ्यायला हवी.
गेली अनेक वर्षे डाव्या चळवळीत काम करताना आणि विशेषत: हिंदू-मुस्लिम सलोख्याच्या प्रश्नावर काम करताना गीता प्रेस विषयी थोडे फार ऐकले होते. परंतु कल्याण मासिक किंवा गीता प्रेसची अन्य प्रकाशने कधीच पाहण्यात आली नव्हती. त्यांच्या ऐतिहासिक कामाची माहिती तर दूरची गोष्ट.अगदी रास्वसंघाशी संबंधित मित्र परिवारातही गीता प्रेसच्या कामाबद्दल फारशी चर्चा होत नसे. डाव्या आणि पुरोगामी चळवळीतील माझ्या अनेक सहकार्यांनाही गीता प्रेसबद्दल अशीच जुजबी माहिती होती. डाव्या, पुरोगामी चळवळीतील विचारप्रवाहाने हिंदुत्ववादी विचारप्रणालीला पुरेसे महत्त्वच दिले नाही. या विचारप्रवाहाची जडणघडण कशी होत गेली, त्याचा पाया कसा आणि कां विस्तारत गेला, संघटनात्मक बांधणी कशी झाली याचे वस्तुनिष्ठ आकलन डाव्या, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते आणि पाठिराख्यांना पुरेसे नाही. याचा अर्थ त्यांना हिंदुत्ववादी विचार प्रवाहाच्या तात्विक भूमिकेचे आकलन नाही असे अजिबात नाही. सनातन वर्णाधिष्ठित, जातिबद्ध हिंदुत्ववादी तत्वज्ञान कसे विषमता जोपासणारे, अमानुष तत्वज्ञान आहे, याचे अचूक तात्विक विश्लेषण महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून डाव्या-पुरोगामी चळवळीतील अनेक विचारवंतांनी केले आहे. हिंदुत्ववादी विचारप्रवाहाने घेतलेल्या राजकीय भूमिकांचा डाव्या-पुरोगामी विचारप्रवाहाने वेळोवेळी अतिशय प्रभावी प्रतिवाद केलेला आहे. सर्वसाधारणपणे डाव्या-पुरोगामी चळवळीतील प्रत्येकालाच त्याचे उत्तम राजकीय भान असते. मात्र व्यावहारिक पातळीवर हिंदुत्ववादी विचारप्रवाहाची वाटचाल कशी होत गेली, त्याचे अंतर्गत चलनवलन, सत्ताधारी वर्गाशी असलेले संधीसाधू लवचिक नाते याचे फारसे आकलन नसते. या पार्श्वभूमीवर अक्षय मुकुल यांचा ग्रंथ खूपच नवीन दृष्टी देतो.
हे पुस्तक आशय-विषयाचा गाभा कायम ठेऊन संक्षिप्त स्वरुपात यावे असा अनेकांनी आग्रह केला. त्यासाठी पूर्वतयारी करत असताना चळवळीतील सहकारी प्रा. अंजली मायदेव-आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारत या पाक्षिकात या पुस्तकावर आधारित लेखमाला सुरू करावी असा आग्रह धरला. त्यानुसार एप्रिल, २०२० पासून प्रबुद्ध भारत या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या पाक्षिकात एक वर्षभर ‘मेकिंग ऑफ हिंदू राष्ट्र’ या शीर्षकाने लेख मालिका लिहिली. या लेखमालेला चांगला प्रतिसाद मिळाला. वाचकांना ही माहिती पूर्णपणे नवीन होती. या प्रतिसादमुळे या पुस्तकाच्या कामाला गती मिळाली.
वास्तविक हा संपूर्ण ग्रंथ मराठीत आणणे आवश्यक आहे. मूळ ग्रंथाचे लेखक अक्षय मुकुल यांनीही तशी इच्छा व्यक्त केली आहे. अक्षय मुकुल यांनी परिश्रमपूर्वक केलेल्या या संशोधनाला नक्कीच ऐतिहासिक मोल आहे. परंतु ५३९ पानांचा हा मूळ ग्रंथ मराठीत आणणे हा मोठा प्रकल्प असेल. म्हणूनच अक्षय मुकुल यांच्या ग्रंथाचा मध्यवर्ती आधार घेत ही संक्षिप्त मांडणी केली आहे.
००००
‘गीता प्रेस अॅण्ड द मेकिंग ऑफ हिंदू इंडिया’ हा अक्षय मुकुल यांचा संशोधित ग्रंथ आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर ‘गीता प्रेसने देशातील हिंदुत्वाला एकसंध मूर्तरूप देण्यात सर्वात कळीची भूमिका बजावली आहे’. हिंदुत्वाची एकात्मिक अस्मिता उभारताना हिंदुत्ववादी विचारप्रवाहाच्या गाभ्यातील ‘सनातन हिंदू धर्माच्या’ संकल्पनांना गीता प्रेस परिवाराने अजिबात धक्का लागू दिलेला नाही. वर्ण आणि जातीय उतरंडीचे समर्थन, मनुस्मृतीचे समर्थन, कुटुंबातील मुलग्यांचे आदर्श ‘हिंदु पुरूष’ म्हणून संगोपन, आदर्श पतिव्रता स्त्री अशा सर्व कल्पनांचा ठाम पुरस्कार गीता प्रेस परिवाराने केला. ‘मुस्लिम पुरूष’ म्हणजे ‘ते’, ‘अन्य’! मुस्लिम म्हणजे ‘हिंस्र’, ‘लिंगपिसाट’ आणि ‘विलासी’ अशी प्रतिमा सतत रंगवणे, मुस्लिम पुरूषांपासून हिंदू स्त्रियांचे संरक्षण करणे सर्व हिंदू पुरूषांचे आद्य कर्तव्य आहे असे स्पर्धात्मक आणि वर्चस्ववादी धार्मिक जातीयवाद जोपासणारे प्रमेय हा हिंदुत्ववादी विचारपटाचा एकात्मिक भाग आहे’. गीता प्रेसच्या वाटचालीचे संशोधन करताना अक्षय मुकुल यांनी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या दोन दशकापासून आजपर्यंत बदलत्या राजकीय सामाजिक घडामोडींचा हिंदुत्ववादी विचारधारेशी असलेला संबंध नेमकेपणाने उलगडून दाखवला आहे. गीता प्रेसच्या स्थापनेपासून (एप्रिल,१९२३) या विचारप्रवाहाचा झालेला राजकीय, सामाजिक प्रवास या संशोधनातून उभा राहतो. तसेच गीता प्रेस परिवाराचा आणि पर्यायाने हिंदुत्ववादी विचारप्रवाहाचा सामाजिक (वर्गीय आणि जातीय) पाया प्रथमच इतक्या स्पष्टपणे पुढे येतो.
गीता प्रेस आणि कल्याण मासिकाचा आरंभ म्हणजे हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचे स्थित्यंतर होते. देशातील मारवाडी समाज १८८०-९० पासून व्यापार आणि उद्योगात अग्रणी होता. आधुनिक काळात तयार होणार्या अर्थव्यवस्थेत या समाजाला कळीचे स्थान होते. तशाच प्रकारचे स्थान आपल्या समाजाला देशाच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मिळवण्यासाठी तो प्रयत्नशील होता. या पार्श्वभूमीवर मारवाडी समाजाच्या पुढाकाराने आदर्श सनातन हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन करण्याच्या हेतूने गीता प्रेस आणि कल्याण मासिक सुरू करण्यात आले. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दोन दशकापर्यंत भारतातील हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व (आणि पर्यायाने नियंत्रण) देशातील हिंदू राजे-रजवाडे, हिंदू जमीनदार मंडळी आणि ब्राह्मण समाजाकडे होते. याचा अर्थ ‘हिंदू धर्माचे प्रतिनिधीत्व आणि नियंत्रण ‘ब्राह्मण—क्षत्रिय’ अशा संयुक्त वर्ण- आघाडीकडे होते. गीता प्रेस सुरू होण्यापूर्वी ‘मारवाडी गॅझेट’, ‘मारवाडी सुधार’ अशी मासिके एका बाजूला समाज सुधारणा आणि त्याचवेळी सनातन हिंदू मूल्यांचा पुरस्कार करत होती. मारवाडी ज्ञाती संघटनेच्या पुढाकाराने सुरू झालेली गीता प्रेस, कल्याण, कल्याण कल्पतरू ही मासिके आणि वर नमूद केलेली अन्य मासिके यांच्या पंचवीस-तीस वर्षांच्या सामुहिक प्रयत्नांमुळे हिंदू धर्माची प्रतिमा बदलली. सनातन हिंदू धर्म मूल्यांचा नव्याने आग्रही पुरस्कार करत राहिल्यामुळे (आणि अर्थातच व्यापार उद्योगातील कळीचे स्थान यामुळे) हिंदू धर्माचे प्रतिनिधीत्व ‘ब्राह्मण-वैश्य’ या संयुक्त वर्ण-आघाडीकडे आपोआप आले. हे स्थित्यंतर हळूहळू देशभर पसरत गेले. सनातन हिंदुत्वाची सूत्रे ब्राह्मण-वैश्य समाजांच्या नियंत्रणात आली याचे मुख्य श्रेय गीता प्रेसकडे जाते (संदर्भ: “दि ‘माउथ’ ऑफ सनातन धर्म : द रोल ऑफ गीता प्रेस इन स्प्रेडिंग द वर्ड ”, या शीर्षकाचा पॉल अर्नी यांचा प्रबंध. अमेरिकन अॅकॅडमी ऑफ रिलिजन अॅन्युअल मीटिंग, वॉशिंग्टन, नोव्हेंबर २०-२३, १९९३ मध्ये सादर झाला). या स्थित्यंतराचा प्रवास अक्षय मुकुल यांच्या ग्रंथातून आपल्या समोर येतो.
देशातील अनेक औद्योगिक घराण्यांचा हिंदुत्वावादी विचारसरणीला थेट पाठिंबा होता (आणि आहे). गांधी- नेहरु काळापासून काँग्रेससहित देशातील अनेक राजकीय पक्षातील हिंदुत्ववादी विचारांचे सहानुभूतीदार असलेल्या नेत्यांचा गीताप्रेस परिवाराशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष, उघड आणि छुपा पाठिंबा होता. हे संबंध अक्षय मुकुल यांच्या संशोधनातून स्पष्टपणे दिसून येतात. स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणार्या काँग्रेस पक्षात असे परस्पर विरोधी राजकीय भूमिका असणारे अनेक विचारप्रवाह सतत कार्यरत होते. (स्वातंत्र्यानंतरही असे विचारप्रवाह काँग्रेसमध्ये टिकून राहिले होते). याचे नेमके प्रतिबिंब अक्षय मुकुल यांच्या संशोधनात पाहायला मिळते. गीता प्रेस परिवाराने स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही प्रस्थापित हिंदुत्ववादी विचारप्रवाहाचे वाहक म्हणून किती आणि कशी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, हे नीटपणे समजून घ्यायचे असेल तर अक्षय मुकुल यांचा हा ग्रंथ मुळातूनच वाचायला हवा.
‘दि न्यू इंडिया फाऊंडेशन’ या संस्थेच्या अभ्यासवृत्तीचा भाग म्हणून अक्षय मुकुल यांनी गीता प्रेसच्या ऐतिहासिक वाटचालीचे संशोधन केले. आदर्श संशोधनाचे सर्व संकेत, नियम पाळून सुमारे चार वर्षे अक्षय मुकुल यांनी हे संशोधन केले आहे. आपल्या संशोधनातील प्रत्येक तपशील साधार असेल याची खात्री त्यांनी करून घेतली आहे. या संशोधनासाठी मुकुल यांनी गोरखपूर, बनारस, लखनऊ या गीता प्रेस परिवाराच्या कार्यक्षेत्रात दीर्घकाळ वास्तव्य केले. गोरखपूर येथील गीता-प्रेस कार्यालयात राहून संस्थेचे ग्रंथालय आणि त्यांच्या ऐतिहासिक दफ्तरातील दस्ताऐवजांचा अभ्यास केला. गीता प्रेसचे संस्थापक हनुमानप्रसाद पोदार यांच्या ‘पोद्दार पेपर्स’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या पत्रव्यवहारांचा अभ्यास केला. पोद्दार यांचे नातू रसिंदु फोगला यांच्याबरोबर आणि गीता प्रेसचे आजचे प्रबंधक, संचालक यांच्याबरोबर संवाद साधला. अशा व्यापक प्रयत्नातून आपले संशोधन आणि निष्कर्ष अधिकाधिक अचूक केले. गीता प्रेसच्या अधिकृत माहितीबरोबरच अक्षय मुकुल यांनी गोरखपूर आयुक्तालयाचा अभिलेख कक्ष, जिल्हा गुप्तचर विभागाचा अभिलेख कक्ष, उ.प्र. सरकारचे पुराभिलेख यातील कागदपत्रांच्या आधारे आपल्या संशोधित माहितीची खातरजमा केली. या संशोधनासाठी अक्षय मुकुल यांनी चेन्नई येथील थिऑसॉफिकल सोसायटी ऑफ इंडिया, ‘हिंदू पेपर्स’चे पुराभिलेख, दिल्लीतील नेहरू मेमोरियल म्युझीयम आणि लायब्ररी इ. संस्थांतील कागदपत्रांचा अभ्यास केला आहे. मूळ ग्रंथाच्या परिशिष्ठात अशा सर्व संदर्भ सूची आणि संदर्भ स्रोत सविस्तरपणे नोंदलेले आहेत. त्यामुळेच परिश्रमपूर्वक केलेल्या या संशोधनाची विश्वासार्हता आणि दर्जा वादातीत ठरतो.
अत्यंत विस्तृत असा हा ग्रंथ मूळ गाभा हरवू न देता संक्षिप्त रुपात मराठीत तयार करणे अत्यंत आव्हानात्मक काम होते. अक्षय मुकुल यांचा हा ग्रंथ दीर्घ संशोधनावर आधारित आहे. त्यामुळे त्याचा बाज संशोधनात्मक अभ्यासाचा आहे. मराठीत त्याचे संक्षिप्त रुपांतर करताना सर्वसाधारण वाचकांना रुची वाटेल अशा पद्धतीने लिहिण्याची आवश्यकता होती. तसा प्रयत्न केला आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय दृष्ट्या सजग नागरिकांचा (मग ते कोणत्याही विचारप्रवाहाचे असोत) असा समज असतो की ‘देशातील हिंदुत्ववादी विचारप्रवाहाचे आद्य प्रवर्तक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’! परंतु हिंदू महासभा (स्थापना १९०५), गीता प्रेस परिवार यांच्या माध्यमातून हिंदुत्ववादी विचारप्रवाह रास्वसंघाच्याही आधीपासून सक्रिय होता. एवढेच नाही तर देशातील हिंदुत्ववादी विचारप्रवाहाचे जनकत्व आणि राजकीय सूत्रे उत्तर भारतातील याच गटांकडे जातात. ही वस्तुस्थिती अक्षय मुकुल यांच्या ग्रंथातील अनेक महत्त्वाच्या तपशीलातून पुढे येते. या तपशीलाचे सामाजिक, धार्मिक धागेदोरे मराठी वाचकांना परिचित नाहीत. म्हणूनच अशा तपशीलाचे संदर्भ स्पष्ट करण्यासाठी काही पूरक माहिती देणे आवश्यक होते. त्यानुसार अनेक ठिकाणी आवश्यक पूरक माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. उदाहरणार्थ,एकोणीसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकापासून पुढे विसाव्या शतकाच्या पहिल्या पंचवीस-तीस वर्षापर्यंत उत्तर भारतातील मुस्लिम समाजावरील उलेमांचा मोठा प्रभाव होता. यासंबंधी अत्यंत मोलाची माहिती आमचे मित्र आणि मुस्लिम समाजाच्या सामाजिक इतिहासाचे सजग अभ्यासक सरफराज अहमद यांनी दिली. अशा पूरक माहितीचे संदर्भ त्यात्या ठिकाणी नोंदले आहेत.
या संपूर्ण लिखाणाचा उद्देश हिंदुत्ववादी विचारप्रवाहाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि वाटचाल एकसंधपणे पुढे यावी हा आहे. अक्षय मुकुल यांच्या ‘गीता प्रेस अॅण्ड द मेकिंग ऑफ हिंदू राष्ट्र’ या ग्रंथातून हे उद्दिष्ट पूर्णांशाने साध्य होते. हा ग्रंथ हेच मध्यवर्ती सूत्र ठेऊन या पुस्तकाचे लिखाण केले आहे. मूळ ग्रंथातील तपशील वापरताना त्यात कोणताही बदल होणार नाही याची खबरदारी घेतली आहे. मात्र त्या तपशीलाचा आजच्या संदर्भात अर्थ लावला आहे. म्हणूनच हे पुस्तक म्हणजे मूळ पुस्तकाचा अनुवाद नाही किंवा केवळ त्या पुस्तकाचे संक्षिप्तीकरण नाही. तर मूळ ग्रंथाचा आधार घेऊन केलेली स्वतंत्र मांडणी आहे; याची वाचकांनी नोंद घ्यावी. सनातनी हिंदुत्ववादी विचारप्रवाहावर टीका करताना अनेकदा ‘फॅसिस्ट’ किंवा ‘प्रतिगामी’ विचारसरणी अशी हेटाळणी दर्शक शेरेबाजी केली जाते. अशी तुच्छतादर्शक टीका निकोप राजकीय विचार-संवादाला नक्कीच पोषक नाही. अशी टीका केल्यामुळे आम नागरिकांना त्याचा फारसा उलगडा होत नाही. उलट हिंदू धर्मात जन्माला आलेल्या व्यक्तीला या यांत्रिक टीकाटिप्प्णीमुळे ती समग्र हिंदूंवरील टीका वाटते. त्यामुळेच आम हिंदू माणसांच्या मनात अशा टीकेची स्वीकारार्हता कमी होते. आम हिंदू नागरिक अशा यांत्रिक टीकेमुळे उलट फारसा विचार न करता हिंदुत्ववादी विचारप्रवाहाकडे ओढला जातो.
हिंदुत्ववादी विचारप्रवाहाच्या वाटचालीबद्दलच्या या लिखाणात आणि अक्षय मुकुल यांच्या ग्रंथात ठिकठिकाणी देशातील विविध राजकीय पक्ष, अनेक राजकीय विचारप्रवाहांतील नेते, विचारवंत यांच्या संबंधी अत्यंत वेगळा तपशील पुढे येतो. काही वाचकांना तो वादग्रस्त वाटू शकतो, न रुचणारा असू शकतो किंवा राजकीयदृष्ट्या गैरसोयीचा असू शकतो. अक्षय मुकुल यांच्या मूळ ग्रंथात हिंदुत्ववादी विचारप्रवाहाची वाटचाल आणि गीता प्रेस हेच केंद्र केले आहे. या ग्रंथाच्या मांडणीतून अक्षय मुकुल यांनी गेल्या शंभराहून अधिक वर्षांच्या राजकीय वाटचालीचा जणू आरसा वाचकांसमोर धरला गेला आहे. ते प्रतिबिंब आज आपल्याला कदाचित पसंत पडणार नाही. ते स्वाभाविक आहे. मात्र असे असले तरी त्याची सत्यता लक्षात घेऊन त्याचा मोकळेपणाने विचार करायला हवा. भारताला एक आधुनिक समतावादी, धर्मनिरपेक्ष, मानवी समाज म्हणून वाटचाल करण्यासाठी या सर्व इतिहासाकडे वस्तुनिष्ठपणे पाहायला लागेल.
भाजप आणि हिंदुत्ववादी विचारप्रवाह भारत हे एक ‘हिंदू राष्ट्र’ आहे असे गृहित धरून आपली सर्व राजकीय धोरणे आखत आहे, राबवत आहे. जातीय उतरंड नव्याने पुनरुज्जीवित केली जात आहे; मुस्लिम आणि अन्य धार्मिक अल्पसंख्यांवर ‘दुय्यम नागरिकत्व’ लादले जात आहे. या सर्व धोरणांची पाळेमुळे हिंदुत्ववादी विचारप्रवाहाच्या ऐतिहासिक वाटचालीत स्पष्ट्पणे सापडतात. स्वातंत्र्यापासून देशाने स्वीकारलेल्या संवैधानिक मूल्यांशी आणि धोरणांशी अत्यंत विपरित अशी ही वाटचाल आहे.या पार्श्वभूमीवर अक्षय मुकुल यांचे संशोधन अधिकच महत्त्वाचे ठरते.
————–
‘सलोखा’ या धार्मिक आणि जातीय सलोख्याच्या प्रश्नावर काम करणार्या संपर्क गटात सहभागी होत असताना देशातील प्रस्थापित सत्ताधार्यांच्या विचारप्रणालीचा हा वस्तुनिष्ठ इतिहास लोकांपर्यंत आणणे आम्हाला आवश्यक वाटत होते. हे पुस्तक लिहीत असताना माझे सलोखा-संपर्क-गटातील सहकारी निशा साळगांवकर आणि संजीवनी कुलकर्णी यांचे प्रोत्साहन आणि पाठिंबा फार मोलाचा होता. प्रत्येक लेख लिहून झाल्यावर त्याचे चिकित्सक नजरेतून वाचन करून आवश्यक त्या सूचना करण्याचे महत्त्वाचे काम या दोघींनी केले.त्यांच्या पाठिंब्याचे मोल माझ्यासाठी अमूल्य आहे. या पुस्तकातील प्रत्येक लेखाचे त्रयस्थपणे वाचन करून त्याचे मूल्यमापन करणारे आणखी एक वाचक म्हणजे माझे जीवलग मित्र अशोक अत्रे ! अशोक अत्रे हे स्वत: प्रतिभाशाली उद्योजक म्हणून प्रसिद्ध आहेतच पण जागतिक अर्थव्यवस्था आणि जागतिक राजकारणाचे ते अत्यंत विचक्षक अभ्यासक आहेत. त्यांनी केवळ या लेखांचे वाचन केले नाही, तर अनेक पूरक संदर्भ दिले. त्याबाबत प्रदीर्घ चर्चा केल्या. संदर्भासाठी काही पुस्तके पाठवली. या पुस्तकाच्या लिखाणात त्यांचा जिवंत सहभाग होता. माझे आणखी एक मित्र आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे फोटोग्राफर, चित्रपट दिग्दर्शक, लेखक आणि दक्षिणायन या अभिव्यक्ती-स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्या चळवळीचे संयोजक संदेश भांडारे यांनी हे पुस्तक पूर्ण करण्यासाठी सतत आग्रह धरला. तसेच पुस्तक प्रकाशनापर्यंत पूर्णत्वास जाण्यासाठी अनेक प्रकारे मदत केली. या सर्वांच्या सक्रिय पाठिंब्यामुळेच हे पुस्तक पूर्ण होऊ शकले, याबद्दल माझ्या मनात विनम्र कृतज्ञतेची भावना आहे.
संवेदनशील, विचार प्रवर्तक डाव्या-पुरोगामी साहित्याची प्रदीर्घ परंपरा टिकवून ठेवणार्या मराठीतील प्रतिष्ठीत अशा लोक वाड.मयगृहाने हे पुस्तक प्रकाशित करावे, हा माझ्यासाठी मोठा बहुमान आहे. पुस्तकाच्या संपादनात लोकवाड.मयगृह संपादक मंडळाच्या आणि विशेषत: विचक्षक पत्रकार शेखर देशमुख यांच्या चिकित्सक सूचनांचा फार महत्त्वाचा वाटा आहे, हे मी विनम्रपूर्वक नमूद करत आहे.त्या सर्वांचे मन:पूर्वक आभार!
या पुस्तकाच्या निमित्ताने आपल्या समाजाच्या राजकीय वाटचालीबद्दल सजग चर्चेला चालना मिळावी अशी अपेक्षा आहे. वाचकांच्या प्रतिसादाची नक्कीच अपेक्षा आहे.
हिंदुत्ववादी राजकारणाच्या पाऊलखुणा ( दी मेकिंग ऑफ हिंदू इंडिया)
प्रमोद मुजुमदार
लोकवाड्मय गृह
किंमतः ३०० रु.
COMMENTS