करोना व्हायरसचा वाढता धोका टाळण्यासाठी राज्यात कलम १४४ लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. जनतेला आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले, की काही शहरांमध्येच नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये आज मध्यरात्रीपासून ३१ मार्चपर्यंत १४४ कलम लागू करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी राज्यातील जनतेला आवाहन करणारे भाषण केले. त्यामध्ये आज जनता कर्फ्यूनंतर सुद्धा घराबाहेर न पडण्याचे त्यांनी आवाहन केले. संपूर्ण राज्यामध्ये १४४ कलम लागू करून जमावबंदी लागू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. एसटी, खासगी बस, मेट्रो, लोकल गाड्या बंद राहतील. मात्र, जीवनावश्यक सेवा सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलेले ठळक मुद्दे
– जीव वाचवणे आता महत्त्वाचे आहे.
– आपण आता अधिक पुढची पावले टाकत आहोत. सर्वात कठीण काळ आता सुरु झाला आहे.
– पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नका.
– परदेशातून येणाऱ्यांनी एकटे राहावे
– जे लोक गेल्या १५ दिवसांत परदेशांतून आले आहेत, त्यांनी समाजात फिरू नये. तपासणी करून घ्यावी. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनीही समाजात फिरू नये.
– गरज नसताना घराबाहेर पडू नये.
– बँक आणि शेअर बाजार सुरु राहणार.
– अन्न धान्यांचा साठा करण्याची काहीही गरज नाही. वस्तूंची कमतरता नाही.
– जीवनाश्यक वस्तू पुरवणारी दुकाने चालू राहतील.
– शहरातील बस सेवा केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच सुरु राहणार.
– यापुढे करोनाचा विषाणू गुणाकार पद्धतीनं वाढणार आहे म्हणून आपण सर्वांनी मिळून वजाबाकी केली पाहिजे.
– सर्व धर्मीयांची सर्व धार्मिक स्थळे बंद करावीत.
– शासकीय कार्यालयात आता केवळ ५ टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील.
– आज मध्यरात्रीपासून सर्व जगातून येणारी विमाने बंद करीत आहोत.
– ज्यांचे घरीच विलगीकरण केलेले आहेत त्यांच्या हातावर शिक्के आहेत. अशांनी कृपा करून १५ दिवस घराबाहेर पडू नका. आणि घरातल्या घरात सुद्धा वेगळे रहा.
– चाचणी केंद्रे वाढविण्यात येत आहेत.
– ३१ मार्च हा पहिला टप्पा आहे. गरज लागली तर पुढेही निर्णय कायम राहील.
– माणुसकी बाळगा. तळहातावर पोट असेल त्यांना मला सांगायचं आहे की, या संकटाने कोणालाही सोडलेलं नाही. किमान वेतन चालू ठेवा.
– संकट हे गंभीर असलं तरी सरकार खंबीर आहे. निश्चय, जिद्द आणि संयम बाळगा.
मुंबईतील लोकल आज मध्यरात्रीपासून ३१ मार्चपर्यंत बंद
कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी रेल्वेने मुंबईतील लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. पश्चिम, मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर या चारही मार्गांवरील लोकलसेवा आज मध्यरात्रीपासून ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. याबाबत रेल्वे बोर्डाच्या बैठकीत आज निर्णय घेण्यात आला.
मुंबई लोकलमधून दररोज काही लाख लोक प्रवास करतात. दिवसभरात लोकलच्या ३ हजार फेऱ्या होतात. लोकल आणि रेलेवे स्थानक हे मुंबईतील सर्वाधिक गर्दीचे ठिकाण आहे.
आज जनता कर्फ्यू असल्याने लोकलच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या होत्या. मुंबईप्रमाणे कोलकातामधील लोकलसेवाही बंद करण्यात आली आहे.
COMMENTS