भाजपचे बालेकिल्ले ढासळत आघाडीचा ‘महा’विजय

भाजपचे बालेकिल्ले ढासळत आघाडीचा ‘महा’विजय

महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीसाठी ही निवडणूक खूप महत्त्वाचा संदेश देणारी मानली जात होती. वर्षोनुवर्षे भाजपचे मतदार आणि गड असलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीने शिरकाव करत हे बालेकिल्ले उद्धवस्त केले.

‘एक चूक म्हणजे साक्षात मृत्यूच’
गणेशोत्सवः कोकणात जाणाऱ्या वाहनांना पथकरातून सवलत
सारस्वत बँकेच्या थकबाकीदारांची नावे उघड करण्यास स्थगिती

भाजपचे पारंपरिक गड किल्ले नेस्तनाबूत करत महाविकास आघाडीच्या ४ उमेदवारांनी पुणे आणि नागपूर तसेच औरंगाबाद या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात विजय मिळविला. त्यामुळे भविष्यात राज्यातील राजकारण आणि आगामी महापालिका तसेच नगरपालिका निवडणुकीत आपली कोणती भूमिका असणार आहे हे महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी स्पष्ट केले आहे.

गेली ५५ वर्षे अभेद्य असलेल्या नागपूरमधील पदवीधर मतदारसंघात भाजपचा हा किल्ला पाडत महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी हे विजयी झाले. तर पुणे हा भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला सुद्धा नेस्तनाबूत करत महाविकास आघाडीने तेथे आपला झेंडा फडकविला आहे. येथे पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदार संघातून अनुक्रमे अरुण लाड आणि जयंत आसगावकर हे विजयी झाले तर औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात सुद्धा महाविकास आघाडीने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. येथे काँग्रेसचे सतीश चव्हाण हे दुसऱ्यांदा मोठे मताधिक्य घेत विजयी झाले. तर अमरावती शिक्षक मतदारसंघात अनपेक्षितपणे अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी बाजी मारली. येथे भाजपचा उमेदवार हा अक्षरश चौथ्या क्रमांकावर फेकला गेला.

या सर्व मोठ्या पडझडीत भाजपसाठी एकमेव आशेचा किरण ठरला तो धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत. तिथे काँग्रेसमधूनच आलेल्या अमरीश पटेल यांनी पोटनिवडणुकीत आपली जागा कायम राखली. पण हा विजय भाजपचा नसून तो व्यक्तिगत पटेल यांचा असल्याचे मानले जाते.

महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीसाठी ही निवडणूक खूप महत्त्वाचा संदेश देणारी मानली जात होती. वर्षोनुवर्षे भाजपचे मतदार आणि गड असलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीने शिरकाव करत हे बालेकिल्ला उद्धवस्त केले. नियोजनबद्ध आखणी, मतदार नोंदणी आणि ती मतांमध्ये परावर्तित करणे ही त्रिसूत्री आघाडीने यशस्वी राबविली. विशेष म्हणजे तिन्ही पक्षाच्या नेतेमंडळीपासून कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदा या निवडणुका विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर खेळल्या गेल्या. एरव्ही शिक्षक किंवा पदवीधर मधून कोण विजयी होऊन गेला याची माहिती कोणालाच नसते. पण यावेळी अशी निवडणूक असते याची माहिती जनतेला मिळाली आणि ते त्यात सहभागी झाले. बूथ पातळीवर काम करत महाविकास आघाडीने पहिल्यांदा आपल्यातील एकीचे दर्शन घडवले.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वतः लक्ष घालून ही निवडणूक जिंकण्यासाठी चंग बांधला होता. तर राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी महाविकासची सूत्रे हाती घेतली होती. त्याला काँग्रेसचे सतेज पाटील, विश्वजित कदम आणि शिवसेनेच्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी मनापासून साथ दिली.

या निवडणुकीचे खास वैशिष्ट्य म्हणजे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात वाढलेली मतांची टक्केवारी. त्यामुळे ग्रामीण भागात भाजपबाबत असलेला राग आणि चीड या मतामधून व्यक्त झाली आहे. एरव्ही १० ते १२ टक्के एवढे होणारे मतदान यावेळो ७० टक्क्यांवर गेले होते. याचा सरळ अर्थ असा की लोकांनी ठरवून भाजपला धडा शिकवला. हीच स्थिती औरंगाबाद आणि नागपूर मतदारसंघात होती.

पुणे पदवीधरसाठी यावेळी सर्वात हॉट स्पॉट ठरला तो सांगली जिल्हा. कारण दोन्ही उमेदवार हे सांगली जिल्ह्यातील. त्यामुळे या जिल्ह्यातून जास्तीतजास्त मते घेण्यासाठी ईर्षा होती. त्याबरोबर कोल्हापूर, सोलापूर, सातारा आणि पुणे या जिल्ह्यातील मतदान तेवढेच महत्त्वाचे होते. भाजपचे चंद्रकांत पाटील हे सलग दोन वेळा याच पदवीधर मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यामुळे भाजपसाठी ही जागा सुरक्षित मानली जात होती. जयंत पाटील यांनी आपल्या राजकीय चालीनुसार ‘करेक्ट कार्यक्रम’ या निमित्ताने केला आहे.

पुणे मतदारसंघात शिक्षक उमेदवारीसाठी भाजपने जितेंद्र पवार यांना पुरस्कृत केले होते पण ते चक्क पाचव्या स्थानावर फेकले गेले. इकडे अमरावती शिक्षक मतदारसंघात सुद्धा भाजप उमेदवार हा चौथ्या स्थानी फेकला गेला. या मतदारसंघात निवडून आलेले अपक्ष उमेदवार किरण सरनाईक हे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मेहुणे असल्याने महाविकास आघाडीकडे त्यांचा नेहमी ओढा असणार आहे.

गेली ५५ वर्षे गड असलेल्या नागपूरमधील भाजपचा पराभव हा देवेंद्र फडणवीस यांचा पराभव मानला जातो. तिथे गडकरी गटाला डावलले गेल्याने मोठ्या प्रमाणात असंतोष होता. त्यामुळे हा गट सक्रिय राहिला नाही. फडणवीस आणि गडकरी गटातील या शीतयुद्धाचा महाविकास आघाडीने पुरेपूर फायदा घेतला. यावेळी नागपूरमधील काँग्रेसच्या सर्व गट तट हेवेदावे विसरून एकत्र आले हे या मोठे वैशिष्ट्य. त्याला राष्ट्रवादी आणि शिवसेनेची भक्कम साथ मिळाली. फडणवीस यांचा एककल्ली कारभार आणि अहंकार नडला अशी भावना काही जुन्या भाजप कार्यकर्त्यांनी खासगीत बोलून दाखविली. फडणवीस यांच्या नेतृत्वाला हा एक प्रकारे मोठा अडसर ठरला आहे.

औरंगाबाद मतदारसंघात सुद्धा भाजपच्या पंकजा मुंडे यांच्या गटातील व्यक्तीला डावलून शिरीष बोराळकर याना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे मुंडे गट प्रचंड नाराज होता. शीर्षस्थ नेत्यांनी समजूत काढल्यानंतर पंकजा मुंडे प्रचारात सक्रिय झाल्या पण ऐन मतदानाच्या आधी दोन दिवस त्या कोरोनाची लक्षणे असल्याने विलगीकरणात गेल्या. त्याचा येथे राजकीय दृष्ट्या वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. त्यामुळे काँग्रेसचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांच्यासाठी विजयाचा मार्ग मोकळा झाला. येथेही महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्ष एकदिलाने काम करत होते. पंकजा मुंडे यांची नाराजी भोवल्याची चर्चा मात्र त्या निमित्ताने सुरू झाली.

अमरावती शिक्षक मतदारसंघात अनपेक्षितपणे अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी बाजी मारली. येथे शिवसेनेचे विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे आणि भाजपचे नितीन धांडे यांच्यात लढत होईल असे मानले जात होते. पण मतदानाच्या आधी जातीय समीकरणे येथे उदयास आली. आणि सरनाईक यांच्या पारड्यात मते पडली. किरण सरनाईक हे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मेहुणे आहेत हे नोंद घेण्याजोगे.

एकमेव अपवाद धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज संस्था निवडणूक. येथे काँग्रेसमधीलच उमेदवार भाजपमध्ये जाऊन विजयी झाला. अमरीश पटेल यांनी ही निवडणूक जिंकली असली तरी यामध्ये भाजपचा काहीही वाटा नाही. पटेल यांचे असलेले व्यक्तिगत सबंध आणि मोठ्या प्रमाणात झालेले लक्ष्मी दर्शन यामुळे कॉंग्रेसच्याच ११७ मतदारांनी त्यांना मुक्तहस्ते मतदान केल्याचे सांगितले जाते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर तसेच मनमानी कारभारावर या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षांतर्गत तसेच जनतेचा असलेला रोष व महाविकास आघाडीवर असलेला मतदारांचा विश्वास यावर लख्ख प्रकाश पडलेला आहे.

अतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0