शाळेत संविधानच्या प्रस्तावनेचे वाचन अनिवार्य

शाळेत संविधानच्या प्रस्तावनेचे वाचन अनिवार्य

भारतीय राज्यघटनेची मूलभूत तत्त्वे, घटनात्मक हक्क आणि कर्तव्ये आणि संविधानाची मूलतत्वे शालेय वयापासून विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी, महाविकास आघाडी सरकारने येत्या प्रजासत्ताक दिनापासून महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये, भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे दररोज सामूहिक वाचन करण्याचे आदेश दिले आहेत.

२६ जानेवारीपासून राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संविधानाच्या प्रस्तावनेचे दररोज सामूहिक वाचन करण्याचे आदेश देण्यात आल्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबत एक परिपत्रक काढले आहे.

देशात २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. नागरिकांना भारतीय राज्यघटनेविषयी संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. भारतीय राज्यघटनेची मूलभूत तत्त्वे, घटनात्मक हक्क आणि कर्तव्ये नागरिकांवर संस्कारित केले पाहिजेत. यामुळे विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक बनण्यास मदत होईल, म्हणूनच सरकार हा उपक्रम राबवत असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

राज्यातल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यानुसार, परिपाठातले इतर विषय वगळण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची आठवण करून देण्यासाठी, वॉटर बेलची अंमलबजावणी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. मंगळवारी राज्य शालेय शिक्षण विभागाने याबाबत एक परिपत्रक काढले. त्यानुसार विद्यार्थ्यांना शाळांमध्ये पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी तीन वेळा घंटी वाजविली जाणार आहे.

COMMENTS