कोरोनाविरोधातल्या लढाईचा हा ‘गोल्डन अवर’- मुख्यमंत्री

कोरोनाविरोधातल्या लढाईचा हा ‘गोल्डन अवर’- मुख्यमंत्री

मुंबई : संपूर्ण जगात कोरोना व्हायरस (कोविड १९) ने थैमान घातलेलं असताना महाराष्ट्र शासनाने आज रात्री १२ वाजल्यापासून मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नाग

अधिक रेशनसाठी २० मुलांना जन्म द्यायचाः रावत
‘सांगली पूरग्रस्तांना पॅकेज नाही पण सर्व मदत मिळेल’
लॉकडाऊन व नॉकडाऊन दोन्हीही नकोः मुख्यमंत्री

मुंबई : संपूर्ण जगात कोरोना व्हायरस (कोविड १९) ने थैमान घातलेलं असताना महाराष्ट्र शासनाने आज रात्री १२ वाजल्यापासून मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर या चार महत्त्वाच्या शहरांमधल्या जीवनावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार, दुकानं, खासगी कंपन्या ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले. त्याचवेळी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणार असल्याचं आणि इयत्ता नववीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर घेणार असल्याचं सांगितले. मात्र दहावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार सुरूच राहणार आहेत.

शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांच्यासमवेत जनतेशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. त्यांनी कोरोना विषाणूच्या लढ्यातला हा महाराष्ट्रासाठीचा ‘गोल्डन अवर’ असल्याचं सांगितलं. त्यांनी राज्यातील आधी ५० टक्के क्षमतेने चालणारी शासकीय कार्यालयं २५ टक्के क्षमतेने चालवण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर राज्यातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा, कार्यालयं, आस्थापना बंद करण्याचे आदेश दिले. खासगी कंपन्यांना तसेच मजूर असलेल्या आस्थापनांना त्यांचं वेतन कापू नका असं आवाहन करत असतानाच हा आर्थिक धक्का भरून काढण्यासाठी अभ्यासगट नेमण्यात आल्याचं ते म्हणाले.

दरम्यान राज्यातल्या कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या ५२ वर गेली असून ही संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी गरज पडल्यास बेस्ट बसेस आणि रेल्वे सेवाही बंद करावी लागेल, असे संकेत त्यांनी दिले. सध्या अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी या सेवा सुरू आहेत. त्याचबरोबर बँकाही अत्यावश्यक सेवा असल्यामुळे त्यांचं कामकाज बंद होणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. जनतेला अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा असं सांगताना मुख्यमंत्र्यांनी ‘ही सुट्टी फिरायला दिलेली नाही, हे आपण स्वतःवर घालून घेतलेलं बंधन आहे. फिरू नका. घरी राहा!’ असंही स्पष्ट केलं. स्थानिक जिल्हाधिकारी आणि महापालिकांनाही आपापल्या अखत्यारीतल्या कंपन्या आणि आस्थापना बंद करण्याचे अधिकार दिल्याचं ते म्हणाले. ‘ज्यांना घरून काम करणं शक्य आहे त्यांना घरून काम करू द्यावं. ज्यांना शक्य नाही त्यांच्यासमोर सध्या कामकाज बंद करण्याशिवाय पर्याय नाही,’ असं ते म्हणाले.

त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे ज्या कोरोनाग्रस्त रूग्णांवर उपचार सुरू होते त्यांच्यापैकी पाचजण विषाणूमुक्त झालेले आहेत. तरीही खबरदारीचा भाग म्हणून त्यांना पुढचे १४ दिवस विलगीकरणात ठेवलं जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही रेल्वे आणि बसेसमधली गर्दी पुढील दोन दिवसांत कमी झाल्याचं दिसलं नाही तर नाइलाजाने हे सर्व बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल असं सांगितलं.

नाशिकहून पळून गेलेल्या कोरोनाग्रस्त कुटुंबाचा इगतपुरी येथे शोध लागला असून त्यांना पुन्हा एकदा विलगीकरणात ठेवण्यात आल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे. लोकांमध्ये घबराट न राहता त्यांनी जास्तीत जास्त सुरक्षित राहावं आणि या विषाणूचा प्रसार होण्यापासून रोखावं यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, गुरूवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर येत्या रविवारी २२ मार्च रोजी संपूर्ण देशात जनता कर्फ्यूचं पालन केलं जाईल. रविवारी मध्यरात्रीपासून रात्री १० पर्यंत या कर्फ्यूचा भाग म्हणून कोणतीही पॅसेंजर रेल्वे धावणार नसल्याचं रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही शुक्रवारी परिपत्रक काढून रविवारी रस्त्यांवर दिसणाऱ्या गाड्या तसेच लोकांवर कारवाई केली जाईल असं सांगितलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोनाशी लढा देण्यासाठी तसेच बसणाऱ्या आर्थिक धक्क्यावर उपाय म्हणून आर्थिक पॅकेज लवकरच जाहीर केलं जाईल अशी घोषणा केली आहे.

देशातील रुग्ण संख्या १९१

भारतातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या १९१ वर गेली असून शुक्रवारी मध्य प्रदेशातील जबलपूर येथे ४ रूग्ण तर हिमाचल प्रदेशात दोन रूग्ण पॉझिटिव्ह असल्याचं दिसून आलं आहे. राजस्थानमध्ये कोरोना व्हायरसने एका इटालियन व्यक्तीचा बळी घेतला असून भारतातील मृतांची संख्या ५ वर गेली आहे. ही संख्या वाढत गेल्यास भारताला त्याचा खूप मोठा फटका बसू शकेल असं मत तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे.

गायिका कुनिका कपूरवरून गोंधळ

गायिका कुनिका कपूर १० मार्च रोजी विमानतळ अधिकाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन तपासणी न करता लखनौला गेल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यानंतर तिने तीन पार्ट्यांना हजेरी लावली असून एका वास्तुरचनाकाराने आयोजित केलेल्या पार्टीत ती जवळपास १०० लोकांच्या संपर्कात आल्याचं सांगितलं जातंय. त्यात अनेक आयएस अधिकारी, राजकीय नेते आणि समाजातील प्रतिष्ठित लोक सहभागी झाले होते. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांचे पुत्र खासदार दुष्यंत हेही त्या पार्टीत होते. त्यांनी स्वतःहून विलगीकरणात जाण्याचा निर्णय घेतला असून या पार्टीनंतर दुष्यंत संसदेत उपस्थित राहिल्याने इतरही खासदार आता सावध झाले आहेत. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. कनिका कपूर हिच्याविरोधात लखनऊ पोलिसांकडे गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. कनिका कपूर राहत असलेल्या संपूर्ण इमारतीलाही विलगीकरणात ठेवण्याबाबत सध्या विचार सुरू असल्याचे वैद्यकीय अधिकारी सांगतात. त्यांचे वडील आणि इतर कुटुंबीयही आता स्वतःची तपासणी करून घेत आहेत.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी ओला-उबेर यांच्यासारख्या कंपन्यांनीही आपल्या शेअर राइड्स काही काळासाठी बंद करत असल्याचं सांगितलं आहे. अनेक हॉटेल्स आणि फूड डिलिव्हरी करणाऱ्या एप्सनी आपण ‘काँटॅक्टलेस डिलिव्हरी’ देत असल्याचं स्पष्ट केलं आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0