शोपियन मजूरांचे एन्काउंटरः साक्ष पूर्ण

शोपियन मजूरांचे एन्काउंटरः साक्ष पूर्ण

नवी दिल्लीः गेल्या १८ जुलै रोजी काश्मीर खोर्यात शोपियन जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या दोन जवानांनी तीन मजुरांना दहशतवादी समजून ठार मारले होते. या दोन जवानांच्या विरोधात साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून अन्य औपचारिक प्रक्रियेनंतर या दोघांवर कोर्ट मार्शल होऊ शकते. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार तीन मजुरांच्या एन्काउंटरप्रकरणात एक मेजर पदाचा अधिकारी दोषी आढळला असून त्यांच्या साक्षीच्या आधारावर संबंधित शिफारशी लेफ्टनंट जनरल वाय के जोशी यांच्याकडे पाठवण्यात आल्या आहेत.

15कोरचे जनरल ऑफिसर-इन-कमांड लेफ्टनंट जनरल बीएस राजू यांनी या प्रकरणातील साक्षीदारांचे जबाब घेतले असल्याचे सांगितले. पण लष्कराचे प्रशासन अंतिम कोणत्या निष्कर्षावर आले आहे, याची माहिती त्यांनी देण्यास नकार दिला.

शोपियानमधील अमशीपुरा येथे तीन मजुरांची हत्या झाल्यानंतर हे वृत्त सोशल मीडियात पसरले त्यानंतर लष्कराने चौकशीचे आदेश दिले. ही चौकशी सप्टेंबर महिन्यात सुरू झाली होती. प्राथमिक तपासात लष्कराने आफ्सा कायद्यांतर्गत अधिकारांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले होते. त्यानंतर लष्कराने चौकशी सुरू केली होती.

१८ जुलैला भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांना ठार मारल्याचे जाहीर केले होते. पण त्यावेळी या दहशतवाद्यांची ओळख पटली नव्हती पण या तिघांची जी छायाचित्रे प्रसिद्ध केली होती, त्यावरून हे दहशतवादी नसून मजूर आहेत आणि ते आमच्या कुटुंबातले महिन्याभरापासून बेपत्ता झालेले तीन सदस्य असल्याचा आरोप राजौरीतील मोहम्मद युसूफ यांच्या कुटुंबाने केला होता. त्यानंतर या प्रकरणाला वेग आला व चौकशी सुरू झाली.

त्यानंतर १३ ऑगस्टला शोपियन पोलिसांनी युसूफ यांच्या घरी राजौरीत जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे डीएनए नमुने घेतले होते.

जूर मारले गेल्याची लष्कराची कबुली

सप्टेंबरमध्ये भारतीय लष्करांकडून तीन मजुरांना दहशतवादी समजून झालेल्या एनकाउंटर प्रकरणात लष्कराने आपल्याला जवानांना दोषी मानले होते. हे एनकाउंटर एफ्स्पा १९९०च्या कायद्याचे उल्लंघन असून आपल्या जवानांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे लष्कराने म्हटले होते. या प्रकरणातील जवानांवर लष्करी कायद्यानुसार अनुशासनात्मक कारवाई सुरू केली जाईल, असेही लष्कराने स्पष्ट केले होते. एनकाउंटरमध्ये मारण्यात आलेले तिघेजण राजौरीतील रहिवासी होते, अशीही कबुली लष्कराने दिली होती.

भारतीय लष्कर आपल्या कारवाईत नैतिकदृष्ट्या प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करत असते व कायद्यानुसार या प्रकरणातील प्रत्येक घडामोड पुढे ठेवली जाईल, असे लष्कराच्या पत्रकात म्हटले होते.

मार्च २०००मध्ये अनंतनाग जिल्ह्यात पाथरीबल येथे पाच निष्पाप नागरिकांना ते दहशतवादी असल्याच्या कारणावरून सुरक्षा दलाने ठार मारले होते. तसेच २०१०मध्ये मचिल येथे पोलिस एन्काउंटरमध्ये तीन नागरिकांना ठार मारण्यात आले होते, या दोन घटनांनंतरची ही तिसरी हृदयद्रावक घटना ठरू शकते.

मूळ बातमी

COMMENTS