पाम ऑइल वादावर मलेशियाकडून साखर खरेदीचा उतारा

पाम ऑइल वादावर मलेशियाकडून साखर खरेदीचा उतारा

कौलालंपूर : काश्मीरसंदर्भात मलेशियाच्या भूमिकेवरून नाराज भारताने मलेशियाकडून पाम तेलाची आयात थांबवली आहे. हा तिढा सोडवण्यासाठी मलेशिया भारताकडून सुमारे १३०,००० टन कच्ची साखर खरेदी करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. मलेशियातील एका बड्या साखर कंपनीने ही तयारी दाखवली आहे. या साखरेची किंमत सुमारे ५० दशलक्ष डॉलर आहे. गेल्या वर्षी मलेशियाने भारताकडून ८८ हजार टन कच्ची साखर आयात केली होती.

मलेशियातील पामतेल उत्पादक कंपनी फेल्डा ग्लोबल व्हेंचर्स होल्डिंग या कंपनीमधील एमएसएम ही एक साखर आयातदार कंपनी असून त्यांनी पाम तेलावरील वादावर तोडगा काढण्यासाठी भारताकडून अधिक साखर खरेदी करण्याची तयारी दाखवली आहे. पण कंपनीने अधिकृतरित्या ही भूमिका मांडलेली नाही पण त्या कंपनीतील दोन सूत्रांनी, साखर आयातीचे प्रमाण वाढवल्याने भारत-मलेशियामध्ये काश्मीरवरून जो तणाव निर्माण झाला आहे तो कमी होईल अशी शक्यता व्यक्त केली आहे. भारत अनेक दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये व्यापारतूट कमी करण्याचा आग्रह मलेशियाला करत आहे. पण त्यावर अजून तोडगा आलेला नाही. त्यात मलेशियाने काश्मीरप्रश्नी भारताला दुखावणारी भूमिका घेतल्याने भारताने पामतेलाची आयात रोखून धरली आहे.

भारत हा मलेशियातील पामतेलाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे आणि जानेवारी महिन्यात ही आयात थांबवल्याने त्याचे परिणाम भारतीय बाजारपेठेवर दिसू लागलेले आहे.

मलेशियाने अन्य देशांची बाजारपेठ पाहू, असे म्हटले आहे पण त्यांना भारताएवढी बाजारपेठ मिळणे सध्यातरी कठीण दिसत आहे. गेल्या पाच वर्षांत भारताने मोठ्या प्रमाणात मलेशियाकडून पाम तेलाची खरेदी केली आहे. गेल्या वर्षी भारताने सुमारे ४.४ दशलक्ष टन पाम तेल खरेदी केले होते. मलेशियाची भारताला एकूण निर्यात १०.८ अब्ज डॉलरची असून आयात ६.४ अब्ज डॉलरची आहे.

मलेशियाने गेल्या वर्षी १.९५ दशलक्ष टन कच्ची साखर भारताकडून खरेदी केली होती. पण मलेशिया भारतापेक्षा ब्राझील व थायलंडला साखर खरेदीत पसंती देत आहे.

भारत हा जगात सर्वाधिक साखर उत्पादन करणारा देश आहे पण साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होण्याने भारतापुढे समस्या निर्माण झाल्या आहेत. भारताने २०१९-२० या काळात ५ दशलक्ष टन साखर निर्यातीचे उद्धिष्ट्य ठेवले आहे.

दरम्यान मलेशियाकडून कच्ची साखर खरेदीच्या निर्णयावर ऑल इंडिया साखर व्यापार असो.चे अध्यक्ष प्रफुल्ल विठलानी यांनी समाधान व्यक्त केले असून भारताच्या साखर उद्योगाला त्याचा फायदा होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

उभय देशांमधील करारानुसार या जानेवारीमध्ये सुमारे ५० हजार टन साखर मलेशियाकडे निर्यात होत असल्याचे मुंबईतील एका साखर व्यावसायिकाने सांगितले.

(रॉयटर्स)

मूळ बातमी

COMMENTS