मालेगाव राज्यातील कोरोनाचे ‘ब्लॅक स्पॉट’ !

मालेगाव राज्यातील कोरोनाचे ‘ब्लॅक स्पॉट’ !

जगभरासह देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्रातील काही शहरे "ब्लॅक स्पॉट" ठरली आहेत. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच राज्यातील एक महत्त्वाचे आणि अतिसंवेदनशील असलेल्या मालेगाव शहरावर राज्याचे लक्ष लागून आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे शासन, प्रशासन, आरोग्य खाते हतबल असल्याचे विदारक चित्र आहे.

वुहानमध्ये मृतांच्या संख्येत दुरुस्ती, ५० टक्क्याने आकडा वाढला
करोना व्हायरस – शरीरात कसा वागतो?
भारत हे करोनाचे पुढील केंद्रस्थान : डॉ. लक्ष्मीनारायण

मालेगाव :  १३ मे रोजी मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त, सहाय्यक आयुक्तांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १३ तारखेला शहराला अचानक भेट दिली होती. त्या बैठकीला आयुक्त आणि उपायुक्त दोघेही उपस्थित होते. त्यांच्या संपर्कात अनेक अधिकारी आले आहेत. त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाल्यावर तातडीने ते दोघे अधिकारी तेथून निघून गेले होते. मात्र, त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे.

कोरोनाच्या उदभवलेल्या स्थितीवरून राज्य शासनाने याआधीच्या महानगरपालिका आयुक्तांची काही दिवसांपूर्वी बदली करून नवीन आयुक्तांची नियुक्ती केली आहे. नवीन आयुक्तांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिलेआहे.

काही दिवसांपूर्वी मालेगाव शहरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती सतीश सुराणा यांना प्रशासनाने शहराबाहेरील म्हाळदा शिवार भागातील इमारतींमध्ये क्वारंनटाईन केले होते. यावेळी त्यांनी तेथील भयाण परिस्थिती उजेडात आणली. कोरोना रुग्णांची हेळसांड त्यांनी व्हिडीओ स्वरूपात मांडली होती. त्याचबरोबर अनेक रुग्णांनी तेथील परिस्थिती व्हिडीओद्वारे मांडली होती.

याच क्वारंनटाईन सेंटरमध्ये डॉक्टरांनी वापरलेले पीपीई ( PPE) किट्स, इतर वापरलेले साहित्य उघड्यावर पडले होते. तेथे फक्त दोनच नर्स उपचाराला असल्याचा आरोप तेथील रुग्णांनी केला होता. जेवणाची सोय देखील योग्य नसल्याचे रुग्णांनी व्हिडीओद्वारे सांगितले होते.

या व्हिडीओनंतर शहरात एकच खळबळ माजली होती. मात्र, मालेगाव महानगरपालिका प्रशासनाने हा आरोप प्रसिद्धीपत्रकाद्वारे फेटाळून लावला आहे. या व्हिडीओनंतर म्हाळदा शिवारातील क्वारंनटाईन सेंटर तात्पुरत्या स्वरूपासाठी बंद करण्यात आले असून येथील रूग्णांना दुसरीकडे हलवण्यात आले आहे.

या संदर्भात मालेगाव महानगरपालिकेचे उपायुक्त नितीन कापडणीस यांच्याशी संपर्क साधल्यावर ते म्हणाले,  “आम्ही लाखो रुपये खर्च करून कोरोना बाधितांसाठी योग्य सुविधा, सकस आहाराची व्यवस्था केली आहे. डॉक्टरांसाठी आवश्यक त्या साधनांची व्यवस्था केली आहे. पीपीई किट्स, N-95 मास्क, व्हेंटिलेटर हाफकीनमधून उपलब्ध केले आहेत.” रुग्णांनी केलेले आरोप मात्र, त्यांनी फेटाळून लावले.

मालेगाव शहरात कोरोनाविरुद्ध लढाईतील सर्वात महत्त्वाचे असलेले डॉक्टर्स उपलब्ध नाहीत. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. बाहेरील डॉक्टर्स, नर्स मालेगावात येण्यास तयार नाहीत. काही डॉक्टर्स तात्पुरत्या स्वरूपात शहरात पाठवण्यात आले होते मात्र, आता ते उपलब्ध नाहीयेत. महाराष्ट्र शासनाकडे डॉक्टर्स उपलब्ध करून देण्याची मागणी केली असल्याचीही माहिती उपायुक्त कापडणीस यांनी दिली.

मालेगावातील अपयश कुणाचे ?

मालेगाव हे शहर राज्यातील अतिसंवेदनशील शहर आहे. या शहराने बॉम्बस्फोट, धार्मिक दंगली पाहिल्या आहेत. येथील नागरिक सतत भीतीच्या छायेत असतात. अशातच कोरोनाचा कहर शहरात सुरू आहे. मालेगाव शहरात सुरुवातीला कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर ज्या तातडीने प्रशासनाने शहरातील वस्त्यांमध्ये उपाययोजना करायला हवी होती, ती न झाल्याने शहरात झपाट्याने कोरोना वाढत आहे.

मालेगाव हे शहर क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान आहे. त्यात शहराची लोकसंख्या खूप जास्त आहे. शहरातील मोठी लोकसंख्या ही झोपडपट्ट्यांमध्ये राहते. जवळपास ६०-७० टक्के नागरिक झोपडपट्टीमध्ये राहतात. मालेगाव हे शहर हातमाग व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. यात काम करणारा समूह प्रामुख्याने हा मुस्लीम आणि बौद्ध समूह आहे. यातील सर्व कामगार वर्ग हा ह्याच झोपडपट्ट्यांमध्ये राहतो. या शहराचे दोन भाग पडतात. शहरामधून जाणाऱ्या मोसम नदीपलीकडील भाग हा मुस्लीम बहुल भाग आहे, तर अलीकडील भागात इतर जाती-धर्मातील लोकं वास्तव्यास आहे. मुस्लीम वस्त्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत. तसेच तो हिंदू बहुल भागातही आढळून आला आहे. त्यामुळे झोपडपट्टी भागातील कोरोना आटोक्यात आणण्याचे मोठं आवाहन प्रशासनासमोर आहे.

प्रशासनाचे अपयश

देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मालेगावात त्याचा कुठेही फरक दिसला नाही. शहरात कोरोना पेशंट आढळ्यावरही अनेक भागात सर्रास बाजारपेठा सुरू होत्या. नागरिकांना त्याचे गांभीर्य नव्हते. यात नागरिकांपर्यंत जागृती करायला प्रशासन कमी पडले. शहरातील दाट लोकवस्तीच्या भागात स्थानिक प्रशासन पोहचलेच नाही. त्यामुळे इतर सर्व व्यवसाय सुरू होते. पेशंट आढळून आल्यानंतर राज्याचे कृषिमंत्री आणि मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे यांनी या वस्त्यांमध्ये स्वतः फिरून लोकांना घरात राहण्याची विनंती केली होती.

या शहराच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाने कठोर पावले उचलायला हवी होती. शहरात डॉक्टर्स, नर्स स्टाफ पूर्णवेळ उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. तात्पुरत्या स्वरूपातील सेवा देण्यासाठी डॉक्टर्स आणि स्टाफ उपलब्ध झाला होता. मात्र, तो पूर्णवेळ नसल्याने प्रशासनाची दमछाक होत आहे.

आतापर्यत मालेगाव शहरात वेगवेगळ्या आजारांनी ६०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तशी नोंद शहरातील मुस्लीम दफनभूमीने केली आहे. हे मृत्यूचे प्रमाण सरासरी कुठल्याही वर्षापेक्षा जास्त आहे. याला अनेक कारणं असू शकतात. अनेकांना दमा, टीबीसारखे जीवघेणे आजार आहेत. त्यात योग्य उपचार मिळत नसल्याची तक्रार आहे. शहरात कोरोनाच्या भीतीपोटी नागरिक इतर आजाराच्या औषध उपचारासाठी बाहेर पडत नसल्याची भीती अनेकांनी बोलून दाखवली आहे.

मालेगाव शासकीय रुग्णालय हे पूर्णपणे कोरोना रुग्णांसाठी अधिग्रहीत करण्यात आले होते. त्याच्या प्रमुखांची नुकतीच बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नवीन आरोग्य अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांचीही बदली करण्यात आली होती. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कामावर कसूर केल्या प्रकरणी मालेगाव महानगरपालिकेच्या नवनियुक्त आयुक्तांनी ४७ कर्मचाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याद्वारे गुन्हे दाखल केले आहेत.

रुग्णांवरून जिल्ह्यातील राजकारण तापले

मालेगाव शहरातील राजकारण कोरोनामुळे ढवळून निघाले आहे. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यात समनव्य दिसून येत नाहीये. शहरात कोरोनाने एवढं गंभीर रूप धारण केलेले असल्याने कुणाचाच कोणाशी ताळमेळ नाहीये.

महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचा मालेगाव बाह्य मतदारसंघ आहे. स्थानिक प्रशासन काम नीटपणे करत नसल्यामुळे त्यांनी काही दिवसांपूर्वी शहरातील हनुमान मंदिरात जवळपास ४ ते ५ तासांचे मौनव्रत धारण केले होते. यातून त्यांची हतबलता दिसून आली. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली होती, तेव्हा नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यात हस्तक्षेप केला होता. मालेगावचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल आणि माजी आमदार शेख रशीद यांच्यातही वाढत्या रुग्ण संख्येवरून वाकयुद्ध जुंपले आहे.

नाशिक, धुळे येथील भाजपा लोकप्रतिनिधींनी मालेगाव शहरातील रुग्ण आमच्या जिल्ह्यात उपचारासाठी नको अशी भूमिका घेतल्याने यावरून राजकारण तापले आहे. धुळे मतदारसंघाचे भाजपा खासदार सुभाष भामरे यांनी मालेगावातील रुग्णांना धुळ्यात प्रवेश बंदीची मागणी केल्याने रुग्णांची चिंता वाढली आहे. मालेगावातील वाढत जाणारी रुग्ण संख्या बघून शहरातील रुग्णालयातील ताण कमी करण्यासाठी इतर ठिकाणी रुग्ण पाठवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यालाच विरोध होत आहे.

कोरोनाची लढाई सामूहिकपणे लढली जाण्याची आवश्यकता असतांना यात राजकारण करणे अत्यंत दुर्दैवी आहे.

रुग्णांच्या जीवाशी खेळ; जबाबदारी कुणाची ?

मालेगावात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या रुग्ण संख्येमुळे प्रशासनाने काही कॉलेज, मंगल कार्यालये, हॉस्टेल क्वांरनटाईन सेंटरसाठी उपलब्ध केले आहेत.

महेश जाधव (नाव बदललेले आहे) या मालेगावातील खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यास कोरोनाची बाधा झाली. तो स्वतः कोरोना रुग्णालयात सेवा देत होता. तो पॉझिटीव्ह आढळल्याने त्याची सहा महिन्यांची मुलगी, बायको, आई-वडील यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. या विलगीकरण कक्षात दोन दिवस त्यांच्याकडे कोणीही ढुंकूनही पाहिले नाही. एकदाच डॉक्टर येऊन गेले व त्या रुग्णांना गोळ्या देऊन गेले. त्यानंतर कोणी फिरकलेच नाही. आपल्या तान्ह्या लहान मुलीची अवस्था बघून शेवटी, त्या कर्मचाऱ्याने रडत – रडत व्हिडीओ बनवून नागरिकांना मदतीचे आवाहन केले होते. स्थानिक पातळीवर तो व्हिडीओ व्हायरल झाला तसेच स्थानिक माध्यमांनी हा विषय लावून धरला होता. त्याचवेळी ही घटना मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी मदत पोहचवली.

दुसरी एक घटना मालेगाव शहरातील आहे. हर्षल पवार या तरुणाच्या भावाला पोटात दुखू लागल्याने इंडोस्कोपीसाठी तातडीने नाशिक येथील रुग्णालयात दाखल करायचे होते. मात्र, स्थानिक प्रशासनाने परवानगी देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप हर्षल पवार यांनी केला आहे. यात नाशिक येथील खाजगी डॉक्टरांनी रुग्णास नाशिक येथे ताबडतोब ऍडमिट करण्याचे सांगितले होते मात्र, नाशिक येथील प्रशासनाने मालेगाव येथील कुठल्याही व्यक्तीस नाशिक शहरात येण्याची परवानगी नाही असं कारण दिले. संपूर्ण मालेगाव शहर हॉट स्पॉट बनले आहे. त्यामुळे तेथील लोकांना नाशिक शहरात येता येणार नाही असं सांगून त्यांची परवानगी नाकारण्यात आली.

मालेगावात उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीयेत. त्यामुळे नागरिकांना नाशिक येथे जाण्यावाचून पर्याय नाहीये. पवार परिवाराने परवानगीसाठी सर्व शासकीय सोपस्कार पार पाडल्यावरसुद्धा फक्त मालेगावातील रहिवासी असल्यामुळे परवानगी नाकारण्यात आली होती. शेवटी अनेक अधिकाऱ्यांशी बोलून त्यांना जाण्याची कशीबशी परवानगी मिळाली मात्र, रस्त्यात कुठेही त्यांना अडवण्यात आले नाही अथवा त्यांच्या परवानगी पत्राची साधी चौकशी करण्यात आली नसल्याची माहिती हर्षल पवार यांनी दिली. जर प्रशासनाचा एवढा ढिसाळ कारभार असेल व त्यातून सर्वसामान्य लोकांच्या जीवितास धोका निर्माण होत असेल तर याला जबाबदार कोण ? असा सवाल संतप्त हर्षल पवार यांनी उपस्थित केला आहे.

मालेगावातील वाढती रुग्ण संख्या चिंतादायक  –

संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही ७६८ झाली असून त्यातील मालेगावातील ६०० लोकांचा समावेश आहे. यापैकी मालेगावातील २४२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर ४५ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर मृत्यू पावलेल्यांची संख्या ही ३४ इतकी आहे.

शहरातील दाट लोकवस्तीच्या वस्त्यांमध्ये कोरोनाबद्दल प्रचंड संभ्रम आहे. लोकांमध्ये कोरोनाबद्दल अनेक अफवा आहेत. त्यामुळेही लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने लोकांचा विश्वास संपादित करावा आणि त्यांच्यातील गैरसमज दूर करणे आवश्यक आहे.

(लेखक पत्रकार आहेत.)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0