‘सैन्याला गुप्त माहिती मिळावी म्हणून कटात सहभागी’

‘सैन्याला गुप्त माहिती मिळावी म्हणून कटात सहभागी’

मुंबईः मालेगांव ब़ॉम्बस्फोटातील एक प्रमुख आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयापुढे खळबळजनक खुलासा केला. आपण भारतीय सैन्याला गुप्त माहिती देण्यासाठी मालेगाव कट रचणार्यांच्या गटात शिरकाव केला पण सरकारने मला माझ्या कार्याचे बक्षिस म्हणून तुरुंगात ठेवले, माझी छळवणूक केली, अत्याचार केले व दहशतवादी ठरवले, असा आरोप केला.

पुरोहित यांनी त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप मागे घ्यावेत अशी याचिका न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरच्या सुनावणीत पुरोहित यांच्या वकील नीला गोखले यांनी आपले अशील कर्तव्याचे पालन करण्यासाठी भारतीय लष्कराला गुप्त माहिती देण्याच्या उद्देशाने मालेगाव कट रचणार्यांच्या गटात सामील झाले होते. त्यांनी भारतीय लष्कर व मुंबई पोलिसांना तशी माहिती दिली होती. मुंबई पोलिसांमधील एक वरिष्ठ अधिकारी हिमांशू रॉय यांनी पुरोहित यांच्याकडून मिळालेल्या माहितीची प्रशंसाही केली होती, असा दावा केला. हिमांशू रॉय यांच्याकडून तसे दस्तावेज मिळाले आहेत, याचा संदर्भ गोखले यांनी दिला. तर पुरोहित यांनी आपण या संदर्भाचा उल्लेख यासाठी करत आहोत की, मी माझे कर्तव्य बजावत होतो. या गटांमध्ये शिरून मी वरिष्ठांना गुप्त माहिती पोहचवत होतो व या कामासाठी मला तुरुंगात टाकण्यात आले, अत्याचार केले व दहशतवादीही ठरवले, असा युक्तिवाद केला.

आता या प्रकरणातील पुढील सुनावणी २ फेब्रुवारीला होणार आहे.

२९ सप्टेंबर २००८मध्ये मालेगावमध्ये एका मशिदीजवळ बॉम्ब बांधलेल्या एका मोटार सायकलीचा स्फोट होऊन त्यात ६ जण ठार व १०१ जण जखमी झाले होते. या प्रकरणी न्यायालयाने ऑक्टोबर २०१८मध्ये पुरोहित यांच्यासह भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर व अन्य ५ जणांवर दहशतवादाचे आरोप निश्चित केले होते.

मूळ बातमी

COMMENTS