बाबरी मशीद कारस्थानात मी नव्हतोः अडवाणी

बाबरी मशीद कारस्थानात मी नव्हतोः अडवाणी

नवी दिल्लीः अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशीद पाडण्याच्या कारस्थानात आपण नव्हतो व या प्रकरणात आपण निर्दोष असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (

‘बाबरीचा निकाल बिलकुल योग्य नाही’
बाबरी पाडण्यासाठी करसेवा केल्याचा फडणवीसांचा दावा
बाबरी मशीद विध्वंस सुनियोजित कटः न्या. लिबरहान

नवी दिल्लीः अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशीद पाडण्याच्या कारस्थानात आपण नव्हतो व या प्रकरणात आपण निर्दोष असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (९२) यांनी शुक्रवारी विशेष सीबीआय न्यायालयाला सांगितले.

अडवाणी यांचा जबाब सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्या. एस. के. यादव यांच्यापुढे व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे नोंदवला गेला. या सुनावणीत अडवाणी यांचे वकील विमल कुमार श्रीवास्तव, के. के. मिश्रा व अभिषेक रंजन हे उपस्थित होते. तर सीबीआयचे वकील ललित सिंग, पी. चक्रवर्ती व आर. के. यादव हे उपस्थित होते.

बाबरी मशीद कारसेवकांनी पाडली त्या कारस्थानात आपण नव्हतो असे अडवाणी यांनी सांगत या प्रकरणात आपण पूर्णपणे निर्दोष असून काँग्रेस सरकारने राजकीय सूडबुद्धीने आपल्याला त्यात गोवले असल्याचे सांगितले. आपल्या निर्दोषत्वाचे पुरावे योग्यवेळी न्यायालयात सादर करू असेही त्यांनी सांगितले.

बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणाचा सीबीआयचा संपूर्ण तपास राजकीय दबावाखाली होता व खोटे- बनावट पुरावे सादर करून आपल्यावर गुन्हे दाखल केले असे अडवाणी यांनी न्यायालयाला सांगितले.

न्यायाधीशांनी अडवाणी यांना १,०५० प्रश्न विचारले, या सर्व प्रश्नांची उत्तरे अडवाणी यांनी सावधपणे दिली. त्यांनी मशीद पाडण्याच्या कटात आपण नव्हतो व विनाकारण आपल्याला यात गोवल्याचा आरोप केला.

न्यायालयाने अडवाणी यांना काही व्हिडिओ क्लिपिंग, वर्तमानपत्रातल्या बातम्या व अन्य पुरावे दाखवले त्यावर अडवाणी यांनी हे सर्व खोटे असून राजकीय हेतूने केलेले हे आरोप असल्याचा बचाव केला.

न्यायालयाने अडवाणी यांनी केलेली कारसेवकांपुढील चिथावणीखोर भाषणेही दाखवली. त्यावर अडवाणी यांनी हा पुरावा खोटा असल्याचा दावा केला.

न्यायालयाने २४ ऑक्टोबर १९९० या तारखेचा एक इंग्रजी वर्तमानपत्रातील ‘अडवाणी यांना समस्तीपूर येथे अटक’ ही बातमी ठेवली. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने या अटकेचा निषेध म्हणून ‘भारतबंद’चे केलेल्या आवाहनाची बातमी तसेच १० ऑक्टोबर १९९०मध्ये पोलिस गोळीबारात अनेक कारसेवक ठार झालेले असूनही आणि बाबरी मशीद उध्वस्त करूनही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘बंद शांततापूर्ण जाईल’ असे केलेले विधान न्यायालयाने अडवाणी यांच्यापुढे पुरावा म्हणून ठेवले. त्यावर अडवाणी यांनी आपल्याला झालेली अटक ही सत्य घटना असून अन्य पुरावे खोटे असल्याचे सांगितले. हा तपास भिन्न राजकीय विचारधारा असलेल्यांच्या विरोधातून राजकीय सूडबुद्धीचा प्रयत्न होता, असे अडवाणी म्हणाले.

अडवाणी यांचा हा जबाब अशा पार्श्वभूमीवर नोंदवण्यात आला आहे की, येत्या ५ ऑगस्टला अयोध्येत भव्य राम मंदिर भूमीपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून त्यात सामील होणार्या ५० महत्त्वांच्या व्यक्तीमध्ये अडवाणी आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0