नवाब मलिक यांचा अंडरवर्ल्डशी संबंध असून, त्यांनी मुंबई बॉम्ब स्फोटातील गुन्हेगारांकडून कमी भावामध्ये जमीन विकत घेतल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्
नवाब मलिक यांचा अंडरवर्ल्डशी संबंध असून, त्यांनी मुंबई बॉम्ब स्फोटातील गुन्हेगारांकडून कमी भावामध्ये जमीन विकत घेतल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्याला मलिकांनी सर्व व्यवहार कायदेशीर असल्याचे उत्तर दिले.
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईत कुर्ला येथील एलबीएस रस्त्यावरील काही कोटी रुपयांची २.८ एकर जमीन केवळ २० लाख रुपयांमध्ये विकत घेतली. मुंबई बॉम्ब स्फोटातील गुन्हेगार मोहम्मद अली इशाक पटेल उर्फ सलीम पटेल आणि सरदार शहावली खान यांच्याकडे या जमिनीचे कुलमुखत्यार पत्र होते. त्यांच्याकडून ही जमीन मलिक सदस्य असलेल्या कंपनीने ही जमीन विकत घेतल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
सरदार शहावली खान हा १९९३ चा गुन्हेगार आहे. याला जन्मठेपेची शिक्षा झाली असून तो तुरुंगात आहे. सर्वोच्च न्यायालयाने ती शिक्षा कायम केली आहे. टायगर मेमनच्या घरी गाड्यांमध्ये त्याने आरडीएक्स भरले. दाऊदची बहीण हसीना पारकरचा माणूस असलेला सलीम पटेल. या दोघांकडून मलिक यांनी जमीन घेतली असा आरोप फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला. ही सर्व कागदपत्रे शरद पवारांनाही पाठवणार असून, योग्य त्या तपास यंत्रणांनाही पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर लगेच मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर दिले.
नवाब मलिक म्हणाले, की ते त्याच ठिकाणी भाडेकरू होते आणि त्यांनी ती जागा मालकांकडून विकत घेतली. त्या जागेचे कुल मुखत्यार पत्र हे पटेल यांच्याकडे होते. शाहवली खान हे तिथे वॉचमन होते आणि त्यांनी त्यांचे नाव ३०० मीटर जागेवर सात बारावर लावून घेतले होते. ते नाव काढून घेण्याच्या बदल्यात त्यांना पैसे देण्यात आले आहेत. यामध्ये कोणताही बेकायदेशीर व्यवहार नाही.
COMMENTS