बंगालचे मंत्री पार्थ चटर्जी यांना मंत्रिमंडळातून काढले

बंगालचे मंत्री पार्थ चटर्जी यांना मंत्रिमंडळातून काढले

कोलकाताः शिक्षक भरती घोटाळ्यात ईडीने अटक केलेले प. बंगालचे मंत्री व तृणमूल काँग्रेसचे नेते पार्थ चटर्जी यांना गुरुवारी मंत्रिमंडळातून काढण्यात आले. चटर्जी यांच्याकडे राज्याचे उद्योग, वाणिज्य, उद्यम विभाग, माहिती तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स, विधीमंडळ कामकाज विभाग व सार्वजनिक उद्योग व औद्योगिक पुनर्निर्माण खाती होती. ही सर्व खाती त्यांच्याकडून काढून घेण्यात आली आहेत.

बुधवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, असे एका सरकारी कार्यक्रमात वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्यावर लगेच कारवाई करण्यात आली.

गेल्या २३ जुलैला पार्थ चटर्जी यांना ईडीने शिक्षक भरती घोटाळ्यात अटक केली होती. ईडीने चटर्जी यांच्यासह अन्य १२ जणांच्या घरांवर छापेही टाकले होते. एका छाप्यात चटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून २० कोटी रु.च्या नोटा व अन्य मालमत्ता जप्त करण्यात आली होती.

अर्पिता यांच्या दुसऱ्या घरातूनही २७ कोटी ९० लाख रु. व ६ किलो सोने सापडले होते. त्यामुळे पार्थ चटर्जी यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करण्याव्यतिरिक्त ममता बॅनर्जी यांच्यापुढे पर्याय नव्हता.

२०१४ ते २०२१ या काळात पार्थ चटर्जी हे प. बंगालचे शिक्षणमंत्री होते. या काळात त्यांनी शिक्षक भरती घोटाळा केला होता. गेल्या एप्रिल व मे महिन्यात सीबीआयने चटर्जी यांची चौकशी सुरू केली होती.

मूळ बातमी

COMMENTS