भाजपाविरोधाचा सारीपाट….

भाजपाविरोधाचा सारीपाट….

महाराष्ट्रात वरवर पाहता हे एक पक्षीय सत्तांतर दिसून येत असले तरी मात्र खोलवर विचार केल्यास सर्वसामान्य जनतेने यातून देशाला एका मोठ्या संकटातून वाचवण्याचा अर्थ काढता येतो. कारण आमच्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नसल्याचे प्रभावी वातावरण भाजपाने ज्या पद्धतीने उभे केले होते त्यातून नैराश्यात गेलेला देश कसा सावरेल हीच मोठी चिंता होती.

फुटबॉलच्या खेळात नियमित खेळाडूंनी चेंडू गोल होण्याच्या शक्यतेपर्यंत आणून ठेवावा, मात्र गोल करणारा शेवटचा स्ट्रोक ऐनवेळी अनपेक्षितपणे टीमशी संबंध नसलेल्या कुणीतरी मारावा अशी आजच्या महाआघाडीच्या पदरात पडलेल्या यशाची व भाजपाच्या अपयशाची कहाणी ठरते आहे.

भाजपाविरोधी वातावरण तयार करण्यात जे काही घटक सुरुवातीपासून सक्रिय होते, व ज्यांच्या भाजपाविरोधाला काही तात्विक व सैद्धांतिक पदर होता त्यांचाही यात गोल करण्याची परिस्थिती निर्माण करण्यात खारीचा वाटा होता. निवडणूक काळात त्याला कर्मधर्मसंयोगाने एक राजकीय परिमाण लाभू शकले कारण मतदारांनी यातील राजकीय पक्षांना त्यासाठी सक्षम मानले हा त्यातला एक भाग.

निवडणुकीत मिळालेल्या जनादेशात एक सातत्याने आढळणारा धागा हा भाजपाविरोधीच होता. एरवी भाजपा नको मोहिमेतील घटक सक्रिय असले तरी निवडणुकीत त्या भाजपाविरोधाला प्रत्यक्षात मूर्त स्वरुप देण्यात अनपेक्षितपणे शिवसेना व त्यामुळे या प्रक्रियेत येऊ शकणाऱ्या राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांच्या माध्यमातून ते प्रत्यक्षात येऊ शकले. हे यश आपल्या झोळीत घेण्याचे काम अनायसेच हे राजकीय पक्ष घेऊ शकले. अनपेक्षितपणे म्हणण्याचे कारण एवढेच की शिवसेना निवडणुकीच्या निकालापर्यंत भाजपाची सहयोगी पक्ष म्हणून सत्तेत होती व भाजपाशी कुठल्याही सैद्धांतिक वा तात्विक वादापेक्षा केवळ सत्तेच्या वाटपावरून त्यांना आपला भाजपा विरोध प्रकट करावा लागलेला दिसतो. इतरांच्या बाबतीत म्हणतांना भाजपा विरोधाची खरी धुरा असण्याची अपेक्षा ज्या पक्षांवर होती त्यात काँग्रेसचा अव्वल क्रमांक असला तरी निवडणूकपूर्व काळात ती भाजपाविरोधात तशी ठाम भूमिका घेऊ शकली नाही. किंवा भाजपाविरोधी प्रयत्नातही तशी आपला सहभाग नोंदवू शकली नाही.

राष्ट्रवादीचेही शेवटपर्यंत तळ्यात मळ्यात चालले होते व शेवटी त्यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला तेव्हा त्यांना अंग झटकून भाजपाविरोध करावा लागला व राजकीय आघाडीवर राष्ट्रवादी भाजपाविरोधक म्हणून पुढे आली. हा भाजपाविरोध तत्व वा संविधान पातळीवरचा नसून आपला पक्ष वाचवण्याचा प्रमुख हेतु असलेला कार्यक्रम होता. अशा या तिन्ही घटकांवर वेगवेगळ्या कारणांनी भाजपाविरोधाचे जनक म्हणून वावरण्याची संधी मिळाली असली तरी खरा भाजपाविरोध काय आहे, कुठे आहे व कसा आहे याचा मागोवा घेतल्यास एक वेगळेच चित्र उभे रहाते.

भाजपा विचाराला असलेला विरोध आज जरी राजकीय पातळीवर प्रखरतेने दिसत असला तरी त्याची पाळेमुळे प्रदेशातील सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात दिसून येतात. चार्वाक, बुद्ध व पुढे म. फुल्यांपर्यंत ही परंपरा असली तरी ती वैदिक परंपरांतील मोक्षप्राप्ती, पापपुण्य, स्वर्गनरकादि संकल्पनांच्या विरोधात बुद्धीप्रामाण्यता व वस्तुनिष्ठ विचारांची होती. यात वर्णव्यवस्था, शोषण प्रवणता व मनुस्मृती सारख्या विषयांचाही समावेश करता येईल. फुल्यांच्या काळात ती सामाजिक व आर्थिक शोषणाच्या पातळीवर आली व त्यातून एका विरोधी विचाराच्या नव्या चळवळीचा उदय झालेला दिसतो. त्यानंतरच्या काळात हिंदू महासभा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यातून जनसंघ हा राजकीय पक्ष व नंतर थेट भारतीय जनता पार्टीपर्यतच्या प्रवासात या विचाराचा राबता झालेला दिसतो. अनादि काळापासून सामाजिक, राजकीय क्षेत्रात या विचाराला विरोध करण्याची परंपरा आहे व ती अजूनही अनेक राजकीय पक्ष व सामाजिक चळवळीतून जिवंत असल्याचे दिसते.

भाजपाचा पितृपक्ष असलेल्या जनसंघाला तसा भारतीय राजकीय परिघात दखलपात्र स्थान मिळवायला बराच कालावधी लागला व आणीबाणीतून बदलत्या राजकीय संधीतून काँग्रेसविरोधी राजकारणाला जो वाव मिळत गेला त्यात भाजपाचा उदय होऊ शकला. त्यात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की याच काळात निखळ हिंदुत्वाला एक भारतीयत्व लाभत साऱ्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात संघपरिवाराच्या माध्यमातून भाजपला एक व्यापकता मिळत गेली व भारतीय राजकारणाचे एक प्रखर वास्तव असलेली जातीव्यवस्था ज्यातील ज्या जाती काँग्रेसच्या काळात दुर्लक्षित होत राजकीय लाभाच्या परिघाबाहेर अस्वस्थ होत्या त्यांच्या सहभागाने आपला एक स्वतंत्र मतदार तयार केला. यात भाजपाने राजकीय सत्ता मिळवतांना लोकशाहीतील तांत्रिक तरतुदींचा वैध अवैध वापर केलेला दिसून येतो.

काँग्रेस विरोधच नव्हे तर त्यांच्या कारभाराचे खरे खोटे चित्र तयार करत काँग्रेस द्वेषाची एक नवी लाट आणत २०१४ साली त्यांनी भारतीय राजकारणात अभूतपूर्व सत्ता मिळवली. माध्यमे व समारंभी कारभाराच्या मदतीने एक नवे आश्वासक चित्र निर्माण करत त्यांनी आपल्या विचारांचीही मीमांसाही सकारात्मक पातळीवर नेत देशात एक नवा राजकीय विचार म्हणून रुजवायला सुरुवात केली.

मात्र हे करत असतांना देशाची सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक चौकट आपल्या या प्रयत्नात विस्कटते आहे याचे भान न राहिल्याने काही नव्या समस्या निर्माण होऊ लागल्या. देशाची सार्वभौमिकता व धर्मनिरपेक्षता यांनाही धक्का पोहचतो की काय अशा शंका येऊ लागली. देशातील सामाजिक सर्वसमावेशकता ही घटनादत्त आहे ही संकल्पना गेली ७० वर्षे रुजलेल्या समाजाला हा एकांगी विचार फारसा पटत नव्हता.  २०४च्या ऐतिहासिक विजयानंतर भाजपाची ज्या वेगाने आगेकूच चालली होती त्यानी स्तिमित होत सारी राजकीय व्यवस्था भांबावली होती व एक, क्षीण का होईना, भाजपाविरोध दाखवत होती.

राजकीय पक्षात सरळ सरळ भाजपा विरोधी भूमिका घेण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे हे लोकसभेच्या निवडणुकीत आपला उमेदवार नसतांनाही प्रचारात उतरले व त्यांनी भाजपाविरोधात एक राळ उठवून दिली. पुढे विधानसभा निवडणुकीत त्यांचा तो प्रयत्न फारसा यशस्वी होऊ शकला नाही. पण ज्या दहशतीच्या वातावरणात सारी राजकीय व्यवस्था भाजपाविरोधात जायला कचरत होती त्याच वातावरणात राज ठाकरेंचे हे धाडस उल्लेखनीय होते. त्या दरम्यान काहीसा लोकाश्रय मिळालेला भाजपाविरोध राजकीय क्षेत्रापेक्षा सामाजिक घटकांचा समावेश असलेल्या क्षेत्रात रुजू लागला होता. त्यात भाजपाच्या पारंपरिक विरोधक म्हणजे धार्मिक तेढ निर्माण होऊन बाधित होणाऱ्या अल्पसंख्यांक घटकांपेक्षा हिंदू समाजाकडूनच याचा विरोध बुद्धीप्रामाण्य, वस्तुनिष्ठता व स्वातंत्र्याची निश्चिंती या कारणानी होऊ लागला. कारण तसेही धर्म व जाती यांचा प्रभाव नव्या पिढीत फारसा प्रभावी ठरत नव्हता. शिवाय २०१४च्या निवडणुकीत उभा केलेला काँग्रेस वा इतर राजकीय पक्षांविषयीचा द्वेष ओसरत भाजपाच्या अपयशी कारभाराची चर्चाही जोर धरू लागली होती. या साऱ्या घटकांचा भाजपा विरोधी मोहिमेला एक प्रकारे पाठबळच मिळत होते.

प्रस्थापित राजकीय व्यवस्था आपल्या पक्षीय सत्ताकारणात भाजपाशी वैर न घेता त्यांच्याशी कसे जमवून घेता येईल याच प्रयत्नात होती. मात्र त्याचवेळी भाजपाच्या मित्रपक्षातही असुरक्षिततेचे वातावरण दिसू लागले होते. मात्र भाजपाच्या राजकारणातील धोके ज्यांच्या लक्षात आले होते त्यांनी मात्र हा गड कसोशीने लढवला. यात काही राजकीय पक्ष, सामाजिक, शैक्षणिक चळवळी व काही विचारवंतांचा समावेश होतो. शेतकऱ्यांच्या काही संघटनाही अस्वस्थ होत्या. ग्रामीण भागात भाजपा विरोध रुजू लागला होता. भाजपा विरोधाची होणारी गळचेपी ही प्रत्यक्ष दिसत असूनही कारवाईची तमा न बाळगता दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांची उदाहरणे समोर असतांना हे धाडस करण्यात आले. यातून मतदारांना यात काहीतरी तथ्य असल्याचा संदेश गेला व त्याचवेळी भाजपाच्या चूकलेल्या धोरणांच्या झळा सामान्यांना बसू लागल्या व काहीतरी कुठेतरी चूकते आहे हे सर्वांच्या लक्षात येऊ लागले. भाजपाची व्यापक होण्याची महत्वाकांक्षा जोर धरू लागताच त्यातला विधिनिषेध संपतांना पाहून राजकीय घटकांबरोबर अराजकीय घटकांनाही काळजी वाटू लागली. प्रस्थापित माध्यमांतून या भाजपाविरोधाला फारसा वाव मिळाला नसला तरी समाजमाध्यमे जी बऱ्यापैकी स्वीकारली जात ते लोक औसुक्याने वापरु लागली होती त्यातून या भाजपाविरोधाचा प्रचार प्रसार होऊ लागला. काही राजकीय पक्षांना हा सत्ताप्राप्तीचा मार्ग होऊ शकतो असे वाटल्याने त्यांनीही भाजपा विरोधाचा आसरा घेतलेला दिसतो. या असंतोषाचे पडसाद लोकसभेच्या निवडणुकीत फारसे दिसू शकले नसले तरी महाराष्ट्राच्या निवडणुकीत भाजपा हटाव मोहिमेला बऱ्यापैकी यश मिळू शकले. याचे कारण भाजपाच्या चुकलेल्या आर्थिक धोरणांचे परिणाम प्रत्यक्ष लोकांना जाणवू लागल्याने व त्यावरची उपाययोजना करण्यात भाजपला आलेल्या अपयशाचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.

राजकीय पटलावरुन भाजपाला हद्दपार करण्याचे श्रेय या पक्षांना दिले जात असले तरी यांना या मार्गात आणण्याचे काम सूज्ञ मतदारांनीच केले आहे हे विसरता येणार नाही. या मतदारांना या निर्णयाप्रत येण्याचे काम या भाजपाविरोधी मोहिमेलाच जाते. भाजपालाच मतदान करण्याचा पायंडा दृढ होत असण्याच्या काळात हे घडत होते. यामागे समाज माध्यमातून अविरतपणे मांडलेला विचार होता. वैचारिक पातळीवर चाललेले मंथन होते व त्याला लोकांच्या प्रत्यक्ष अनुभवाची जोडही होती. यात प्रामुख्याने व्यक्त होणारा विचार म्हणजे कुणीही चालेल पण भाजपा नको इतपर्यंत सामान्य लोक व्यक्त होऊ लागले होते. हा बदल प्रामुख्याने ग्रामीण भागातील शेतकरी समाजाच्या वाढत्या मतदानातून दिसून येतो व त्यात निवडून आलेल्या पक्षीय समर्थनातून भाजपा विरोधाची लाटही दिसते. निवडणुकीतील निकालात भाजपा विरोधाचे स्पष्ट प्रमाण बघता या मतदारांना या निर्णयाप्रत आणायला असे तळागाळात काम करणाऱ्या भाजपा विरोधकांचे प्रयत्न कारणीभूत होते. मात्र यामार्गाने निर्माण झालेला भाजपा विरोध हा सुप्त पातळीवर राहात त्याला प्राप्त माध्यमातून तेवढी प्रसिद्धी न मिळू शकल्याने हा असंतोष निर्माण करणारे मात्र या नंतरच्या चित्रातून हरवलेले दिसतात.

वरवर पाहता हे एक पक्षीय सत्तांतर दिसून येते. मात्र खोलवर विचार केल्यास सर्वसामान्य जनतेने यातून देशाला एका मोठ्या संकटातून वाचवण्याचा अर्थ काढता येतो. कारण आमच्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नसल्याचे प्रभावी वातावरण भाजपाने ज्या पद्धतीने उभे केले होते त्यातून नैराश्यात गेलेला देश कसा सावरेल हीच मोठी चिंता होती. निवडणुकांमध्ये दहशत, पैसा व इतरही मार्गांचा प्रछन्न वापर इतर राजकीय विचार व घटकांना निरुपयोगी ठरवू लागला होता. राजकीय व्यवस्था कितीही भांबावली तरी देशातील लोकशाही प्रेमी मतदार सारासार विचार करत योग्य निर्णय करत तो राबवूही शकतात हे सिद्ध झाल्याने संबंधितांनी आता सुटकेचा निश्वास टाकायला हरकत नाही.

COMMENTS