मनपरिवर्तनः भाजप खासदाराचा राजीनामा मागे

मनपरिवर्तनः भाजप खासदाराचा राजीनामा मागे

अहमदाबादः माजी केंद्रीय मंत्री व भरूच येथील भाजपचे विद्यमान खासदार मनसुख वसावा यांनी मंगळवारी भाजपच्या सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा बुधवारी परत घेतला. ते आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामाही संसदेच्या आगामी अधिवेशनात देणार होते. पण गुजरातचे मुख्यमंत्री रुपाणी यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांचे मनपरिवर्तन झाले.

गेल्या आठवड्यात वसावा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी नर्मदा जिल्ह्यातील १२१ गावे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून पर्यावरण मंत्रालयाने अध्यादेशाद्वारे जाहीर केली होती, ती अधिसूचना स्थानिक आदिवासींच्या हितासाठी मागे घ्यावी अशी विनंती घेतली होती. आदिवासींची गावे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील घोषित केल्यानंतर सरकारने या आदिवासींच्या जमिनी व संपत्ती ताब्यात घेण्यास सुरूवात केल्याने आदिवासींमध्ये भय व अविश्वास निर्माण झाला आहे, असेही या पत्रात नमूद करण्यात आले होते. या आदिवासींना स्थानिक अन्य लोकांसमवेत सामावून घ्यावे त्यामुळे त्यांच्या जगण्यात शांतता व स्थैर्य येईल असाही पत्रात वसावा यांनी आग्रह केला होता.

वसावा यांनी पक्षाला लिहिलेल्या पत्रात, माझ्या चुकांमुळे पक्षाची प्रतिमा खराब होऊ नये अशा अपेक्षेने राजीनामा देत असून पक्षाने माझ्या क्षमतेपेक्षा अधिक संधी दिली आहे, त्यासाठी पक्षाचा आभारी आहे. माणसाकडून चुका होतात व माणसे चुका करतात, त्याचा तोटा पक्षाला होऊ नये अशी माझी अपेक्षा आहे. पक्षाचा मी निष्ठावंत कार्यकर्ता असून मला माफ करावे, अशी विनंती केली होती.

पण बुधवारी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याशी चर्चा केल्यानंतर वसावा यांनी आपल्याला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी संसद सदस्य राहावे म्हणून आग्रह धरला. कारण लोकसभा खासदार असल्याने कंबर व गळ्याच्या दुखापतीवर उपचार करता येतील, असा सल्ला दिल्याचे पत्रकारांना गांधीनगरमध्ये सांगितले. पक्षाने आपल्याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे व पक्षातील कार्यकर्ते त्यांच्यासोबत राहतील अशी ग्वाही दिल्याचे वसावा यांनी सांगितले.

मूळ बातमी

COMMENTS