मतदान – एक निःस्वार्थ कृती!

मतदान – एक निःस्वार्थ कृती!

मतदान राष्ट्र बळकट करण्यासाठी नसते, तर ते जनतेला बळकटी देते.

देशभंजक नायक
अमेरिकेचे असे का झाले ?
‘फाटा’ची लोकशाहीकडे वाटचाल : ७० वर्षानंतर निवडणुका

मागच्या काही महिन्यांपासून अनेक कलाकार, क्रीडापटू, राजकारणी, इतिहासतज्ञ आणि बुद्धिजीवी लोक आपणा सगळ्यांना उन्हातान्हाची पर्वा न करता बाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. कॉर्पोरेट जगानेदेखील आपण सामाजिकदृष्ट्या सुजाण आणि नफ्याच्या पलीकडे बघणारे आहोत हे दाखवायची संधी सोडली नाही. आपल्याला योग्य निर्णय घ्यायला सांगताना ते स्वतःच्या कंपनीचा मोठेपणा मिरवायला विसरले नाहीत.

या प्रयत्नांचे सार्थक झाले असे सध्यातरी वाटते आहे. भारतभरातील मतदानाचा टक्का ‘जास्त’ किंवा ‘खूप जास्त’ असल्याच्या बातम्या आल्या आहेत. अनेक विक्रम तोडले गेले आहेत आणि त्यामुळे या देशाचे नागरिक म्हणून आपल्याला अभिमान वाटायलाच हवा. मतदान देशभक्ती अधोरेखित करणारे काम झाले आहे, राष्ट्राच्या अभिमानाखातर उचललेले ते एक महत्वाचे पाऊल आहे. निवडणूक अधिकाऱ्याजवळील कागदांच्या चळतीत माझे नाव आणि छायाचित्र असल्यामुळे मी  भारतीय संघराज्याशी त्वरित एक ‘नागरिक’ म्हणून जोडला जातो. मात्र हेच  एक पूर्ण सत्य आहे असे नाही. अजून दुसऱ्या कारणांसाठी सुध्दा मी मतदान करतो, उदाहरणार्थ, माझे आयुष्य समृद्ध बनवू शकतो; ज्या ‘बाहेरच्या शक्ति’ माझ्या आयुष्यात बदल घडवू पाहात आहेत त्यांच्याशी दोन हात करू शकतो. हे ‘बाहेरचे’ अथवा ‘इतर’ कोण आहेत, हे मी कोण आहे यावर ठरते! पण तरीही आपल्यासाठी अशी ‘ती’ बाहेरची माणसे अस्तित्वात असतातच.

म्हणूनच, भारतीय आहे म्हणून मी मतदान करतो, तसेच मी ज्या धर्माचा, जातीचा किंवा भाषिक गटाचा भाग आहे त्यासाठीही मतदान करतो. आत्ताच्या उतावळ्या राष्ट्रवादी सामाजिक-राजकीय वातावरणात अनेकवचनी ‘आम्ही’चा उल्लेखही एकवचनीच केला जातो.

आपल्या मतामुळे भ्रष्टाचाराचा बिमोड होईल किंवा विकास घडून येईल ही कल्पना काही वेळेपुरती बाजूला ठेवू या, आणि मतदानामागच्या खऱ्याखुऱ्या कारणाचा आढावा घेऊ ज्याचे मूळ लोकशाहीमध्ये आहे.

लोकशाहीचे विशुद्ध आणि मुलभूत स्वरूप ध्यानात घेतल्यास असे लक्षात येईल की एक प्रक्रिया म्हणून नव्हे तर एक तत्व म्हणून आपल्याला जन्माने मिळालेली ही अवस्था आहे – ती कोणत्याही राजकीय व्यवस्थेने दिलेली नाही.  लोकशाही म्हणजे दृष्टी, संवेदना, अनुभव, विचार, निवड आणि कृतीचे स्वातंत्र्य! मानवाला नैसर्गिकरित्या मिळालेले हे वरदान आहे ज्यासाठी कुठल्याही अर्ज-विनंत्या कराव्या लागत नाहीत.

२९ एप्रिल २०१९ रोजी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दरभंगा जिल्ह्यातील एका बोटीत झालेले मतदान. सौजन्य: पीटीआय

२९ एप्रिल २०१९ रोजी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दरभंगा जिल्ह्यातील एका बोटीत झालेले मतदान. सौजन्य: पीटीआय

हळूहळू मानवाने नव्या राजकीय आणि सांस्कृतिक व्यवस्था निर्माण करण्यास सुरुवात केली, आणि त्यावेळेस त्याला ‘सत्ता’ नावाचे नवे आणि आकर्षक असे मूल्य गवसले. सत्तेच्या आकर्षणामुळे त्याने निसर्गतः मिळालेला स्वतंत्र निवडीचा अधिकार स्वतःपासून दूर नेला आणि आपल्या बांधवांपासूनही लपवला. ही स्वतंत्र ‘इच्छा’ त्याने केवळ काहीजणांना बहाल केली आणि बहुसंख्य लोकांना ती आचरण्याची सक्ती केली. बहुतेक समाजांमध्ये वैयक्तिक इच्छेचा बिमोड करण्यात आला.

मानवनिर्मित जुलूमशाही अनेक वर्षे सहन केल्यानंतर मनुष्याने पुन्हा अशा सामूहिक ऊर्जेचा शोध घेतला जी वैयक्तिक इच्छेतून निर्मिली जाऊ शकते. प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य इतर अनेक स्वतंत्र विचार आणि कृतींना जन्म देते, परंतु पुष्कळदा ते एकमेकांच्या विरोधी असू शकतात. पण त्यातून अंतिमतः जे चैतन्य निर्माण होते त्यामुळे माणसांची स्वप्ने प्रत्यक्षात आकारास येऊ शकतात.  हे सत्य समजल्यामुळे माणसाने पुन्हा एकदा स्वातंत्र्याचे मूल्य उचलून धरले आणि त्याला लोकशाही असे संबोधले. आधुनिक काळातील लोकशाहीमध्ये कितीही त्रुटी असल्या तरी ती आपल्याला निसर्गतः जे मिळाले आहे आणि जे आपण आजच्या समाजाच्या साच्यात बसवू पाहतो, त्याच्या बऱ्याच अंशी जवळ जाते.

आपले मत लोकशाहीस चालना देते – मत हे परीसाप्रमाणे असते.  पण सोन्यामध्ये रूपांतरित होणाऱ्या लोखंडाची किंवा शिशाची किंमत कमी असते काय? या सगळ्या धातूंमध्ये ज्या अनावश्यक श्रेणी निर्माण केल्या आहेत, त्यात गुरफटून जायला नको. ‘मत’ हे आपल्याला मिळालेले मौल्यवान देणं आहे. आपण कुठल्याही आर्थिक अथवा सामाजिक स्तरातील असलो तरीही  आपले मत हे आपले आहे, जे आपल्याला स्वतःच्या इच्छेची जाणीव करून देते. त्यासाठी जो काही थोडा वेळ आपण देतो, त्यात आपण निवड करतो आणि आपण स्वतंत्र आत्मा होतो व आहोत याची अनुभूती घेतो.

म्हणूनच, मतदान करणे हे केवळ एखाद्या राष्ट्राचा, पंथाचा वा समुदायाचा भाग म्हणून करण्याचे कार्य नव्हे, तर ते मानवी समाजाचा एक घटक असल्याच्या नात्याने पार पाडले पाहिजे. आपण स्वतःच्या गरजांच्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या घटनांशी जोडून घेऊ शकतो.  त्यामुळे मतदान हे आपल्याला दिसणाऱ्या आणि दृष्टिपलीकडच्या अनेक माणसांचे आयुष्य बदलण्यासाठी महत्वाचे असते. जेव्हा तुम्ही मतदान करता, तेव्हा त्या निवडीद्वारे आपण सर्व एक आहोत हे सांगत असता.

महामार्गावरून जात असताना आपल्या खिडकीशी येणारी (काहीबाही विकायला येणारी किंवा भीक मागणारी) माणसे, हॉटेलमध्ये खाणे झाल्यावर आपली ताटे उचलणारा माणूस किंवा राजस्थानातील आपल्याला केवळ नकाशातच दिसेल अशा दुर्गम खेड्यातील लहान मुले एकमेकांशी जोडलेले आहेत, आणि यांतील दुवा आपले मत आहे. मतदान करणे हे तुम्ही आपल्या आजूबाजूच्या जगाबद्दल संवेदनशील असल्याचे प्रतिक आहे. सहभावना, सामर्थ्य आणि जे आहे ते वाटून घेण्यासाठी तत्पर असल्यचेही!

कोणाच्या सक्तीने किंवा बळजबरीने नाही, तर आपल्याला वाटते म्हणून आपण मतदान केले असेल, तर मतदानकेंद्रातून बाहेर पडल्यावर आपल्याला शुचिर्भूत झाल्यासारखे वाटते आणि हृदय आनंदाने भरून जाते. असे का होते? कारण कुठेतरी अंतर्मनात आपल्याला समजते की हा जो काही थोडा वेळ आपल्याला मिळाला आहे, त्यात आपण स्वतःसाठी असे काही न करता, दुसऱ्याचा किंवा दुसऱ्यासाठी विचार केला आहे. आपल्या सामाजिक अस्मितांनी आपल्यावर लादलेल्या मर्यादांपलीकडे जाऊन आपण काही करू पाहिले आहे.

मतदानकेंद्रातून बाहेर येताना आपणा सर्वांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य असते. त्याचे कारण म्हणजे ‘बदलांचा’, ‘सुधारणेचा’ अथवा ‘असहमतीचा’ अधिकार आपण बजावलेला असतो. परंतु खरी परिस्थिती अशी नसते. आपल्याला पूर्णत्वाची भावना येते कारण समस्त माणसांसाठी आपण आपल्याही नकळत काही केल्याची भावना आपल्या मनात असते. मतदानादरम्यान आपली स्वतःची अगदी वेगळी बाजू आपल्यासमोर येते. ही जाणीव दुसऱ्यांसाठी विचार करण्यास भाग पाडते आणि त्यावेळेस आपण “यातून आपल्याला काय लाभ होईल?” याचा विचार करत नाही. लोकशाहीचे हे भावनिक अंग आहे असे म्हणता येईल. एरवीचे आपले लोखंडी पिंजऱ्यातील मर्यादित अस्तित्व जणू नाहीसे होऊन आपण माणुसकीला कवटाळतो.

एकतेची भावना समान असते, तुम्ही समाजाच्या तळागाळातील आहात की उच्चभ्रुंपैकी, याचा इथे काही संबंध येत नाही. उदाहरणार्थ एखादी तळागाळातील व्यक्ति, जिला रोजच्या खडतर आयुष्यात सुधारणा हवी आहे तीही जेव्हा मतदानकेंद्रात जाते तेव्हा स्वतःचा सामाजिक स्तर विसरून त्या रांगेतील एक होऊन जातो. इतरांप्रमाणेच त्या व्यक्तिलाही जीवन बदलणारा निवडीचा अधिकार मिळतो, लोकांच्या आयुष्यास स्पर्श करतो, चेहऱ्यावर हास्य आणतो आणि या जगाला आणखी चांगले बनवण्यास हातभार लावतो. हे सगळे कदाचित शब्दांत मांडता येणार नाही. परंतु त्याला याची जाणीव जरूर असते.

मतदान हे राष्ट्र बळकट करण्यासाठी नसते, ते जनतेला बळकटी देते.  लोकशाही आपल्याला निव्वळ मर्यादित राष्ट्रीय अस्मितेच्या पलीकडे पाहण्यास सक्षम करते. निवडणुकीची प्रक्रिया ही राष्ट्रासाठी असते, परंतु मत मात्र राजकीय सीमांपालिकडे असते.  त्यामुळे आपल्याला या जगातील प्रत्येक मनुष्याचे, झाडाचे आणि प्राण्याचे जीवन बदलायचा अधिकार मिळतो.

जेव्हा आपण मतदान करतो तेव्हा त्याचा प्रत्येक माणसावर परिणाम होतो. त्या चारदोन क्षणांची ही किमया आपण लक्षात घ्यायला हवी. आपल्या एका मताने कलह थांबू शकतात आणि लोकांना आवाज मिळू शकतो.  सीमांचे महत्व नाहीसे होऊन लोकांना अधिक महत्व प्राप्त होते. यामुळे आपण एकत्र नांदू शकतो आणि निसर्गतः मिळालेली संसाधने वाटून घेऊ शकतो.

मत देताना आपण नेहमी आदर्शवादी असतो, तेव्हा आपण व्यवहार्य  विचार करूच असे नाही. त्यामुळे कदाचित या सगळ्या बदलांची आपल्याला कधीच कल्पना येणार नाही, पण त्याने तसा काही फरक पडत नाही. आपण जेव्हा जगभरात अधिकाधिक लोकशाही व्यवस्था निर्माण करण्याची अपेक्षा ठेवतो तेव्हा आपण बदलाला उत्सुक अशा अधिकाधिक माणसांशी हे जग वाटून घेत असतो; त्यातून आणखी सीमा, मर्यादा आणि बंधने निर्माण करायचा प्रयत्न करत नाही.

पैसा, दारू, धर्म आणि जातीवरून आणले जाणारे विविध प्रकारचे दबाव हे निवडणुकीचे वास्तव आहे. आपल्यापैकी प्रत्येक माणसावर त्याचा परिणाम होतो. पैसा म्हणजे केवळ राजकीय पक्ष ज्याचे बेकायदेशीरपणे वाटप करतात  ते नव्हे, तर ‘एखादा पक्ष जर जिंकून आला तर मला किती पैसे मिळतील’ या विचाराचाही त्यात समावेश असतो.

धर्म आणि जात या आपल्या समाजातील सगळ्यात प्रबळ अशा लोकशाहीविरोधी व्यवस्था आहेत. स्वतःच्या मृगजळात त्यांनी माणसांना आणि समाजाला गिळंकृत केलेले आहे. हा सगळा एक आभास आहे याची जाणीव होईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. या व्यवस्था आपल्याला आपल्या मर्यादित परिघाबाहेरचे जग बघू देत नाहीत आणि म्हणूनच आपण जितके परीघ तयार करू, तितके त्यात आणखी गुरफटून जातो.

आपल्यातील कोणीही परिपूर्ण मनुष्य नाही आणि म्हणूनच आपण विभाजन करू, सत्ता गाजवू, हल्ले करू, दुखावू आणि नियंत्रण गाजवायला बघू. पण तरीही आपण चांगली माणसेही आहोत आणि जर डोळसपणे मतदान केले तर ते आपण सिद्ध करू. हे सिद्ध करायची दुर्मिळ संधी लोकशाही आपल्याला देते. आपले मत आपल्याला सगळ्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय बांधनांपलीकडे नेऊ शकते.

‘मत’ प्रत्येक मनुष्याला स्वतःशी आणि आजूबाजूच्या सर्व घटकांशी जोडते. ही एक दुर्मीळ अशी मनुष्यनिर्मित गोष्ट आहे, ज्याचा अंदाज मनुष्यालाही कधी खऱ्या अर्थाने आला नाही. परंतु आता जर आपल्याला मतदानाच्या अधिकाराचे हे परिवर्तनशील अंग लक्षात आले असेल तर याला अमूल्य दागिन्याप्रमाणे जपले पाहिजे आणि आदराने परिधानदेखील केले पाहिजे.

मतदान ही एक निःस्वार्थ कृती आहे.

टी. एम. कृष्णाहे शास्त्रीय गायक आणि लेखक आहेत.

मूळ इंग्रजी लेख येथे वाचवा.

अनुवाद – गायत्री लेले

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1