मेघालयात काँग्रेसला खिंडार; १२ आमदार तृणमूलमध्ये दाखल

मेघालयात काँग्रेसला खिंडार; १२ आमदार तृणमूलमध्ये दाखल

नवी दिल्लीः मेघालय काँग्रेसमधील १७ आमदारांपैकी १२ आमदारांनी बुधवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षांतरात राज्याचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा हे खुद्द होते. संगमा हे काँग्रेसमधील ज्येष्ठ व वरिष्ठ नेत्यांवर नाराज होते. मेघालय प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी व्हिन्सेंट एच. पाला यांची नियुक्ती झाल्यानंतर संगमा गट नाराज झाला होता. आपल्याशी चर्चा न करता हा निर्णय घेण्यात आल्याचे संगमा यांचे म्हणणे होते. संगमा गेल्या सप्टेंबरपासून पक्षाच्या कार्यक्रमापासून स्वतःला दूर ठेवत होते. त्यांनी गेल्या ऑक्टोबरमध्ये काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेतून मतभेद दूर होत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. पण ही नाराजी व मतभेद दूर झाले नाहीत. अखेर या नाराजीतून त्यांनी आपल्या गटातील १२ आमदारांना तृणमूलमध्ये नेले. आता राज्यात या राजकीय भूकंपानंतर तेथे तृणमूल काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष बनला आहे.

मेघालयमध्ये २०२३मध्ये विधानसभा निवडणुका होत असून आपल्या पक्षाची मजबूत बांधणी व्हावी म्हणून तृणमूल काँग्रेसने अनेक महत्त्वाच्या राजकीय चाली खेळण्यास सुरूवात केल्या आहे. संपूर्ण ईशान्य भारतात तृणमूलला आपले पाय पसरायचे असल्याने राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर तृणमूलला मदत करत आहेत.

गेल्या काही महिन्यात तृणमूलने काँग्रेसमधील बडे नेते आपल्या पक्षात घेतले आहेत. २३ नोव्हेंबरला कीर्ती आझाद, जेडीयूचे पवन वर्मा, हरियाणा काँग्रेसचे अशोक तंवर, त्या पूर्वी काँग्रेसच्या खासदार सुष्मिता देव, लुईजिन्हो फालेरियो व अभिजीत मुखर्जी अशा मातब्बर नेत्यांना पक्षात घेतले होते.

२०१२च्या विधानसभा निवडणुकांत तृणमूलने राज्यातल्या ६० पैकी ३५ जागांवर निवडणुका लढवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांना यश मिळाले नव्हते.

२०१८च्या विधानसभा निव़डणुकांत काँग्रेसने २१ जागा जिंकल्या होत्या. यात कॉनरॉड संगमा यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी)ला १९ व भाजपला दोन जागा मिळाल्या होत्या. एनपीपीने भाजपप्रणित नॉर्थ इस्ट डेमोक्रेटिक अलायन्समध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता.

मूळ बातमी

COMMENTS