डॉ. श्रीराम लागू - माझ्या वैयक्तिक समस्यांनी झालेली माझ्या मनाची विफल अवस्था मी पार विसरून गेलो. इतका मी ‘गिधाडे’ वाचून हेलकावून गेलो होतो. नाटक हिंस्त्र होते - आणि फार जिवंत होते. अत्यंत निर्घृण हिंस्त्रपणाने त्याने माझ्या टराटरा चिंध्या केल्या. अत्यंत निर्दयपणे माझे रक्त त्याने गटारात ओतून दिले आणि मग त्यातले एक टमरेलभर तोंडाला लावून आधाशीपणाने गिळून टाकले आणि तृप्तीची घाणेरडी ढेकर दिली.
१९६२च्या जूनमध्ये इंग्लंडहून परत आलो. त्यावेळी मी पुण्यात रहात होतो. वैद्यकीय व्यवसाय करत होतो. माझ्या काकांचा गाजलेला खून-खटला, माझ्या पहिल्या पत्नीचे इंग्लंडमधे झालेले अचानक अपघाती निधन आणि पानशेतच्या प्रलयाने केलेली पुण्याची वाताहात – एका पाठोपाठ झालेल्या या आघातांनी मनाच्या जवळपास चिंधड्या झाल्या होत्या. फुंकर घालायला फक्त नाटकांचा सहवास होता. पी.डी.ए. आणि रंगायनमधली स्नेही मंडळी होती. पण एकंदरीत मन थाऱ्यावर नव्हते.
अशा अवस्थेत तेंडुलकरांनी एक दिवस ‘गिधाडा’चे हस्तलिखित माझ्या हातात दिले. ‘एकदा वाचून पहा’ म्हणाले. मी लगेचच वाचले. भयंकर अस्वस्थ झालो. एका खडकाळ, ओसाड, रखरखीत प्रदेशातल्या गिधाडांच्या ढोलीत माणसांची रूपे घेऊन वावरणारी निर्घृण गिधाडे स्वप्नात येऊन मनाचा थरकाप उडवू लागली. रक्ताने बरबटलेले त्यांचे पंजे आणि सुळे यांच्या तावडीत सापडलेल्या एका असहाय्य चिमणीचा भयानक तडफडात मन विदीर्ण करू लागला. माझ्या वैयक्तिक समस्यांनी झालेली माझ्या मनाची विफल अवस्था मी पार विसरून गेलो. इतका मी ‘गिधाडे’ वाचून हेलकावून गेलो होतो. नाटक हिंस्त्र होते – आणि फार जिवंत होते. अत्यंत निर्घृण हिंस्त्रपणाने त्याने माझ्या टराटरा चिंध्या केल्या. अत्यंत निर्दयपणे माझे रक्त त्याने गटारात ओतून दिले आणि मग त्यातले एक टमरेलभर तोंडाला लावून आधाशीपणाने गिळून टाकले आणि तृप्तीची घाणेरडी ढेकर दिली.
मी येणाऱ्या-जाणाऱ्या या नाटकाबद्दल सांगत सुटलो. पी.डी.ए., रंगायन आणि इतरत्र त्याची वाचने केली. नाटक ऐकणाऱ्यांच्या प्रतिक्रिया दोन टोकांच्या असायचा. एक वर्ग असा असायचा की तो नाटकातल्या बीभत्सपणाची, हिंस्त्रपणाची किळस आणि तज्जन्य संताप घेऊन अर्ध्या वाचनातून उठून जायचा आणि दुसरा, नाटकात माणसाच्या हिंसक वृत्तीचे, भोगवादाचे, मूल्यशून्यतेचे, अमानुष अशा प्रामाणिकपणाने घडवलेले दर्शन पाहून विलक्षण प्रभावित, अस्वस्थ व्हायचा.
काही असले तरी हे नाटक रंगमंचावर आणणे त्या काळात अशक्य दिसत होते. पी.डी.ए.चे अध्यक्ष भालबा केळकर बहुसंख्य सभासदांच्या (विशेषतः स्त्री सभासदांच्या) मताचा आदर करण्याकरता हे नाटक पी.डी.ए. तर्फे करू देणार नाही असे भालबांनी निक्षून सांगितले. रंगायनचे अध्यक्ष श्री. पु. भागवत, त्यांनी सांगितले, ‘नाटक श्रेष्ठ आहे, करायला पाहिजे एक खरे, पण सध्याच्या सेन्सॉर बोर्डाची अवस्था पाहता, आता हे नाटक सेन्सॉरकडे पाठवणेच चूक ठरेल. कारण ते नक्की नापास होईल. आणि एकदा नापासाचा असा शिक्का बसला म्हणजे पुढे कधीच हे नाटक करता येणार नाही.’
मला उपलब्ध असलेल्या दोन्ही वाटा बंद झाल्या. मी भयंकर चडफडलो. हे नाटक झालेच पाहिजे…ते आपण केले पाहिजे…हे नाटक रंगमंचावर आणल्याशिवाय आपले पितर स्वर्गाला जायचे नाहीत! एका बाजूला या नाटकाबाबत मी इतका वेडा आणि हटवादी झालो होतो आणि दुसऱ्या बाजूला निरनिराळी माणसे निरनिराळ्या मार्गांनी माझी खात्री पटवीत होती की सद्य:परिस्थितीत हे नाटक रंगभूमीवर येणे शक्य नाही. माझा फार कोंडमारा झाला. नाटक माझ्या अंगी मावेनासे झाले-फोडून बाहेर येईल की काय असे वाटू लागले. सगळ्याच वाटा बंद झालेल्या पाहून एक दिवस मी समोर टेपरेकॉर्डर घेऊन बसलो – सबंध नाटक एका बैठकीत वाचून रेकॉर्ड करून टाकले.
मग मला खूप हलके वाटले. एवढ्या मोठ्या आजारातून उठल्यासारखे. मी ती टेप तेंडुलकरांच्या हवाली केली आणि मनावरचे मोठे ओझे उतरल्यासारखा माझ्या इतर उद्योगात गुंतलो. ‘गिधाडे’ मनातून काढून टाकले.
पण हे तसे मनातून गेले नाही. त्याने मला सतावणे बंद केले एवढेच. मनाच्या एका कोपऱ्यात वेटोळे घालून ते आपले पडून राहिले.
यानंतर पाच-सहा वर्षांचा काळ गेला. १९६९च्या जानेवारीत मी आफ्रिकेहून भारतात परतलो आणि माझा वैद्यकीय व्यवसाय बंद करून संपूर्ण वेळ नट झालो. पुण्याहून मुंबईला स्थलांतर केले. व्यावसायिक नाटकात कामे करू लागलो आणि सुदैवाने लवकर दुबेच्या तावडीत सापडलो. त्याच्या ‘थिएटर युनिट’ करता मोहन राकेशचे, तेंडुलकरांनी भाषांतर केलेले मराठी ‘आधी अधुरे’ करू लागलो. ‘थिएटर युनिट’ प्रायोगिक संस्था होती. समानशील माणसे खूप भेटल्यामुळे गप्पा, चर्चा खूप व्हायच्या – अगदी हिरिरीने रंगायच्या. तिथे लक्षात आले की ‘गिधाडे’ अजून मनातून गेलेले तर नाहीच, पण थिएटर युनिटच्या मोकळ्या, प्रागतिक वातावरणात ते मोठ्या आशेने आणि उत्साहाने पुन्हा फणा काढून उभे राहते आहे. मी ‘गिधाडे’बद्दल खूप उत्साहाने बोलायचो – पण बाकीच्या मित्रमंडळींना ते नाटक रंगमंचावर सादर करणे अशक्यप्राय वाटायचे आणि त्यामुळे ते मला माझ्या विचारापासून परावृत्त करायचे. एव्हाना सर्वांनी ते नाटक वाचले होते किंवा माझी टेप ऐकली होती. नाटक विलक्षण आहे याबद्दल जवळपास सर्वांचेच एकमत होते – पण ते सेन्सॉर कसे होणार? सादर करण्याचे धाडस कुठली संस्था करणार? दिग्दर्शन कोण करणार? त्यात कामे करायला कोण तयार होणार? इत्यादी अनेक प्रश्न त्या मित्रांना भेडसावीत. माझ्याजवळ तरी या प्रश्नांची उत्तरे थोडीच होती! पण उत्साहाच्या भरात मी नाटकाची तरफदारी करत होतो – त्याचा प्रयोग रंगमंचावर सादर झालाच पाहिजे असे हिरिरीने मांडत होतो. जवळपास प्रत्येक बैठकीत हा ‘गिधाडे’चा विषय निघायचा.
अशाच एका बैठकीत आव्हाने देणे-घेण्यापर्यंत मजल गेली. दिग्दर्शन करण्याचे आव्हान मी स्वीकारले, निर्मितीचे आव्हान दुबेने स्वीकारले. मी आव्हान स्वीकारले याला फारसा अर्थ नव्हता. कारण मी ते फार पूर्वी, कोणी देण्याआधीच स्वीकारून बसलो होतो. दुबेने निर्मितीचे आव्हान स्वीकारणे फार महत्त्वाचे होते, कारण निर्मितीच्या बाळंतपणाची कटकट आणि निर्मितीनंतरच्या वादळाला तोंड देण्याची तयारी या दोन्ही गोष्टींचा सारासार विचार करून त्याने हे आव्हान स्वीकारले होते. नाटक तीन महिन्यांत म्हणजे मे १९७०पर्यंत सादर करण्याची पैजही घेण्यात आली.
आणि मग झपाटल्यासारखे सगळे कामाला लागलो.
खूप वर्षांपूर्वी वाचलेले नाटक, प्रत्यक्ष सादर करण्याच्या दृष्टीने जेव्हा पुन्हा (कितव्यांदा कुणास ठाऊक!) वाचले तेव्हा प्रथमच असे जाणवले की नाटकात अनावश्यक भाग खूप लिहिला गेला आहे तो प्रथम छाटावा लागेल – नाटक प्रमाणबद्ध करावे लागेल. त्याचे नीट संपादन करावे लागेल – कदाचित थोडे फार पुनर्लेखन करावे लागेल. मूळ तीन अंकी, जवळजवळ साडेतीन तास चालेल असे नाटक, शक्य तर दोन अंकी, आटोपशीर करायला हवे.
हे जाणवले तेव्हा फार बरे वाटले. वाटले की विचार बरोबर असेल की चूक, पण त्या नाटकाची जी जबरदस्त भावनिक जबाबदारी माझ्यावर होती तिच्यातून मी मोकळा झालो आहे; थोडा अलिप्त होऊन त्या नाटकाचा विश्लेषणात्मक विचार मी करू शकलो आहे हे चांगले लक्षण आहे!
संहिता घेऊन तेंडुलकरांनाकडे गेलो आणि नाटक छाटून बेताचे करावे – शक्य तर दोन अंकातच ते बसवावे, हा प्रस्ताव त्यांच्यापुढे मांडला. तेंडुलकर म्हणाले, ‘तुम्ही ‘गिधाडे’ आता बसवताहात तेव्हा तुमच्या दृष्टीने ते वर्तमान आहे. पण मी ते अनेक वर्षांपूर्वी लिहिले आहे आणि त्यातून केव्हाच मुक्त झालो आहे. आता त्यात मी पूर्वीसारखा गुंतू शकणार नाही. तेव्हा काय संपादन करायचे ते तुम्हीच करा. तुम्ही योग्य तेच कराल असा मला विश्वास आहे.’
मी संहिता घेऊन बसलो. नाटकात पुनरावृत्ती बरीच असल्याने तीन अंकांचा ऐवज, योग्य ती काटछाट करून दोन अंकात बसवणे कठीण नव्हतेच. मूळ आशयाला धक्का न लावता हे सहज करता आले, पण एक-दोन ठिकाणी सांधा निखळला. तो नीट जोडण्यासाठी दोन प्रवेश नव्याने लिहिणे आवश्यक होते. ते स्वतः लिहिण्याची कल्पनाही माझ्या मनात येणे शक्य नव्हते (तेंडुलकरांच्या ताजमहालाला माझी वीट?) तेव्हा पुन्हा तेंडुलकरांकडे दाखल झालो. तेंडुलकरांनी संपादित संक्षिप्त संहिता वाचली. त्यांनाही ही संक्षिप्त आवृत्ती नाटक म्हणून अधिक परिणामकारक वाटली. आणि त्यांनी तत्परतेने मला हवे असलेले दोन प्रवेश नव्याने लिहून दिले. (कदाचित तेही मी लिहीन अशी त्यांना भीती वाटली असावी!)
संहिता तयार झाली.
आज ते नाटक बसवताना अवघड वाटणार नाही. पण वीस वर्षांपूर्वीची (१९७०) मराठी रंगभूमीची अवस्था लक्षात घेतली पाहिजे.
इतका नेमका, इतका प्रांजळ आणि इतका रांगडा घाव मराठी प्रेक्षकांवर तत्पूर्वी कुठल्याही नाटकाने घातला नव्हता. प्रत्येक माणसात दडून बसलेल्या हिंसक श्वापदाचे प्रत्ययकारी दर्शन हे नाटक निधडेपणाने घडवत होते. ते तितक्याच प्रामाणिकपणे रंगमंचावरून घडवणे आवश्यक होते. आणि त्याकरता रंगभूमीवरील अनेक सभ्यतेचे संकेत झुगारून द्यावे लागणार होते. प्रेक्षकांचा अनुनय तर हे नाटक करणार नव्हतेच, उलट त्यांच्या मर्मस्थानी एक सणसणीत ठोसा घालणार होते. आव्हान मोठे होते. गफलत झाली तर अंगावर शेकणार होते. पण आता माघार घेण्याचा प्रश्नच नव्हता.
नाटक सेन्सॉर बोर्डाकडे पाठवले आणि तालमींची जुळवाजुळव सुरू झाली.
पात्रयोजना काळजीपूर्वक करणे फार महत्त्वाचे होते (तसे ते नेहमीच असते म्हणा) कारण नाटकात हिंस्त्र मानवी गिधाडांचे (पप्पा, रमाकांत, उमाकांत, माणिक) प्रत्ययकारी दर्शन घडविणे जेवढे महत्त्वाचे दिसत होते तेवढेच – किंबहुना थोडे जास्तच – महत्वाचे दिसत होते, त्या गिधाडांच्या तावडीत सापडलेल्या दोन अश्राप जीवांची (रमा व रजनीनाथ) शोकांतिका कधी उभी करणे हे. हा समतोल साधला गेला नसता तर नाटक नुस्तेच शिवीगाळीने भरलेले एक बीभत्स दर्शन झाले असते.
‘गिधाडां’च्या भूमिका तुलनेने सोप्या आणि भाव खाऊन जाणाऱ्या असल्याने रजनीनाथ आणि रमा यांची निवड करणे अवघड होते. रमाच्या भूमिकेत मीना सुखटणकर (आता नाईक) हवी तेवढी कृश दिसणार नव्हती – पण तिचा अभिनयाचा आवाका लक्षात घेऊन तिला ते काम दिले. रजनीनाथाचे काम मी स्वतः करावे असे ठरवत होतो – कारण ते काम अवघड होते आणि योग्य माणूस चटकन मिळत नव्हता. पण मग अशोक साठे मिळाला आणि प्रश्न सुटला. एकनाथ हट्टंगडी या अत्यंत गुणी नटाचे तुफान विनोदी काम मी बादल सरकारांच्या ‘वल्लभपूरची दंतकथा’ या नाटकात पहिले होते. आणि मी त्या नटाच्या प्रेमात पडलो होतो. ‘गिधाडे’त ‘पप्पा’चे काम त्याने करावे असे मी ठरवले. पण तो तयार होईना. ‘एवढे गंभीर काम मला पेलवणार नाही’ असे त्याचे म्हणणे. मोठ्या आग्रहाने त्याला तयार केले. बाकी मग दीपा, अशोक कामेरकर आणि मी अशी सगळी टोळी जमली.
तें. आणि आम्ही , तेंडुलकरी नाटक आणि नाटकवाले या पुस्तकातील एक उतारा
संपादक : प्रदीप मुळ्ये, राजीव नाईक, विजय तापस
आविष्कार प्रकाशन
COMMENTS