विहंगावलोकन आणि मी

विहंगावलोकन आणि मी

भारतीय उपखंडात येणारे पक्षी दोन मार्गांनी भारतात येतात, यातील काही पक्षी इंडस व्हॅली मार्गाचा उपयोग करतात बहुतेक पाणथळ जागीचे पक्षी या मार्गांनी प्रवास करतात, दुसरा मार्ग हा ब्रह्मपुत्रा नदीच्या मार्गाने भारतीय उपखंडात येतो.

अदानी समूहाच्या मानहानीच्या दाव्यात पत्रकार रवी नायर यांच्याविरुद्ध वॉरंट
मोदीच शहांना खोडून काढत आहेत – विरोधकांची टीका
गुजरात दंगलः मोदी व अन्य जणांची क्लिन चीट कायम

सध्या कोरोनाचे मळभ दूर होत असताना सर्व पक्षी आणि निसर्गप्रेमी हळू हळू बाहेर पडू लागलेत, बाहेरच्या देशात जाण्या-येण्यासाठी ठराविक विमाने चालू असली तरीही काही परदेशी पाहुणे भारतात येऊ लागलेत. ज्यांना कोणत्याही सीमा अडवू शकत नाहीत आणि ते दरवर्षीच भारताला भेट देतात, असे परदेशी पाहुणे म्हणजे भारतात दरवर्षी हजारोंच्या संख्येने स्थलांतरित होणारे नवनवीन पक्षी. महाराष्ट्रातही अनेक पक्षी स्थलांतर करून येतात.

भारतात जवळपास २३० प्रजातीचे पक्षी स्थलांतर करून येतात, तर महाराष्ट्रात हीच संख्या ६०च्या आसपास असते. महाराष्ट्रातील विविध सागर किनारे आणि पाणथळ जागा या पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजून जातात.

भारतातील विविध प्रदेशातील जैव विविधता अभ्यासताना माझा पक्ष्यांशी संबंध आला, नाहीतर मुंबईत राहात असल्यामुळे कावळे, चिमण्या, पारवे आणि काही प्रमाणात बगळे यावर माझी मजल लहानपणी तर कधी गेली नाही, पण जस जसा या विषयावर अभ्यास आणि निरीक्षणे वाढू लागली तसं तसं महाराष्ट्रातील पक्षी सृष्टीचं एक वेगळ आणि समृद्ध विश्व खुणावू लागलं. पु.लं. म्हणतात तसं की काही माणसांच्या वर्षानुवर्ष भेटी झाल्या तरी मनाच्या गाठी बसत नाहीत आणि काही माणसे क्षणभरात आपलीशी होऊन जातात तसच काहीस पक्ष्यांच्या बाबतीतही आहे.

मुळात पक्षी स्थलांतर का आणि कसे करतात याबद्दल मला कुतूहल होतं. अभ्यास करताना असं कळल की ऋतुमानात होणारे बदल, अन्नाचा तुटवडा आणि दिवसाच्या कालावधीत होणारा बदल हे घटक पक्षी स्थलांतराला कारणीभूत ठरतात. पक्षी स्थलांतराचे पूर्ण जगभरात चार प्रमुख उड्डाणमार्ग आहेत. ते खालीलप्रमाणे:

  • निओ आर्क्टिक – निओ ट्रॉपिकल हवाई मार्ग – पक्ष्यांचे स्थलांतर उत्तर आणि दक्षिण अमेरिकेदरम्यान होते.
  • युरेशियन- आफ्रिकन हवाई मार्ग – युरोप, आशिया आणि आफ्रिका या खंडांच्या दरम्यान होणारे स्थलांतर.
  • ऑस्ट्रेलियन हवाई मार्ग – दक्षिण पूर्व आशिया आणि ऑस्ट्रेलिया या दरम्यान होणारे स्थलांतर.
  • पेलॅजिक हवाई मार्ग – समुद्रावर होणारे स्थलांतर

भारतीय उपखंडात येणारे पक्षी दोन मार्गांनी भारतात येतात, यातील काही पक्षी इंडस व्हॅली मार्गाचा उपयोग करतात बहुतेक पाणथळ जागीचे पक्षी या मार्गांनी प्रवास करतात, दुसरा मार्ग हा ब्रह्मपुत्रा नदीच्या मार्गाने भारतीय उपखंडात येतो.

महाराष्ट्रातील मी पाहिलेले काही पक्षी मनावर अक्षरशः गारुड करतात. रातवा हा असाच एक पक्षी. हा जीव निशाचर असतो थंडीच्या कालावधीत सकाळी तापून व काहीशा गरम असलेल्या मातीत बसलेला रातवा रात्री पाहणं हे अनुभवावच लागतं, कधी तुम्ही तुमच्या गाडीवरून रात्री फिरायला बाहेर पडता आणि तुमच्या गाडी जवळून चक चक आवाज करून कोणीतरी निघून जातं हे पाखरू म्हणजेच रातवा. हा पक्षी धीट असतो का हे कळायला मार्ग नाही पण अंधाऱ्या रात्री अचानक गाडीच्या चाकाजवळून उडून घाबरवतो हे मात्र खरं. इंग्रजीमध्ये याला नाईटजार असं म्हणतात. याचे सर्वसाधारणपणे ३ प्रकार महाराष्ट्रात आढळून येतात. याच्या डोळ्यांवर प्रकाश पडला असता याचे लाल गुंजेसारखे चमकणारे डोळे याचं अस्तित्व जाणवून देतात. हा पक्षी लहानसहान किटकांवर गुजराण करतो, रातवा घरटे वगैरे बांधायच्या भानगडीत पडत नाही जमिनीवरच अंडी घालून मोकळा होतो. याची अंडी फिकट गुलाबी रंगाची आणि त्यावर तपकिरी ठिपके असलेली असतात. फेब्रुवारी ते सप्टेंबर या काळात प्रजनन होते. जंगल, गवताळ प्रदेश, शेतीच्या जागा अशा ठिकाणी हा पक्षी आढळतो.

रातवा मी प्रथम पहिला तो राजस्थानमध्ये त्यानंतर सावंतवाडीला ओझरती भेट झाली आणि मग ३-४ वर्ष सोडून हा निशाचर मला भेटला तो थेट पुण्यातच. हा पक्षी संपूर्ण भारतभर आढळतो आणि स्थानिक स्थलांतर सुद्धा करतो.

महाराष्ट्राचा राज्यपक्षी म्हणजेच हरोळी (Yellow footed green pigeon) हा सुद्धा एक असाच देखणा पक्षी. याला हिरवा होला, हरोळी, यलो फुटेड् ग्रीन पिजन किंवा पिवळ्या पायाची हरोळी या नावांनीही संबोधले जाते. हरोळी कबुतरासारखाच आवाज करते, हिरव्यागर्द झाडांच्या ठिकाणी हा फळभक्षी दिसून येतो. विशेषतः वडवर्गीय झाडांची फळे याला खूप आवडतात. हा पक्षी मध्य भारतापासून उत्तरेकडील राज्यात सुद्धा आढळतो. यांचा विणीचा हंगाम मार्च ते जूनमध्ये असतो एखाद्या उंच झाडावर काड्यांनी बांधलेल्या घरट्यात हे पक्षी अंडी घालतात. यांच्या हिरव्या रंगामुळे झाडाचे पान आणि झाडावरील पक्षी यात फरक करणे खूप कठीण.

रोहित पक्षी (Flamingo) हा महाराष्ट्रात स्थलांतर करून येणारा अतिशय सुंदर पक्षी आहे. हा प्रामुख्याने पाणथळ जागी आढळतो, हा पक्षी स्थानिक स्थलांतर करतो, भारतातील बहुतेक रोहित पक्षी कच्छच्या रणात आढळतात आणि हिवाळा सुरू झाला की मुंबई आणि आसपासच्या ठिकाणी आपले बस्तान बसवतात. पावसाळ्यात यांचा विणीचा हंगाम असतो, गुडघाभर पाण्यात मातीच्या किल्ल्यासारखा आकार करून हे पक्षी त्यात अंडी घालतात. शेवाळ हे यांचे प्रमुख खाद्य असते, त्याच्या चोचीतून ते उपयोगी असलेले शेवाळ खातात, या शेवाळामुळेच या पक्ष्यांना विशिष्ट असा गुलाबी रंग प्राप्त होतो. हा पक्षी लहानमोठे मासे, किडे आणि पाणवनस्पती सुद्धा खातो.

चित्रबलाक (Painted stork) हा सुद्धा पाणथळ जागी राहणारा करकोच्या च्या जातीतील एक भारदस्त पक्षी म्हणता येईल, ऑगस्ट ते जानेवारी हा यांचा प्रजनन काळ असतो, हे पक्षी स्थानिक स्थलांतर करतात, विणीच्या हंगामात याची भरतपूर येथे असलेली असंख्य घरटी मी पहिली आहेत, जानेवारी नंतर साधारणत: हे पक्षी मुंबई आणि आसपासच्या भागात दिसतात. याचं वजन ३ किलोपर्यंत असतं, हा पक्षी मासोळ्या, बेडूकसापगोगलगाय यांच्यावर गुजराण करतो. याला रंगीत करकोचा असे सुद्धा म्हटले जाते.

पाखुर्डी (Chestnut bellied Sandgrouse) हा असाच एक लपून वावरण्यात पारंगत असलेला पक्षी, पाखुर्डी हा पक्षी कोरड्या माळरानावर किंवा वाळवंटी प्रदेशात आढळतो. याचा रंग प्रामुख्याने पिवळा असून त्यावर नक्षी असते. हे पक्षी धान्य किंवा गवताच बीज खातात क्वचित प्रसंगी लहान-सहान किटक सुद्धा फस्त करतात. पाखुर्डी फक्त आशिया आणि आफ्रिका खंडातच आढळतात. यांचा विणीचा हंगाम हा राहत्या प्रदेशातील अन्नाची उपलब्धता आणि पाऊस यावर अवलंबून असतो. पाखुर्डी दर विणीच्या हंगामात जोडीदार निवडत नाहीत, ते एकाच जोडीदारासोबत आयुष्यभर राहतात. बऱ्याचदा कोरड्या प्रदेशात राहात असल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य असते, यामुळे हे पक्षी पाण्याच्या शोधात खूप दूरवर ये जा करतात. हे पक्षी पाणी प्यायल्यानंतर गळ्याची आणि चातीजवळची पिसे ओली करतात आणि त्या पिसातून वाहून आणलेले पाणी आपल्या पिल्लांना पाजतात. या पिसांमध्ये १५-२० मि.ली. पाणी साठवण्याची क्षमता असते. यांचे दर्शन मला पुण्याच्या  माळरानावर झाले.

भारतीय धाविक (Indian courser) हा सुद्धा भारतात आणि महाराष्ट्रात माळरान शेतजमिनी वर आढळणारा पक्षी आहे. या पक्षाचे प्रथम दर्शन मला राजस्थानात झाले त्यानंतर हा पक्षी थेट ७-८ वर्षांनी दिसला तो पुण्याजवळ माळरानावारच. अतिशय देखणा असा हा पक्षी याच्या डोक्याच्या मागील बाजूस असलेल्या पांढऱ्या पट्ट्यामुळे ओळखला जातो. याचा रंग कोरड्या प्रदेशाला साजेसा म्हणजे तपकिरी असतो. हा पक्षी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, इत्यादी राज्यात आढळतो. यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे म्हणूनच हा एक संकटग्रस्त पक्षी म्हणून ओळखला जातो.

दलदल ससाणा (Eurasian marsh harrier) हा मांसाहारी पक्षी हिवाळ्याच्या सुरुवातीला याचे आगमन होते. संपूर्णपणे गडद तपकिरी असलेला हा रुबाबदार पक्षी आहे यातील नराच डोकं फिकट तपकिरी रंगाच असतं. बेडूक, मासे, छोटे पक्षी, छोटे सस्तन प्राणी तसेच मृत प्राणी यावर गुजराण करतो. याची वीण भारतात होत नाही, विणीच्या हंगामात हा पक्षी पॅलिआर्क्टिक प्रदेशात स्थलांतर करतो. हिवाळ्यात मुंबई जवळील पाणथळ जागी याचे दर्शन होऊ शकेल.

तर असे हे मला भावलेले काही पक्षी. खर पाहता सगळ्याच पक्षांच्या आठवणी अतिशय आल्हाददायक आहेत. अगदी भारताचा राष्ट्रीय पक्षी मोरापासून ते लहानग्या पाकोळीपर्यंत अनेक पक्षी आहेत जे माणसाच्या ना ना प्रकारे उपयोगी पडतात आणि आपण माणसे मात्र त्यांचा अधिवास नष्ट करून त्यांची शिकार करून त्यांच्यावर गंडांतर आणायचा प्रयत्न करतो.

म्हणूनच मग जनजागृतीसाठी महाराष्ट्र राज्य सरकारनतर्फे दिनांक ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर हा आठवडा पक्षी सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला. ५ नोव्हेंबर हा अरण्यऋषी म्हणून ओळखले जाणारे आणि पक्षीकोशाचे निर्माते मारुती चित्तमपल्ली यांचा जन्मदिवस तर १२ नोव्हेंबर ही डॉ. सलीम अली यांची जयंती. या दोन उत्तुंग व्यक्तीमत्वांचा जागर करत त्यांच्या पाऊलखुणाचा मागोवा घेत आपण पक्षी निरीक्षण आणि पक्षांचे संगोपन संवर्धन करायचा निश्चय करूया आणि आपल जग सुंदर करणारे हे रंगीबेरंगी मित्र वाचवूया.

(सर्व छायाचित्रे – धनंजय द.राऊळ)

धनंजय द.राऊळ, यांनी वनस्पती शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले असून, त्यांनी जैव विविधतेचा अभ्यास केला आहे. तसेच ते छायाचित्रणही करतात. NatureNotes

ही मालिकानेचर कजर्वेशन फाउंडेशनद्वारे राबवलेल्यानेचर कम्युनिकेशन्सया कार्यक्रमाचा भाग आहे. सर्व भारतीय भाषांतून निसर्गविषयक लेखनास प्रोत्साहन मिळावे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. पक्षी आणि निसर्गाविषयी लिहिण्याची तुमची इच्छा असल्यास फॉर्म भरा.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0