आजी आणि नातवाचं खट्याळ गूळपीठ ‘मिनारी’

आजी आणि नातवाचं खट्याळ गूळपीठ ‘मिनारी’

म्हटलं तर 'मिनारी' ही गोष्ट अमेरिकेत स्थलांतरीत झालेल्या एका कोरियन कुटुंबाच्या जगण्याच्या धडपडीची आहे. म्हटलं तर ही गोष्ट छोटा डेविड आणि त्याची आज्जी

भारतातर्फे ऑस्करसाठी ‘जल्लीकट्टू’ची शिफारस
मँक
बोचरा थट्टापट : बोराट

म्हटलं तर ‘मिनारी’ ही गोष्ट अमेरिकेत स्थलांतरीत झालेल्या एका कोरियन कुटुंबाच्या जगण्याच्या धडपडीची आहे. म्हटलं तर ही गोष्ट छोटा डेविड आणि त्याची आज्जी सून-जा यांच्यातल्या खोडकर गूळपिठीची गोष्ट आहे.

कॅलिफोर्नियातल्या एका निर्मनुष्य माळावर जेकब पोचलाय. कोणीही माणूस आसमंतात नाही. जमिनीचा मोकळा तुकडा जंगलझाडांनी घेरलेला आहे. एका ट्रेलर घरात संसार थाटलाय. डॉक्टर म्हणा, एखादी वस्तू म्हणा, काहीही हवं असेल तर काही मैल दूर जावं लागतं.

जेकबची बायको मोनिका म्हणते- कुठं निर्जन ठिकाणी आलोय, कसं जगणार.

जेकब सांगतो- पाच एकर जमीन घेऊन त्यावर कितीशी शेती करणार, म्हणून धोका पत्करून पन्नास एकर जमीन घेतलीय.

खड्डा करून जेकब पाणी शोधतो. त्या पाण्यावर तो बाग फुलवतो. पाणी आटतं. घरात प्यायलाही पाणी उरत नाही.

घरात भांडणं होतात. ॲन आणि डेविड ही मुलं भांडणं पाहून-ऐकून दुःखी होतात.

जेकब दिवसरात्र व्यवस्थित डिझायनिंग वगैरे करून शेताची आखणी करतो, सिंचनाची सोय करतो, त्याला लागणारं सारं इंजिनयरिंग  तो स्वतःच करतो.

एकटं पडलेलं कुटुंब दूरवरच्या गावातल्या चर्चमधे जातं. तिथं इतर अमेरिकन कुटुंबं त्यांना भेटतात. तिथला एक अमेरिकन मुलगा डेविडला म्हणतो-तुमचा चेहरा असा सपाट का असतो.

एका देशातून दुसऱ्या देशात जाऊन वसणं किती कठीण असतं.

आणि अचानक मोनिकाची आई, सून-जा, येते.

तिनं कोरियातून येताना नाना वनस्पती वगैरे आणलेल्या असतात, खेळायचे पत्ते आणलेले असतात. ती वनस्पतीचा एक काढा करून डेविडला देते.

तो कडू काढा पिताना डेविड तोंड वाकडं करतो. वैतागतो. पिणार नाही म्हणतो. आज्जी सांगते-अरे हा खास कोरियन काढा आहे. तो तुला शक्ती देणार आहे.

डेविडच्या हृदयात एक छिद्रं असतं, जेकब कुटुंबाला त्याची चिंता असते.

डेविड काढ्याचा वाडगा घेऊन बेसिनवर जातो, काढा ओतून टाकतो.

मग डेविड आज्जीला शिक्षा करायची ठरवतो. आज्जीचं लक्ष नसतांना तिच्या सूपच्या वाडग्यात तो सू करतो. फूफू करून आज्जी सू तोंडाबाहेर फेकते.

डेविड आजीला खट्याळपणे विचारतो- आजी कशी वाटली सू. आजी त्याला धपाटा घालते.

छोड्या डेविडला मरणाची भीती वाटते. आज्जी त्याला कुशीत घेते आणि म्हणते – मी तुला बरी मरू देईन. डेविड छान झोपतो.

आज्जी डेविडला ओढ्याच्या काठी नेते. तो चालायला घाबरत असतो, आजी त्याला सांगते पळ घाबरू नकोस.

ओढ्याच्या काठावर आजीनं ‘मिनारी’ ही पालेभाजी लावलेली असते. भाजी खुडत असताना आजी त्याला सांगते-मिनारी. कुठंही वाढते. कोणीही खाऊ शकतो. सूपमधे खा. भाजी करून खा. वंडरफुल. औषध म्हणून चालतं, अन्न म्हणूनही चालतं. ‘मिनारी’ वंडरफुल.

छोटा डेविड हे नवे शब्द शिकतो. तो रिपीट करत रहातो, मिनारी वंडरफुल, मिनारी वंडरफुल, मिनारी वंडरफुल.

डेविडच्या पायाला बारीकशी जखम होते. आजी पट्टी लावते आणि म्हणते पळ, तू बरा झालास. डेविड चालू लागतो. आजी म्हणते डेविड तू स्ट्राँग बॉय आहेस. डेविडला आत्मविश्वास येतो.

मिनारी ओढ्याच्या काठावर एका झाडाच्या फांदीवर साप दिसतो. डेविड सापाला दगड मारायला निघतो.

आजी त्याला थांबवते.

दगड मारलास तर तो लपेल. लपलेल्या गोष्टी उघड गोष्टीपेक्षा जास्त घातक असतात.

जेकबचा शेतीचा प्रयोग फेल जात असतो, घरात आर्थिक अडचणी असतात. जेकब, पत्नी, मुलं आणि आजी चर्चमधे जातात. चर्चमधे प्रवचन झाल्यानंतर देणगी गोळा करण्यासाठी वाडगा फिरवला जातो. यांच्याकडं पैशाची चणचण असते. तरीही मोनिका एक नोट वाडग्यात टाकते. नंतर वाडगा आजीसमोर येतो. आजी कोणाचं लक्ष नाहीये ना असं पाहून त्यातली एक नोट हळूच काढून घेते.

ओढ्याला डेविड मिनारी ओढा असं नाव ठेवतो. त्या ओढ्यातलं पाणी प्याल्यामुळं म्हणा किंवा मिनारी भाजी खाल्यामुळं म्हणा डेविडच्या हृदयातलं छिद्र लहान होतं, त्याची प्रकृती सुधारते.

पक्षाघाताचा झटका लागलेल्या आजीच्या हातून शेतावरच्या साठवणीला (खलिहान) आग लागते. आपल्या हातून हे घडलं याचा परिणाम आजीवर होतो. आजी घराबाहेर पडून घरापासून दूर दूर जाऊ लागते. तिला काय वाटत असेल ते तिचा चेहरा आणि खुरडती चाल सांगत असते. डेवीड आणि ॲन तिला नको जाऊ म्हणून विनवतात. शेवटी दोघं जण तिला आडवं जाऊन पुढं जाणं अशक्य करतात.

आजी मागे फिरते.

घरात घडणाऱ्या छोट्या छोट्या घटना गुंफून चित्रपट केलाय.

किती तरी गोष्टी कळतात.

अमेरिकेत गेलेला कोरियन कष्ट कसे करतो. शेतीसाठी वापरलेल्या पाण्याचे पैसे तो मोजतो. शेतीत नुकसान झालं म्हणून तो चोरून पाणी किंवा वीज वापरत नाही. किंवा सरकारकडं हातही पसरत नाही. मेहनत करून पुन्हा उभं रहाण्याचा प्रयत्न तो करतो. कुरकूर करत नाही.

खांद्यावर क्रूस घेऊन लोकांना मदत करणारा एखादा पॉल नावाचा माणूस अमेरिकेत असतो.

आर्थिक सुख मिळावं यासाठी कोरियन माणसं आपलं गाव आणि देश सोडून दूर अमेरिकेत स्थाईक होतात. एकटेपण त्रास देतं म्हणून ती इतर कोरियन माणसांसोबत रहायचा प्रयत्न करतात, गावाकडून आपल्या माणसांना बोलावून घेतात. आपल्या कोरियन माणसांच्या खाण्याच्या सवयी चांगल्याच  माहित असल्यानं कोरियन स्थलांतरीत कोरियन भाज्या, फळं, पदार्थ तयार करून त्यांचा व्यापार करतो.

कित्ती तरी गोष्टी.

प्रचंड डिटेलिंग आहे.

सून-जा या आजीचे क्लोज अप कमालीचे बोलके आहेत. अभिनेत्याच्या चेहऱ्यावर ते भाव येणं आणि नेमके ते भाव सेकंदाच्या त्या दहाव्या भागात पकडणं, असं आहे छायाचित्रण.

जेकब आणि मोनिकामधे भांडणं चाललेली असतात. एकदा भांडणाचा क्षण जातो आणि नंतर दिल जमाईचा क्षण येतो. अर्ध्या मिनिटापूर्वी तणाव आणि त्रागा असलेला चेहरा एकदम आनंदी होतो. जेकब मोनिकाला म्हणतो की तू आनंदी असतेस तेव्हां छान दिसतेस. हा बदलचा चेहरा छायाचित्रकारानं सार्थ पकडलाय. कमालीचं सुंदर चित्रण.

काय गंमत आहे पहा. नोमॅडलँडची दिक्दर्शक चाओ ही चिनी आहे आणि मिनारीचा दिग्दर्शक ली आयझॅक चुंग दक्षिण कोरियाचा आहे. दोघेही एशियन आहेत.

मिनारीमधी अनेक संवाद कोरियन भाषेत आहेत. गेल्या वर्षी पॅरासाईट या फिल्ममधेही कोरियन संवाद होते, पॅरासाईटला ऑस्कर मिळालं होतं. पॅरासाईट हा गुन्हेपट असल्यासारखा होता, त्यात खुनाची भीषण रक्तबंबाळ दृश्यं होती. मिनारी एकदमच दुसऱ्या टोकाचा, शांत चित्रपट आहे. त्यातल्या कित्येक संवादांचं इंग्रजीत भाषांतरही उपशीर्षकांमधे दिलेलं नाही. कोरियन भाषेत आभार, थँक यू, हे संबोधन  ‘कम सा हम नी धा’ असं आहे. पण प्रत्यक्ष बोलताना मात्र ते फक्त हम नी धा असंच म्हणतात. हा बारकावा चित्रपट ऐकताना लक्षात येतो पण भाषांतरात तो मांडणं आणि कळणं शक्य नसतं.

चाओची नोमॅडलँड सुद्धा तिसरी चौथी फिल्म आणि चुंगचीही मिनारी ही चौथी फिल्म. चित्रपटाच्या भाषेत ज्यांना ओतूर किंवा उस्ताद म्हणतात असे हे मुरलेले चित्रपटवाले नाहीत.

चुंगची पहिली फिल्म Munyurangabo (२००७) रवांडातल्या नरसंहारावर आहे. चुंग, पत्नीबरोबर, तिथल्या नरसंहाराचे बळी ठरलेल्या लोकांच्या मानसीक पुनर्वसनासाठी रवांडात गेले होते. तिथं त्यांनी उपचार पद्धत म्हणून तिथल्या लोकाना फिल्म करायला शिकवलं. त्या नादात त्यांनी ही फिल्म केली. फिल्म रवांडा भाषेतली आहे.

रवाडांतला नरसंहार भीषण होता, त्याचा परिणाम तिथल्या मुलांवर कसा झाला असेल याची कल्पनाही करवत नाही. त्यातल्या दोन मुलांवर ती फिल्म आहे. माणसाच्या आतली धालमेल  चेहऱ्यावर पकडणं हे वैशिष्ट्यं, शैली, चुंग यांनी तिथं घडवली असावी.

मिनारी चित्रपटाला चित्रपट, दिग्दर्शन, मुख्य अभिनय, सहाय्यक अभिनय आणि ओरिजिनल स्कोर यासाठी नामांकनं मिळाली आहेत. पैकी आजीच्या भूमिकेसाठी मिळालेलं नामांकन बक्षीसात रूपांतरीत व्हायला हरकत नाही.

निळू दामले, लेखक आणि पत्रकार आहेत.

मिनारी
दिग्दर्शक – ली आयझॅक चुंग
कलाकार – स्टिवन युन, योहून यु जंग, अलान किम, हान ये री  

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0