खनिज समृद्ध पण गरीब अफगाणिस्तान

खनिज समृद्ध पण गरीब अफगाणिस्तान

१९८०च्या दशकात रशियाने अफगाणिस्तानचे भूशास्त्रीय सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात अफगाणिस्तानात लोह, तांबे, सोने, कोबाल्ट, रेअर अर्थ धातू व लिथियमचे मोठ्या प्रमाणात साठे असल्याचे आढळून आले. आता या साठ्यांवर मालकी राहावी म्हणून अफगाणिस्तानात सत्तास्पर्धा सुरू होऊ शकते.

अफगाण शांतता चर्चेत शस्त्रसंधी, महिला हक्कांवर भर
महिलांना संपूर्णपणे झाकून घेण्याचा तालिबानचा आदेश
अमेरिका भेटीतून इम्रानने बरंच कमावलं

अफगाणिस्तानात सद्याची परिस्थिती अतिशय बिकट बनलेली आहे. बायडन प्रशासनाने आपले सैन्य माघारी बोलवल्यानंतर तिथे जी यादवी व तालिबानी कहर माजला आहे त्याने सर्व जगाला हादरवून सोडले आहे. फौजा माघारी घेण्याच्या अमेरिकेच्या निर्णयामुळे जगभर पडसाद उमटले आहेत व तिथल्या स्थितीबद्दल सर्वत्र फार काळजीने व पोटतिडकीने बोलले व लिहिले जात आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातील जीवघेण्या परिस्थितीत लवकरच आशादायक बदल घडून येईल ही अपेक्षा करूया.

अफगाणिस्तान इतिहासाची पाळेमुळे 

अफगाणिस्तानाचा इतिहास फारच थरारक व रोमांचकारक आहे यात कोणताही वाद नाही. त्याचे गतकाळचे वैभव विस्मयकारक होते. भारतीय उपखंडात जेव्हा राजेरजवाड्यांचे राज्य होते तेव्हाच्या सामाजिक-राजकीय सीमा अतिशय तरल होत्या. अनेक राज्यांच्या सीमा एका पिढीतच कमीजास्त होत असायच्या. कधी काळी आजच्या भारताच्या हद्दीत असणाऱ्या राजांची हुकूमत अफगाणिस्तानातही पसरलेली होती. त्याप्रमाणेच तिथल्या प्रशासनाची पकड इकडील राज्यांवरही होती. ही उलाढाल कित्येक शतकं चालू होती. ब्रिटिशांच्या अमलाखाली आल्यानंतर यात खंड पडला.

अफगाणिस्तानात अतिशय उच्च्प्रतीची नैसर्गिक साधनसंपत्ती आढळते. हा देश आज गरीब असला तरी खनिज संपत्तीने समृद्ध आहे. हे सारे खनिज देशाच्या विकासासाठी त्यांनी वापरले तर आज जगाकडे आर्थिक मदतीसाठी जी याचना त्यांना करावी लागते ती करण्याची त्यांना अजिबातच गरज भासणार नाही. एका अमेरिकी तुकडीच्या प्रमुखाने अफगाणिस्तान हा खनिजाच्या संदर्भात सौदी अरेबिया आहे असे म्हटले आहे. सौदी अरेबियाने जसे तेलव्यापारात उदंड कमाई केली आहे त्या प्रमाणेच अफगाणिस्तानसुद्धा खनिजांच्या साहाय्याने आपल्या देशाची उन्नती व भरभराट करू शकतो. या देशात जर दीर्घकाळ शांतता व सुव्यवस्था राहिली तर त्या देशाचा कायापालट खनिज व्यापाराद्वारे मिळालेल्या धनातून करता येऊ शकतो.

अफगाणिस्तानचा भूशास्त्रीय इतिहास 

अफगाणिस्तान भूतुकडा हा भारतीय भू-तुकड्याचा एक भाग आहे. या देशाची भौगोलिक व भूशास्त्रीय संरचना अतिशय गुंतागुंतीची आहे. या भू-तुकड्याला अनेक छोट्या-छोट्या भू-तुकड्यांनी घेरलेले आहे. त्यामुळे अफगाणिस्तान भू-तुकड्यावर अनेकांगाने ताण पडतो आहे. उत्तरेकडे सरकणारा अरबी भू-तुकडा अफगाणिस्तानच्या पश्चिम सीमेला कुरडतोय, तर पूर्वेकडे भारतीय भू-तुकडा त्याच्यावर दबाव टाकतो आहे. हे दोन्ही भू-तुकडे, अरबी व भारतीय, यूरेशिया भू-तुकड्याखाली सरकत आहेत. दरवर्षी ते अनुक्रमे ३३ व ३६ मिमी या धीम्या गतीने यूरेशियाखाली जात आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानचा काही भाग वर उचलला गेला आहे व तिथे डोंगरकपारींची अतिशय विस्तृत शृंखला तयार झाली आहे. भू-तुकड्यांच्या मार्गक्रमणामुळे, त्यांच्या स्थानांतरणामुळे, अफगाणिस्तानात अनेक विभंग निर्माण झाले आहेत. तिथे अनेक प्रकारची संरचनीय विसंगती निर्माण झालेली आहे. त्यातच त्याच्या आजूबाजूला अतिशय जटिल भूभौतिकीय परिस्थिती अस्तित्वात आलेली आहे. हा देश भारत, पाकिस्तान, इराण, तुर्केमेनिस्तान, उझबेकिस्तान व ताझिकिस्तानने घेरलेला आहे. या देशाच्या एका बाजूला मक्रण विभंग तर दुसऱ्या बाजूला पामीर डोंगर अस्तित्वात आहेत.

अशा विसंगती निर्माण होताना तिथल्या परिसंस्थेत फार मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. जर सर्व रासायनिक व भौतिक घटकांची अनुकूल परिस्थिती राहिली तर ऊर्जेच्या मदतीने अशा ठिकाणी विपुल प्रमाणात खनिज संपत्ती निर्माण होते. खनिजांचा शोध घेते वेळी भूशास्त्रज्ञ अशा प्रकारचे विभंग व संरचनीय विसंगती शोधण्याच्या प्रयत्नात असतात. जगभरातील सारे भूशास्त्रज्ञ व भूभौतिकीय शास्त्रज्ञ खनिजशोधासाठी प्राथमिक स्वरूपात हीच प्रक्रिया अवलंबतात. अशा तर्हेने घेण्यात येणाऱ्या शोधमोहिमेत त्यांना फार मोठ्या प्रमाणात यश मिळत राहते. त्याचमुळे नवीन खंड व उपखंड शोधले जातात कारण खंडीय सीमांत प्रदेशात खनिज मिळण्याचे प्रमाण जास्त असते.

आधुनिक अफगाणिस्तानची अधोगती 

अमेरिकेने आपले सैन्य सुमारे दोन दशकांपूर्वी अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्यासाठी नेले होते. त्याआधी तालिबानने तिथे कहर माजवला होता. पण त्याहीपूर्वी काही दशक आधी रशियाने आपले सैन्य तिथे घुसविले होते. रशिया व अमेरिकेने हे असे का केले याबद्दल याच पोर्टलवर इतरत्र सविस्तर माहिती मिळेलच. पण जेव्हा रशिया तिथे होती तेव्हा त्यांनी १९८०च्या दशकात अगदी विस्तृतपणे भूशास्त्रीय सर्वेक्षण पार पाडले होते. त्यांनी अफगाणिस्तानात कुठे व कोणत्या प्रकारची खनिजं आढळतात याचे नकाशे व रेखाटने काढून ठेवली होती. पण जेव्हा त्यांनी अफगाणिस्तानातून काढता पाय घेतला तेव्हा ही सारी सामग्री त्यांनी पाठीमागे तशीच ठेवली. काबूलमधील भूशास्त्रीय सर्वेक्षण केंद्रात हे सारे नकाशे खितपत पडले होते. या नकाशात लोह, तांबा, सोनं, कोबाल्ट, रेअर अर्थ धातू व लिथियम व त्यांच्या साठ्यांची माहिती होती.

रशियाच्या जाण्यामुळे एक पोकळी निर्माण झाली जी तालिबानने भरून काढली. तालिबान्यांची भीती त्याकाळीही सगळ्यांच्या मनात होती. त्यांच्या क्रूरतेचे अनेक किस्से आपण ऐकलेले आहेत, चित्रफिती पाहिलेल्या आहेत. त्यांच्या या वर्तनाला घाबरून त्याकाळच्या काही भूशास्त्रज्ञांनी हे सारे नकाशे तिथल्या अधिकृत कार्यालयातून उचलून नेले व सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवले. काहींनी आपल्या घरात हे आराखडे लपवून ठेवले होते. त्यांचं ध्येय एकच होतं. या क्रूर तालिबान्यांच्या हातात हा बहुमोल ऐवज पडू द्यायचा नाही. त्यांना भीती होती की, तालिबान्यांच्या हातात जर हे नकाशे पडले तर उत्खनन करून कधी या खनिजांची ते विल्हेवाट लावतील याचा थांगपत्तासुद्धा कुणाला लागू देणार नाहीत.

खनिज शोधण्याचे प्रयत्न 

अमेरिकेने आपले सैन्य अफगाणिस्तानात २००१ साली पाठवले. तालिबान्यांच्या जाचातून व वाढीस लागलेल्या दहशतवादी कृत्यांना चाप लावण्यासाठी ते तिथे पोहोचले होते. असा अमेरिकेचा दावा होता व आहे. तो किती खरा होता याची शहानिशा आपल्याला सहजपणे करता येईल. पण तो आता आपला विषय नाही. अमेरिकी सैन्य आल्यानंतर तिथल्या सामान्य लोकांच्या मनात दिलासादायक भावना निर्माण झाली होती यात कोणतीही शंका नाही. अमेरिकेच्या आश्वासक उपस्थितीमुळे तिथल्या भूशास्त्रज्ञांनी लपवून ठेवलेले खनिजसंपत्तीचे नकाशे बाहेर काढले व अमेरिकी तज्ज्ञांच्या हाती सुपूर्द केले. अफगाणिस्तान हा भूशास्त्रज्ञांसाठी एक नंदनवन आहे. तिथे जमीन अगदी रुक्ष व खडबडीत आहे. झाडाझुडपांचीही तिथे वानवा आहे. त्यामुळे सर्वेक्षणासाठी व खनिज शोध मोहिमांसाठी इथली जागा अतिशय पोषक आहे. खनिज उत्खनन हा प्रकार अफगाणिस्तानसाठी नवा नव्हता. उत्खननाचे उल्लेख चंगेज खान व अलेक्झांडरशी सुद्धा संबंध दर्शवतात. पण आधुनिक काळात तिथे घडणाऱ्या अनेक अप्रिय घडामोडींमुळे विज्ञान व वैज्ञानिक जाणिवा रुजलेल्या नव्हत्या व अजूनही त्या रुजलेल्या नाहीत असे दिसते आहे.

अमेरिकी भूवैज्ञानिकांना जेव्हा रशियन भूशास्त्रज्ञांनी तयार केलेले नकाशे मिळाले तेव्हा त्यांची उत्सुकता चाळवली गेली. त्यांनी या माहितीकडे अतिशय बारकाईने व संवेदनशीलपणे पाहायचे ठरवले. त्यांनी तिथल्या भूशास्त्रज्ञांना व जाणकारांना आव्हान करून जेवढे म्हणून रशियन व अफगाणी भाषेतील नकाशे व आराखडे होते ते सारे गोळा केले. वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवलेले नकाशे एकाच ठिकाणी जमा करण्यात आले. जी विखुरलेली माहिती होती ती एका ठिकाणी जमा करण्यात आली. जमा करण्यात आलेल्या साऱ्या नकाशांचे विश्लेषण अमेरिकी, अफगाणी व इतर देशातील भूशास्त्रज्ञांनी केले. त्यातील माहितीनुसार खनिजसंपन्न ठिकाणांना भेटी देण्याचे ठरले. त्याचबरोबर तुटकपणे करण्यात आलेल्या सर्वेक्षणाला पूर्णत्व बहाल करण्यासाठी सम्यकपणे पुन्हा सर्वेक्षण करायचे असेही त्यांनी ठरवले.

२००६-०७ साली यूएसजीएसच्या वैज्ञानिकांनी चुंबकीय व गुरुत्वाकर्षणीय हवाई सर्वेक्षण पार पाडले. या हवाई माध्यमातून त्यांनी अफगाणिस्तानच्या सुमारे ७०% प्रदेशाचे सर्वेक्षण पार पाडले. त्यातून त्यांना अतिशय उपयोगी व उपयुक्त माहिती मिळाली. त्यांनी त्यातून बोध घेऊन आधुनिक उपकरणांच्या मदतीने आणखी सविस्तर व तपशीलवार सर्वेक्षण पार पाडले. अफगाणिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच इतके विस्तृत भूशास्त्रीय सर्वेक्षण पार पडले होते.

जेव्हा या खनिज साठ्यांची अंतिम आकडेमोड करण्यात आली तेव्हा सारे संबंधित तज्ज्ञ अचंबित झाले. त्यांची व्याप्ती व मूल्य दोन्ही उच्च प्रतीचे आहे याबाबत त्यांच्या मनात कोणतीही शंका राहिली नाही. हेल्मन्ड प्रांतात प्रत्यक्षदर्शी पुरावा मिळवण्यासाठी जेव्हा हे तज्ज्ञ तिथल्या एका ज्वालामुखीय प्रदेशात गेले तेव्हा त्यांना तिथे अनेक टन वजनाचे रेअर अर्थ मूलतत्व (आरईई) पाहावयास मिळाले. या तत्वांचा उपयोग अनेक उद्योग व उत्पादनात केला जातो. दळणवळणाचे उपकरण, तसेच विमान बांधण्यासाठी वापरण्यात येणारे वजनाने हलके पण चिवट धातू निर्माण करण्यासाठी सुद्धा आरईईचा सर्रास उपयोग होत असतो. हवाई झोतायंत्रात सुद्धा आरईईचा वापर केला जातो. या धातूचे इतरही अनेक उपयोग आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे जगाची आरईईची एकूण ९७% इतकी मोठी गरज चीन भागवतो. सारे जग आरईईसाठी चीनवर निर्भर आहे आणि ही एक गंभीर समस्या आहे. चीन केव्हाही या खनिजांसाठी जगाला आपल्या तालावर नाचवू शकतो. त्यामुळे चीनला पर्याय म्हणून अफगाणिस्तानकडे पाहिले पाहिजे.

खनिजांची एकूण किंमत

पण २००६-०७च्या सर्वेक्षणानंतर हे सारे ज्ञान तात्विक पातळीवरच व भूशास्त्रज्ञांच्या वर्तुळातच फिरत राहिले. या ज्ञानाचा आर्थिक लाभ किती व कसा होणार याचे गणित कोणीच त्यावेळी मांडले नव्हते. ती प्रक्रिया नंतर सुरू झाली. २००९ साली अमेरिकेने अफगाणिस्तानात व्यापारउदीम वाढवण्यासाठी एक टास्क फोर्स तयार केला होता. अनेक कागदपत्रांची पडताळणी करताना या चमूच्या हाती भूशास्त्रीय आकडेवारी लागली. या चमूतील काही तज्ज्ञ मंडळींना या खनिज साठ्यांची बाजार किंमत फार मोठी आहे हे लक्षात आले. त्यानंतर आर्थिक दृष्टिकोनातून व बाजारभावाने या साठ्यांचे मूल्यमापन करण्याचे आदेश निघाले. तेव्हा त्यांची किंमत नेमकी किती आहे, व किती मोठी आहे, हे सर्वांच्या लक्षात आले.

टास्क फोर्सच्या आदेशानंतर आणखी काही जुन्या व नव्या ठिकाणी सर्वेक्षणं पार पाडण्यात आले. त्या सर्वेक्षणानंतर लिथियम साठे फार मोठ्या प्रमाणावर तिथे आढळतात हे सुद्धा स्पष्ट झाले. सध्या जी जागतिक तापमानवाढ सुरू आहे त्यावर मात करण्यासाठी किंवा त्याचा दाह कमी करण्यासाठी लिथियम सारख्या खनिजांची अतिशय फार मोठ्या प्रमाणावर गरज भासणार आहे. पेट्रोल वापरामुळे व अन्य काही कारणांमुळे तापमानवाढ होते आहे. तापमान कमी करण्यासाठी पेट्रोलसारख्या पदार्थांचा वापर कमी करणे हे क्रमप्राप्त ठरते. त्यासाठी विद्युत ऊर्जेचा वापर वाढवणे ही काळाची गरज झाली आहे. पण विद्युत ऊर्जा साठवून ठेवायची कुठे व कशी? त्यासाठीच लिथियम खनिजाची महिमा वाढते व याचे साठे का महत्त्वाचे आहेत ते कळते.

लिथियमची खास अशी वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे या खनिजापासून बनवलेली बॅटरी जास्त काळ टिकते व तिचे चार्जिंग पुन्हापुन्हा लाखो वेळा करता येते. त्यातच लिथियम बॅटरीत वेळोवेळी सुधार करत गेल्याने त्यात स्फोट होण्याचे प्रमाण फार कमी होत आले आहे. त्यामुळेच आज बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या बाजारात भराभर येण्याच्या तयारीत आहेत.

बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या भविष्यात सगळीकडे पाहावयास मिळणार आहेत यात कुणाचेच दुमत असण्याचे कारण नाही. पण बॅटरीसाठी लागणारी किमान सामग्री ही जगातील इतर ठिकाणी कमी होत चालली आहे. अफगाणिस्तानात मात्र याचे बरेच साठे उपलब्ध आहेत. या देशातील एकूणच खनिजसंपत्ती व त्याची बाजारकिंमत अजूनही योग्यरितीने काढण्यात आलेली नाही. एका अंदाजानुसार अफगाणिस्तानातील खनिजांची एकूण किंमत २०० ते २५० ट्रिलियन रुपये (एक ट्रिलियन म्हणजे एक लाख दशलक्ष) ठरवली गेली आहे. ही अंदाजित रक्कम आहे व ती कमी किंवा जास्तीही होऊ शकते.

अफगाणिस्तानात जे काही चालू आहे त्याचा फटका त्या देशालाच जास्ती बसतो आहे. तिथे खनिकर्म सुरू आहे पण अतिशय छोट्या प्रमाणात. तरीही लाखो डॉलरचा महसूल अमेरिकी व अफगाणी प्रशासनाला मिळत होता. आता तो तालिबानला मिळेल व त्याचा कशाप्रकारे उपयोग होईल हे आपण सारे जाणून आहोतच.

जर सारे आलबेल झाले, तिथे शांती नांदली व समानतेचे व बंधुभावाचे वारे वाहायला लागले तर अफगाणिस्तान जगाचा तारणहार ठरू शकतो…किमान खनिजांबाबत तरी !!!

प्रवीण गवळी, भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अधीन कार्यरत नवी मुंबई येथील भारतीय भूचुंबकत्व संस्थेत, वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0