मॉडेर्ना इंक या बायोटेक कंपनीच्या प्रायोगिक कोविड-१९ लशीमुळे निरोगी स्वयंसेवकांच्या छोट्या समूहामध्ये संरक्षक प्रतिपिंडे (अँटिबॉडीज) निर्माण झाल्याची
मॉडेर्ना इंक या बायोटेक कंपनीच्या प्रायोगिक कोविड-१९ लशीमुळे निरोगी स्वयंसेवकांच्या छोट्या समूहामध्ये संरक्षक प्रतिपिंडे (अँटिबॉडीज) निर्माण झाल्याची प्रारंभिक माहिती कंपनीने सोमवारी प्रसिद्ध केली. या लशीची चाचणी प्रथम अमेरिकेत होणार आहे.
मार्चमध्ये ४५ सब्जेक्ट्सवर सुरू झालेल्या सुरक्षित चाचणीत भाग घेतलेल्या आठ लोकांमार्फत हा डेटा आला आहे.
जगभरात ४.७ दशलक्ष लोकांना ज्याची लागण झाली आहे आणि ३१७,००० लोकांचा ज्यामुळे मृत्यू झाला आहे, त्या नोव्हेल कोरोनाविषाणूपासून संरक्षण करण्याच्या उद्देशाने विकसित केल्या जाणाऱ्या १००हून अधिक लशींपैकी मॉडेर्नाची लस एक आहे.
एकंदर ही लस सुरक्षित आहे असे अभ्यासात दिसून आले आहे आणि सर्व सहभागींमध्ये या विषाणूविरोधात प्रतिपिंडे निर्माण झाली आहेत.
या आठ व्यक्तींच्या शरीरांनी दिलेल्या प्रतिक्रियांचे विश्लेषण केले असता असे दिसून आले की, १०० मायक्रोग्रामचा डोस मिळालेल्या व्यक्तींमध्ये तसेच २५ मायक्रोग्रामचा डोस मिळालेल्या लोकांमध्ये आढळलेला विषाणूला रोखणाऱ्या संरक्षक प्रतिपिंडांचा स्तर हा कोविड-१९ या कोरोनाविषाणूमुळे होणाऱ्या आजारातून बऱ्या झालेल्या लोकांच्या रक्तातील प्रतिपिंडांच्या तुलनेत अधिक होता.
अमेरिकेतील जैवतंत्रज्ञान कंपनीने प्रसिद्ध केलेल्या एका बातमीनुसार, मॉडेर्नाच्या समभागांच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ झाली. मात्र, लशीच्या विकास व उत्पादनासाठी १.२५ अब्ज डॉलर्सचे सामाईक समभाग विकण्याची योजना कंपनीने उघड केल्यानंतर नंतरच्या व्यवहारात समभाग १.६ टक्क्याने खाली आला.
“ही संशोधने महत्त्वपूर्ण आहेत पण हा क्लिनिकल चाचणीचा पहिलाच टप्पा आहे आणि यात केवळ आठ व्यक्तींचा समावेश होता. हा टप्पा सुरक्षितता तपासण्यासाठी घेण्यात आला होता, परिणामकारता तपासण्यासाठी नव्हे,” असे जॉन हॉपकिन्स सेंटर फॉर हेल्थ सिक्युरिटीचे प्रादुर्भावजन्य आजार तज्ज्ञ डॉ. अमेश अडालजा म्हणाले. त्यांचा या अभ्यासात सहभाग नव्हता.
ही लस विकासाच्या प्रगत टप्प्यावरील लशींपैकी एक असून, या प्रारंभिक माहितीमुळे आशेचा किरण निर्माण झाला आहे.
या लशीची चाचणी परिणामकारकतेच्या दृष्टीने हजारो लोकांवर घेतली जाईल तेव्हा त्यातील अनेक दोष समोर येऊ शकतात. तरीही सध्या आपल्याला जे दिसत आहे, ते प्रोत्साहक आहे, असे डॉ. अडालजा म्हणाले.
नोव्हेल कोरोनाविषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी प्रतिपिंडांचा नेमका कोणता स्तर संरक्षण ठरेल आणि हे संरक्षण किती काळ टिकेल हे समजून घेण्याचा प्रयत्न वैज्ञानिक करत आहेत.
मॉडेर्नाच्या मते लस डोसनुसार वेगवेगळा परिणाम करत आहे. म्हणजे १०० एमसीजीचा डोस मिळालेल्यांमध्ये कमी क्षमतेचा डोस मिळालेल्यांच्या तुलनेत अधिक प्रतिपिंडे तयार झालेली आढळली.
लशीच्या मानवी चाचणीचा दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेतील नियामक यंत्रणांनी नियामक परीक्षणांचा वेग वाढवण्यासाठी लशीला “फास्ट-ट्रॅक” स्टेटसही दिला आहे.
दुसऱ्या किंवा मधल्या टप्प्यातील चाचण्या या परिणामकारकतेची पडताळणी करण्याच्या तसेच योग्य डोस निश्चित करण्याच्या दृष्टीने घेतल्या जातात. मॉडेर्नाने २५० एमसीजी डोसची चाचणी न घेता ५० एमसीजी डोसची चाचणी घेण्याचा निर्णय केला आहे. रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी आवश्यक डोस कमी केल्यास प्रत्येक शॉटमध्ये लागणारे लशीचे प्रमाण कमी करण्यात ते उपयुक्त ठरू शकते. याचा अर्थ कंपनी अखेरच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात लशींचे उत्पादन करू शकेल.
डोसची संख्या जास्तीतजास्त वाढवणे
“साथीच्या पार्श्वभूमीवर मागणी पुरवठ्याच्या प्रमाणात प्रचंड जास्त असेल असे अपेक्षित आहे. डोस जेवढा कमी असेल तेवढ्या जास्त लोकांना आम्ही लशीचे संरक्षण पुरवू शकू,” असे मुख्य वैद्यकीय अधिकारी ताल झॅक्स म्हणाले.
अमेरिका सरकारने एप्रिलमध्ये मॉडेर्नावर मोठा विश्वास टाकत लशीच्या विकासासाठी ४८३ दशलक्ष डॉलर्सचे सहाय्य बायोमेडिकल अॅडव्हान्स्ड रिसर्च अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (बीएआरडीए) या अमेरिकेच्या आरोग्य व मानवी सेवा खात्याचा भाग असलेल्या यंत्रणेमार्फत दिले.
या अनुदानामुळे २०२० सालात दर महिन्याला लक्षावधी डोसचा पुरवठा करणे शक्य होईल, असे कंपनीने सांगितले. आणखी गुंतवणूक केल्यास आणि लस यशस्वी ठरल्यास, २०२१ मध्ये दर महिन्याला कोट्यवधी लशी पुरवणे शक्य होईल, असेही कंपनीने नमूद केले.
“आम्ही उत्पादनाचे प्रमाण वाढवण्यासाठी गुंतवणूक करत आहोत, जेणेकरून, आम्ही जास्तीतजास्त लशी पुरवू शकू आणि सार्स-सीओव्ही-टूपासून अधिकाधिक लोकांना वाचवू शकू,” असे मॉडेर्नाचे चीफ एक्झिक्युटिव्ह स्टीफन बॅन्सेल यांनी नवीन विषाणूचे अधिकृत नाव घेत सांगितले.
मे महिन्यात मॉडेर्नाने लाँझा ग्रुपशी १० वर्षांचा धोरणात्मक सहयोग केला. यामुळे काही काळानंतर, २०२१ सालाच्या अखेरीपर्यंत, कंपनीला ५० एमसीजी क्षमतेचे १ अब्ज डोस तयार करणे शक्य होईल. अमेरिकेबाहेरील देशांना लस पुरवण्यासाठीही कंपनी नियोजन करत आहे, असे झाक्स म्हणाले.
“या लशीचे पहिले लाभार्थी राष्ट्र अमेरिकाच असेल,” झाक्स म्हणाले. अर्थात जगातून जेथून कोठून या लशीसाठी मागणी येईल, तेथे ही लस उपलब्ध करून देण्याची नैतिक बांधिलकी कंपनी मानते, असेही ते म्हणाले. जुलै महिन्यात अधिक व्यापक अशा तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या घेतल्या जातील असे अपेक्षित असल्याचेही मॉडेर्नाचे म्हणणे आहे.
सध्या कोविड-१९साठी कोणतेही मान्यताप्राप्त उपचार किंवा लस नाही आणि सुरक्षित व परिणामकारक लस प्रत्यक्ष हातात येण्यासाठी तिचा विकास सुरू झाल्यापासून १२ ते १८ महिन्यांचा काळ लागू शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. या हिशेबाने मॉडेर्नाची लस जानेवारी महिन्यात प्रत्यक्ष वापरासाठी येईल.
मॉडेर्नाच्या लशीच्या प्रारंभिक चाचण्यांतील सर्वांत लक्षणीय साइड-इफेक्ट्स म्हणजे सहभागी झालेल्यांपैकी तिघांना सर्वोच्च
डोसच्या दुसऱ्या शॉटनंतर “फ्लूसारखी” लक्षणे जाणवली. ही लक्षणे म्हणजे भक्कम रोगप्रतिकार प्रतिसादाचे अप्रत्यक्ष परिमाण आहे असे आपल्याला वाटत असल्याचे कंपनीने सांगितले.
रॉयटर्स
मूळ लेख
COMMENTS