रेडिओवरूनप्रसारित होणारे कार्यक्रम आणि पूर्वनियोजित मुलाखतींव्यतिरिक्त मोदींनी देशाच्या जनतेशी खराखुरा संवाद साधलेला नाही. संवाद घडला असल्याचा आभास तयार करण्यात मोदी माहिर आहेत.
जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं एक वाक्य आहे, “संवाद घडला असल्याचा आभास तयार झाला असणे, ही संपर्क साधण्यामधील सर्वात मोठी अडचण आहे.”
शॉची ही उपरोधिक टिप्पणी म्हणजे त्यांच्या माणसांच्या निरीक्षणावर आधारित संभाव्य धोक्याचा इशारा आहे. मात्र मोदींचा संपूर्ण जनसंपर्कच शॉच्या इशार्यावर आधारित आहे. भारतीय राजकारणाच्या इतिहासात, कमीतकमी बोलण्यातून खूप काही बोलून जाण्याचे आणि महत्त्वाच्या विषयांना बगल देण्याचे कसब मोदींइतके कुणालाही साधले नसावे.
मोदींच्या आभासी संवादाचे ताजे उदाहरण म्हणजे त्यांनी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याला दिलेली आणि जोरदार चर्चेत आलेली ‘अ-राजकीय’ मुलाखत! या मुलाखतीला ‘अ-राजकीय मुलाखतीचे’ विशेषण देणे म्हणजेच याआधी नरेंद्र मोदी यांनी अनेक राजकीय मुलाखती दिलेल्या असून आता ते अ-राजकीय मुलाखती देऊ शकतात असा आभास निर्माण करणारे आहे.
पण वस्तुस्थिती अशी आहे की मोदींनी ज्या अनेक मुद्द्यांना हात घालण्याची अपेक्षा होती ती काही अंशीदेखील पूर्ण झालेली नाही. ज्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी देणे अपेक्षित होते ती तर त्यांनी दिलेली नाहीतच. आपल्या कारकीर्दीत खऱ्या अर्थाने उत्स्फूर्त, राजकीय म्हणता येईल अशी एकही मुलाखत त्यांनी दिलेली नाही.‘मन की बात’ हे त्यांचे रेडिओवरून प्रसारित होणारे पूर्वनियोजित कार्यक्रम आणि रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, एबीपी अशा निवडक वाहिन्यांना दिलेल्या पूर्वनियोजित मुलाखतींव्यतिरिक्त नरेंद्र मोदींनी देशाच्या जनतेशी खराखुरा संवाद साधलेला नाही.
‘कम्युनिकेशन’ या शब्दाची व्युत्पत्ती लॅटिनमधील कम्युनिस या शब्दावरून झालेली आहे. त्याचा शब्दशः अर्थ आहे ‘देवाणघेवाण करणे किंवा सर्वांसोबत वाटून घेणे’. संवादाच्या खऱ्या प्रक्रियेत दोन्ही बाजूंनी होणारी देवाणघेवाण, सरमिसळ आणि एकत्र येणे अभिप्रेत असते. जिथे दोन व्यक्ति समोरासमोर येऊ शकतात, कोणाच्याही मनात शंका असल्यास त्याचे समाधान करू शकतो, असा एक मोकळा अवकाश असतो.
भारताचे पंतप्रधान त्यांना हवे तेव्हा आणि त्यांना हवा तसा संवाद साधतात तो काही खरा संवाद नव्हे.
भारतीयांच्या मनातले खदखदणारे अनुत्तरित प्रश्न खालीलप्रमाणे असू शकतात.
- नोटबंदी करण्यामागचा नेमका उद्देश काय होता? त्यातून नेमके काय साध्य झाले आणि नेमका कोणाला उपयोग झाला?
- त्याने काळ्या पैशांवर नियंत्रण आले का?
- त्यामुळे दहशतवादी हल्ले थांबले का?
- वस्तू आणि सेवा कराचा लघुउद्योजकांना (वस्तुतः नक्की कोणाला) काय फायदा झाला?
- जर नोटबंदी आणि वस्तू व सेवा कर हे दोन्ही अत्यंत उपयुक्त निर्णय घेण्यात येऊनही बेरोजगारी इतकी प्रचंड कशी?
- अच्छे दिन आणि विकास कुठे आहेत?
- आश्वासने देण्यात आलेले कोट्यावधी रोजगार कुठे आहेत?
- ट्विटरवर असभ्य आणि शिवराळ भाषा वापरणाऱ्यांना पंतप्रधान फॉलो का करतात?
- धर्माच्या नावाखाली हिंसाचाराच्या घटना राजरोस घडत असताना पंतप्रधान मौन का बाळगतात? अशी घटना घडून गेल्यानंतर अनेक दिवसांनी अत्यंत मोघम अशा प्रतिक्रिया का देतात?
- नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीसारखे लबाड देश सोडून फरार झाल्यानंतर इतक्या दिवसांनी सर्वांनी चौकीदार होण्याचे आवाहन का केले जात आहे?
मात्र या सर्व प्रश्नांना उत्तरे देण्याचे टाळून, महत्त्वाच्या मुद्द्यांना बगल देत मोदी पूर्वनियोजित मुलाखतीमध्ये खालील प्रश्नांची उत्तरे देताना दिसतात.
- तुम्हाला आंबे आवडतात का?
- तुम्ही आंबे कसे खाता?
- तुम्हाला राग येतो का?
- तुम्ही रागावर नियंत्रण कसे ठेवता?
- तुमच्याकडे विनोदबुद्धी आहे का?
- तुम्ही हे असेच कपडे का घालता?
- तुम्ही इतक्या कमी वेळ झोप का घेता?
- तुम्ही चित्रपट पाहता का?
- तुम्ही चित्रपटातली गाणी गुणगुणता का?
- तुमची आई तुमच्यासोबत येऊन राहते का?
आपल्या पाच वर्षांच्या कारकीर्दीत भारतीय समाजाला मुळापासून हलवून टाकणाऱ्या अनेक घटना घडूनही, जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे पंतप्रधान, ऐन निवडणुकांच्या तोंडावर एका बॉलिवूड अभिनेत्याला ‘अराजकीय’ मुलाखत देतात (आणि माध्यम वर्तुळात ज्याची संभावना PR puff piece म्हणून केली जाते) याचा अर्थ देशातल्या सर्वात शक्तिशाली माणसाला भीतीने घाम फुटला आहे, हे नक्की!
या विचित्र आणि काहीशा अचाट मुलाखतीबद्दल खूप चर्चा झालेली आहे. आज्ञाधारक वृत्तवाहिन्यांनी त्याचे कौतुक केले तर स्वतंत्र बाण्याच्या वृत्तवाहिन्या आणि माध्यमांनी त्यावर टीकेची झोड उठवली आहे. समाजमाध्यमांत त्याची खिल्ली उडवली गेली आणि विरोधी पक्षांनी सडकून टीका केलेली आहे. एनडीटीव्हीच्या रवीश कुमार यांनी तर आपल्या तिरकस, उपरोधिक शैलीचा उत्तम वापर करत आपल्या प्राईम टाइम या कार्यक्रमात अराजकीय सादरीकरण घडवून आणले आहे.
अराजकीय असे म्हणवले जाणाऱ्या या मुलाखतीत बराच मोठा राजकीय आशय होता. मोदींनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला, किमान तीनवेळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख केला, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि आपण जवळचे मित्र असल्याचा टेंभा मिरवला, आपले राजकीय विरोधक आपल्याला कुर्ते आणि रसगुल्ले भेट म्हणून पाठवत असल्याचे सांगितले.
‘कॅथॉलिक नसलेला पोप’ हा जसा भ्रम आहे तसाच अ-राजकीय पंतप्रधान हा देखील एक भ्रमच आहे. ‘पोपनी व्हॅटिकनमध्ये नॉन कॅथॉलिक प्रवचन दिले’ असे म्हणताच येणे शक्य नाही.
अनेक जणांच्या मते हा अत्यंत हुशारीने केलेला प्रचाराचा प्रयत्न (PR Coup) होता. हे करत असताना निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आचारसंहितेचा खुलेआम भंग झालेला आहे. मोदींच्या जनसंपर्क गटाने त्यांची ‘एक उमद्या स्वभावाची, विरक्त, पैसा, सत्ता, प्रसिद्धी यांचा कणभरही मोह नसणारी, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असणारी जेष्ठ व्यक्ती’ अशी छबी तयार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे. प्रत्यक्षात मात्र या सगळ्या प्रयत्नानंतरही ‘स्वतःच्याच कोशात गुरफटलेली, आत्मकेंद्रित आणि वास्तवापासून पळ काढणारी व्यक्ती’ अशी त्यांची प्रतिमा समोर आली आहे.
स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा इतका हव्यास असेल तर ही त्यासाठी योग्य जागा नाही हे मोदी यांना त्यांच्या कारकीर्दीच्या सुरवातीलाच जाणवून देणे आवश्यक होते. पण आता उशीर झालेला आहे. भारताचे चौदावे पंतप्रधान म्हणून इतिहासात त्यांची नोंद, देशाला प्रश्नांच्या गर्तेतून बाहेर काढणारा मुत्सद्दी अशी होण्याऐवजी भयग्रस्त, असुरक्षित, आणि आपण जनतेशी संवाद साधत असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी बॉलिवुड कलाकार, समाजमाध्यमांवर असभ्य भाषा वापरणारे ट्रोल्स आणि प्रचंड जनसंपर्क यंत्रणा अशा मोठ्या जमावाची गरज भासणारा पंतप्रधान म्हणून ते ओळखले जाणार आहेत.
रोहित कुमार हे शिक्षक असून सकारात्मक मानसशास्त्र हा त्यांचा विषय आहे.
मूळ लेख
COMMENTS