नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे समर्थन मिळवण्यासाठी रविवारी रात्री मुंबईतील पंचतारांकित हॉटेल ‘हयात’मध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल य
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे समर्थन मिळवण्यासाठी रविवारी रात्री मुंबईतील पंचतारांकित हॉटेल ‘हयात’मध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी बॉलीवूडमधील काही कलाकारांना आमंत्रण दिले होते. पण हे आमंत्रण मोजक्याच कलाकारांनी स्वीकारले.
या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या कलावंतांमध्ये चित्रपट निर्माते रितेश सिधवाणी, प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी, दिग्दर्शक कुणाल कोहली, अभिषेक कपूर, कलाकार रणवीर शौरी, गायक शान, रुपकुमार राठोड, भूषण कुमार, रमेश तौरानी, अनू मलिक, राहुल रवैल, रोहित खिलनानी उपस्थित होते. या कार्यक्रमाला जावेद अख्तर, फरहान अख्तर, दिया मिर्जा, जॅकी श्रॉफ, रवीना टंडन, राजकुमार हिराणी, बोनी कपूर, मधूर भांडारकर, सुनील शेट्टी, प्रल्हाद कक्कर, विक्की कौशल, आयुष्यमान खुराना, रिचा चढ्ढा, कबीर खान, भूमी पेडणेकर, करण जोहर यांनाही निमंत्रण देण्यात आले होते पण हे कलाकार उपस्थित राहिले नाहीत.
हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा सुमारे ७५-१०० जण हयातच्या हॉलमध्ये उपस्थित होते. हा कार्यक्रम बॉलीवूडमधील एक निर्माते महावीर जैन यांनी आयोजित केला होता. महावीर जैन हे भाजप समर्थक आहे व त्यांनी या अगोदरही पक्षाच्या समर्थनात प्रयत्न केले होते.
हा कार्यक्रम सुरू होताच पियुष गोयल यांनी, ‘आम्ही तुमची मते जाणून घेण्यास उत्सुक आहोत’ असे उपस्थित कलाकारांना उद्देशून सांगितले. ‘देशात सर्वत्र नागरिकत्व दुरुस्ती कायदा व एनआरसीच्या विरोधात गैरसमज पसरवले जात असून धर्माच्या आधारावर भेदभाव केला जात असल्याचा आरोप केंद्र सरकारवर होत आहे. अशा परिस्थितीत तुमचे मत काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी तुमच्यापुढे आलो आहे, असे पियुष गोयल म्हणाले.
उपस्थित कलाकार गोयल यांची भूमिका ऐकत होते. काहींनी गोयल यांना थेट प्रश्न विचारले. पण सरकार अडचणीत येतील असे प्रश्न विचारले गेले नाहीत, असे एका आमंत्रिताने ‘द वायर’ला नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली. एका आमंत्रिताने ‘हिंदू खतरे मे’ हा प्रचार आता कामाचा नाही हिंदू धर्म अनेक वादळातून तगून गेला आहे. तो मुघल राजवटीतूनही गेला आहे असा मुद्दा मांडला. त्यावर गोयल यांनी हिंदूंमध्ये अंतर्गत संघर्ष आहे, असे उत्तर दिले. यावर एका प्रसिद्ध कलावंताने हिंदुत्व हे संकटात नसून भारतीयत्व मात्र संकटात असल्याची टिपण्णी केली.
मूळ बातमी
COMMENTS