महाअसत्याच्या तंत्राचा अविष्कार : मोदींचे भाषण ‘पाहावे’ कसे? – भाग २

महाअसत्याच्या तंत्राचा अविष्कार : मोदींचे भाषण ‘पाहावे’ कसे? – भाग २

लोकांना मोदींच्या सर्व विसंगती, त्यांचे सर्व धोरणात्मक अपयश, त्यांची फोल ठरलेली आश्वासने, वाढलेल्या राष्ट्रीय समस्या हे सर्व विसरायला लावण्याचे भुलीचे इंजेक्शन या भाषणांतून कसे दिले जाते? समोर असलेल्या नागरिकांच्या साध्याशा जमावाचे रुपांतर हिंस्र झुंडीत कसे केले जाते? मोदींचे वक्तृत्व, त्यांचे आवाहन यांच्या सामान्य श्रोत्यांवरील प्रभावाचे, मोदीमोहिनीचे रहस्य समजून घ्यायचे असेल, तर त्यांच्या भाषणशैलीबरोबरच त्यातील प्रचारतंत्रेही लक्षात घ्यावी लागतील...

जोइशा इराणीसंदर्भातील ट्विट हटवा; न्यायालयाचे काँग्रेस नेत्यांना आदेश
बिहार मुख्यमंत्रीपदः अमित शहा इतके मवाळ का?
भाजपसाठी स्त्रियांचे हक्क पुरूषधार्जिणेच!
लक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी

लक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी

गोंदिया. दिनांक ३ एप्रिल २०१९. रात्रीची वेळ. भाजपची प्रचारसभा. मैदान गच्च भरले आहे. महिलांची संख्या लक्षणीय.
लहान आवाजात ‘भारत माता की जय’चा घोष करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण सुरू केले. हळुहळू आवाजाची उंची वाढत आहे. बोलण्याची गती वाढत आहे. भारत मातेची, गोंदिया-भंडा-यातील देवतांची आठवण करून देऊन श्रोत्यांना कब्जात घेतले जात आहे. त्यांना थेट प्रश्न विचारले जात आहेत.
‘या चौकीदाराच्या प्रयत्नांवर तुम्ही संतुष्ट आहात ना?’
लोक हात उंचावून आवाज देतात – “हो.”
या चौकीदाराच्या निष्ठेवर, नियतीवर विश्वास आहे ना? “हो.”
देश योग्य दिशेने चाललाय ना? “हो.”
मधूनच ‘देशने दिशा भी बदली है, आगे बढने की गती भी बदली है’ अशा प्रकारची पोकळ विधाने केली जात आहेत. सर्जिकल स्ट्राईक, ए-सॅट यांची आठवण करून दिली जात आहे. एखाद्या लहान मुलाला कौतुकाच्या स्वरात विचारावे, तशा सुरात मोदी जमलेल्या आबालवृद्धांना विचारत आहेत…
‘पाकिस्तानी दहशतवाद्यांना कसं घरात घुसून मारलं… आठवतंय ना?’
आता त्यांच्या सुरात नाटकीपणा आलाय. आवाजाला तिरस्काराची धार चढलीय. ते सांगत आहेत – ‘दिल्लीतल्या एअरकंडिशन्ड खोल्यांत बसलेले लोक म्हणत आहेत की आता देश बालाकोटला विसरलाय. पण मला सांगा, तुम्ही बालाकोटला विसरलात का?’
श्रोत्यांतील काही जण हात हलवून नाही असे सांगतात.
मोदी म्हणतात, ‘अरे देश ६२च्या युद्धाला विसरला नाही, तर बालाकोटला कसा विसरेल?’
हा नेहरूंना दिलेला तडाखा. जणू काही त्यानंतर ६५, ७१ घडलेच नाही, असा आव!
आता गाडी लोकांच्या मनात भय निर्माण करण्याकडे वळली आहे. काँग्रेसने नुकत्याच जाहीर केलेल्या जाहीरनाम्यावर टीका सुरू आहे. मोदी सांगत आहेत – ‘काँग्रेसचं देश अस्थिर करण्याचं कारस्थान तुम्ही पाहात आहात. यांची एक सवय आहे, एक तर पूर्ण कब्जा करा, नाही तर संभ्रम निर्माण करा. आज ते संभ्रम निर्माण करताहेत. कारण त्यांना माहित आहे, की मोदींमुळे लोकांची भलाई होत आहे आणि त्यांची मलाई उडून जात आहे.’
काँग्रेसच्या जाहिरनाम्याला शेलकीतला शब्द ठेवलाय त्यांनी. “ढकोसलापत्र”. त्यावर टीका करताना ते श्रोत्यांना सांगत आहेत – ‘काँग्रेसचं हे ढकोसलापत्र म्हणजे पाकिस्तानच्या कारस्थानांचं योजनापत्र आहे. आपल्या वीरजवानांचं मनोबल तोडण्याचं षड्यंत्र आहे. भारत तेरे टुकडे होंगे अशा घोषणा लावणा-यांचं साजीशपत्र आहे.’
पुनरुक्तीतून ते आपला मुद्दा पटवून देत आहेत. लोकांच्या मनातील भय जागृत करीत आहेत. पण गोंदियात केवळ पाकिस्तानचा मुद्दा कसा चालेल? विदर्भात नक्षलवाद ही मोठी समस्या आहे. तो मोठा शत्रू आहे. या माओवाद्यांचे दिवस आता भरत चालले आहेत, असा दिलासा ते देत आहेत. पाच

मोदी आपल्या श्रोत्यांची भावनिक शरणागती दृढ करून घेत असतात.

सगळी सत्ता माझ्या मुठीत आहे, समजलं ना?

वर्षांत काय केले याला हे एका वाक्यात उत्तर दिल्यानंतर ते पुन्हा भयनिर्मितीकडे वळले आहेत. इशारा देत आहेत, की ‘सावध राहा. या महाविलावट करणा-यांना (म्हणजे महाआघाडीला.) जरासाही मोका मिळाला ना, तर या माओवाद्यांना गती मिळेल…’
मोदींचे भाषण सुरूच आहे. श्रोत्यांच्या चेह-यावर खुशी दिसते आहे. काहींच्या हातवा-यांत उन्माद दिसतो आहे. काँग्रेस हा पाकिस्तानचा मित्र, नक्षलवाद्यांचा समर्थक, देशाचे तुकडे करणा-यांचा पाठीराखा हे चित्र लोकांच्या मनात कोरले जात आहे…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कोणत्याही प्रचारसभेतील कोणतेही भाषण घ्या. त्याचे टेम्प्लेट ठरलेले आहे. ते आता इतके ओळखीचे झाले आहे की कोणत्याही विचारी माणसाला त्याचा कंटाळा यावा. त्यातील तो सामान्य दर्जाचा नाटकीपणा, आवाजातील ते नाटकी चढ-उतार नकोसे वाटावेत. परंतु याच शैलीतील भाषणांनी मोदी हे आजच्या काळातील वक्ता दशसहस्त्रेषु ठरले आहेत. मोदीमोहिनी निर्माण करण्यात याच भाषणांचा मोठा वाटा आहे. हे कसे साधले जाते? लोकांना मोदींच्या सर्व विसंगती, त्यांचे सर्व धोरणात्मक अपयश, त्यांची फोल ठरलेली आश्वासने, वाढलेल्या राष्ट्रीय समस्या हे सर्व विसरायला लावण्याचे भुलीचे इंजेक्शन या भाषणांतून कसे दिले जाते? समोर नागरिकांचा साधासा जमाव तर असतो. त्याचे रुपांतर हिंस्र झुंडीत कसे केले जाते?
आज अनेकांना आश्चर्य वाटते की मोदी हे किती खालच्या पातळीवर जाऊन विरोधकांवर टीका करतात. वस्तुतः प्रचार म्हटले की त्याची पातळी ही खालचीच असते. अडॉल्फ हिटलरचे सांगणेच तसे होते, की प्रोपगंडाची उंची असावी ती इतकीच की तो कमीत कमी बुद्धी असलेल्या माणसाच्या डोक्यावरून जाणार नाही. त्याच्या भावनांना भिडेल, तितका तो यशस्वी ठरेल. हिटलरचे एकूणच लोकांबद्दलचे मत वाईट होते. सर्वसामान्य लोकांची ग्रहणशक्ती अत्यंत माफक असतेच, पण ते बुद्धीनेही कमी असतात. त्यांची विस्मरणशक्ती मा्त्र प्रचंड असते असे त्याने ‘माईन काम्फ’मध्ये म्हणून ठेवले आहे. आता या पार्श्वभूमीवर मोदींची काँग्रेसच्या जाहिरनाम्यावरची टीका पाहावी.
सेडिशनचे ब्रिटिशकालीन कलम रद्द करण्याचे आश्वासन काँग्रेसने आपल्या जाहिरनाम्यात दिले, तर लगेच मोदींनी हा जाहीरनामा म्हणजे पाकिस्तानचे कारस्थान आहे अशी टीका केली. वस्तुतः सेडिशनचा अर्थ होतो राजद्रोह. राजद्रोह आणि देशद्रोह यात फार फरक आहे. पण सामान्य जनतेला ते कोण सांगणार? त्यामुळे त्यांनाही वाटते की देशद्रोहाचे कलम रद्द करणे म्हणजे अतिच झाले. लोकांची स्मृती फार कमजोर असते. त्यांना हे आठवतच नसते की अण्णा आंदोलनाच्या वेळी तत्कालिन काँग्रेस सरकारने असीम त्रिवेदी नामक व्यंगचित्रकाराला मुंबईत अटक केली होती ती याच राजद्रोहाच्या आरोपाखाली. फार काय, या देशात ‘जय महाराष्ट्र’ असे लिहिणे हाही‘देशद्रोहा’चा गुन्हा मानण्यात आला होता. जून २०१७ मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काही कार्यकर्त्यांसह एकूण १२ जणांवर कर्नाटक सरकारने राजद्रोहाचा आरोप ठेवला होता. त्यांनी केलेला राजद्रोह काय होता, तर ‘जय महाराष्ट्र’ असे लिहिलेल्या एसटी बसचे स्वागत त्यांनी बेळगावीत केले होते. पण हे सांगायचे नाही, त्याची आठवण करून द्यायची नाही, सेडिशनचे भाषांतर राजद्रोह याऐवजी देशद्रोह असे करायचे आणि त्यातून लोकमानसातील राष्ट्रभक्तीच्या भावनेला आवाहन करायचे असा हा प्रकार असतो. तथ्ये तोडूनमोडून मांडायची, अर्धसत्ये सांगायची आणि त्यातून आपणांस हवा तो भावनिक परिणाम निर्माण करायचा यालाच तर प्रोपगंडा म्हणतात. मोदी त्यात माहीर आहेत.
प्रोपगंडाची काही विशिष्ट तंत्रे ते वारंवार वापरताना दिसतात. विरोधकांचे राक्षसीकरण (डेमनायझेशन) हे त्यातील एक महत्त्वाचे तंत्र.
हिटलरने एके ठिकाणी म्हणून ठेवले आहे की माणसाच्या मनात खोलवर डुकरांची शिकार करणारा कुत्रा (म्हणजे श्वाईनहुंड) दडून बसलेला असतो. प्रोपगंडा हा त्या कुत्र्याला भावणारा असला पाहिजे. त्यात कोणतीही गुंतागुंत नको. त्याला दोनच बाजू असल्या पाहिजेत. काळी किंवा पांढरी. कारण सामान्य लोक अशाच बायनरीमध्ये विचार करीत असतात. माणूस पूर्णतः वाईट नसतो, तसाच तो पूर्णतः चांगलाही नसतो हे त्यांच्या पचनी पडणे अवघडच असते. म्हणूनच विरोधक हे नेहमीच काळ्या रंगात रंगविले पाहिजेत. त्यांच्यात थोडासाही चांगुलपणा आहे असे चुकूनही म्हणता कामा नये. कोणत्याही प्रकारच्या प्रोपगंडाची ही पहिली अटच आहे, की आपल्या समोरच्या कोणत्याही समस्येबाबतचा आपला दृष्टीकोन नीट एक-पक्षीय, एकाच बाजूचा असला पाहिजे. मोदी आपल्या विरोधकांबाबत नेमके हेच करताना दिसतात.
मोदीभक्तांत आपल्याला प्रामुख्याने दिसतात ते सर्वसामान्य बुद्धिमत्तेचे, कमी शिकलेले वा ह्युमॅनिटीज – मानव्यशास्त्रांच्या अभ्यासापासून दूर असलेले आणि उजव्या विचारसरणीने, मुस्लिम द्वेषाने पछाडलेले उच्चशिक्षित लोक. त्यांच्या मनातील ‘शिकारी कुत्र्या’ला जागे करायचे तर ती टीका अर्थातच अशा प्रकारे सुसंस्कृतता, सभ्यता यांपासून दूर असायला हवी. मोदींच्या वक्तृत्वात हेच आढळते. काही वर्षांपूर्वी त्यांनी हार्डवर्क विरुद्ध हार्वर्ड अशी एक बायनरी उभी केली होती. तिचा अर्थ तेव्हाही अनेकांच्या लक्षात आला नव्हता. समाजातील बुद्धिमंत, विचारवंत यांच्याविषयी सामान्यांच्या मनात नेहमीच एक दुरावा असतो. अनेकांच्या मनात त्यांच्याविषयी आकस असतो. हस्तीदंती मनो-यातले संपादक वा लेखक, दिल्लीतील एअरकंडिशन्ड केबिनमधले लोक, ल्युटेन्स दिल्ली वा ल्युटेन्स मीडिया’ ही विशेषणे याच आकसाची द्योतक! या आकसाला मान्यता (सँक्शन) देण्याचे काम मोदी सातत्याने करीत असतात. त्यामागील, कष्ट करणारे विरुद्ध विचार करणारे असे द्वंद्व निर्माण करण्यामागील त्यांचे हेतू लक्षात घ्यायला हवेत. विवेक, तर्क, बुद्धीनिष्ठता हे सारे पदभ्रष्ट करणे हा त्याचा उद्देश आहे. एकदा हे पदभ्रष्ट झाले की लोकांच्या मनातील शिकारी कुत्र्याला छू करणे सोपे. ही मनातील शिकारी कुत्री कान टवकारतात ती त्यांच्या भावनांना आवाहन केले, वा त्यांच्या मनातील भयगंडाला चुचकारले की!
या चुचकारण्यासाठी वारंवारतेचे प्रोपगंडातंत्र वापरले जाते. जोसेफ गोबेल्सचे म्हणून एक विधान सांगितले जाते, की ‘अत्यंत असत्य अशी गोष्ट तुम्ही सतत सांगत राहिलात की हळुहळू लोकांना ती खरी वाटू लागते.’ यालाच जोडून हिटलरची महाअसत्याची संकल्पना येते. त्याने लिहून ठेवले आहे की महाअसत्यामध्ये नेहमीच एक जोरकस विश्वासार्हता असते.’ खोटे हे जेवढे मोठे तेवढा लोकांचा त्यावर विश्वास बसतो. हे त्याने सिद्धच करून दाखविले आहे.
मोदींना त्यांच्या विरोधकांनी फेकू असे नाव ठेवले आहे. त्याचा अर्थ असा की मोदी हे सातत्याने खोटे बोलतात. अर्धसत्ये सांगतात. अनेकदा ते इतिहासाचा अपलाप करतात. आणि दिलेली माहिती वा केलेले विधान चुकीचे आहे हे दाखवून दिल्यानंतरही ते त्याबाबत – खुलासा तर दूरच – चकारही काढत नाहीत. लोक त्यावरून त्यांची खिल्ली उडवतात. मोदींचा इतिहास कच्चा आहे वगैरे म्हणतात. वस्तुतः त्यांचा तो खोटेपणा ही जाणीवपूर्वक केलेली कृती असते. तो महाअसत्याच्या तंत्राचा अविष्कार असतो.
गोंदियाच्या त्या प्रचारसभेत आपल्याला मोदींच्या वक्तृत्वशैलीचे आणखी एक वैशिष्ट्य स्पष्टपणे दिसते. ते म्हणजे लोकांशी थेट संवाद साधणे. तो केवळ प्रश्नोत्तरातूनच साधला जातो असे नव्हे. रंगमंचावरील गायक आपल्याबरोबर गा वा टाळ्या वाजवा असे श्रोत्यांना सांगतो, सभेतील एकादा नेता एकाचवेळी सर्वांनी मोबाईलची फ्लॅशलाईट लावावी अशी फर्माईश करतो, मंचावरील वक्ता श्रोत्यांना जयघोष करण्यास सांगतो हे संवादाचेच प्रकार. ते लोकांना आपल्याशी जोडून घेणे असते. मोदी हे प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करतात. आपल्याला हवी तशीच उत्तरे स्वाभाविकपणे येतील असे ते साधेसोपे प्रश्न असतात. त्यांत तर्कविचारांचा संबंध नसतो, त्यांच्या उत्तरासाठी डोके चालविण्याची गरज नसते. ‘अच्छे दिन आले की नाही?’ असे मोदींनी विचारल्यानंतर, त्या वातावरणात ‘आले’ असेच उत्तर येणार असते. अशा प्रकारच्या प्रश्नोत्तरातून मोदी आपल्या श्रोत्यांची भावनिक शरणागती दृढ करून घेत असतात. बँडवॅगन हे तंत्र अशा सभांत व्यवस्थित कार्यरत असते. सगळेच एका बाजूने बोलत असताना कोणी चुकूनही त्याविरोधात बोलण्याचा विचारही करू धजावणार नसतो. फ्रेंच समाज-मानसशास्त्रज्ञ ‘गुस्ताव ले बॉन’ यांनी लिहून ठेवले आहे की संघटित गर्दीत कोणीही आपले व्यक्तिमत्व अबाधित राखू शकत नाही. एकदा व्यक्ती त्या संघटित गर्दीचा वा झुंडीचा भाग बनली की ती संस्कृतीच्या शिडीच्या अनेक पाय-याखाली उतरते. तिला चेहरा प्राप्त होतो तो त्या गर्दीचाच. अशा गर्दीतील शरणागत माणसांना बेफाम करणे अवघड नसते. कारण ती मुळातच दुस-याच्या बुद्धीने वागू लागलेली असतात. ती सूचनाक्षम बनलेली असतात. अशा वेळी त्यांच्या मनात निर्माण केलेले भ्रम हेच वास्तव आहे असे समजून ते चालत असतात. हे मोदीमोहिनीचे रहस्य आहे. हे लक्षात घेऊन त्यांची भाषणे पाहिली, की मोदींच्या आवाहनाचे खरे स्वरूप लक्षात येते.

या लेखाचा भाग  येथे पहावा.

विसोबा खेचर, सर्व घटनांवर लक्ष ठेऊन असणारे, पट्टीचे लेखक आणि पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0