‘मोदींचे आरोप निवडणुका डोळ्यापुढे ठेवून’

‘मोदींचे आरोप निवडणुका डोळ्यापुढे ठेवून’

नवी दिल्लीः देशात कोरोना पसरवण्यामागे काँग्रेस पक्षाचा हात असल्याचा आरोप मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केल्यानंतर बुधवारी त्यांनी राज्यसभेत काँग्रेसच्या ७० वर्षांच्या राजकारणावर पुन्हा बेछुट टीका केली. या टीकेचे पडसाद उमटू लागले असून पंतप्रधान मोदींचे भाषण इतिहासाच्या घटनेची मोडतोड असून भाजपच खरा टुकडे-टुकडे गँगचा समर्थक असल्याची टीका काँग्रेसने केली.

मोदींनी लोकसभेतल्या आपल्या भाषणात लॉकडाउनच्या काळात काँग्रेसने श्रमिकांना रेल्वेचे तिकिटे देऊन महाराष्ट्रातून उ. प्रदेश, बिहार राज्यात पिटाळले, त्याने कोरोना पसरला असा आरोप केला. देशातला कोरोना हे काँग्रेसचे पाप असल्याची टीका केली. मोदींनी दिल्लीत आप सरकारलाही दुषणे दिली. आपनेही दिल्लीत गरीब वस्तीत राहणाऱ्या श्रमिकांना, गरीबांना, श्रमिकांना उ. प्रदेश, उत्तराखंड, बिहार, पंजाबात पिटाळले त्यामुळे तेथे कोरोना पसरला असा आरोप केला.

मोदींच्या या आरोपांना महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी तीव्र आक्षेप घेत केंद्र सरकारने श्रमिकांची जबाबदारी न घेता त्यांना मरण्यासाठी सोडून दिले. पंतप्रधानांनी कोणतीही तयारी न करता लॉकडाउन घोषित केला. त्यामुळे मुंबई व राज्यात अडकलेल्या यूपी, बिहारमधील श्रमिकांची परिस्थिती चिंताजनक बनत गेली. त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. आमच्या महाविकास आघाडी सरकारने श्रमिकांच्या हितासाठी निर्णय घेतले त्याचा आम्हाला अभिमान असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनीही नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचे मोदींनी आयोजन केले त्यामुळे कोरोना फैलावला असा आरोप केला. मोदींनी वेळीच आंतरराष्ट्रीय उड्डाणांना प्रतिबंध घातला असता कोरोना फैलावला नसता. मोदीनींच देशात कोरोना वाढवला असे मलिक म्हणाले.

काँग्रेसचे नेते व मंत्री अशोक चव्हाण यांनीही ५ राज्यांच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून आपले अपयश झाकण्यासाठी मोदी आरोप करत असल्याचे म्हणाले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदींच्या आरोपाला उत्तर दिले. ‘पंतप्रधानांचे हे विधान पूर्णपणे खोटे आहे. ज्यांना कोरोनाच्या काळात वेदना सहन कराव्या लागल्या आहेत, ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याप्रती पंतप्रधान संवेदनशील असतील, अशी देशाला आशा आहे. जनतेच्या दुःखावर राजकारण करणे पंतप्रधानांना शोभत नाही.’ अशी टिप्पण्णी केली.

COMMENTS