नवी दिल्लीः फेक न्यूजचा पर्दाफाश करणाऱ्या अल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद झुबैर यांना ज्या ‘हनीमून-टू-हनुमान हॉटेल’ ट्विट फोटोप्रकरणात दिल्ली पोलिसांन
नवी दिल्लीः फेक न्यूजचा पर्दाफाश करणाऱ्या अल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद झुबैर यांना ज्या ‘हनीमून-टू-हनुमान हॉटेल’ ट्विट फोटोप्रकरणात दिल्ली पोलिसांनी अटक केली त्या ट्विटमधील फोटो १९८३मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘किसीसे ना कहना’ या प्रसिद्ध दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांच्या हिंदी चित्रपटातला आहे. झुबैर यांना सोमवारी धार्मिक तेढ व दंगल भडकवण्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. झुबैर यांनी हे ट्विट २४ मार्च २०१८ सालमध्ये केले होते. हे ट्विट म्हणजे हॉटेल बोर्डाचे फोटो होता व ते गेले चार वर्षे अजूनही त्यांच्या ट्विटर अकाउंटवर कायम होते.
दरम्यान मंगळवारी झुबैर यांच्या पोलिस कोठडीत आणखी ४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
झुबैर यांच्या या ट्विटविरोधात तक्रार एका ट्विटर हँडलवरून करण्यात आली होती, ते अकाउंट ऑक्टोबर २०२१मध्ये उघडण्यात आले होते. या अकाउंटमधून एकदाच १९ जूनला ट्विट करण्यात आले होते, त्या ट्विटमध्ये झुबैरला लक्ष्य करण्यात आले होते.
दिल्ली पोलिसांनी ज्या फोटोवरून झुबैर यांना अटक केली तो फोटो २०१८मध्ये इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखातही प्रसिद्ध झाला होता. त्यावर कोणाचे लक्षही गेले नव्हते व अशा फोटोने धार्मिक तेढ निर्माण झाली अशी तक्रारही कोणी केली नव्हती.
महत्त्वाची बाब अशी की किसीसे ना कहना चित्रपटातील या हॉटेलच्या बोर्डावर सेन्सार बोर्डने हरकत घेतली नव्हती. हा चित्रपट आजपर्यंत अनेक वेळा दूरदर्शन व अन्य वाहिन्यांवर दाखवण्यात आला आहे.
झुबैर यांना जाणूनबुजून लक्ष्य?
प्रेषित पैगंबर यांच्यावर अवमानास्पद टीका केल्यामुळे निलंबित व्हाव्या लागलेल्या भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी झुबैर यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली. झुबैर यांच्या अनेक ट्विटमुळे आपल्याला जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या आरोपानंतर #ArrestMohammedZubair या हॅशटॅगखाली राष्ट्रीय स्तरावर ट्विटर ट्रेंड चालू करण्यात आला आणि उ. प्रदेशातून एक फिर्याद दाखल करण्यात आली. झुबैर यांनी आपल्या ट्विटमधून धार्मिक तेढ निर्माण केली असा आरोप करण्यात आला.
झुबैर आपल्या ट्विटर हँडलवरून अनेक उपहासात्मक ट्विट, फोटो प्रसिद्ध करत असतात, त्यांचे बहुतांश ट्विट सत्ताधारी भाजप व कडव्या हिंदुत्ववादी गट यांच्याविरोधात असल्याने ते हिंदुत्ववादी गटांचे विशेष करून लक्ष्य झाले आहेत.
मूळ बातमी
COMMENTS