नैतिक श्रेष्ठतेचा ‘हिंदु’स्तानी दंभ

नैतिक श्रेष्ठतेचा ‘हिंदु’स्तानी दंभ

सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर देशातल्या नैतिक श्रेष्ठांचा दंभ टरारून वर आला. या दंभाचे ज्यांनी जाहीर प्रदर्शन मांडले, त्या तथाकथित रॉबिनहूड पूर्व डीजीपी गुप्तेश्वर पांडेंनी नितीशकुमारांच्या पक्षात तितक्याच जाहीरपणे प्रवेश केला. यात ‘औकात’ कुणाची दिसली? ज्या स्त्रीस त्यांनी ललकारले तिची की खुद्द पांडेंची?

बिहारमध्ये एनडीए फुटली; नितीशविरोधात पासवान
नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री
‘अग्निपथ वरून बिहार पेटले

समाजातील नैतिक मूल्ये काळानुरुप बदलायला हवी. जे काल अनैतिक होते, तसे ते आज ठरू नये. असे घडणे म्हणजे समाज पुढारणे. पण ही प्रक्रिया चार पावले पुढे-दोन पाऊले मागे, असे करत उलट-सुलट प्रकाराने अव्याहत सुरुच राहते,  असे संस्कृतीचे अभ्यासक, मानववंश शास्त्राचे तज्ज्ञ मानतात. म्हणजे, एकदा समाजाची मूल्यव्यवस्था सुधारली, पुढारली म्हणजे तो माघारी वळत नाही, असे घडत नाही. कारण, कर्मठ, कर्मकांडी, परंपरावाद्यांचे वर्चस्व ज्या धर्मग्रंथांवर अवलंबून असते,  त्या धर्मग्रंथांचे महत्त्व काही कमी होत नाही. सुधारणा ही देशाच्या संविधानात संभवते, धर्मग्रंथातली वचने अपरिवर्तनीय, अपौरुषेय असतात. काळ्या दगडावरची रेघ ठरतात. आणि याच्याच बळावर कट्टरपंथी वर्ग समाजामध्ये नैतिक श्रेष्ठतेच्या दंभाची पेरणी करत जातात. असे घडत नसते, तर युरोपात प्रबोधन पर्वानंतरच्या कालखंडात हिटलर, मुसोलिनीसारखे मानवी दैत्य जन्मालाच आले नसते. जगाला दोन महायुद्धांना, पाठोपाठ अमेरिका-रशिया शीतयुद्धाला सामोरे जावे लागलेच नसते.
या संदर्भाने, नैतिक श्रेष्ठता मिरवणाऱ्यांसाठी आताचा काळ काहीसा अपेक्षित आणि पोषक म्हणता येईल, असा आहे. केवळ भारतातच नाही, अमेरिका, शेजारचे पाकिस्तान-अफगाणिस्तान, अरब राष्ट्रे इथे तिथे सर्वत्र हा दंभकारी समाज विस्तारत चालल्याचे दिसते. त्यात भारताचा दंभ दोन अंगुळे वरच्या स्तरावरचा. कारण, आताचा भारत स्वत:ला विश्वगुरुच्या जागी कल्पिणारा. त्याचा दंभ छोटा असून कसा चालेल?

या दंभाचीदेखील आपल्याकडे भारीच गंमत असते. उजवे लोक, पोथीनिष्ठ डाव्यांच्या ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’ ला हिंसक आदेशपत्र म्हणून हिणवतात आणि डावे हिंदूंमधल्या अनेकांची आचारसंहिता असलेल्या मनुस्मृतीला हिटरलच्याही आधीपासून अस्तित्वात असलेला ‘फॅसिस्ट मॅनिफेस्टो’ मानतात. एकूणात संधी मिळेल तेव्हा या डाव्या-उजव्यांची त्यांच्या- त्यांच्या ‘मॅनिफेस्टो’ला स्मरून दंभगिरी चाललेली असते. सध्या देशात मार्क्सवादी, लेनिनवादी, माओवादी असे डाव्यांचे बहुतेक सगळे गट-तट सैरभैर अवस्थेत आहेत. तर कडव्या उजव्यांची भलतीच चलती आहे. त्यात गेल्या तीन महिन्यापासून सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाने या नैतिक श्रेष्ठांना मुबलक प्रमाणात इंधन पुरवले आहे.

ही आत्महत्या नव्हे, तर जिनिअस नट कम अवकाश संशोधकाची हत्या आहे आणि त्या हत्येला नैतिकतेच्या दृष्टीने मूलत: दुय्यम दर्जा असलेली,  खरे तर ‘औकात’ नसलेली  ‘ढोर, गंवार, शूद्र, पशू, नारी सकल ताडण के अधिकारी’, या न्यायाने स्त्री जबाबदार आहे, इथून या दंभाने उसळली मानण्यास सुरुवात केली आहे. पुढे जावून या रिया चक्रवर्तीनामक स्त्रीस डाकीण, चेटकीण ठरवून तिच्यावर शक्य होईल त्या दिशेने झडप घालणे सुरू राहिले आहे.

मग पुरेसा अहं सुखावून झाल्यानंतर एका टप्प्यावर या ‘चवचाल’ स्त्रीस तुरुंगात डांबले गेले. यथावकाश मोर्चा माननीय भोजपुरी अभिनेता-नेता रविकिशन यांच्या नजरेतल्या ‘गटरछाप’ बॉलिवूडमधल्या इतर स्रियांकडे वळवला गेला. रोज एका नव्या ‘नशेबाज’ स्रीचे नाव, रोज नव्याने नैतिकतेचे धडे. आता तर आपण कुठून सुरुवात केली हे विसरून हा नैतिक श्रेष्ठांचा वर्ग -या वलयांकित स्त्रियांना हा समाज आयकॉन समजतो, अशा प्रसंगी त्या चरस-गांजा-हशीश ओढतातच कशा, त्यांना या अनैतिक कृत्याची जबरी शिक्षा व्हायलाच पाहिजे. जय भारत-जय ‘हिंदु’स्तान-असे म्हणत मनसोक्त शाब्दिक चाबकाचे फटक मारतो आहे. असे म्हणताना, बॉलिवूडमधल्या पुरुषांना या श्रेष्ठांनी क्लीनचिट तरी दिली आहे किंवा पुरुष असे वागूच शकत नाहीत, वागले तरीही त्याचे एकमेव कारण या बदफैली स्त्रियाच आहेत, अशी त्याची पक्की खात्री तरी झालेली दिसते आहे.

बलवान शत्रूला भिडताना आपल्या पौरुषत्वाबद्दल शंका आल्या तर याच स्त्रीला पुढे करून बळी द्यायचे आणि समूहावर जरब ठेवायची असेल, तर याच स्त्रीस वेठीस धरायचे, या तशा पूर्वापार चालत आलेल्या टॅकटिक्स आहेत. आपण सर्वात स्खखनशील आहोत, हे वारंवार सिद्ध केलेल्या बॉलिवूडवर कायद्याच्या आडून सध्या हाच प्रयोग अगदी दणक्यात सुरू आहे. रोजच नट्यांचे चारित्र्यहनन सुरू आहे. न्यायालयाच्या निकालाआधीच नैतिक श्रेष्ठांनी जागा व्यापलेल्या सरकारने, समाजाने, मीडियाने या नट्यांवर गुन्हेगार असा शिक्का मारलेला आहे. एनसीबीच्या चौकशीदरम्यान दीपिका पडुकोन तीन वेळा रडली. कोलमडली. स्फुंदली. चौकशी दरम्यानचे तपशील जसे बाहेर येत गेले, हा दंभकारी समाज भयंकर सुखावल्याचे दिसले. कोणाचे सुख कशात, तर कोणाचे सुख आणखी कशात.

या दंभकारी समाजाच्या सुखाच्या कल्पनाही फार भारी. म्हणजे, जशी निवडून निवडून बोकड-कोंबड्यांवर शिक्का मारून त्यांची रवानगी कत्तलखान्यांकडे केली जाते, तसाच नैतिक श्रेष्ठांचा सर्वोच्च नेता दुरूनच शिक्का मारण्यालायक बाया-माणसांकडे इशारा करतो. त्या इशाऱ्यानुसार सारी यंत्रणा हलते. बाई असो वा पुरुष एकदाचा झुंडीच्या हवाली होतो आणि मग ती झुंड टोकत, ठेचत, लचके तोडत शिक्का मारलेल्यांना ओढत, खेचत नेत राहते. एक झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा… असे मिळून धांगडधिंग्यात गुन्हेगारास फरफटत नेत राहातात. या वेळची नैतिक श्रेष्ठांमध्ये चढलेली नशा इतकी धुंद करणारी असते, त्यात सावज जिवंत आहे, अर्धेमेले आहे कशाशीही त्यांना देणेघेणे नसते. फक्त खेचणे-ओढणे-फरफटत नेणे सुरू राहते. लांबवर बसलेला नैतिक श्रेष्ठांचा नेता, कसा जन्माचा धडा शिकवला म्हणत, गालातल्या गालात हसत असतो.

योग किती विलक्षण असतात, सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात न्याय मिळावा, यासाठी पवित्र कायद्याच्या रक्षणार्थ ज्यांनी अतिव उत्साहाने आपली प्रतिष्ठा पणाला लावली, ते नैतिक श्रेष्ठतेचे दंभरुपी स्टार्स अंगाखांद्यावर वागवणारे, स्वेच्छेने निवृत्ती पत्करलेले बिहारचे पूर्व डीजीपी तथाकथित रॉबिनहूड गुप्तेश्वर पांडे रविवारी विधिवत ‘सुशासनबाबू’ मुख्यमंत्री नितिशकुमारांच्या उपस्थितीत जनता दल युनायटेड या पक्षात प्रवेश करते झाले. पोलिसी अहंकाराला राजकीय घर लाभले. आणि अशा रीतीने नैतिक श्रेष्ठत्वाचा असंख्यांना असलेला ‘हिंदु’स्तानी दंभ गगनाला भिडला…

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0