एव्हरेस्टचे चिरकालीन रहस्य

एव्हरेस्टचे चिरकालीन रहस्य

८ जून, १९२४ रोजीच्या थंडगार पहाटे दोन ब्रिटिश गिर्यारोहक त्यांच्या छोट्याशा तंबूतून बाहेर पडले आणि अवजड ऑक्सिजन उपकरणे पाठीवर लादून तेव्हापर्यंत कोणत्याही मानवप्राण्याने न तुडवलेली माउंट एव्हरेस्टची वाट चढू लागले.

राष्ट्रीय विज्ञान दिनाचा अन्वयार्थ
गोगोईंविरोधात हक्कभंगाच्या १० तक्रारी दाखल
ट्विटरवर अरब जगतातून ‘बॉयकॉट इंडिया’चा ट्रेंड

देवाने साथ दिली तर आम्ही शिखरावर तरंगत जाऊ किंवा मग वारे छातीत भरून घेऊन शिखरावर धडकू तरी.”

जॉर्क मलोरी यांनी घरी पाठवलेल्या पत्रातील मजकूर

 तब्बल ८,१४० मीटर उंचीवरच्या एव्हरेस्टच्या बर्फाच्छादित उत्तर कड्यावर ८ जून, १९२४ रोजी उगवलेली पहाट थंडीने गारठलेलीच असणार. या थंडगार पहाटे दोन ब्रिटिश गिर्यारोहक त्यांच्या छोट्याशा तंबूतून बाहेर पडले आणि अवजड ऑक्सिजन उपकरणे पाठीवर लादून तेव्हापर्यंत कोणत्याही मानवप्राण्याने न तुडवलेली माउंट एव्हरेस्टची वाट चढू लागले. यातले एक म्हणजे जॉर्ज मलोरी केम्ब्रिज विद्यापीठातील एक्स्ट्रा म्युरल स्टडीजमधले लेक्चरर होते, तर दुसरा धिप्पाड तरुण, सॅण्डी आयर्विन, ऑक्सफर्ड विद्यापीठात इंजिनीअरिंगचं शिक्षण घेत होता. त्यांची ही मोहीम पुढे चिरकालाचं रहस्य झाली. या मोहिमेची एक भव्य आख्यायिका झाली. पण हे मलोरी नेमके होते कोण?

जॉर्ज लाय मलोरी यांचा जन्म १८ जून, १८८६ रोजी इंग्लंडमधल्या चेरशायरमधील मोबलेरी येथे एका क्लर्जीमनच्या घरात झाला. त्यांचा धाकटा भाऊ पुढे १९४४ मध्ये ओव्हरलॉर्डमधील अलाइड एअर अर्माडामध्ये एअर मार्शल झाला. मलोरी यांनीही पहिल्या महायुद्धात तोफखान्याचा अधिकारी म्हणून सहभाग घेत एका संपूर्ण पिढीला व्यापून टाकणारा भीषण नरसंहार बघितला होता. एव्हरेस्टवर ब्रिटिशांनी सुरुवातीला काढलेल्या मोहिमा म्हणजे ब्रिटिश आणि रशियन साम्राज्यं आशिया नावाच्या पटावर खेळत असलेल्या खेळाचा भाग होत्या. सुरुवातीच्या ब्रिटिश माउंट एव्हरेस्ट मोहिमांचे श्रेय सर फ्रान्सिस यंगहसबंड यांना जातं. वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी यंगहसबंड मुरलेले शोधक झाले होते. त्यांनी हिमालयातला पाणलोट प्रदेश पालथा घातला होता. ताकलामाकन वाळवंट ओलांडून चीनमधील तुर्केस्तान गाठत त्यांनी तोपर्यंत कोणीही न तुडवलेल्या मुस्ताघ खिंडीतून काशगर ते भारत मार्ग शोधून काढला होता. तीन साम्राज्यांचा छेदबिंदू असलेल्या काराकोरम पर्वतरांगा, हिंदुकुश आणि पामीरची माहिती त्यांनीच तत्कालीन व्हॉइसरॉय लॉर्ड डफरिन यांना दिली होती. त्यानंतर १९०४ मध्ये त्यांनी तिबेटमधील एका मोहिमेचे नेतृत्व केले. त्यातूनच या भागात आणि प्रत्यक्ष माउंट एव्हरेस्टवर ब्रिटिशांचा शिरकाव सुरू झाला. माउंट एव्हरेस्टवरील ब्रिटिश टेहळणी मोहीम घेण्यासाठी १९२१ मध्ये स्थापन झालेल्या माउंट एव्हरेस्ट कमिटीच्या अध्यक्षस्थानी सर फ्रान्सिसच होते. जॉर्ज मलोरी या टेहळणी पथकाचे महत्त्वाचे सदस्य म्हणून निवडले गेले होते. १९२१ सालची ही मोहीम अनेक दृष्टींनी असामान्य होती. या मोहिमेच्या निमित्ताने प्रथमच मानवाने चोमोलुंगमाच्या, जगातील सर्वोच्च पर्वताच्या, निकटच्या प्रदेशात पाऊल टाकले. ते काम्बा झोंगपासून एव्हरेस्टच्या प्रदेशाच्या जवळ पोहोचले तेव्हाच एका महत्त्वाकांक्षेने मलोरी यांना भारून टाकलं.

ते लिहितात- आम्ही आता नकाशाबाहेर पाऊल टाकण्याच्या बेतात आहोत. एव्हरेस्टचं पहिलं दर्शन त्यांच्यासाठी अविस्मरणीय होतं. त्यांनी बायको रुथकडे केलेलं वर्णन काहीसं असं आहे : “ढगांच्या गर्दीतून अचानक बर्फाची चमक आमच्या नजरेस पडली. पर्वतांचा एक संपूर्ण समूह विशाल तुकड्यांच्या स्वरूपात समोर आला. पर्वतांचे आकार धुक्यात नेहमीच विलक्षण भासतात. एखाद्या स्वप्नासारखे. एक बंडखोर त्रिकोण खोलातून उंच उसळी मारत असावा तसं शिखराचं एक टोक ७० अंशाच्या कोनात झेपावताना दिसत होतं. त्याला अंत नव्हताच. त्याच्या डावीकडे करवतीच्या दात्यासारखा माथा आकाशात झुलत होता. हळुहळू, अगदी हळुहळू, आमच्या डोळ्यापुढे विशाल पर्वताच्या बाजू आणि हिमनद्या उलगडल्या जाऊ लागल्या. आता सलग दिसत होता पर्वत. आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडच्या उंचीवर आकाशात पोहोचलेलं एव्हरेस्टचं शुभ्र शिखर.”

एव्हरेस्टने मानवावर दीर्घकाळापासून गारुड केलं आहे यात शंका नाही.

हॉवर्ड-बरी यांच्या नेतृत्वाखालील ही मोहीम म्हणजे सर्वेक्षणाचा एक प्रयत्न होता. जूनच्या अखेरीस रोंगबुक हिमनदीजवळ बेस कॅम्प स्थापन करण्यात आला. मोहिमेची उद्दिष्टं साध्य झाली. एव्हरेस्ट भागाचं सर्वेक्षण व नकाशा तयार झाला आणि उत्तरेकडून व पूर्वेकडून तसंच पश्चिम टोकापर्यंत शिखराचा शोध घेण्यात आला. मलोरी पर्वतांचा शोध घेण्यात अग्रेसर होते, तर भारतीय सर्वेक्षण खात्याचे ऑलिव्हर व्हीलर यांनी या प्रदेशाचं काळजीपूर्वक सर्वेक्षण केलं. विरोधाभास म्हणजे नॉर्थ कोलला जाणारा मार्ग तसेच तिबेटच्या बाजूने एव्हरेस्टवर जाणारा मार्ग व्हीलर यांनी शोधून काढला. मलोरी यांनी इस्ट रोंगबुक हिमनदी बघितली पण हे मार्ग त्यांच्या नजरेतून सुटले. अर्थात त्यांनी बाकी बरंच काही केलं. नयनरम्य खारता खोऱ्यातून एव्हरेस्टकडे जाणारे मार्ग खुले केले, एव्हरेस्टचा पूर्वेकडील दर्शनी भाग बघितला, नॉर्थ कोलपर्यंतचा मार्ग निश्चित केला. दक्षिणेकडील मार्ग चढण्यासाठी खडतर ठरेल असं त्यांचं मत होतं. १९२२ मध्ये माउंट एव्हरेस्ट चढून जाण्याच्या उद्देशाने मोहीम आखली गेली. तोपर्यंत इस्ट रोंगबुक हिमनदीचं महत्त्व सर्वांना कळून चुकलं होतं आणि त्याचा लगेच उपयोग करण्यात आला. या पथकात जॉर्ज फिंच यांचाही समावेश होता. ऑक्सिजनचा वापर सर्वप्रथम करण्याचा मान यांच्याकडे जातो. शेर्पा त्याला इंग्लिश एअर’ म्हणायचे. या मोहिमेसाठी दोन शैलींचा वापर झाला. यातील अभिजात अल्पाइन शैलीत ऑक्सिजनच्या उपकरणाचा वापर नव्हता, तर नवीन शैलीत अतिउंचीवर ऑक्सिजन उपकरण वापरलं जाणार होतं. मलोरी आणि हॉवर्ड सोमर्वेल ११ मे रोजी नॉर्थ कोलला पोहोचले. २० मे रोजी मलोरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अभिजात शैलीत पहिला प्रयत्न केला. मलोरी यांचे सहकारी तीव्र हवामानामुळे शिबिरे स्थापन करण्यातच दमून गेले होते. पहाटे साडेपाच वाजता उठल्यानंतर ते सात वाजता निघाले आणि त्यांनी त्या दिवशी ७,६०० मीटरवर कॅम्प व्ही स्थापन केला. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता उठून मलोरी, सॉमर्वेल आणि एडवर्ड नॉर्टन यांना ८,२२५ मीटरवरील उत्तर कड्यावर दुपारी दोनपर्यंत पोहोचण्यासाठी कडवा संघर्ष करावा लागला. अर्थात त्यांनी उंचीचा विक्रम स्थापित केला.

ऑस्ट्रेलियाचे जॉर्ज फिंच यांच्या आग्रहावरून पुढला प्रयत्न ऑक्सिजन उपकरणासह करण्यात आला. आता तंदुरुस्त सहकारी कमी असल्याने फिंच जेफ्री ब्रुस आणि गुरखा तेजबीर यांच्यासह २५ मे रोजी निघाले. त्यांनी ७,४६० मीटरवर कॅम्प व्ही स्थापन केला आणि २७ मे रोजी ते ऑक्सिजन उपकरणासह निघाले. तेजबीरने ७,९२५ मीटरवर असताना मोहीम सोडली. फिंच आणि ब्रुस ८,३२५ मीटरच्या नवीन विक्रमी उंचीवर पोहोचले पण ब्रुस यांचं उपकरण बिघडल्याने ते पुढे जाऊ शकले नाहीत. ते किती उंचीवर जाऊ शकले असते हा मुद्दा वेगळा पण त्यांनी मलोरी यांना एव्हरेस्ट गाठण्याचा नवीन दृष्टिकोन दिला. १९२२ सालच्या मोहिमेची तुलना अवकाशातल्या पहिल्या मानवी प्रवेशाशी केली जाऊ शकते. या मोहिमेने अनेक गोष्टींचा पाया घातला. ईशान्य कड्याचा मार्ग या मोहिमेतच सापडला. “डेथ झोन”मध्ये ऑक्सिजनचा वापर प्रथम करण्यात आला. १९२१ साली सुरू झालेल्या प्रयत्नांचा कळस १९२४ सालच्या मोहिमेत साधण्यात आला. मागील मोहिमांतून धडे घेऊन सर्व आखणी करण्यात आली. आता मलोरी यांचं वय ३७ वर्षे होते. शिखर गाठण्यासाठी त्यांच्याकडे फार वेळ उरला नव्हता. त्यांच्यात आणि शिखरात काहीतरी ठरलं असावं. ते या मोहिमेतून तसेच परत येणार नव्हते. ही मोहीम मे महिन्यातच खराब हवामानामुळे रद्द करण्यात आली. अखेरीस एडवर्ड नॉर्टन आणि सॉमर्वेल यांनी ४ जून रोजी शिखर पादाक्रांत करण्याचा प्रयत्न केला आणि ते ग्रोट कुलॉइर ओलांडून ८,५७२ मीटर उंचीवर पोहोचले. त्यानंतर त्यांना प्रयत्न सोडून द्यावा लागला. ऑक्सिजनशिवाय केलेली ही विलक्षण चढाई होती आणि हा विक्रम मोडला जाण्यासाठी तब्बल ५० वर्षांचा काळ लागला. १९७८ मध्ये राइनहोल्ड मेस्नर आणि पीटर हाबेलर यांनी हा विक्रम मोडला. मलोरी नॉर्थ कोलवर प्रतीक्षा करत होते आणि त्यांना शिखर पादाक्रांत करण्यासाठी अखेरचा प्रयत्न करायचा होता. हा प्रयत्न ते आयर्विन नावाच्या तरुणासोबत करणार होते आणि ऑक्सिजन वापरणार नव्हते. शिखर पादाक्रांत केल्याखेरीज परत यायचंच नाही असा निग्रह कदाचित मलोरी यांनी केला होता.

८ जून रोजी अखेरचे फासे फेकत मलोरी अँड्र्यू (सॅण्डी) आयर्विन या सहकाऱ्यासोबत कॅम्प सिक्समधून पहाटे किंवा त्याहीपूर्वी निघाले. त्यांचा सहाय्यक गिर्यारोहक नोएल ओडेल १२:५० वाजेपर्यंत केवळ ८,००० मीटर्सपर्यंत चढून गेला होता. तिथे विश्रांती घेण्यापूर्वी त्याने शिखराच्या कड्याकडे बघितलं.

ओडेल यांनी केलेल्या वर्णनानुसार : “वातावरण अचानक स्वच्छ झालं आणि एव्हरेस्टच्या शिखर आणि कड्यावरचं आच्छादन दूर झालं. कड्यावरच्या खडकामागील छोट्याशा हिममाथ्यावर दिसणाऱ्या काळ्या बिंदूवर माझी नजर खिळली. हा काळा बिंदू सतत हलत होता. मग आणखी एक काळा बिंदू दिसू लागला आणि माथ्यावरच्या पहिल्या काळ्या बिंदूजवळ आला. पहिला मग खडकाच्या पायरीशी आला आणि शिखरावर दिसू लागला. मग दुसराही दिसू लागला. आणि हे सगळं दृश्य अचानक ढगांत लपेटून दिसेनासं झालं.”

त्यानंतर मलोरी आणि आयर्विनला कोणी जिवंत बघितलं नाही. ओडेलला ते दिसत होते तो काळ त्यांच्या एव्हरेस्टच्या दिशेने चाललेेल्या प्रवासातले तीन तास असणार. ट्वीड जॅकेट्स आणि हॉबनेल्ड बूट्स घालून केवळ एका दोरीसह जोमाने शिखराकडे जाताना ते दिसले ते अखेरचेच.

मलोरी आणि आयर्विनचं नेमकं काय झालं हे आज सुमारे शतकभरानंतरही रहस्यच आहे.

अजय दांडेकर, दिल्ली एनसीआरमधील शिव नाडर विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक आहेत.

फिलिप समर्स, हे ऑस्ट्रेलियन संशोधक, इतिहासकार आणि लेखक आहेत.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0