कोरोनाविरुद्धचे जर्मन मॉडेल आणि नेतृत्त्वाचे महत्त्व

कोरोनाविरुद्धचे जर्मन मॉडेल आणि नेतृत्त्वाचे महत्त्व

जर्मनी या देशाचे कोरोनाव्हायरस आपत्ती व्यवस्थापन हे सध्याच्या मॅाडेलपेक्षाही उत्तम आहे, यामध्ये नेतृत्त्वाचा मोठा सहभाग आहे.

राम नवमी : काही ठिकाणी लॉकडाऊनला फाटा
कोरोनाचा पुनःसंक्रमणाचा धोकाः आयसीएमआर
कोरोनाचे संकट कायम, जबाबदारीची गरजःमुख्यमंत्री

सध्या जर्मनीमध्ये जवळपास १ लाख लोकांना कोरोनाचा संर्सग झाला असून, मृत्यू १५०० झाले आहेत. संसर्ग आणि मृत्यूचे प्रमाण १.५% इतके आहे. जर तुलनाच करायची झाली तर हाच १ लाखाचा टप्पा गाठेपर्यंत ईटली, स्पेन व फ्रान्स यांचा मृत्यूदर १०% पर्यंत आहे. म्हणजे १०,००० लोकांचा मृत्यू. मग जर्मनीने नेमके काय आणि कसे व्यवस्थापन केले? याचे रहस्य काय? तर ते आहे, योग्य आणि तार्कीक विचार करणारे नेतृत्व, सुदृढ आरोग्यव्यवस्था व तातडीचे व्यवस्थापन आणि विनावलंब पुर्वतयारी.

सुदृढ आरोग्यव्यवस्थेबद्दल बोलायचं तर एकूण गेल्या २० वर्षात व त्यातील जर्मनीच्या चॅन्सेलर अॅन्जेला   मर्केल यांच्या १५ वर्षाच्या काळात जर्मनीने त्यांची वृध्द लोकसंख्या व एकूण विचार करुन आरोग्यव्यवस्थेचे  कमालीचे आधुनिकीकरण घडवून ती सुधारली.

जर्मनीची लोकसंख्या आहे ८.३ कोटी व तेथे ७.५ लाख बेड्सची (रुग्णालयातील खाटा) सोय आहे. भारतामध्ये  १३५ कोटी लोकसंख्येसाठी ६.९ लाख बेड्स आहेत. अमेरिकेत ३५ कोटी लोकसंख्येसाठी ९.५ लाख बेड्स आहेत.  जर्मनीमध्ये सध्या ३० हजार आयसीयु (ICU) बेड्स हे उत्तम व्हेंटिलेटरसहीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यामध्ये त्यांनी आणखी ही क्षमता ४० ते ५० हजार आयसीयु(ICU+Ventilators)  बेड्स करायची तयारी सुरु केली आहे. भारतामध्ये हीच संख्या (ICU+Ventilators) ४८ हजार इतकी आहे. तसेच फक्त आयसीयु (ICU) बेड्सची संख्या २८ हजार इतकी होती, ती ५६ हजार करण्याची तयारी सुरु आहे. सध्या त्यातील अर्धे बेड्स रिकामेच आहेत. त्यामुळेच जर्मनीने आता इटली, फ्रान्स व स्पेन यांसारख्या युरोपीयन संघातील देशांच्या कोरोनाबधीत रुग्णांवर जर्मनीत ऊपचार सुरु केले आहेत.

कोरोनाचे ८०% रुग्ण बरे होतात व २०% रुग्ण हे गंभीर असतात त्यांना ICU बेड्सची व त्यातील काहींना वेंटिलेटरची गरज लागते. त्याचसोबत आरोग्य कर्मचारी वर्गही तेवढाच सक्षम असावा लागतो. त्याबाबतीतही जर्मनीमध्ये दर हजार लोकांमागे ३.५ डॅाक्टर आहेत. भारतात हे प्रमाण ०.५३ तर अमेरिकेत १.६ इतके आहे. यावरुन जर्मिनिच्या आरोग्य व्यवस्थेची सक्षमता काय असेल, याचा अंदाज येतो.

दुसरा मुद्दा तातडीच्या व्यवस्थापनाचा आणि विनाविलंब पुर्वतयारीचा. जर्मनी हा पहिल्या काही देशांपैकी होता, ज्यांनी कोरोना तपासणीचे कीट हे जानेवारीच्या मध्यातच तयार केले होते. जर्मनीतील खाजगी क्षेत्रात काम करणारे आणि सरकारी संस्थांमध्ये काम करणारे वैद्यकीय तज्ज्ञ आणि विषाणूतज्ज्ञ यांनी पहिला भर हा टेस्टींग कीट तयार करण्यावर दिला. त्यामुळेच फ्रेब्रुवारीच्या शेवटी जर्मनीमधून जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) १४ लाख टेस्ट पाठवल्या गेल्या. जसजसे जर्मनीमध्ये कोरोनाच्या केसेस वाढल्या, तसे हे किट्स  लाखोंनी तयार करण्यात आले. आजतागायत १० लाख लोकांच्या टेस्ट करण्यात आल्या. ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नव्हती, तेही त्यामुळे सापडले व प्रसार कमी करुन मृत्यूदर आटोक्यात आणण्यात आला. आज जर्मनीकडे आठवड्याला पाच लाख टेस्ट करायची क्षमता आहे. देशाच्या आरोग्यव्यवस्थेवर लक्ष ठेवून असणाऱ्या रॅाबर्ट कॅाश या संस्थेद्वारे फेब्रुवारीमध्येच टास्क फोर्स नियुक्त करण्यात आला आणि काम सुरु झाले. संस्थाप्रमुख डॅा. लोथर वेलर यांनी जर्मनीमध्ये मार्चमध्येच प्रती आठवडा १ लाख ६० हजार टेस्ट सुरु होत्या, असे सांगितले होते आणि ही संख्या प्रती आठवडा ५,लाख करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले होते.

तिसरा मुद्दा म्हणजे, योग्य आणि तार्कीक विचार करणारे नेतृत्व. जर्मनीच्या चॅन्सेलर अॅन्जेला मर्केल या स्वत: क्वांटम केमिस्ट्री (पुंजरसायनशास्त्र) या विषयातील डॉक्टरेट आहेत व अल्पकाळ सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांनी २००९ ची आर्थिक मंदी, २०१२-१३ मधील युरोपियन मंदी या काळात संपूर्ण युरोपात आर्थिक परिस्थिती बिघडली असताना जर्मनीला फायद्यात ठेवलं होतं. २०१५ चे विस्थापितांचे संकट त्यानी हाताळले पण त्यामुळे त्यांच्या प्रसिध्दीला ग्रहण लागले.

२०२० मध्ये मात्र जेंव्हा कोरोनाचे संकंट आले, तेंव्हा मात्र चॅन्सेलर अॅन्जेला मर्केल यांचे नेतृत्त्वच सर्व जर्मनीला तारू शकते, याचे याची सर्व जर्मन लोकांना जाण होती. मर्केल या अभ्यासू व म्हणूनच स्पष्ट वक्त्याही आहेत. त्यामुळेच त्यांचे भाषणही तसेच स्पष्ट असते. त्यामुळे त्यांना नाटकीय भाषणकला जमत नाही. त्यांनी जर्मन लोकांना थेट सांगितलं, की हा व्हायरस आपल्यात आहे, हे वास्तव टाळून चालणार नाही. तो आहे व आपल्या हातात एवढंच आहे, की त्याला थांबवायचं. कारण किमान पुढली दिड ते दोन वर्षे यावर लस नाहीये. त्यामुळे तुमच्यातील प्रत्येकाने किती काळजी घेऊन समाजाला व आम्हाला मदत करायचीय हे समजेल. मी तज्ञांशी बोलले आहे. त्यानुसार ६० ते ७० टक्के जर्मन लोकांना हा होऊ शकतो. पण भिऊ नका. बरेच बरे होतील व सद्य व्यवस्थेत आणखी बदल व सुधारणा करुन आपण जास्तीत जास्त लोकांना वाचवणार आहोत. महत्त्वाचे म्हणजे मर्केल यांनी त्यांच्या १५ वर्षाच्या काळात प्रथेप्रमाणे ख्रिसमसचे राष्ट्रसंबोधन सोडले तर इतकी संकंटं येऊनही त्यांनी  एकदाही टिव्हीवर येऊन भाषण केलं नव्हतं. पण त्यांनी आत्ता १० मिनीटांचे राष्ट्र संबोधन केले. कोरोनाबद्दल राष्ट्रसंदेश दिला आणि  त्यातही सांगितलं, की तुम्ही हे प्रकरण काळजीने घ्या. तुमच्यासाठी कुटुंबासाठी, सर्वांसाठी.  तसेच त्यांनी आरोग्य कर्मचारी ते सुपरमार्केटमध्ये या काळातही आपल्यासाठी काम करणाऱ्यांचे आभार मानले. शेवटी खेदही प्रकट केला, की या लॅाकडाऊनमुळे तुमच्या मौलिक लोकशाही हक्कांवर तात्पुरती बंदी आणावी लागली. त्या म्हणाल्या, की हे कधीच होता कामा नये. युध्दजन्य परिस्थितीत केलं तरी ते तात्पुरतं असावं.

मर्केल यांनी हा संदेश १८ मार्च ला दिला. मर्केल सरकारच्याच जर्मनीच्या आरोग्यमंत्र्यानी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ६० वर्षावरील व्यक्तींना न्युमोनियाची लस घेण्यास सांगितले होते. ज्या डॅाक्टरमार्फत लस घेण्यात आली, त्यांना नंतर कोरोनाचे निदान झाले. या कसोटीच्या काळात मर्केल यांनी २२ तारखेला पत्रकार परिषदेत २ व्यक्तींच्यावर लोकांना भेटण्यास स्वतःसाठी बंदी लागू करुन, क्वारंटाईनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. जर्मनीच्या अर्थव्यवस्थेला ऊभारी देण्याचे पॅकेज, इतर राष्ट्रप्रमुख व कॅबिनेट बैठका या त्यांनी फोन व व्हिडीओवर चालूच ठेवल्या होत्या. शेवटी ३ एप्रीलला त्या पुन्हा कामावर रुजु झाल्या. त्यांच्या या कृतीमधून आपसूकच कोरोनासंबंधी लोकांनी घ्यावयाच्या काळजीचे उदाहरणच दिसून आले.

एवढं होऊनही जर्मन सरकार व आरोग्य अधिकाऱ्यांनी जगाला सांगितले आहे, की तुम्ही आमच्या कमी मृत्यूदराकडे पाहू नका. या आजाराने येत्या काही महिन्यात आमची अवस्थासुध्दा इटलीसारखी होणार आहे. कारण हा आजार पुढील दिड वर्ष राहणार आहे. आमची १५% जनता ही वृध्द असून, या टप्प्यात तरुणांमध्ये  संक्रमणाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आम्हीही अशा बिंदूवर येऊ शकतो, जसं इटलीमध्ये आत्ता आहे. फक्त सध्या आम्हाला वेळ मिळाला व व्यवस्थापन यामुळे इतरांच्या तुलनेत आम्ही योग्य पातळीवर आहोत. पण येत्या महिन्यांमध्ये परिस्थिती बदलू शकते व आम्हाला वाईट परिस्थितीसाठी तयार राहायला हवे.

कोरोनानंतर जग सध्या आहे, तसे राहणार नाही. आपल्याला दर हजारी असणारं डॉक्टरांचे, आयसीयुचे, रुग्णालयांचे, बेड्सचे प्रमाण वाढवायला लागणार आहे. आपली आरोग्य व्यवस्था कमालीची बदलून टाकावी लागणार आहे. सरकारकडून लोकांना जी माहिती दिली जाते, त्याचे स्वरूप बदलावे लागणार असून, त्यामध्ये पारदर्शकता आणावी लागणार आहे.

विजय पाटील, हे दक्षिण कोरीयामध्ये मटेरीयल सायन्स या शाखेमध्ये पीएचडी करीत असून, आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: