सागर जिल्ह्यातील एका जैन मंदिरातील ही घटना आहे. मुलाचे वय ११ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो रडताना आणि ब्रह्मचाऱ्याला सोडून देण्याची विनंती करताना दिसत आहे. एससी/एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करताना पोलिसांनी सांगितले की, अल्पवयीन मुलाच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळल्या आहेत.
सागर: मध्य प्रदेशातील सागर शहरातील जैन मंदिरात भाविकांनी प्रसाद म्हणून दिलेले बदाम खाल्ल्याच्या संशयावरून एका ११ वर्षीय मुलाला दोरीने बांधून बेदम मारहाण करण्यात आली.
मोतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारिला येथील सिद्धायतन या जैन मंदिरात गुरुवारी ही घटना घडली असून त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली.
मोतीनगर पोलिस स्टेशनचे प्रभारी सतीश सिंह यांनी सांगितले, की करिला येथील एका व्यक्तीने आणि त्याच्या पीडित मुलाने ब्रह्मचारी राकेश जैन यांच्याविरोधात अर्ज केला आहे. या व्यक्तीचे म्हणणे आहे, की त्यांचा अल्पवयीन मुलगा मंदिराच्या गेटजवळ उभा होता, तेव्हा राकेशने त्याला पकडले आणि मारहाण केली. फिर्यादीनुसार, राकेशने त्याला मंदिराच्या आवारात दोरीने बांधले होते.
सिंह यांनी सांगितले, की या प्रकरणी राकेशवर प्राणघातक हल्ला आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हिडिओनुसार, मूल रडत आहे आणि मंदिरात येण्याबाबत स्पष्टीकरण देत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दिसत आहे, ज्याने पांढऱ्या रंगाचा अंगरखा आणि त्याच रंगाचे धोतर घातले आहे. तो दुसऱ्या मुलाला या मुलाला बांधून ठेवण्यास सांगत आहे, तर हे मूल रडत आहे.
व्हिडिओमध्ये आणखी काही लोक या मुलाला सोडण्यास सांगत आहेत पण आरोपी ब्रह्मचारी त्यांना तेथून निघून जाण्यास सांगत आहे.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, पुजारी राकेश जैन यांनी सांगितले, की त्यांना संशय आला की मुलाने प्रसादामधून बदाम घेतले होते आणि त्यांनी त्या अल्पवयीन मुलाला पळून जाऊ नये म्हणून झाडाला बांधले.
अल्पवयीन मुलाच्या शरीरावर जखमेच्या खुणा आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
COMMENTS