मुहर्रम किंवा मोहरम आणि पश्चिम भारतीय परंपरा

मुहर्रम किंवा मोहरम आणि पश्चिम भारतीय परंपरा

मोहरमच्या १० दिवसांमध्ये सार्वजनिक शोक साजरा केला जातो. काही तरुण मुले हातांमध्ये पंजे घेऊन आणि वाघाच्या रंगाचे कपडे घालून किंवा स्वतःची शरीरे तशी रंगवून घेऊन,किंवा तसे मुखवटे घालून थोडक्यात वाघाचे सोंग घेऊन रस्त्यांवर फिरत राहतात. मराठीत तर मोहरमची सोंगे असा वाक्प्रचारही आहे.

भारतीय उपखंडात शिया आणि सुन्नी असे दोन्ही मुसलमान उपपंथ आढळतात. यामध्ये शिया मुसलमान हे कमी कट्टर असतात आणि सुन्नी मुसलमान हे जास्त कट्टर असतात असा नुसताच समज नाही तर वास्तवातही तसेच आढळते. नुकताच हिजरी किंवा मुसलमान वर्षाचा पहिला महिना मुहर्रम सुरू झाला.

या महिन्यातला १० वा दिवस आशुरा म्हणून सर्वत्र साजरा होतो. इराकमधील करबला या स्थळी पैगंबरांचे नातू हजरत हुसैन यांना अत्यंत अन्यायपूर्वक अवस्थेत मारण्यात आले. मरताना त्यांना पाणीसुद्धा तहान भागवण्यासाठी मिळू शकले नाही. त्यामुळे शिया मुसलमान हा दिवस मातमचा म्हणजेच सार्वजनिक शोक प्रदर्शनाचा मानतात. उत्तर भारतात बऱ्यापैकी श्रीमंती किंवा संपन्नता असल्यामुळे या दिवसाआधी कबरींची जी प्रतिके बनवण्यात येतात त्यांना ताज़िये म्हणतात. तर दक्षिण आणि पश्चिम भारतात यांना ताबूत म्हणतात.

एका मुसलमान मित्राने या मुहर्रममध्ये असणारे वाघाच्या जर्द पिवळ्या रंगाचे किंवा वाघाचे जे अस्तित्व महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर भागात किंवा कर्नाटकातील धारवाड, बेळगाव, हुबळी, म्हैसूर परिसरात आढळते त्या विषयी विचारले आणि मग या लेखमालेविषयी काही सुचले.

जत्रा, जत्रेनिमित्त भरणारे बाजार, या निमित्ताने होणारे आणि आयोजित केले जाणारे खेळ आणि सादरीकरणाच्या कला यांचे प्रदर्शन, मिरवणुका, वेशभूषा, केशभूषा आणि रंगभूषा यांचे विषयीचे संकेत आणि नियम या सर्व गोष्टी मानवी संस्कृतीच्या इतिहासात प्रागैतिहासिक काळापासून आढळतात. या सणांमध्ये कुठल्या ना कुठल्या निमित्ताने ‘मास हिस्टेरिया’चे प्रदर्शन घडते. या ‘मास हिस्टेरिया’मध्ये बहुतांश तरुणाई सामील असते.

प्रचलित आणि प्रस्थापित कुठलाही उन्नत अवस्थेतील धर्म अशा ‘मास हिस्टेरिया’ला प्रोत्साहन आणि अनुमती देत नाही. तरीही वर्षातून एकदा कधीतरी होणाऱ्या अशा मास हिस्टेरियाच्या प्रदर्शनाला मूक संमती किंवा अनुमती देताना दिसतात. अशा ‘मास हिस्टेरिया’ची आधुनिक मनोविज्ञानांप्रमाणे विचार करणे हा आपला विषय नाही. परंतु अशा सणांचे आणि ‘मास हिस्टेरिया’च्या प्रदर्शनाचे प्रागैतिहासिक काळापासूनचे अस्तित्व ऐतिहासिक आणि काही पुरातत्त्वीय पुराव्यांनी सिद्ध करता येते.

जगात जिथे जिथे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे तीन ऋतू विशेष दाखवता येतात तिथे हिवाळ्याच्या शेवटी उन्हाळा येतो. सार्वजनिक सणांमध्ये जी सामाजिक, सामूहिक स्मृती जतन केली जाते, तिचाही विचार आणि अभ्यास सध्याचे अभ्यासक करीत असतात.

सर्वसाधारणपणे वार्षिक ऋतुचक्रात हिवाळा हा अंताचा, विलयाचा आणि उन्हाळा हा नवसृजनाचा ऋतू मानले जातात. उत्तर गोलार्धात ग्रीकोरोमन, सेमिटिक आणि दक्षिण आशियायी समाजांमध्ये नवीन वर्षाची सुरुवात ही या नवसर्जनापासून मानली जाते. त्यामुळे माणसांचे नवीन वर्ष हे मार्च महिन्यात सुरू होत असे. सेमिटिक लोकांना सौर आणि चांद्र वर्षाचा मेळ कसा घालावा? हे समजल्यापासून सेमिटिक वर्षाचा पहिला महिना मुहर्रम हा मार्च महिन्याच्या सुमाराला येत असे. या महिन्याच्या १०व्या दिवसाला यहुदी आणि मुसलमान आशुरा असे म्हणतात. या दिवशी ईश्वराने पहिला माणूस ऍडम किंवा आदम निर्माण केला असे मानले जाते.

ग्रीकांचा, ख्रिश्चनांचा ईस्टर, ज्यू आणि मुसलमानांचा आशुरा, भारतीय उपखंडातील बैसाखी, महाशिवरात्री किंवा होळी वगैरे सण हे अशा नवसर्जनाचे स्वागत करणारे सण होत. आशुरा साजरी करण्याची परंपरा इस्लामपूर्व होती. इस्लामने सौर वर्ष नाकारून फक्त चांद्र वर्षाला अनुमती दिल्यामुळे मुहर्रम सध्या दरवर्षी मार्च महिन्यात येत नाही. भारतीय उपखंडात मुहर्रममध्ये ताज़िये (उत्तर भारतात) किंवा ताबूत (दक्षिण भारतात) बनवून मुहर्रम साजरा केला जातो. योगायोग म्हणजे पैगंबरांचे नातू हजरत हुसैन यांचा मृत्यू आशुराच्याच दिवशी झाला होता. इराकमधील करबला येथे हजरत हुसैन यांच्यावर अतिशय अन्यायकारक युद्ध लादण्यात आले. कुठलीही संस्कृती मान्य करणार नाही असे युद्ध होते ते. तहान लागलेली असताना पाणीही मिळू नये इतक्या अन्यायकारक अवस्थेत हजरत हुसैन यांचा मृत्यू झाला. ताज़िये आणि ताबूत हे या मृत्यूचे प्रतीक असणाऱ्या कबरींचे प्रतीक असतात. या १० दिवसांमध्ये सार्वजनिक शोक साजरा केला जातो. काही तरुण मुले हातांमध्ये पंजे घेऊन आणि वाघाच्या रंगाचे कपडे घालून किंवा स्वतःची शरीरे तशी रंगवून घेऊन,किंवा तसे मुखवटे घालून थोडक्यात वाघाचे सोंग घेऊन रस्त्यांवर फिरत राहतात. मराठीत तर मोहरमची सोंगे असा वाक्प्रचारही आहे.

शिया मुसलमानांची पाच पंजतन ही संकल्पना समजावून घेऊ. पाच पंजतन म्हणजे पाच पवित्र आत्मे. हे पाच जण म्हणजे स्वतः पैगंबर, हजरत अली, हजरत फातिमा, हजरत हसन आणि हजरत हुसैन. पैकी हजरत अली हे पैगंबरांचे सख्खे चुलतभाऊ आणि जावई. हजरत फातिमा या पैगंबरांच्या ज्या चार मुली प्रौढावस्थेपर्यंत जगल्या त्यांच्यापैकी सगळ्यात लहान मुलगी. हसन आणि हुसैन हे दोघेजण या दांपत्याचे मुलगे. पैगंबरांचे एकही पुरुष अपत्य प्रौढावस्थेपर्यंत जगले नाही. त्यामुळे खरे तर अरबी पितृसत्ताक वारसा पुढे कुणालाही मिळालाच नसता एवढे सध्या आपण लक्षात ठेवूयात.

कुरैश किंवा हाशिम या कर्तबगार पूर्वजांमुळे पैगंबरांचे घराणे कुरैशी किंवा हाशमी म्हणून ओळखले जाते. कुरैश आणि हाशिम हे प्रेषित इस्माईल यांचे थेट वंशज समजले जातात. प्रेषित इसहाक आणि इस्माईल हे दोघे प्रेषित इब्राहिम यांचे मुलगे. पैकी इसहाक़ हे पत्नी साराचे. तर इस्माईल हे दुसरी पत्नी हाजिराचे. ही सर्व नावे सर्व सेमिटिक धर्मग्रंथांमध्ये म्हणजे बायबलचा नवा करार, जुना करार आणि कुरआनमध्येही आहेत.

पैगंबरांच्या कुटुंबामध्ये हजरत अली आणि हजरत फातिमा हे दोघेजण पैगंबरांचे सगळ्यात लाडके होते हे निर्विवाद. परंतु स्वतःचा समाज-राजकीय वारसही पैगंबरांनी निवडलेला नव्हता हे पण निर्विवाद. सुरुवातीला फक्त मक्का गावापुरता असणारा इस्लाम पैगंबरांच्या हयातीतच सरळ्या अरबस्तानाचा धर्म बनला होता हे सत्य पण निर्विवाद. पैगंबरांनी स्वतःच्या वारसाबाबत कुठलीही इच्छा स्पष्टपणे व्यक्त केली होती असे म्हणता येत नाही. परंतु मुसलमानांचा पुढला राज्यप्रमुख कुणी मक्केकर आणि कुरेशीच असू शकतो अशा सूचना पैगंबरांनी निश्चित दिल्या असाव्यात.

पैगंबरांचा धार्मिक वारसा निर्विवादपणे सगळ्यांना मान्य असला तरी सामाजिक किंवा राजकीय वारसा मात्र सगळ्या मुसलमानांना मान्य होता असे म्हणवत नाही. पैगंबरांच्या मृत्यूनंतर ज्या घटना घडत गेल्या त्या जर इतिहासात नीट बघितल्या तर हजरत अली यांनी स्वतःचा राजकीय पराभव मनोमन मान्य केला होता असे म्हणता येते.

सुदैवाने पैगंबरांच्या तीन राजकीय वारसांच्या मृत्यूनंतर हजरत अली हे हयात होते. त्यामुळे हजरत अली हे मुसलमानांचे पैगंबरांनतरचे चौथे राजकीय वारस बनले. मानवी मन कसा स्वतःच्या फायद्याचा विचार करते? याचा इतिहास जगभर जसा सापडतो तसाच तो सुन्नी आणि शिया इतिहासात सापडतो.

हजरत हसन यांचा मृत्यू करबलाच्या युद्धाआधी घडला होता. त्यांच्या मृत्यूची दोन कारणे सापडतात. खरा ऐतिहासिक उल्लेख आढळत नाही. एका परंपरेप्रमाणे त्यांना वाघाने मारले तर एका परंपरेप्रमाणे त्यांच्या ५० व्या पत्नीला त्यांनी तलाक दिल्यानंतर तिने विषप्रयोगाने मारले अशी आहे.

हजरत हुसैन यांनी स्वतःची मुलगी हजरत क़ासिम म्हणजे हजरत हसन यांचा मुलगा यांना दिली होती. भारतातील मुहर्रममध्ये ७ व्या दिवशी या विवाहाचे स्मरण केले जाते. ‘है दोस्त दूल्हा’ अशा आरोळ्या दिल्या जातात. ‘है दोस्त दूल्हा’ या घोषणेचे मराठीत ‘हैदोसधुल्ला’ असे रूपांतर झालेले सहज दिसून येते. ‘हैदोसधुल्ला’ या मराठी शब्दानेच लक्षात येते की मुहर्रमच्या सवाऱ्यांमध्ये काय तऱ्हेचा ‘मास हिस्टेरिया’ आढळत असेल?

शियांचे काही समज हे भारतातल्या तंत्रपंथीयांसारखे गूढ आहेत. भारतातल्या इस्लामच्या प्रवासात आणि इतिहासात एक महत्त्वाचा फरक म्हणजे उत्तर भारतीय सर्व राजवटी या काही मोजके अपवाद वगळता सुन्नी. तर दक्षिण भारतातील सुरुवातीच्या सगळ्या राजवटी शिया! भारतातल्या सर्वसामान्य लोकांना गूढवादाचे किती आकर्षण आहे? हे जर समजून घेतले तर दक्षिणेतल्या या शिया राजवटींचा व्यवस्थित विचार करता येईल. सगळे मुघल सुरूवातीपासून सुन्नी. असे असतानाही इतिहासाचा निरपेक्ष अभ्यासक त्यांना सेक्युलर किंवा धर्मनिरपेक्ष म्हणतो त्याचे कारण त्यांनी भारतातील इस्लामी धर्ममताव्यतिरिक्त इतर सर्व हिंदू अथवा मुसलमान उपपंथियांचे सहअस्तित्व मान्य करून राज्य केले हे आहे.

वाघ हा प्राणी शैव धर्ममतात शिवाचा प्रतीक मानलेला आहे. वाघाचे कातडे किंवा वाघाच्या कातड्याच्या कपड्यांचे महत्त्व शैव पंथात सगळीकडे दिसते. मृत्यू आणि सृजनाचा प्रतीक असणाऱ्या वाघाला भारतीय संस्कृती दुर्गेचे वाहन मानते. नवनिर्माणाचा रंग हा वाघाचा सतेज रंग मानला जातो. मुहर्रमच्या सोंगांमध्ये फिरणारे वाघ हे पश्चिम भारतात सगळीकडे बहुतकरून कनिष्ठ जातीय हिंदू तरुण असतात. भांग आणि तत्सम मादक द्रव्यांचा वापर मुक्तपणाने केला जातो. एक काळ असा होता की, मोहरमची ही सोंगे फिरू लागली की, प्रतिष्ठित माणसे स्वतःच्या घराचे दरवाजे बंद करून घरातच राहात असत. कारण जर वाघाने मारले तर त्याची तक्रार कुठेही करता येत नाही!

भारतात पसरलेला इस्लाम हा असा अनेक अंगांनी पसरलेला आहे. हे समजावे म्हणून मोहरमबद्दल, त्या विषयी असणाऱ्या हिंदू आणि मुसलमानांच्या समजाबद्दल हे सगळे लिहिले. ऑर्थोडॉक्स इस्लाम कुठल्याही सार्वजनिक शोकाला म्हणजेच मातमला कुठलीही मान्यता देत नाही. जशी होळीत जी बोंबाबोंब, शिवीगाळ, हाणामारी होते तिला ऑर्थोडॉक्स हिंदू धर्म मान्यता देत नाही.

राजन साने, हिंदू-मुस्लिम संवादाचे अभ्यासक आहेत.

COMMENTS