मुसलमान परके हा लोकप्रिय समज

मुसलमान परके हा लोकप्रिय समज

हिंदू-मुस्लिम संवाद - धार्मिक अस्मितांना फुलवून आणि गोंजारून स्वतःचा वैध आणि लोकशाही मार्गांनी राजकीय फायदा करून घेण्याच्या आजच्या काळात हिंदू-मुस्लिम-संवाद अधोरेखित करून सांगणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी ही लेखमाला..

‘तुम्ही सेक्युलर नाही?’
सगळं बदलेल पण भारत हिंदू राष्ट्रच – सरसंघचालक
आठशे वर्षांच्या संवादाची पार्श्वभूमी

भारतात मागील तीस वर्षांत तथाकथित हिंदुत्ववादी राजकीय तत्त्वज्ञान असणाऱ्या राजकीय पक्षाने राजकारणात खूप मोठी आगेकूच केली आहे. २०१४ मध्ये तीस वर्षांनी सर्वप्रथम कुणाही एका राजकीय पक्षाला लोकसभेत निर्विवाद बहुमत मिळाले. या वर्षीच्या २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये परत हाच म्हणजे भारतीय जनता पक्ष परत एकदा मोठ्या बहुमताने निवडून आला आहे. निदान सार्वजनिक मंचांवर तरी, भारतीय स्वातंत्र्यानंतर शाबूत असणारी धर्मनिरपेक्षता, पुढेही तशीच राहील, अशी शाश्वती आज घडणाऱ्या घटना पाहून वाटत नाही.

पोटापाण्याच्या निमित्ताने मुस्लिम बहुल समुदायात, समाजात वावरण्याची संधी मिळाली. त्यामुळे मुसलमान, इस्लाम, अरबस्तान, इराण, अरबी, फारशी, मुसलमानांची दैनंदिन राहणी, बुरखा पद्धती, तलाक पद्धती, मुसलमानांचा आक्रमकपणा अशा अनेक गैरसमज निर्माण करणाऱ्या मिथकांचा उलगडा होऊ लागला. पुण्यातील शनिवार पेठेत ब्राह्मणी वातावरणात बालपण आणि कॉलेजचे शिक्षण घेणाऱ्या माझ्यासाठी या मिथकांचा उलगडा धक्कादायक होता. इस्लाम आणि इस्लामी कायदा तसेच इस्लामी राज्यव्यवस्था या विषयाचा थोडा अभ्यास झाला. ढोबळमानाने इसवी सनाच्या अकराव्या शतकापासून पुढे भारतात मुसलमानांची संख्या वाढायला लागली असे दिसते. आजच्या अफगाणिस्तानचा बराच भाग, संपूर्ण पाकिस्तान हे भूप्रदेशही ऐतिहासिक काळापासून अखंड भारताचे भाग मानले जातात. इस्लाम आणि मुसलमानांविषयी ठाऊक असणाऱ्या आणि एकाही मुसलमानाशी निकटचा संबंध किंवा मैत्री नसताना जोपासले गेलेल्या समज आणि गैरसमजांना प्रत्यक्ष वावरात तडा गेला. भारतीय इतिहासाचा हिंदू-मुस्लिम-संवाद या पैलूतून विचार करीत असताना असे लक्षात आले की, भारतीय राज्यघटनेचे, धर्मनिरपेक्षता हे एक व्यवच्छेदक लक्षण असले तर, हा संवाद शक्य तिथे शक्य तसा मांडायला हवा.

इसवीसनाचे अकरावे, बारावे आणि तेरावे शतक प्रामुख्याने उत्तरेत आणि त्या नंतरची दोन शतके दक्षिणेत असे एकूण सुमारे पाचशे वर्षे पश्चिमेकडून येणाऱ्या मुसलमानांचे आक्रमण होत राहिले. पाचशे वर्षे म्हणजे सुमारे वीस पिढ्या. पश्चिमेकडून होणारे हे आक्रमण सुरुवातीला जरी पूर्वेकडे असले तरी, नंतरच्या दोन शतकांमध्ये भारतात दक्षिणेकडे पसरले. महाराष्ट्रासह दक्षिणेतल्या चार राज्यांसाठी हे आक्रमण वायव्य दिशेकडून होते. उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात या पाच-सहाशे वर्षांत एकही एतद्देशीय प्रबळ सत्ता नव्हती किंवा निर्माण झाली नाही, जिने या मुसलमानी आक्रमणाचा पाडाव केला किंवा करायला हवा होता. महाराष्ट्रातले पहिले मुसलमानी आक्रमण हे ज्ञानेश्वरांनंतर म्हणजे चौदाव्या शतकाच्या सुरूवातीचे आहे. देवगिरी राज्य.

हिंदू आणि मुसलमानांपैकी आपल्या अवतीभवती असणारी, वावरणारी सामान्य माणसे जर तपासली तर असे लक्षात येते की, या प्रत्येकाला खूप लहानपणापासून स्वतःची एक धार्मिक ओळख जाणीवपूर्वक देण्यात आली आहे. तसेच हिंदू आणि मुसलमान या दोन स्वतंत्र वैयक्तिक आणि सामाजिक ओळखी जाणीवपूर्वक विरोधी किंवा विसंवादी म्हणून बिंबवण्यात आल्या आहेत. दोन्ही धर्मियांनी हे हेतुपुरस्सर केले आहे. वास्तविकता जर तपासली तर असे लक्षात येईल की, सुरुवातीचा तीन-चारशे वर्षांचा काळ वगळता भारतात राज्य करणाऱ्या कुणाही राज्यकर्त्याला समाजाचे घटक म्हणून हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये सातत्याने संवाद कसा घडत राहील, या कडे लक्ष द्यावे लागले आहे.

भौगोलिकदृष्ट्या भारत हा विशाल आणि उपखंडात्मक देश आहे. संपूर्ण भारतात पसरलेल्या हिंदू आणि मुसलमानांचे जर अवलोकन मागील हजार वर्षांत निर्माण झालेल्या आणि भारतीय समाजात अस्तित्वात असलेल्या हिंदू-मुस्लिम-संवादाशिवाय हे शक्य नाही, असे लक्षात येईल. धार्मिक अस्मितांना फुलवून आणि गोंजारून स्वतःचा वैध आणि लोकशाही मार्गांनी राजकीय फायदा करून घेण्याच्या आजच्या काळात हिंदू-मुस्लिम-संवाद अधोरेखित करून सांगणे अतिशय गरजेचे आहे. मुसलमान या देशात परके आहेत. या रूढ आणि खोट्या मिथकातील तथ्यांश तपासून पाहूयात.

रूढ आणि खोट्या मिथकातील तथ्यांश

भारतात दस्तावेजीकरण म्हणजेच डॉक्युमेंटेशन ब्रिटिश काळाआधी फारसे आढळत नाही. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातील सुरुवातीचा जर आपण भारतीय इतिहास तपासला तर असे लक्षात येते की, हा इतिहास बरेच वेळा लोकप्रिय समज आणि विश्वास यांवर आधारित आहे. या इतिहासात भारतातले धार्मिक वैविध्य दिसते. प्रांतीय वैविध्य दिसते. भाषिक वैविध्य दिसते. अतिशय लोकप्रिय असा आर्य (उत्तर) आणि द्रवीड (दक्षिण) असा संघर्ष दिसतो. खूप मोठे सांस्कृतिक वैविध्य दिसते. याहून अतिशय वेगळा आणि अगदी उघड असणारा हिंदू आणि मुसलमान हा संघर्ष दिसतो. काळाच्या तुलनेने हा संघर्ष सगळ्यात नवीन असला तरी तो ठळकपणे दिसतो. या सगळ्या समजांना पुरून उरते भारतातली जातीव्यवस्था! एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातील बहुतेक अभ्यासकांनी या कोड्यांचा आपापल्या परीने उलगडा करण्याचा प्रयत्न केलेला आढळतो. आधुनिक विज्ञानांनी विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात खूप मोठी झेप घेतली. ही झेप जशी मूलभूत विज्ञानांमध्ये होती तशीच मानव्यशास्त्रांमध्येही होती.

मागील तीस-पस्तीस वर्षांत अनुवंशशास्त्रात (जेनेटिक्स) पॉप्युलेशन जेनेटिक्स अशा नवीन उपविषयाची भर पडली. ह्यूमन जीनोम प्रकल्प बहुतेक जणांना ठाऊक असेल. या अभ्यासामुळे संपूर्ण जगभर इतिहास विषयक अनेक कोडी उलगडण्यास मदत केली. भारतात मुसलमान परके या भारतातील सगळ्यात मोठ्या लोकप्रिय, समजाला या अभ्यासाने वैज्ञानिक पुराव्यानिशी समूळ छेद दिला. सुप्रसिद्ध पत्रकार, संपादक आणि लेखक टोनी जोसेफ यांचा डिसेंबर २०१८ मध्ये एक ग्रंथ प्रसिद्ध झाला. ग्रंथाचे नाव ‘Early Indians : The Story of our Ancestors and Where We Came From’, असे आहे. या या ग्रंथात आजच्या भारतातील लोकांचे पूर्वज आणि आपण भारतीय भारतात आलो कुठून या विषयीची अद्ययावत माहिती मांडलेली आहे.

मध्य आणि दक्षिण आशियातील लोकांच्या अनुवंशाविषयी सुप्रसिद्ध अनुवंशशास्त्रज्ञ डेव्हिड राईश यांनी जो जागतिक प्रकल्प राबविला त्या अभ्यासावर हा ग्रंथ आधारित आहे. मुख्य म्हणजे हा अभ्यास पूर्णपणे विज्ञानाधारित आहे आणि यामध्ये प्राचीन मानवी डीएनए वापरले गेले आहे.

टोनी जोसेफ यांनी त्यांच्या ग्रंथात भारतातल्या आजच्या लोकसंख्येच्या जडणघडणीविषयी ‘पिझ्झा’ हे रूपक खूप छान वापरले आहे.

जर ‘पिझ्झा’ हे सध्याच्या भारतीयांचे प्रारूप मानले तर या पिझ्झ्याचा बेस म्हणजे प्राचीन भारतीय होत. हे साधारणपणे दहा ते बारा हजार वर्षांपूर्वीचे आहेत. असे भारतीय भारतात सर्वत्र समान आढळतात. मग ते भारतातल्या कुठल्याही राज्यात राहात असोत. कुठल्याही जातीधर्माचे असोत वा कुठलीही भाषा बोलणारे असोत.

या पिझ्झा बेसवरती येते सॉस. जे संपूर्ण पिझ्झा बेसवर सर्वत्र एकसमान पसरलेले आहे. हे सॉस हडाप्पा लोकांचे म्हणजे सिंधू संस्कृतीच्या लोकांचे आहे. हडाप्पा लोक भारतात साधारण सहा ते चार हजार वर्षांपूर्वी वावरले. हे लोक संपूर्ण भारतात दक्षिणोत्तर सुपीक जमिनीच्या शोधात फिरले आणि स्थानिकांबरोबर पसरले. ही संस्कृती साधारण चार हजार वर्षांपूर्वी अस्ताला गेली.

भारतात या नंतर स्थलांतरित झालेले लोक भारताच्या पिझ्झा बेस आणि सॉसवर पसरलेले चीझ, ढोबळी मिरची, टोमॅटो आणि इतर भाज्या होत. हे स्थलांतर सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचे आहे. ही टॉपिंग्ज पिझ्झा बेस आणि सॉसप्रमाणे एकसारखे पसरलेली नाहीत.भारतीय पिझ्झा जर छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापला तर प्रत्येक तुकड्यावर असणाऱ्या या टॉपिंग्जपैकी एकाचे प्रमाण कमी किंवा जास्त सापडते.

याच पुस्तकात टोनी जोसेफ यांनी भारतीय जातीव्यवस्थेचाही वैज्ञानिक उलगडा केला आहे. भारतीय जातीव्यवस्था ही तुलनेने खूप अर्वाचीन म्हणजे सुमारे दोन हजार वर्षे जुनी आहे. जेव्हा अनुवांशिक स्थलांतरे थांबलेली आढळतात. दोन हजार वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाहांना (एन्डोगॅमी) बंदी घालण्यात आली. ही बंदी राजकीय, सामाजिक तसेच धार्मिकही होती. आर्यांच्या भारतातल्या आगमनापासून भारतात जातीव्यवस्था सुरू झाली या लोकप्रिय समजाला आधुनिक वंशशास्त्र किंवा अनुवंशशास्त्रातले निष्कर्ष बळकटी न देता उलट असा गैरसमज खोटा ठरवतात. भारतातले शेवटचे अनुवंशशास्त्रीय मानवी स्थलांतर हे सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी घडले.

भारताच्या मुख्य भूमीवर असणाऱ्या मुसलमानांना एक हजारहून जास्त वर्षांचा इतिहास नाही. भारतातले मुसलमान हे अनुवंशशास्त्रानुसार वेगळे दाखवता येत नाहीत. जसे मानवी स्थलांतराचे चार विभिन्न टप्पे भारतात दाखवता येतात तसे ते मुसलमानांविषयी दाखवता येत नाहीत. असे असतानाही भारतात मुसलमान परके हा एक लोकप्रिय समज आहे. या समजाला गैरसमज ठरविण्यासाठी याच समजाचे काही पैलू पुढच्या लेखात पाहूयात.

राजन साने, हिंदू-मुस्लिम संबंधांचे अभ्यासक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0