सूर लागावा, सौंदर्य खुलावे

सूर लागावा, सौंदर्य खुलावे

राज्याच्या वतीने दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालयाची घोषणा होणे आणि पर्यावरणप्रेमी कलावंतांनी मिळून मुंबईतल्या जैवविविधतेचा नकाशा तयार करणे, या दोन घटनांमधून चहूबाजूंकडे दिसणाऱ्या नैराश्य आणि हतबलेऐवजी आश्वासक सूर आणि सौंदर्य खुणावते आहे...

‘आवश्यक सर्व झाडे कापली’
#SaveAareyforest संतप्त झाला सोशल मीडिया
आरे कॉलनी आंदोलन सुरूच

एका दिशेला, शरीराची विटंबना झालेल्या हाथरस (उ.प्र.) येथील बलात्कारपीडित दलितकन्येच्या मृत्युने शोषितांचा वर्ग सून्न पडलेला आहे. दुसऱ्या दिशेला सुशांतसिंग राजपूत कुटुंबियांच्या आततायी वकिलाचा सीबीआयच्या नावे आकांत चाललेला आहे. तिसऱ्या दिशेला, कृषी विधेयकावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये पेटवापेटवी चाललेली आहे. चौथ्या दिशेला गिधाडगिरी करणाऱ्या मीडियाला मिनिट टू मिनिट खबरी पोहोचवून समाजस्वास्थ्याचा खुळखुळा करण्यास मोलाचा हातभार लावणाऱ्या तथाकथित छळवादी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यावर ‘वुई आर प्रोफेशन एजन्सी’ म्हणण्याची नामुष्की ओढवली आहे.

चहुदिशांनी नैराश्य वाढवणाऱ्या घटनांमुळे जगात बरे काही घडते आहे की नाही, या शंकेने लोकांना ग्रासले असताना दोन बातम्यांनी उमेद-उत्साह वाढवावा, हा कुलुपबंदीच्या काळातला मोठाच योग म्हणायला हवा.

पैकी एक बातमी, राजकीय आणि आरोग्य आणीबाणीशी झुंजणाऱ्या राज्य शासनाने आपल्या पहिल्या संगीत महाविद्यालयास मास्टर दीनानाथ मंगेशकरांचे नाव देण्याच्या केलेल्या घोषणेसंदर्भातील आहे. तर दुसरी बातमी एका पर्यावरणप्रेमी तरुणाने मुंबई शहराच्या जैवविविधतेची जाणीव करून देणारा नकाशा प्रसिद्ध केल्याची आहे. म्हणजे एक बातमी आपल्याकडे कशाची कमतरता आहे, हे दर्शवणारी तर दुसरी मुंबईच्या अंगणात किती समृद्धी दडलेली आहे, हे सांगणारी आहे. संगीतसूर आणि निसर्ग सौंदर्याचा हा मिलाफ हुरुप वाढवणारा आहे.

महाराष्ट्राला संगीताचीही थोर परंपरा आहे आणि संगीत विद्यालयांचीही. मग अशावेळी गानसम्राज्ञी लता मंगेशकरांच्या वाढदिवशी शासनाच्यावतीने झालेल्या या घोषणेत नवीन काय आहे ? की ही केवळ मंगेशकरांचा मान राखण्यापुरती प्रतिकात्मकता म्हणता येईल, अशी केवळ चमचमीत घोषणा आहे?

बातमीतल्या उपलब्ध तपशीलावरून तरी तसे वाटत नाही. कारण, इथे शासनाचा इरादा आंतरराष्ट्रीय दर्जाचे देशातले पहिले महाविद्यालय सुरू करण्याचा दिसतो आहे. या साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण-पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतल्याचे नमूद आहे. महाविद्यालयात मंगेशकरांच्या मार्गदर्शनाखाली जगात नाव कोरणारे नव्या पिढीतले गायक-वादक घडतील. हासुद्धा हेतू उदात्त आहे.

सुदैवाची गोष्ट म्हणजे, ठाकरे हे असे विरळा मुख्यमंत्री आहेत, जे स्वतः छायाचित्रण कलेत पारंगत तर आहेतच, पण ज्यांना लेखन-कलेचा समृद्ध असा कौटुंबिक वारसादेखील लाभलेला आहे. त्यामुळे संगीत महाविद्यालयापुरते न थांबता, शासनाच्या पातळीवर चित्र-शिल्प, व्यंगचित्र आदी क्षेत्रातल्या दिग्गजांना सोबतीला घेऊन या कलांच्या जतन-संवर्धनासाठी तळागाळातल्यांपासून सगळ्यांना सामावून घेणारी कलादालने सुरू करण्याचाही विचार होण्यास हरकत नसावी. त्यातही बाळासाहेबांची पहिली ओळख ठरलेल्या व्यंगचित्र कलेचे स्थानिक ते जागतिक असा पट असलेले कायमस्वरुपी कलादालन सुरू करण्याचा विचार तर नक्कीच व्हायला हवा. जिथे एका छताखाली कलावंत तयार होतील, आपल्या कलेचे दर्शन घडवत राहतील. शेवटी, अमेरिकेकडे सर्वाधिक अणुबॉम्ब आहेत, लष्करी ताकद सगळ्यात मोठी आहे, म्हणून ती महासत्ता नाहीये, हे महासत्तापण तिला संबंध जग कवेत घेणाऱ्या विविध विषयांवरच्या म्युझियममुळे, सर्वोच्च दर्जांच्या संशोधन केंद्रांमुळे, मुक्तपणे कलेस बहरू देणाऱ्या कलासंस्थांमुळे आलेले आहे, हे तरी विसरून कसे चालेल.

नियोजित मा. दीनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालयाचा दर्जा आंतरराष्ट्रीय ठेवण्याचा इरादा कौतुकास्पद आहेच, पण दर्जाप्रमाणेच या महाविद्यालयाने प्रांत आणि देशाच्या सीमारेषा ओलांडून शास्त्रीय संगीताचा आधार असलेल्या लोकसंगीतापासून आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या विविध समूहांच्या संगीतकलेचादेखील त्यात समावेश करणे अपेक्षित आहे.

संगीतकार अजय-अतुल यांच्या सैराट सिनेमातले ‘झिंगाट’ गाणे गावून आफ्रिकी देशातले कलंदर कलावंत आनंद लुटत असतील, तर या महाविद्यालयाने आफ्रिकी कलावंतांच्या गीत-संगीताला महाविद्यालयात स्थान देण्यास हरकत नसावी. तसेही हिंदुस्थानी असो वा कर्नाटकी आपले शास्त्रीय संगीत जगभर पोहोचले, आता जगाचेही संगीत या महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे. हे घडले तरच आंतरराष्ट्रीय दर्जाला काही अर्थ असेल. तसेही तंत्रसामग्रीने आंतरराष्ट्रीय, रंगरुपाने आंतरराष्ट्रीय एवढा संकुचित विचार ठाकरे-मंगेशकर यांनी या महाविद्यालयाची कल्पना करताना केला नसणार..

संगीत हा असा समुद्र आहे, जो अथांग-अमर्याद आहे. त्याची खोली आणि व्याप्ती कल्पनातीत आहे. तुम्ही त्यात जितके खोलवर जाल, तितके तुमच्या हाती संगीताचे मोती लागतील, हे आपल्याकडे दिग्गजांच्या बोलण्यातून वारंवार डोकावत असते. अर्थातच, हा समुद्र केवळ शास्त्रीय संगीतापुरता मर्यादित नाही किंवा एकमेव नाही. प्रत्येक समूह आणि देशागणिक असंख्य संगीत- समुद्र जगभर पसरलेले आहेत. त्या समुद्रांच्या पाण्यात शिरण्याचे भान हे महाविद्यालय राखेल. जेवढे वैविध्यपूर्ण संगीत आपलेसे होत जाईल, आपल्या संगीताला श्रीमंती चढत जाईल. एवढे जमले तर लता मंगेशकरांच्या कार्यकर्तृत्वाला याहून मोठा मानाचा मुजरा नसेल.

संस्कृतीच्या समृद्धीसाठी जितके कलांचे वैविध्यपूर्ण असणे महत्त्वाचे, तसेच पर्यावरणाच्या समृद्धीसाठी राहत्या घराच्या आसपासच्या जैवविविधतेचे अस्तित्व टिकून असणे महत्वाचे. परंतु गेल्या काही वर्षात पर्यावरण निरक्षरतेत आपण जगाला मागे टाकत असल्याने जैवविविधतेचे भान ही आपल्याकडे खूपच दूरच गोष्ट राहिली आहे. विशेषतः मुंबईसारख्या काँक्रिटीकरणाचा कळस गाठलेल्या महानगरात राहणारे लोक वर्षानुवर्षे रात्रीच्या आकाशातला साधा चंद्रदेखील पाहात नाही, वा तशी त्यांना फुरसतही मिळत नाही, तिथे आपल्या अंगणात काय श्रीमंती दडलेली वा घटत चाललीय, यासंबंधातली महानगरी लोकांची जाण यथातथाच राहत आहे. हे अजाणतेपण घालवणारा बायोडायवर्सिटी मॅप अर्थात मुंबईचा जैवविविधता दर्शवणारा नकाशा पर्यावरणासंदर्भात कार्य करणाऱ्या ‘मिनिस्ट्री ऑफ मुंबईज् मॅजिक’ या संस्थेतर्फे प्रकाशित करण्यात आला आहे. ‘बायोडायवर्सिटी बाय दी बे’ या उपक्रमांतर्गत कलावंत-व्यंगचित्रकार रोहन चक्रवर्ती यांनी रेखाटलेल्या या नकाशात मुंबई परिसरात वास करून असलेल्या वैविध्यपूर्ण प्राणी-पक्षी आणि वनस्पतींवर नव्याने प्रकाशझोत टाकण्यात आलेला आहे. यातून आपल्या खजिन्यात काय मौल्यवान गोष्टी शिल्लक आहेत, हे तर कळतेच पण काय निसटून चाललेय, याचेही आकलन होत आहे.

या नकाशावर परिचित-अपरिचित स्थळांसोबतच ९० हून अधिक जातींच्या प्राणी-पक्ष्यांची नोंद आहे. त्यात जशी सर्वपरिचित खारफुटी ही पाणवनस्पती आणि स्थलांतरित फ्लेमिंगो पक्षांचे आश्रयस्थान झालेली शिवडीची दलदल असलेली पाणथळ जागा आहे तसेच जगातला सगळ्यात अवाढव्य नि सुंदर अॅटलस मॉथ नावाने ओळखला जाणारा तृणभक्ष्यी कीटकही आहे. यात वसई क्रीक भागात आढळणारे अंगाएवढीच मोठी शेपटी असलेले एशियन पाम सायवेट अर्थात पाण वा काळमांजर आहे, लिचास आरेनसिस (Lychas aareyensis) नावाचा विंचूही आहे, मुंबईतल्या आरे कॉलनीत अधिवास असलेली गेकोएल्ला (Giri’s geckonella) नावाची भूचर पालही आहे आणि बॉम्बे सी बग (Goniobra-nchus bombayanus) नावाने ओळखला जाणारा समुद्री जीवही आहे. सोबतीला मुंबईतल्या आद्य कोळी आणि आगरी समूहाची दखलही आहे.

अर्थातच या सगळ्याचा उद्देश, नव्या पिढीला सजग करण्याचा, आपल्या जैववैविध्याचा त्यांच्यामध्ये अभिमान जागवण्याचा आहे आणि तो योग्यच आहे. रोहन चक्रवर्ती आणि त्याच्या सहकाऱ्यांची हीसुद्धा इच्छा आहे, की हा नकाशा मुंबई महापालिका, मुंबईतल्या बागा आणि नक्कीच पर्यावरण मंत्रालयातही लावला जावा. पर्यावरणाच्यादृष्टीने संवेदनशील असलेल्या आदित्य ठाकरेंना या मागण्या पूर्ण करणे अवघड जावू नये. त्यांनी हे तर करावेच, परंतु मुंबईतल्या जंगलांमध्ये बिबट्याचा अधिवास आहे, म्हणजे अजून तरी इथली जैवसाखळी मजबूत आहे, टिकून आहे. या जैवसाखळीचा पर्यावरणाच्या बऱ्या-वाईट होण्याशी थेट संबंध आहे, हे जनतेला या ना त्या माध्यमातून वारंवार समजून सांगावे आणि बिबट्या मारल्यानंतर आपण जल्लोश करतो खरे, पण तो आपण आपल्या विनाशाचा वेळेआधी केलेला जल्लोश असतो, हेही समजून द्यावे. एवढे साधले तरीही मुंबईलाच नव्हे अख्ख्या राज्याला सूर गवसेल आणि तो गवसला की राज्याचे सौंदर्यही खुलून उठेल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0