अपार कष्ट, वाचकांना हवं ते देण्याची तयारी आणि सतत वेगवेगळे प्रयोग करण्याची मानसिकता या भांडवलावर मुरलीधर उर्फ बाबा शिंगोटे यांनी ‘पुण्यनगरी’ आणि त्याच्याशी संलग्न वृत्तपत्रांचं साम्राज्य उभं केलं.
देशातील आणि जगातील माध्यमविश्व सध्या कमालीच्या अस्थिरतेने ग्रासले आहे. दिवसेंदिवस विकसित होत असलेले तंत्रज्ञान, त्यातून दिवसेंदिवस वाढतच चाललेली स्पर्धा, समाज माध्यमांसारख्या नवमाध्यमांनी जगभरातच जनमानसात मिळवलेले स्थान आणि त्यातून निर्माण झालेली नवी स्पर्धा, त्यातून आर्थिक आघाडीवरची अस्थिरता आणि संक्रमणावस्था आणि या सगळ्यांत वृत्तपत्रांसमोर उभे राहिलेले अस्तित्वाचे आव्हान असे सध्याचे माध्ममविश्वाचे स्वरूप आहे.
मतमतांचा गलबलाट आणि केवळ मीच ही भूमिका ठासून मांडली जाण्याच्या या काळात ‘पुण्यनगरी’ वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक मुरलीधर उर्फ बाबा शिंगोटे यांच्या निधनाची बातमी ऐकून अस्वस्थ वाटले. बाबा प्रदीर्घ काळ जगले. यशाचा मार्ग दाखवत कृतार्थतेनं जगले. पण त्यांच्या वागण्या- बोलण्यात या यशाचा दर्प कधीही जाणवला नाही. परिस्थिती कितीही हलाखीची असो, त्यावर मात करण्याची जिद्द ठेवून, कठोर कष्ट उपसण्याची तयारी ठेवली, तर यशाला गवसणी घालता येते, हे बाबांनी दाखवून दिले. एरवी ही कविकल्पना किंवा सुभाषित वाटावी, अशीच ओळ. आपण जन्माला आल्यापासून ती सतत ऐकलेलीही असते. पण हाच सुविचार कसा अंगिकारता येतो आणि खरोखर यशाला कशी गवसणी घालता येते, हे बाबांनी त्यांच्या कर्तबगारीने दाखवून दिले आहे.
प्रसिद्धीसाठीचे साधन स्वत:च्या हातात असतानाही त्याचा वापर करून स्वत:ला मिरवून घेण्याचा सोस त्यांनी कधीही बाळगला नाही. उलट ‘पुण्यनगरी’ हा ब्रँड राज्यभरात प्रस्थापित करण्यावरच त्यांनी कायम लक्ष दिले आणि हा ब्रँड प्रस्थापितही करून दाखवला, हे बाबांचे वेगळेपण ठसणारे आहे.
जुन्नर तालुक्यातले ओतूर हे खेडेगाव ही बाबांची जन्मभूमी. सुमारे आठ दशकांपूर्वी हा सगळा परिसर दुर्गम या सदरात गणला जाणारा. तेव्हा शिक्षणाच्या सोयी जेमतेम. उदरनिर्वाहासाठी शेती हेच प्रमुख साधन. अशा त्या काळात अगदी पोरसवदा वय असतानाच बाबांनी उदरनिर्वाहासाठी मुंबई गाठली. मुंबईच्या बाजारात आणि पुढे वाशीतील एपीएमसीत ओतूर भागातून अनेकजण त्या आधीही पोटापाण्यासाठी दाखल झालेले होते. मुंबईतील अन्य व्यवसायांतही जुन्नर तालुक्यातील माणसं गेली होती. गाठीशी फारसे शिक्षण नसलेले पोरसवदा वयातले बाबाही असेच मुंबईत दाखल झाले होते. मूळचे ओतूरचे असलेले बुवासाहेब दांगट यांनी मुंबईत वृत्तपत्र विक्री व्यवसायात जम बसवायला सुरवात केली होती. बाबा त्यांच्याकडे गेले. घरोघरी वृत्तपत्र टाकणाऱ्या पोऱ्या या स्वरुपात बाबांनी दांगटांकडं काम करण्यास सुरवात केली. वृत्तपत्र विक्री करणारा मुलगा फार तर आणखी पैसे कसे मिळतील, जादा काम कसं मिळेल, याचाच विचार करेल. बाबांचाही प्रारंभीचा विचार तेवढाच होता. परंतु, बाबांमध्ये एक मुलभूत जिज्ञासा होती. आपण जे वृत्तपत्र रोज घरोघरी टाकतो किंवा रस्त्यावर, लोकलमध्ये विकतो, ते बनते कसे, याचे कुतुहल त्यांना होते. त्यातून ते ‘नवाकाळ’मध्ये रोज रात्री जाऊन बसायचे. अग्रलेखांचा बादशहा असा ज्यांचा लौकिक होता, त्या नीळकंठ खाडिलकरांशी त्यांचा यातून परिचय झाला आणि पुढे तो वाढतच गेला. खाडिलकर अग्रलेख कसे लिहायचे, पान एक साठीच्या बातम्यांच्या निवडीचे निकष ते कसे लावत, सामान्यांशी त्यांचा संपर्क कसा असायचा आणि आपला पेपर उद्या वाचला गेला पाहिजे यासाठी पानाची मांडणी कशी असावी, यावर खाडिलकर काय करायचे, हे बाबा रोज पाहत असत. त्या काळातल्या अनेक आठवणी बाबा प्रसंगोपात्त विषय निघाला की सांगत असत.
दांगट एजन्सीत काम करताना बाबांना वृत्तपत्र वितरणातील खाचाखोचा कळाल्या. बाबांनीही आस्थेवाईकपणे या खाचाखोचा शिकून घेतल्या आणि त्यातूनच पुढे त्यांना ‘नवाकाळ’ची वितरणाची एजन्सी मिळवली आणि या संधीचं सोनं करून दाखवलं. त्यांनी ‘नवाकाळ’चा खप वाढवला. सहकाऱ्यांच्या मदतीनं ‘नवाकाळ’ रुजवला. काही काळ या वृत्तपत्राचा खप चार ते सहा लाखांच्या दरम्यान होता, यातूनच बाबांच्या यशाची कल्पना यावी. ‘नवाकाळ’चे प्रमुख वितरक या नात्यानेही पुढे खाडिलकरांशी त्यांची वृत्तपत्र व्यवसायावर चर्चा व्हायची. एकदा खाडिलकरांशी काही कारणांवरून वाद झाला आणि बाबांनी स्वतःचा पेपर काढायचं ठरवलं.
बाबांनी हा निर्णय घेतला, त्यामागं केवळ हा वाद नव्हता. बाबांची काही निरीक्षणही होती आणि त्यातून या व्यवसायात आपण काही करू शकू, याची कुठेतरी खात्रीही त्यांना वाटत होती. बाबा ज्या काळात वृत्तपत्र वितरण करायचे, त्या काळी सर्वंच वृत्तपत्रांचा आकार मोठा होता. ब्रॉडशीट असं त्याचं स्वरूप होतं. मुंबईत लोकलमध्ये प्रवास करताना ही मोठ्या आकाराची वृत्तपत्रं वाचण्यात अडचण यायची. सतत सर्वसामान्य माणसांच्या गर्दीत राहणाऱ्या बाबांनी ही बाब हेरली होती. गर्दीत उभं राहूनही पेपर वाचता आला पाहिजे, असं त्यातून त्यांच्या डोक्यात आलं. एखादी कल्पना मनात आली, की ती लगेच अमलात आणायची. त्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही, हा बाबांचा खाक्या होता. तसेच, त्यावेळी त्यांच्याकडे कामाला असलेल्या मुलांना काय काम द्यायचं हाही प्रश्न बाबांपुढे होता. त्यातून बाबांनी १९९४ मध्ये ‘मुंबई चौफेर’ हे सायंदैनिक काढलं. हे सायंदैनिक काढतानाही बाबांनी काही जणांना हाताशी धरलं. चार पानांचं आणि ५० पैसे किमतीचं हे डेमी साईज दैनिक होतं. त्याच वर्षी दसऱ्याला ‘आपला वार्ताहर’ हे सकाळी प्रसिद्ध होणारं दैनिक सुरू केलं.
वृत्तपत्र लोक का घेतात, ते काय वाचतात, याचा बाबांचा अगदी बारकाईने अभ्यास होता. त्यातून त्यांनी चर्चा होणारी बातमी पान एक अगदी अंगावर येईल अशा स्वरुपात प्रसिद्ध करण्यास सुरवात केली. बघताबघता या दैनिकांनी जम बसवला. बाबांच्या वितरण कौशल्याचा अनुभवही यात कामाला आला. उद्याची हेडलाईन काय, हीच त्यांची त्या काळातली चिंता असायची. कोणती हेडलाईन दिली, की मुंबईच्या कोणत्या भागात पेपर खपेल, याचाही त्यांचा अभ्यास होता. आशिया खंडातील डेमी साईजं स्वरुपातील सर्वांत मोठं वृत्तपत्र अशी आज ‘मुंबई चौफेर’ची ओळख आहे.
‘मुंबई चौफेर’, ‘आपला वार्ताहर’नंतर बाबांनी पुण्यासाठी म्हणून ‘पुण्यनगरी’ हे वृत्तपत्र काढलं. प्रारंभी ८ पानांचा छोटेखानी असा हा पेपर होता. चटपटीत बातम्या हे त्याचं स्वरूप होत. पुढे याच पेपरच्या राज्यातल्या जिल्ह्या-जिल्ह्यात आवृत्त्या निघाल्या. त्यातून ‘पुण्यनगरी’नं राज्यभरात आपला वाचक कमावला. मराठवाडा, विदर्भात प्रस्थापितांना जबरदस्त आव्हान उभं केलं आणि काही ठिकाणी तर नंबर एकचं स्थानही मिळवलं आहे. अल्पशिक्षित असलेल्या बाबांचं हे यश, ही कर्तबगारी नाकारता येईल का?
‘पुण्यनगरी’ समूहात ‘आपला वार्ताहर’सह पाच वृत्तपत्रं आहेत. त्याचीही एक गंमत आहे. मराठी आणि थोडीबहुत हिंदी भाषा वगळली, तर त्यांना अन्य भाषांचा गंध नव्हता. असं असतानाही बाबांच्या समूहात कन्नड वृत्तपत्र आहे, हे वेगळेपण नाही का? ‘कर्नाटक मल्ल्या’ हे कन्नड वृत्तपत्र चालू पुढं चालू राहावं, असं या वृत्तपत्राच्या मालकांना वाटत होतं. मात्र, हे वृत्तपत्र चालवण्यासाठी योग्य व्यक्ती सापडेना. अशातच या मालकांची बाबांशी त्यांची भेट झाली. बाबांवर त्यांचा विश्वास होता. त्यामुळे त्यांनी आनंदानं ‘कर्नाटक मल्ल्या’ची सूत्रं बाबांकडं दिली. स्वत:ला कन्नड येत नाही आणि कन्नड येणारी माणसं नसतानाही बाबांनी आधीचा कर्मचारीवर्ग आणि नंतर काही जणांना दिमतीला घेऊन ‘कर्नाटक मल्ल्या’ यशस्वीपणे चालवून दाखवला.
मुंबईत उत्तर भारतीयांचं वाढलेलं प्रमाण बाबांच्या चाणाक्ष नजरेतून सुटलं नाही. त्यांनी ‘यशोभूमी’ हे हिंदी वृत्तपत्र काढलं. एक लाखांच्या पुढं खप नेऊन तिथंही त्यांनी आपली मोहोर उमटवली.
बाबांना वाचकांची आवड चांगलीच माहीत होती. त्यामुळं पहिल्या पानावर कुठल्या बातम्या लावायच्या, हे ते स्वतः सांगत. बहुतांश वेळा तेच पान लावायचे. रात्री उशिरापर्यंत क्रिकेटची मॅच चालू असेल, तर बाबा मुद्दाम पान थांबवत. निकाल आल्यानंतर पहिल्या पानावर उजव्या हाताला ती बातमी आवर्जून घेत. क्रिकेट, चित्रपट आणि राजकारण हेच वाचकांना खिळवून ठेवणारे विषय आहेत, असं त्यांचं ठाम मत होतं. बातम्यांचे मथळे (हेडिंग) कसे असले पाहिजेत, याबाबतही त्यांचा वेगळा विचार असे. चटपटीत म्हणजे काहीही किंवा सवंग, असलं मथ्थडपणाही कधी त्यांना खपला नाही. वाचकानं पैसे खर्च करून पेपर विकत घेतला पाहिजे, असं वाटत असेल तर आपणही त्याला तसंच काही दिलं पाहिजे, हा बाबांचा रोखठोक विचार होता. व्यावसायिकता किंवा ज्याला प्रोफेशनॅलिझम म्हणतात, तो याहून कुठे वेगळा असतो? सध्या करोनाच्या संकटामुळे वृत्तपत्रांच्या खपावर चांगलाच परिणाम झाला आहे. त्या आधीही खपाची ओरड होतीच. अशा वेळी बाबांची ही भूमिका आपल्याला काही शिकवणारी नाही का?
एकापाठोपाठ एक पेपर काढून, आर्थिकदृष्ट्या यश मिळवत असतानाच बाबांनी दुसरं एक पथ्य पाळलं होतं. ते कधीही कोणत्याही राजकीय पक्ष किंवा समूहाच्या वाट्याला गेले नाहीत. किंबहुना वृत्तपत्र व्यवसायापलीकडं ते कधी गेले नाहीत. सर्वच पक्षांशी ते समान अंतरावर राहिले. माध्यम क्षेत्रातल्या यशानंतरही बाबांना हा मोह झाला नाही, हेही मला विशेषच वाटते. मोठ्या उद्योगपतीचा पाठिंबा नाही, राजकीय आश्रय नाही, अशा स्थितीतही मोठ्या भांडवलदारांच्या वृत्तपत्रांच्या पंक्तीत त्यांनी ‘पुण्यनगरी’ला नेऊन बसवलं. घरात खायला नसलं, तरी कर्मचाऱ्यांचे पगार झाले पाहिजेत, असा त्यांचा आग्रह होता.
एकापाठोपाठ एक वृत्तपत्रांच्या यशानंतर काहीसे आर्थिक स्थैर्य बाबांना जरूर मिळाले, पण बाबांनी तेही कधी डोक्यात जाऊ दिले नाही. उद्याचा पेपर, उद्याची हेडलाईन याशिवाय त्यांनी कधी कोणता विचार केला असेल, असेही वाटत नाही.
राज्यातल्या प्रत्येक गावात आज ‘पुण्यनगरी’चे छानसे कार्यालय आहे. बाबा ज्या गावात जातील, तिथं त्यांची उत्तम बडदास्त ठेवता येईल, अशीही हॉटेलं होती. पण बाबा अशा हॉटेलांमध्ये कधीच राहिले नाही. ज्या गावात जात तिथल्याच ‘पुण्यनगरी’च्या कार्यालयात ते राहत. तिथंच झोपण्यासाठी पथारी पसरत. आता पथारी म्हटलं, की आपल्याला अवमानास्पद वाटेल. पण मी हे शब्दार्थांनही म्हणतो आहे. कार्यालयात असलेले पेपर किंवा पेपरचा गठ्ठा व्यवस्थित मांडून बाबा चक्क त्यावर झोपत. याबाबतची एक छोटीशी आठवण सांगतो. एकदा सोलापूरहून ते पुण्याला परत येणार होते. वाटेत त्यांच्या काय मनात आले कळत नाही. पण त्यांनी इंदापुरात ब्रेक घ्यायचे ठरवले. इंदापुरात पहाटे कितीला पेपर येतो, वितरण कसे चालते, हे त्यांना तपासायचे होते. इंदापुरात ‘पुण्यनगरी’चा बातमीदार आजही आहे. त्याला कल्पना दिली असती, तर त्यानं बाबांची इंदापुरात व्यवस्थित सोय केली असती. तिथल्या रेस्ट हाऊसमध्येही त्यांना राहता आले असते. पण बाबांनी यातले काही केले नाही. ते रात्री उशिरा इंदापूरच्या एसटी स्टँडवर पोचले. तिथचं ‘पुण्यनगरी’चे गठ्ठेही येणार होते. बाबांनी शांतपणे गाडीतून काही जुने पेपर काढले. स्टँडच्या फरशीवर पसरले आणि शांतपणे झोपीही गेले. कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारा, एका वृत्तपत्राचा मालक असणारा हा माणूस, पण त्याचा कोणताही बडेजाव न माजवता असं राहू शकत होता. वडापाव आणि चहा हेच त्यांचं स्टेपल फूड होतं.
मी पुणे आवृत्तीचा संपादक म्हणून ‘पुण्यनगरी’त दाखल झालो, त्यावेळी बाबांनी वयाची पंचाहत्तरी ओलांडली होती. हे वय म्हणजे निवृत्तीनंतरच्याही निवृत्तीचे. पण बाबा त्याही वयात सतत कामात असत. पहाटे चारच्या सुमारास वृत्तपत्र विक्रेत्यांची भेट घेण्यापासून त्यांच्या कामाची सुरवात होत असे आणि रात्री उशिरा पेपर छपाई सुरू होईपर्यंत हा दिवस लांबत असे. ज्या गावात असतील, तिथल्या छोट्यातल्या छोट्या विक्रेत्याशीही संपर्क साधण्याचा शिरस्ताही त्यांनी कधी मोडला नाही. वयानं थकले, तरी बाबा अगदी गेल्या एप्रिलपर्यंत कामात होते. त्या अर्थानं शेवटपर्यंतच म्हणायला हरकत नाही. राज्यभरात रोज आपला पेपर किती विकला गेला, वितरणाची स्थिती काय आहे, याची अगदी शेवटपर्यंत ते माहिती घेत होते. वृत्तपत्रांच्या खपाची घटती संख्या हाच त्यांच्या चिंतेचा विषय होता…. अगदी शेवटच्या क्षणीही. वाढती स्पर्धा, समाज माध्यमांचे वाढते प्राबल्य वगैरे गोष्टी त्यांनाही माहिती होत्याच की! पण ही कारणंही त्यांना पूर्णाशांनी मान्य नव्हती. वाचकाला हवं ते देण्यात आपण कमी पडतोय, ही त्यांची यामागची खंत होती. त्यांची ही खंत बरेच काही सांगून शिकवून जाणारी आहे. शून्यातून विश्व निर्माण केलेल्या आणि त्यातूनच जगणं शिकवून गेलेल्या बाबांचे स्मरण म्हणूनच नित्य राहील.
गोपाळ जोशी, ज्येष्ठ पत्रकार आहेत.
COMMENTS