पतंजली आयुर्वेदच्या जाहिरातींमधील छुपा अजेंडा

पतंजली आयुर्वेदच्या जाहिरातींमधील छुपा अजेंडा

पतंजली उत्पादनांची इतकी विक्री होण्यामागे बाबा रामदेव यांचा मोठा हात आहे. विक्रीसाठी त्यांनी पतंजली उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये देशभक्ती, स्वदेशी, हिंदू धर्माभिमान या भावनांचा दुरुपयोग सातत्याने केला आहे. इतकंच नव्हे तर त्यांच्या स्पर्धक विदेशी कंपन्या या भारताला गुलाम बनवण्यासाठी आल्या आहेत याचाही प्रसार केला.

कोरोना औषध : रामदेव, बाळकृष्णवर फिर्याद दाखल
सुप्रीम कोर्टाकडूनही बाबा रामदेवांना समज
तडफडणाऱ्या रुग्णांची रामदेवबाबांकडून थट्टा

जाहिरात हा आपल्या आधुनिक जगण्याचा अविभाज्य घटक झाला आहे. वृत्तपत्रे, टीव्ही, इंटरनेट यावरून दिवसरात्र जाहिरातींचा मारा सुरू असतो. यांत सर्वाधिक वाटा असतो तो विविध उत्पादनांचा. जाहिरात केली जाते ती आपल्या या उत्पादनांची संभाव्य ग्राहकांना माहिती व्हावी व त्यांनी ती विकत घ्यावी यासाठी. लोकांच्या नजरेपुढे एकच एक उत्पादन असेल तर ते त्याच्या मनावर ठसत जातं आणि स्वाभाविकपणे ते विकत घेण्याकडे त्याचा कल वाढतो ही मानसिकता जाहिरातींच्या मागे असते. ह्या जाहिरातींमधून उत्पादनांची खरी माहिती देण्यात यावी, लोकांची दिशाभूल व फसवणूक करण्यात येऊ नये अशी अपेक्षा असते. एका उत्पादकाने आपल्या उत्पादनाचा खप वाढवण्यासाठी इतर उत्पादकांच्या तशाच प्रकारच्या उत्पादनांविषयी खोटी माहिती पसरवू नये अशीही अपेक्षा असते. ही जाहिरातींमधील नैतिकता आहे. प्रत्यक्षात अशा गोष्टी घडत नाहीत. सर्वच नाही पण काही उत्पादक जाहिरातींमधील या नैतिक गोष्टी पाळत नाहीत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक देशाने यंत्रणा उभारलेली आहे. भारतातही, ‘एडव्हरटायझिंग स्टँडर्डस् कौन्सिल ऑफ इंडिया’ या जाहिरात नियामक संस्थेमार्फत जाहिरातींवर लक्ष ठेवण्यात येतं, त्यांच्याकडे दाखल झालेल्या तक्रारींवर कारवाई केली जाते. कोणाही उत्पादकाने जाहिरातींचा गैरवापर करू नये हा मूळ उद्देश त्याच्या मागे आहे. पण मोठे उत्पादक अशा कारवायांना भीक घालत नाहीत. यातील एक मोठे नाव आहे, ‘पतंजली आयुर्वेद’चे.

बाबा रामदेव या प्रसिद्ध योगगुरुने बालकृष्ण या त्याच्या शिष्यासमवेत २००६ मध्ये पतंजली आयुर्वेदची स्थापना केली. ही एक आंतरराष्ट्रीय ग्राहकोपयोगी उत्पादने करणारी कंपनी आहे. सौंदर्य प्रसाधने, खाद्यान्न, आयुर्वेदिक औषधे ही त्यांची प्रमुख उत्पादने आहेत. बालकृष्ण हे कंपनीचे मुख्यकार्याधिकारी आहेत तर बाबा रामदेव हे सर्वाधिकारी आहेत. स्थापनेनंतर कंपनीने अल्पावधीतच विक्रीचे उच्चांक गाठायला सुरूवात केली. २०१०-११ मध्ये १०० कोटी रु. इतकी कंपनीची उलाढाल होती. २०१४-१५ मध्ये ती २ हजार कोटी रु.वर पोहोचली. तर २०१९-२० मध्ये ती ९ हजार कोटी रु.वर पोहोचली. बाबा रामदेव यांची भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक आहे. योगगुरू म्हणून ते भारतात प्रसिद्ध आहेत. शिवाय देशभक्ती, आयुर्वेद यांची भलामण करण्यात ते मग्न असतात. २०१४ मध्ये भाजप सरकार आल्यानंतर कंपनीची झालेली वाढ हा काही योगायोग नाही. त्यामुळेच पतंजलीच्या उद्योगांकडे सरकारने वेळोवेळी डोळेझाक केल्याचं दिसून येतं. कंपनीच्या विरोधात दिशाभूल करणाऱ्या जाहिराती दिल्याच्या ३३ तक्रारी त्यांच्या २१ उत्पादनांच्या विरोधात दाखल करण्यात आल्या आहेत. ज्यांतील १७ जाहिराती ह्या ‘एडव्हरटायझिंग स्टँडर्डस् कौन्सिल ऑफ इंडिया’च्या दिशानिर्देशांच्या विरोधात जातात असं आढळून आलं. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना च्यवनप्राश या उत्पादनाची जाहिरात करण्यास मनाई घातली होती. तर त्यांच्या आवळा रसाला निकृष्ट दर्जा असल्याने बंदीला सामोरं जावं लागलं. करोनाच्या काळात कंपनीने कोरोनील नावाचे औषध बाजारात आणले. करोनावर उपचार करण्यासाठी हे प्रभावी औषध असल्याची घोषणा त्यांनी देशाचे विद्यमान आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि रस्ते व बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत केली होती. या औषधाला जागतिक आरोग्य संघटना व भारतीय आयुष मंत्रालयाची मान्यता मिळाल्याचा दावाही त्यांनी याच वेळी केला होता. हे दोन्ही दावे खोटे असल्याचे नंतर उघड झाले. मद्रास उच्च न्यायालयाने त्यांच्यावर १० लाख रु.चा दंड लादला तर महाराष्ट्र सरकारने या औषधाच्या विक्रीवर बंदी घातली. आजघडीला पतंजली कंपनी आणि बाबा रामदेवच्या विरोधात विविध स्वरूपाचे शंभराहून जास्त खटले विविध न्यायालयांत सुरू आहेत.

पतंजली उत्पादनांची इतकी विक्री होण्यामागे बाबा रामदेव यांचा मोठा हात आहे. विक्रीसाठी त्यांनी पतंजली उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये देशभक्ती, स्वदेशी, हिंदू धर्माभिमान या भावनांचा दुरुपयोग सातत्याने केला आहे. इतकंच नव्हे तर त्यांच्या स्पर्धक विदेशी कंपन्या या भारताला गुलाम बनवण्यासाठी आल्या आहेत याचाही प्रसार केला. पतंजलीच्या या जाहिराती कशा असतात ते पाहणे महत्त्वाचे आहे. या जाहिराती मुख्यतः न्यूज चॅनेल्सवर दाखवल्या जातात. पहिलं उदाहरण आहे पतंजलीचं ‘सौंदर्य’ नावाचं त्वचेची काळजी घेणारं उत्पादन. याची सरळ साधी जाहिरात करण्याऐवजी पतंजलीने यात वेगळाच सूर लावला आहे. यात सौंदर्या व तिची बहिणी ऐश्वर्या या दोन मुली दाखवण्यात येतात. सौंदर्या ही संस्कारी, परंपरेचं पालन करणारी आहे व ऐश्वर्या ही मुक्त विचारांची आणि म्हणून वाईट चालीची आहे असं सांगण्यात येतं. सौंदर्याच्या सौंदर्याची सारेजण स्तुति करतात तर ऐश्वर्याला तिचा चेहरा मेकअपमध्ये लपवावा लागतो तरीही ती सुंदर दिसत नाही. कारण सौंदर्या पतंजलीचं मलम वापरते आणि ऐश्वर्या अन्य कंपनीचं. या जाहिरातीतून हा स्पष्ट संदेश देण्यात येतो की ज्या मुली पारंपरिक नसतात, संस्कारी नसतात आणि पतंजलीची उत्पादने वापरत नाहीत त्या वाईट असतात. ज्या मुली स्वतंत्र विचारांच्या असतात त्यांच्याकडे समाज वाईट नजरेनं बघतो. या जाहिराती नेमक्या त्याच वेळी लागतात ज्या वेळी अन्य उत्पादक आपल्या जाहिरातींमधून स्त्री सक्षमतेची, स्त्री-पुरुष समानतेची भावना पसरवत असतात.

पतंजलीची ही जाहिरात म्हणजे स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर आघात करणारी व त्यांना खोट्या नैतिकतेच्या तुरुंगात कोंडणारी आहे याबद्दल शंका नाही. पतंजलीची दुसरी जाहिरात आहे ‘दंतकान्ति’ या टुथपेस्टची. विदेशी कंपन्या भारतात येऊन गुंतवणूक करतात, उत्पादने विकतात आणि सारा पैसा विदेशात नेतात असा आरोप यांत करण्यात येतो. इतकंच नाहीतर देशभक्तिचं आवाहन करून भारतीय विक्रेत्यांना विदेशी उत्पादनांऐवजी केवळ पतंजलीचं उत्पादन (इतर भारतीय कंपन्यांचीही नाही) विक्रीसाठी ठेवायला सांगण्यात येतं. ज्यामुळे ते देशाची सेवा करतील जशी महात्मा गांधी, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद यांनी केली होती. या सर्वांचे फोटो जाहिरातीत वापरण्यात येतात. पतंजली आपल्या कंपनीचा नफा देशसेवेसाठी वापरतो असा दावा यात केला जातो. प्रत्यक्षात बालकृष्ण, जे पतंजलीचा मुख्यकार्याधिकारी आहेत त्यांच्याकडे कंपनीचे ९४ टक्के शेअर्स आहेत. २०२१ मे मध्ये त्यांच्याकडे २.३ अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती होती.

ही जाहिरात उघडपणे विदेशी कंपन्यांविषयी चूकीची, खोटी माहिती पसरवून त्यांच्यावर बहिष्कार घालण्यासाठी ग्राहकांना उचकवते. जे ग्राहक पतंजलीची उत्पादने वापरत नाहीत ते देशभक्त नाहीत असा आरोप करते. पतंजलीने स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी याच पद्धतीची आणखी एक जाहिरात आणली होती. ज्यांत भारताचा स्वातंत्र्यपूर्वकालीन नकाशा दाखवण्यात येतो. ज्यावर क्रुसाचं चिन्ह व त्यांमध्ये ई, आय व सीओ ही तीन इंग्रजी अक्षरे दाखवण्यात येतात. ती उघडपणे ईस्ट इंडिया कंपनीची आहेत. महात्मा गांधींनी सुरू केलेल्या स्वदेशी आंदोलनाचा उल्लेख करत बाबा रामदेव सांगतात, विदेशी कंपनीया हमारे लिये बहुत ही खतरनाक है क्यों की देश का धन देश के बाहर ले जा रही है और देश में कोई भी बडा काम चैरीटी का नही करती है. इन सबका विकल्प है पतंजली का सात्विक स्वदेशी अभियान. पतंजली का प्रॉफिट किसी व्यक्ति विशेष के लिये नही बल्की चैरीटी के लिये है. आज आझादी के ७१ साल बाद भी चायना, युएस, युके जैसी कंपनीया लूट कर रही है.”

ही जाहिरात उघडपणे विदेशी कंपन्यांना चोर लुटारू संबोधते. देशभक्तिच्या भावनेला हात घालत ती ग्राहकांवर चुकीचा दबाव आणते. या जाहिरातीच्या विरोधात ख्रिश्चन धर्मियांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. अशा जाहिराती भारताच्या सर्वधर्मसमभावाच्या तत्त्वाच्या विरोधात जातात. अशीच एक जाहिरात म्हणजे पतंजलीची गाईच्या तुपाची. यांत बाबा रामदेव पुन्हा एकदा चुकीची माहिती देतात व सांगतात की, गायींना कत्तलखाण्यात जाण्यापासून वाचवा आणि गाईचंच तूप वापरा. यातून ते मुसलमानांच्या विरोधात संदेश देतात कारण खाटीक व्यवसायात मुस्लिमांचा जास्त भरणा आहे. देशात मॉब लिंचिंग होत असतांना ही जाहिरात म्हणजे मुसलमानांना हिंदू धर्माचे खलनायक व गायीचे मारेकरी म्हणून संबोधणारी होती.

या सर्व जाहिराती या एडव्हर्टायझिंग कौन्सिलच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आहेत. पण कंपनी त्याकडे लक्ष देत नाही. कारण आहे त्यांना असलेलं राजकीय पाठबळ. पतंजली कंपनीची सध्याची उत्पादन क्षमता ही ३५ हजार कोटी रु.ची आहे. ती त्यांना ६० हजार कोटी रु,वर न्यायची आहे. त्यासाठी अत्यंत आक्रमकपणे ते जाहिराती करतात. त्यांना ना कायद्याचं भय आहे ना सरकारचं. कारण सध्या हिंदुत्ववादी भाजप सरकार केंद्रात आहे त्यामुळे रामदेव याचे फावत आहे. शिवाय हिंदू धर्माचे योगी संन्यासी असल्याने लोकांचाही त्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई करण्याची हिम्मत कोणी करत नाही. केली तरी त्याला रामदेव त्याला भीक घालत नाहीत. संन्यासी हा सर्वसंगपरित्यागी असतो. सहिष्णू व शांत वृत्तीचा असतो. सत्यवादी असतो. रामदेव बाबांमध्ये यांतील कोणतंही लक्षण दिसत नाही. कोरोनीलवर बंदी घातली गेली तेव्हा रामदेव यांनी ऐलोपॅथीच्या विरोधात अत्यंत चुकीची व विखारी विधाने केली. त्यासाठी त्यांच्यावर १००० कोटी रु.चा अब्रुनुकसानीचा खटलाही दाखल करण्यात आला आहे. सत्ता आणि मूर्ख लोकांचा पाठिंबा असल्याने रामदेव यांचे प्रस्थ वाढलेलं आहे. ज्याला या जाहिरातींमधून खतपाणी घालण्यात येतं. अत्यंत उथळ व दर्जाहिन या जाहिराती आहेत. पण देशभक्तीची नशा लोकांच्या मेंदूत पोहोचवण्यात रामदेव बाबा व त्यांची कंपनी यशस्वी झाली आहे. अन्य धर्मांविषयी चुकीचा विचार करण्यासाठी, स्त्रियांना गौण समजण्यासाठी, विदेशी कंपन्यांना चोर समजण्यासाठी, असं या जाहिराती प्रत्यक्षपणे सांगतात. अन्य भारतीय कंपन्यांची उत्पादने देखील हलकी आहेत असा दावा यांतून करण्यात येतो. सर्वच पातळ्यांवर पतंजली कंपनीच्या या जाहिराती चुकीच्या आहेत यात शंका नाही. कोणतीही व्यावसायिक नीतिमत्ता त्यांत पाळली जात नाही. सामाजिक भावनांचा विचार यात केला जात नाही. लोकांच्या देश व धर्माविषयीच्या श्रद्धेला आपल्या स्वार्थासाठी राबवून घेण्याचं रामदेव बाबा व कंपनीचं धोरण आहे. या फसवणूकीच्या धंद्यापासून जनता जितक्या लवकर सावध होतील तेवढं चांगलं.

हा लेख हा अलीम खान व सुभाष कुमार यांच्या “Ethics and Narratives: An Analysis of Commercials of Patanjali Ayurveda.” या संशोधन प्रबंधातील निष्कर्षांवर आधारित आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0