चीनचा विरोध असतानाही नॅन्सी पॅलोसी यांचा तैवान दौरा यशस्वी

चीनचा विरोध असतानाही नॅन्सी पॅलोसी यांचा तैवान दौरा यशस्वी

तैवानला आपलाच प्रदेश मानणाऱ्या चीनने नॅन्सी पॅलोसी यांच्या तैवान भेटीला विरोध करत अमेरिकेला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला होता. मात्र पॅलोसी यांनी तरीही आपला दौरा पूर्ण केला. गेल्या २५ वर्षांत तैवानला भेट देणार्‍या अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या पहिल्या अध्यक्षा आहेत.

मुत्सद्देगिरीला पाक आणि चीनची किनार
अफ़गाणिस्तानचा तिढा
कमला हॅरिस : खऱ्या अमेरिकेची प्रतिनिधी

तैपेई/बीजिंग: अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पॅलोसी बुधवारी चीनच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर तैवानला भेट देऊन निघून गेल्या.

पॅलोसी आणि इतर पाच खासदार येथून दक्षिण कोरियाला रवाना झाले. पॅलोसी त्यांच्या आशिया दौऱ्याचा एक भाग म्हणून सिंगापूर, मलेशिया आणि जपानलाही भेट देणार आहेत.

यापूर्वी, तैवानला भेट दिलेल्या अमेरिकन शिष्टमंडळाने सांगितले होते की अमेरिका तैवान दिलेल्या वचनबद्धतेपासून मागे हटणार नाही.

पॅलोसी या २५ वर्षांत तैवानला भेट देणार्‍या अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या पहिल्या अध्यक्षा आहेत.

तैवानचे राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांची भेट घेतल्यानंतर एका संक्षिप्त निवेदनात त्या म्हणाल्या, “आज जगासमोर लोकशाही आणि निरंकुशता यापैकी एक निवडण्याचे आव्हान आहे. तैवान आणि जगभरातील सर्वत्र लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी अमेरिकेची वचनबद्धता अढळ आहे.”

पॅलोसी म्हणाल्या, “तैवानशी अमेरिकेची मैत्री आणि एकजुटता आता पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची आहे, हाच संदेश आम्ही आज आणला आहे.”

तणावपूर्ण वातावरणात झालेल्या भेटीदरम्यान, पॅलोसी यांनी तैवानच्या खासदारांशी संवाद साधला आणि पत्रकारांना सांगितले की अमेरिका ‘आहे त्या परिस्थितीचे’ समर्थन करते, परंतु तैवान बळजबरी होऊ शकत नाही.

दुसरीकडे चीनने या भेटीचा निषेध म्हणून तैवानमधून लिंबू, मासे आणि इतर खाद्यपदार्थांची आयात बंद केली आहे.

अमेरिकेचे शिष्टमंडळ मंगळवारी रात्री तैवानची राजधानी तैपेई येथे आल्यानंतर, चीनने बेटाच्या आसपास लष्करी सरावांची मालिका सुरू केली आणि अनेक कठोर विधाने केली.

पॅलोसी यांच्या भेटीबद्दल संताप व्यक्त करत त्यांनी तैवानच्या हवाई क्षेत्राजवळ अनेक चीनी लढाऊ विमानांचे उड्डाणे केली आणि तैवानच्या समुद्र हद्दीमध्ये लष्करी सराव केला.

त्याचवेळी चीनचे उप परराष्ट्र मंत्री शी फेंग यांनी मंगळवारी उशिरा चीनमधील अमेरिकेचे राजदूत निकोलस बर्न्स यांना बोलावून पॅलोसी यांच्या भेटीला तीव्र विरोध नोंदवला.

चीनच्या अधिकृत न्यूज एजन्सी ‘शिन्हुआ’च्या वृत्तानुसार, शी फेंग यांनी सांगितले, की चीनच्या विरोधाला न जुमानता दौरा सुरू ठेवल्यामुळे अमेरिकेला त्यांच्या चुकांची किंमत चुकवावी लागेल.

बातमीनुसार, शी फेंग यांनी अमेरिकेला ताबडतोब या घटनेचे स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे आणि पॅलोसीच्या तैवान भेटीमुळे उद्भवणारे प्रतिकूल परिणाम दुरुस्त करण्यासाठी व्यावहारिक उपाययोजना करण्यास सांगितले आहे.

ते म्हणाले की अमेरिकेने चुकीच्या मार्गावर जाऊ नये, जेणेकरून तैवान सामुद्रधुनीत तणाव वाढेल आणि चीन-अमेरिका संबंध इतके बिघडतील की ते पुन्हा रुळावर येऊ शकणार नाहीत.

तत्पूर्वी, पॅलोसी यांच्या तैवान भेटीच्या संभाव्यतेवर वाढत्या तणावादरम्यान, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी मंगळवारी सांगितले होते की तैवानच्या मुद्द्यावर अमेरिकेने केलेली फसवणूक त्याच्या राष्ट्रीय विश्वासार्हतेला प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.

वांग यांनी एका निवेदनात म्हटले आहे, “काही अमेरिकन राजकारणी तैवानच्या मुद्द्यावर आगीशी खेळत आहेत. त्याचा परिणाम चांगला होणार नाही. लोकांना त्रास देणार्‍या अमेरिकेचा चेहरा पुन्हा समोर आला आहे आणि शांतता बिघडवण्यात ती जगात अव्वल आहे हे दाखवून देत आहे.”

तैवानला आपल्या देशाचा भाग मानणाऱ्या चीनने पॅलोसी तैवानच्या दौऱ्यावर आल्यास, ते प्रत्युत्तर देतील आणि आपले सैन्य हातावर हात ठेवून बसणार नाही, असे वारंवार बजावले होते.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी मंगळवारी बीजिंगमध्ये सांगितले होते, की “अमेरिका आणि तैवानने यापूर्वी एकत्रीतपणे भडकावण्याची कृती केली आहे आणि त्यामुळे चीन स्वसंरक्षणार्थ कारवाई करण्यास मजबूर आहे.”

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0