नाओमी, ख्रिस्तीयानो आणि सीमोन

नाओमी, ख्रिस्तीयानो आणि सीमोन

नाओमी, ख्रिस्तीयानो आणि सीमोन यांनी धैर्य दाखवल्यामुळे जागतिक खेळ स्पर्धांमध्ये मानसिक आरोग्याच्या प्रश्नावर चर्चा सुरू झाली आहे.

वैश्विक लिंगभेद यादीः 156 देशात भारताचे स्थान 140
मणिपूरमध्ये भाजपचे सरकार अल्पमतात
पीटर ब्रूकः जगाला महाभारताची ओळख करून देणारा अवलिया

२०२१ ची विंबल्डन स्पर्धा या वर्षी २८ जून ते ११ जुलै दरम्यान लंडनमध्ये पार पडली. पुरुष गटातील अंतिम सामना सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हीच आणि इटलीचा मॅटीओ बेरेटीनी यांच्यात झाला. यंदाच्या अंतिम सामना कोण जिंकतोय, कोण हरतोय यापेक्षा सुद्धा दुसऱ्या काही सामाजिक-सांस्कृतिक-मानसिक घटनांनी हा सामना विशेष ठरला. अंतिम सामन्याची नाणेफेक करण्याचा मान मिळाला १३ वर्षांच्या सिन सेरेसिन्हे या हसऱ्या मुलाला. सिन हा सध्या इंग्लंडमधील ‘ऑफ द रेकॉर्ड युथ काऊन्सेलिंग’ (Off The Record Youth Counselling) या संस्थेमध्ये मानसिक आरोग्याबद्दल समुपदेशन आणि संबंधित उपचार घेत आहे. विम्बल्डन फाउंडेशन सध्या या विषयावर काम करत आहे. अंतिम सामन्यासाठी या दोन संस्थांनी एकत्र येऊन अधिकाधिक लोकांपर्यंत मानसिक आरोग्याचा संदेश पोचवण्यासाठी हे घडवून आणलं.

यावर्षीचीच फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा ३० मे ते १३ जून दरम्यान पॅरिसमध्ये पार पडली. मे महिन्याच्या शेवटी आणि जून महिन्याच्या सुरुवातीला फ्रेंच ओपन स्पर्धेला खळबळजनक सुरुवात झाली. यापूर्वी असा गोंधळ कधीच झाला नसेल अशा मैदानाबाहेरच्या आणि खेळाव्यतिरिक्तच्या मुद्दयाने फ्रेंच ओपन गाजली. नाओमी ओसाका ही जपानची महिला टेनिस खेळाडू सध्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.  तिच्या एका कृतीने फक्त टेनिस विश्वच नाही तर संपूर्ण क्रीडा-जगत ढवळून निघाले. सन २०१८ मध्ये नाओमी टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारी जपानची पहिली महिला बनली होती. त्या वर्षी अमेरिकन ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिने २३ ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या महान खेळाडू सेरेना विलियम्स हिला सरळ सेटमध्ये हरवले होते. त्यानंतर ती जगातील क्रीडा रसिकांच्या गळ्यातील ताईत बनली यात काही आश्चर्य नाही.

नाओमी आहे तशी लाजाळू स्वभावाची ! पण वेळप्रसंगी कुणाचाही विचार न करता, मनातलं जे काही असेल ते निरागसपणे सांगून टाकणारी, अशीही तिची ख्याती आहे. प्रसारमाध्यमांना सामोरे जाताना काही निश्चित नियम आणि शिष्टाचार असतात आणि ग्रँडस्लॅम सारख्या किंवा जागतिक पातळीवरच्या मोठ्या स्पर्धेदरम्यान हे कठोर संकेत कॉर्पोरेट कंपन्या आणि स्पर्धेचे आयोजक यांच्या करारनाम्यातील कलमाप्रमाणे अधिकाधिक धारधार होत जातात. हे नियम किती कडक असतात आणि त्यातून किती मानसिक शोषण किती होऊ शकते हे ११ जून ते ११ जुलै या काळात पार पडलेल्या १६ व्या युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या घटनांवरून दिसून येईल. ख्रिस्तीयानो रोनाल्डो याने एका सांमन्यानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये अधिकृत प्रायोजक असलेल्या कोकाकोलाच्या बाटल्या हटवून “पाणी प्या” असा आरोग्यदायी संदेश देत समोर पाण्याच्या बाटल्या आणून ठेवल्या. या घटनेचा व्हिडिओ जगभर व्हायरल झाला आणि एवढंच नाही तर आरोग्य-पोषणमूल्ये यावर माध्यमे-समाज माध्यमे यांत तुफानी चर्चा झाली. यावर कडी म्हणून की काय कोकाकोलाच्या शेयर बाजारातील भांडवल मूल्यामध्ये काही अब्ज डॉलर्सची घट झाली. पण या घटनेनंतर युरो कपच्या (UEFA) आयोजकांनी सर्व खेळाडूना अशी ताकीद दिली की याप्रकरच्या घटना परत घडल्या तर असे करणाऱ्या खेळांडूना भारी दंड होईल. युरो स्पर्धेच्या या नियमाला कोणत्याही संघातील खेळाडूने नंतर आव्हान दिले नाही. परंतु महिला टेनिसमधील एका खेळाडूने एका महिन्यापूर्वीच यावर भूमिका घेऊन जागतिक पातळीवर आत्मपरीक्षणाचे एक नवीन पर्व सुरू केले होते हे नक्की.

नाओमी ओसाकाने या वर्षीच्या फ्रेंच स्पर्धेतून माघार घेतली ती फक्त एवढ्याच (?) कारणासाठी की तिला स्पर्धेच्या पत्रकार परिषदेमध्ये टोचणारे किंवा अस्वस्थ करणारे प्रश्न विचारले जातात व त्यामुळे येणारा मानसिक ताण सहन हॉट नाही, म्हणून तो त्रास टाळण्यासाठी तिने पत्रकार परिषदेला सामोरी जाणार नाही, असे आयोजकांना नम्रपणे  सांगितले. परंतु फ्रेंच ओपन स्पर्धेच्या आयोजकांनी तिला एका सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित न राहिल्याबद्दल १५,००० डॉलर एवढा भरभक्कम दंड ठोठावला. तसेच यापुढील सामन्यात जर तिनं असं केलं तर तिच्यावर पुढील कारवाई केली जाईल असा इशारा दिला.

ओसाकाने तो सुप्त धमकी असलेला इशारा त्यांच्याच तोंडावर मारून पुढच्या सामन्याआधीच आपण या स्पर्धेतून माघार घेत आहे असे जाहीर केले. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या खेळाडूने अशा प्रतिष्ठेच्या फ्रेंच ओपन मधून माघार घेणे म्हणजे स्पर्धेवर प्रतीकात्मक बॉम्ब टाकून केलेले कायदेभंग-असहकार आंदोलनच ! त्यावेळी दिलेल्या प्रसिद्धी निवेदनात ती म्हणाली होती, “माझ्या कल्पनेत सुद्धा मी अशा परिस्थितीत सापडेन असं वाटलं नव्हतं. मला कधीही सगळ्या टेनिस जगताचे लक्ष याप्रकारे विचलित करायचे नव्हते. आता माझ्या माघारीनंतर सर्वांना टेनिसवर पुन्हा लक्ष केंद्रित करता येईल अशी आशा वाटते. मी कधीही ‘मानसिक आरोग्य” हा शब्दप्रयोग हलक्या अर्थाने वापरला नाही. सत्य हे आहे की २०१८ पासुन मी प्रदीर्घ मानसिक तणावाच्या प्रसंगांतून गेलेली आहे. याचा सामना करताना मला अतिशय निर्वाणीच्या क्षणांतून जावे लागले आहे. जे मला ओळखतात, त्यांना हे माहीत आहे की मी स्व-केंद्रित आहे आणि जेव्हा जेव्हा मी या प्रकारच्या स्पर्धांसाठी जाते तेव्हा तेव्हा मी हेडफोन वापरुन ज्या सामाजिक गोतावळ्याची मला सततची भीती वाटते तिच्यापासून स्वत:चे रक्षण करते. मी खऱ्या अर्थाने सुस्वभावी अशा पत्रकारांची यासाठी माफी मागते. पण मी एक नैसर्गिक वक्ता नाही आणि जागतिक पातळीवरच्या मिडियाला सामोरे जाताना मला खूप दडपण येते. मला विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना मला अतिशय चिंताग्रस्त वाटते. तर यावेळी पॅरिसमध्ये मी आधीपासूनच घोर दबावाखाली होते. म्हणून मी ठरवले की यावेळी स्वत:ची काळजी घेणे हा सगळयात चांगला उपाय असू शकेल. त्यामुळे आधी मी पत्रकार परिषदेला दांडी मारण्याचे आणि नंतर स्वत:हून स्पर्धेतून माघार घेण्याचे ठरवले. मला वाटते की याबाबतीत स्पर्धेचे नियम खूप कालबाह्य झाले आहेत. मी स्पर्धेच्या आयोजकांची याबद्दल खाजगीत पत्रव्यवहाराने माफी सुद्धा मागितली. मला आशा आहे की तुम्ही सुरक्षित आहात आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्यातर्फे स्नेह !”

टेनिसच्या इतिहासातील महान खेळाडू आणि १२ वेळा महिला एकेरी, १६ वेळा महिला दुहेरी आणि ११ वेळा मिश्र दुहेरी अशा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या अमेरिकेच्या बिली जिन किंग (७७) यांनी या निर्णयाबद्दल नाओमीचे कौतुक केले. या प्रकारे खेळाच्या सर्वोच्च पातळीवर स्वत:बद्दलचे सत्य खुले करणे हे खूप बहादुरीचे काम आहे असं किंग म्हणाल्या. त्या पुढे म्हणतात की आता नाओमीला तिला आवश्यक असलेली मानसिक शांती आणि अवकाश (Peace & Space) दिला पाहिजे. २०१८ मध्ये नाओमी ओसाकाने ज्या सेरेना विलियम्सला अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत हरवले होते ती यावेळी नाओमीच्या बाजूने किल्ला लढवायला धावून आली, “मला वाटते कि जाऊन नाओमीची घट्ट गळाभेट घ्यावी. मी सुद्धा अशा परिस्थितीतून याआधी अनेकदा गेलेली आहे. आम्ही वेगवेगळी व्यक्तिमत्वे आहोत आणि प्रत्येक जण एक वेगळं व्यक्तिमत्त्व घेऊन जगत असतो. मी जाड कातडीची आहे. इतर लोक पातळ कातडीचे आहेत. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने परिस्थती हाताळतो. तिला जसं या स्थितीला हाताळायचं आहे तसं हाताळू द्या. खेळाडूंना कठीण काळात त्यांना व्यक्त करण्यासाठी कुणीतरी उपलब्ध असणं अत्यावश्यक असतं. त्याचवेळी तुम्हाला तुमची भावनिक गरज म्हणून कुणाशी बोलायला किंवा तुमचं मन व्यक्त करायला आवडेल याबद्दल धीराने व्यक्त व्हायला येणं, ही क्षमता असणं सुद्धा महत्त्वाचं असतं. टेनिस विश्वातील असो किंवा तुमच्या आयुष्यातील कुणी व्यक्ती असो, नियमितपणे किंवा दर आठवड्याला तुमच्याशी बोलायला कुणीतरी हजर असणं हे कळीचं आहे.”

नाओमी ओसाकाबद्दल अधिक समजून घ्यायला हवे. जून २०१९ ते २०२० या काळात ओसाका सर्वात जास्त प्रायोजक मिळालेली महिला खेळाडू बनली होती. यामध्ये तिने मारिया शारापोवा आणि सेरेना विलियमस पेक्षा जास्त कमाई केली. तिचे यश फक्त व्यावसायिक कमाई पुरते मर्यादित नाही. तिची आई जपानी आहे आणि वडील हैती देशातील आहेत. मागील वर्षी जेव्हा अमेरिकेत जॉर्ज फ्लॉइड या आफ्रिकन अमेरिकन नागरिकाची पोलिसांच्या दमनशाहीने हत्या केली होती तेव्हा नाओमी ओसाका याबद्दलच्या आंदोलनाची खुली समर्थक होती. तिने समाज माध्यमांवर या विषयावर सामाजिक न्यायाची आणि समतेची उघड उघड बाजू घेतली होती. कॉर्पोरेट ब्रॅंड, जाहिराती, प्रचार, फॅशन आणि श्रीमंत जीवनशैली यासाठी टेनिस खेळाडू प्रसिद्ध असताना सर्वोच्च क्रमवारीतील खेळाडूची ही संवेदनशीलता अद्वितीय होती आणि त्याप्रमाणे नाओमीच्या वागण्यात सातत्य राहिलेले आहे.

आधी नाओमी ओसाकाच्या वादाने गाजलेली फ्रेंच ओपन आणि ख्रिस्तीयानो रोनाल्डो याच्या प्रकरणाने गाजलेली युरो कप स्पर्धा संपून जगाने टोकियो ऑलिंपिकच्या पंधरवड्यात (२३ जुलै ते ८ ऑगस्ट) प्रवेश केला होता. या दोन्ही घटनांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून सदसदविवेकबुद्धी जागृत असलेले सेलिब्रिटी खेळाडू हे- माध्यमांच्या कव्हरेजसाठी कच्चा माल नाहीत तसेच ते नफ्याचा हव्यास असलेल्या उत्पादनांचे प्रचार करणारे चाकरमाने सुद्धा नाहीत- अशी ठिणगी टाकून दिली. या ठिणगीने एका नव्या आशावादी प्रवाहाची सुरुवात करून दिली. याचा जोर किती टिकेल अशी शंका असतानाच टोकियो ऑलिंपिकमध्ये सनसनाटी घटना घडली आणि माध्यमविश्वातील चर्चेचा संपूर्ण वर्णपटल आता या एका नव्या विचार प्रवाहाने प्रेरित झाला आहे. तो प्रवाह आहे की, “It`s OKAY TO BE NOT OKAY and even more COOL TO SHARE about stress and depression ! हा मोठा बदल व्हायला आणखी एक महान खेळाडू कारणीभूत ठरली. जी अत्यंत कमी वयात दंतकथा बनून राहिली आहे आणि पुढील काही वर्षे ती तिच्या क्रीडाप्रकारातील साम्राज्ञी बनून राहील हे निश्चित !

टोकियो स्पर्धा जशीजशी जवळ आली तशीतशी ही स्पर्धा कोण आपल्या नावावर इतिहासात कोरणार याचे अंदाज लावले जात होते. २००४ ची ग्रीस मधील अथेन्स ऑलिंपिक स्पर्धा जलतरण मध्ये ६ सुवर्णपदके आणि २ ब्रॉन्झ पदके जिंकणाऱ्या अमेरिकेच्या मायकेल फेलप्सच्या नावाने इतिहासात अजरामर झाली. २००८ च्या चीन मधील बीजिंग ऑलिंपिक स्पर्धेमध्ये जमैकाच्या उसेन बोल्टने १०० मीटर, २०० मी. आणि १०० मी. रिले स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि जागतिक विक्रमासह मैदानी स्पर्धेत जगाचा बादशहा बनला होता.

ब्राझील मधील रिओ-डी-जानिरो मध्ये होत होती २०१६ च्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा ! त्यावेळी केवळ १९ वर्षांची असलेली एक जिमनॅस्ट जागतिक विक्रमासह चार सुवर्णपदके आणि एक ब्रॉन्झ पदक जिंकते. तिची तुलना मग पदक जिंकणाऱ्या आणि जागतिक किर्तीच्या इतर खेळांडुबरोबर केली जाते. स्पर्धा चालू असतानाच ती व्यक्त होते, “मी पुढची उसेन बोल्ट किंवा मायकेल फेलप्स नाही. मी पहिली सिमोन बाईल्स आहे.” स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाला दुसऱ्याच्या आणि पुरुषी यशाच्या मापदंड व प्रभावाखाली न जोखण्याची ही उर्मी लैंगिक समानता, आधुनिक जीवनातील व्यक्तीवादी विचारधारा आणि स्त्री स्वातंत्र्याची उदगाती फ्रेंच तत्वज्ञ सिमोन द बोहूआर हिचीच आठवण करून देणारेच हे वाक्य होते. ती सिमोन होती, ही सुद्धा एक सिमोन आहे.

तर टोकियो ऑलिंपिक येता येता पुन्हा एकदा माध्यम विश्वातील निरीक्षक, क्रीडा विश्लेषक आणि कॉर्पोरेट ब्रॅंडचे धुरीण पुन्हा एकदा आपली गणिते आजमावत पुढची भाकिते करीत होते. यामध्ये पुन्हा एकदा सिमोन बाईल्स ही स्पर्धा गाजवणार आणि नवनवीन विक्रम स्थापित करणार अशी पद्धतशीर हवा सुद्धा निर्माण करण्यात आली. २०१३ ते २०१५, २०१८-२०१९ अशी आजपर्यंत बाईल्स पाचवेळा जागतिक स्पर्धेची विजेती राहिलेली आहे. एकाच वेळी जागतिक स्पर्धा आणि ऑलिंपिक या दोन्ही स्पर्धांमध्ये जिमनॅस्टीकच्या सर्व गटांमध्ये विजेतेपद मिळवून राखणारी इतिहासातील ती केवळ दुसरी खेळाडू आहे. जागतिक स्पर्धांमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त २५ पदके मिळवलेली खेळाडू बनली तेव्हा तिने वयाची पंचविशी सुद्धा पार केलेली नव्हती. जीवनाच्या अशा वळणावर ती टोकियो मध्ये होणाऱ्या कोरोनाच्या जागतिक महामारीच्या काळात पार पडणाऱ्या अभूतपूर्व ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्यासाठी आली. टोकियो ऑलिंपिकच्या प्राथमिक फेरीमधील काही सामन्यांत आपले लक्ष विचलित होत असल्याचे तिला लक्षात आले. प्राथमिक फेरीतील काही स्पर्धा ती खेळली पण २७ जुलैला तिने सांघिक प्रकाराच्या स्पर्धेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर अलीकडेच तिने इतर वैयक्तिक स्पर्धा प्रकारांतून सुद्धा माघार घेत असल्याचे घोषित केले. आपण आता मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी माघार घेत असल्याचे तिने जाहीर केले. सिमोनने मानसिक आरोग्याच्या पातळीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी घेतलेली माघार ही दु:खद घटना नव्हती, ती तर स्थितप्रज्ञतेने स्वत:च्या मनाकडे पाहून त्याच्या रक्षणासाठी वेळीच पाऊल उचलणारे दृढ इच्छाशक्तीचे पाऊल होते.

सिमोनचा खरा प्रचंड मोठा दु:खद अनुभव समजून घेण्यासाठी थोडं मागं जाऊ या. हॉलीवूडमध्ये मीटू (#metoo) चळवळीमध्ये अनेक महिला कलाकारांनी तिथल्या हार्वे वीनस्टीन या चित्रपट निर्मात्याने केलेल्या लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवला होता. यासाठी वीनस्टीनला २३ वर्षांची शिक्षा झाली होती. त्यानंतर #metoo चळवळ जागतिक पातळीवर इतर देशांत सुद्धा पोचली होती. अमेरिकेतील क्रीडा क्षेत्रात सुद्धा #metoo घडले. मिशिगन स्टेट विद्यापीठामधील क्रीडा प्रशिक्षण केंद्रात काम करत असलेल्या लारी नासर या डॉक्टरने ३०० पेक्षा जास्त महिला खेळांडूचे वैद्यकीय उपचारांच्या नावाखाली लैंगिक शोषण केले होते.  २०१८ मध्ये नासरला यासंबंधित अनेक गुन्ह्यासाठी ४० ते १७५ वर्षे एवढी प्रदीर्घ तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. जानेवारी २०१८ मध्येच सिमोन बाईल्स सुद्धा #metoo या अमेरिकेत सुरू झालेल्या चळवळीमध्ये व्यक्त झाली होती. तिचे सुद्धा याच क्रीडा केंद्रांवर प्रशिक्षण अनेक महिन्यांपासून लैंगिक शोषण चालू होते आणि याच मेडिकल डॉक्टरने तिचे ते केले असे तिनेच जाहीर केल्यावर खळबळ उडाली.

तिने त्यावेळी ट्विटरवर जाहीर केलेल्या एका पत्रकात टोकियो ऑलिंपिकचा सुद्धा उल्लेख केला होता. ती म्हणते, “या सर्व वेदनादायक आठवणी परत परत येणे हे कडेलोट होईल, इतक्या कष्टदायक आहेत. विशेषत: मी आता टोकियो ऑलिंपिकसाठी तयारी करण्यासाठी, ज्या ठिकाणी माझे लैंगिक शोषण झाले, त्याच ठिकाणी मला आता सरावाला जावे लागणार. मला माहीत आहे की हा भयानक अनुभव माझे व्यक्तिमत्त्व परिभाषित करत नाही. मी त्या अनुभवापेक्षा खूप काही अधिक आहे. मी एकमेवाद्वितीय, प्रतिभावान, प्रेरित आणि ध्येयवादी आहे. माझी कहाणी या अनुभवापेक्षा मोठी असेल आणि मी हा शब्द देते की मी माझ्या पूर्ण शक्तीने, मनाने यापुढील प्रत्येक स्पर्धेत उतरेन. मी कधीही हार मानणार नाही. माझे या खेळावर अत्यंत प्रेम आहे आणि मी मैदान सोडून जाणाऱ्यातली नाही. एका पुरुषाला आणि त्याला मदत करणाऱ्याना मी माझे खेळावरील प्रेम आणि त्यातील आनंद ओरबाडून घेऊ देणार नाही. माझ्यासारख्या अनेक मुलीबाबतीत हे असे का झाले याचा शोध आपण घेतला पाहिजे. हे प्रसंग पुन्हा पुन्हा होऊ नयेत यासाठी आपण प्रयत्न करत राहिले पाहिजेत.”

आज जेव्हा टोकियो ऑलिंपिकमधून मानसिक आरोग्याच्या कारणासाठी सिमोन बाईल्सने माघार घेतली तेव्हा २०१८ च्या त्याच प्रसिद्धी पत्रकातील शेवटचे वाक्य आजही तंतोतंत लागू पडते, “मी माझ्या वेदनेतून वाट काढण्याचा प्रयत्न करत असताना सर्वांना माझा खाजगीपण जपण्याची, त्याचा आदर करण्याची विनंती करते. ही एक प्रक्रिया आहे आणि त्यासाठी मला अजून वेळ द्यायचा आहे.” कदाचित नाओमी ओसाका सुद्धा हेच म्हणतेय…क्रीडा क्षेत्रातील किंवा जीवनाच्या सर्व क्षेत्रातील टोकाची स्पर्धा अनुभवणाऱ्या सर्व जणांची हीच भावना असेल.

राहुल माने विज्ञान-तंत्रज्ञान विषयावर लिहिणारे पत्रकार असून, ‘इंडियन अॅकॅडेमी ऑफ सायन्सेस’चे ‘एस. रामशेषन विज्ञान लेखन’ फेलो आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0