नातेसंबंध आणि लैंगिकता - बदलत्या जीवनशैलीच्या पार्श्वभूमीवर अविवाहित तरुण मुलं-मुली प्रेम, नाती याबद्दलचे निर्णय काय व कसे घेतात, या सगळ्याचा त्यांच्या मानसिक शारीरिक व सामाजिक आरोग्यावर काय परिणाम होतो, हे जाणून घेणारा अभ्यास करायला हवा, असे आम्ही ठरवले. त्याला नाव दिले ‘युथ इन ट्रान्झिशन’!
‘युथ इन ट्रान्झिशन’च्या संशोधनाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी आम्ही काही तरुण-तरुणींशी अधिक सविस्तर बोललो. त्यांच्या नातेसंबंधांबद्दलच्या, लैंगिक जवळीकीबद्दलच्या कल्पना समजावून घेतल्या. अशा संशोधनापूर्वी विषयाच्या चहुबाजूंचा अंदाज घेण्याची गरजच असते आणि आम्हाला पुरेसा अंदाज नसलेल्या अशा अनेक गोष्टी त्यामध्ये सामोऱ्या आल्या.
पहिली गोष्ट म्हणजे ‘नात्यामध्ये असणे’ हे तरुणाईचे प्रमाण झालेले आहे. नात्यात असताना मग ते नाते पुढे न्यायचे का, लग्न करायचे की नाही, की लग्नाशिवाय एकत्र राहायचे, याविषयी विचार सुरू होतो. आम्हाला जाणवलं की हा विचार आजची तरुणाई सजगपणे करत आहे. परंपरागत चौकटींच्या पलिकडे जाऊन आजूबाजूला पहात आहे, लैंगिक जवळीकीची नाती जोडणे किंवा त्याशिवाय नात्यात असणे हे सर्व अनुभवून पाहण्याची त्यांना इच्छा आहे. लैंगिक संबंध आणि लग्न ह्यांचा परस्परसंबंध असलाच पाहिजे असा काही नियम नाही, हे म्हणणे त्यांना शक्य होत आहे. आत्तापर्यंत ढोबळपणे रूढ असणारी प्रमाणे – समीकरणे बदलत आहेत.
नव्या नावांची, नव्या प्रकारची नाती घडून येत आहेत. भावनिक गुंतवणूक किंवा सामाजिक बांधिलकीस केंद्रस्थानी न ठेवणाऱ्या या नात्यांना फ्रेंड्स विथ बेनिफिट्स, कॅज्युअल नाते, एका दिवसापुरते नाते (वन नाईट स्टॅन्ड) अशी नावे आहेत आणि त्याचा अर्थ या तरुण मंडळींना अगदी चांगला समजतो आहे.
आपल्या जोडीदारास ‘बॉयफ्रेंड’ किंवा ‘गर्लफ्रेंड’ असे म्हणणारी आणि नात्यास बांधिलकीचे (कमिटेड) नाव देणारी मुले-मुली अनेक आहेतच, पण तसेच ठराविक नाव न देऊ इच्छिणारी, त्यावर कुठलाच शिक्का न मारावासा वाटणारेही अनेक आहेत. कधी नात्यांच्या ठराविक चौकटीत किंवा पारंपरिक व्याख्येत बांधून न राहावेसे वाटल्याने त्या नात्याला कुठले नाव द्यावे याचा शोध सुरु आहे, तर कधी त्यांना नात्याला नाव द्यावेसेच वाटत नाही.
नाते एकीकडे घडवता- घडवता त्याच्या रूपरेषांची व्याप्ती आधीच नेमकी आखून घेणे हे अवघडही आहे.
व्यक्ती-व्यक्तींमध्ये हा नात्याचा प्रवास नेमका कधी आणि कोणत्या वयात सुरू व्हावा, हे तसे सापेक्षच असते. तरी किशोरवयामध्येच नात्यांची सुरुवात झालेली असणारेही काहीजण होते.
काहींचा हा नात्यांचा प्रवास हा एकापाठोपाठ येणाऱ्या स्टेशनांसारखा कमी काळासाठीच्या अनेक नात्यांचा होता. तर काहींनी एकाचवेळी अनेक नात्यांमध्ये असण्याचा अनुभवही सांगितला. सोशल मीडिया व डेटिंग अॅप यांच्यामार्फत नाते शोधणारेही काहीजण होते. मित्र-मैत्रिणी, जोडीदार मिळवण्यासाठी, त्यासाठीच्या अनेक पर्यायांपर्यंत पोचण्यासाठी आणि वागणूकीतला खाजगीपणा, निनावीपणा जपण्यासाठी त्यांना या माध्यमांची मदत झाली होती.
नातेसंबंधांतील असे बदलते प्रवाह तरुणाईकडून समजून घेताना काही धोक्याच्या वाटाही समोर आल्या. मुख्य म्हणजे या सगळ्यांत असुरक्षित लैंगिक संबंधांचे प्रमाण बरेच मोठे आहे.
एकीकडे कॉन्डोम वापराबद्दलची एकूण जागरूकता वाढते आहे हे खरेच, पण काँडोम्स सातत्याने वापरायला हवेत हे कळलेले असले तरी वळलेले मात्र नाही. असे का होत असावे याची कारणे अनेक आहेत. दारूचा अंमल, आधी न ठरवता घडलेला सेक्स, कॉन्डोम वापरण्याबाबतची अनिच्छा तर आहेच, शिवाय विड्रॉव्हल मेथड (वीर्यपतन होण्याआधीच लिंग बाहेर काढून घेणे) वरचा (अंध) विश्वासही आहे. कॉन्डोमबाबत एक अडचण असते, तो दुकानात जाऊन आणावा लागतो, नाहीतर ऑनलाइन दुकानांमधून थेट घरी मागवावा तरी लागतो. याची लाज वाटणे हेही एक कारण होतेच. इतकेच काय कॉन्डोमवर आमचा विश्वासच नाही, असे चकीत करणारे कारणही होते.
एक बाब प्रकर्षाने जाणवली, की लैंगिक संबंधाच्या वाटेने जाताना गरोदरपण राहण्याची भीती तरुणाईच्या मनात निश्चितच होती. पण दुसऱ्या बाजूला लैंगिक संबंधांतून पसरणाऱ्या आजारांबद्दल मात्र त्यांना पुरेशी माहिती नव्हती. गरोदरपण टाळण्यासाठी इमर्जन्सी पिल्स असतात, हे कळल्यामुळे वेळ आलीच तर त्यावर भर देण्याचा विचार व वर्तन होते.
एकीकडे पालकांकडून, कुटुंबियांकडून प्रेम, नाते, इतकेच काय मुलग्यां-मुलींची जवळीकीची मैत्री सुद्धा आक्षेपार्ह ठरवली जाते. त्याचवेळी मित्रमंडळींच्या गटाकडून मात्र प्रत्येकाचे नाते असायलाच हवे, असा दृश्य-अदृश्य दबाव आहे, असे अनेकांनी मांडले व यातून या मुलामुलींच्या मनाची ओढाताणही होते आहे.
या लहानश्या चाचणी अभ्यासातल्या निरीक्षणांमधून तरुणांच्या संपूर्ण आयुष्याचे चित्र एकत्र पाहण्याची गरज आहे हे अधोरेखित झाले.
तरुणांच्या जीवनाचे संदर्भ बदलत आहेत हे तर दिसतेच आहे, त्याला अनेक कंगोरे आहेत हे देखील निश्चित! आयुष्यातील बहुविध बाबींचा त्या सर्वांशी संबंध आहे. तेव्हा बदलत्या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर हे संपूर्ण एकसलग चित्र आपण बघायला हवे, त्याचा अर्थ लावायला हवा आणि जमले तर त्यापुढेही पोचायला हवे. या सगळ्या विचारांमधून ‘युथ इन ट्रान्झिशन’ अभ्यासास सुरुवात झाली.
हा अभ्यास लहानसा नव्हता. तब्बल १२४० मुलामुलींशी आम्ही बोललो आणि त्यातून दिसलेले हे साधार चित्र आपल्यासमोर ठेवत आहोत. या मुलाखतींमधूनही एकीकडे नात्याबद्दलच्या संकल्पनांचे चित्र बदलताना दिसत होतेच. पण दुसरीकडे लिंगभावावर आधारित भूमिकांमध्ये मात्र बदल झालेला नव्हता. पितृसत्ताधारी वृत्ती-प्रवृत्ती, योनिशुचिता, स्त्रीची लैंगिकता जखडून ठेवणाऱ्या, तिचे चारित्र्य, पावित्र्य यांना आधारभूत मानणाऱ्या, पुरुष सोडून इतर लिंगभावांस दुय्यम, तिय्यम दर्जा देणार्या संकल्पनाही त्याच वेळी मनांमध्ये हजर आहेत हे दिसत होते.
जवळीकीच्या नात्यांमधल्या भावनिक, शारीरिक आणि लैंगिक हिंसेबद्दलही अनेकजण बोलले. ह्या हिंसेचे स्वरूप मनाला लागेल असे बोलणे, कोणाशी बोलायचे-कोणते कपडे घालायचे याबद्दलचे दुसऱ्याचे निर्णय स्वतः घेणे, संशयी वृत्ती, दबाव, फसवणूक इथपासून पार मारहाण आणि लैंगिक संबंधांसाठीची जबरदस्ती – बलात्कार इथवर सर्वकाही होते. नात्यांच्या अंतर्गत घडणाऱ्या हिंसेस वाचा फुटत नाही, तिच्याकडे बहुतेकवेळा डोळेझाक केली जाते, अनेकदा ती हिंसा आहे याची जाणसुद्धा नसते असे दिसले.
युरोपमधील सेक्शुअल रेव्होल्यूशन ही इतर राजकीय प्रवाहांमधून, व्यक्तीगत निवडींना, स्वातंत्र्याला प्राधान्य देणाऱ्या विचारांना समांतर अशी चालू झाली. भारतामधील चित्र मात्र त्यापेक्षा वेगळे आहे.
आपल्या नात्याची निवड आपली असली, ते आपल्याला हवेसे असेल तरीही कुटुंबीयांचा विरोध, जातींमधील फरकामुळे ते पुढे नेता येणार नाही आणि कुटुंबियांच्या-समाजाच्या विरोधाला तोंड देता येणार नाही, मुख्य म्हणजे आपल्या मनाजोगते वागता येणार नाही हे मान्य केल्याचे या अभ्यासातील अनेकांनी सांगितले. जगाची जवळून ओळख करून देणारी माध्यमे हाताशी असूनही, स्वतःच्या निर्णयांवर स्वतःची पकड मात्र घेता येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
जितका दबाव आणि कोंडी अधिक तितके नैराश्य आणि चिंता अधिक. हेही या तरुणतरुणींच्या बोलण्यातून स्पष्ट दिसले. अनेकांनी त्यांच्या मानसिक त्रासांबद्दलचे अनुभव प्रकर्षाने मांडले. कुटुंबियांच्या अपेक्षांना बळी पडणे, त्यातून कोंडमारा होणे, त्याविरुद्ध अंतर्गत बंड पुकारणे सर्वत्र दिसते आहे.
“नंतर लग्न करून भांडीच घासायची आहेत तेव्हा आत्ताच मी आयुष्य माझ्या मनाप्रमाणे जगून घेते” अशाप्रकारची वाक्ये त्यांच्याकडून आली.
त्यांच्या मनात गोंधळ तर आहेच, परंतु त्यांच्या निर्णयांना परिस्थितीला शरण जाण्याच्या अगतिकतेची जोड आहे. एक मात्र नोंदवायला हवेच की समाजमाध्यमांनी नेहमीच तरुण पिढीला बेजबाबदार ठरवले आहे, तशा उथळ वृत्तीमधून मात्र त्यांचे आयुष्याचे निर्णय आलेले नाहीत. अनेक गुंतागुंतीच्या प्रक्रियांचा परिपाक त्यांच्या विचारांमागे आहे.
पालकांचा-समाजाचा वाटणारा धाक आणि कुटुंबामध्ये विसंवाद ही बाब सार्वत्रिक असावी असे वाटावे इतके जण त्याबद्दल बोलले. संशोधनातील प्रश्नावलींतील एक प्रश्नावली घरातील – कुटुंब असल्यास त्यामधील – लहानपणीच्या अनुभवांबद्दलची होती. त्यामध्ये “तुम्ही लैंगिकता, नातेसंबंध याविषयी घरच्यांशी मोकळेपणाने बोलू शकता का? व त्यात काही प्रश्न वा अडचण आल्यास तुम्ही घरातल्या कोणाला तो विचारू शकाल का?” असे प्रश्न होता. ७५% तरुणांनी त्याचे उत्तर अजिबात नाही असेच दिले.
दुसरीकडे पालकांच्या मनात तरुणांबद्दलच्या काळजीचे आणि अविश्वासाचे वातावरण आहेच. त्यामुळे तरुणांच्या लैंगिक आरोग्यविषयक गरजांकडे फक्त दुर्लक्षच होत आहे. अश्या वेळी, हे तरुण नातेसंबंधांविषयी काय म्हणू पाहत आहेत, ते सर्वांनीच शांतपणे ऐकून व समजून घेण्याची गरज आहे. अनेक मंचांवरती त्यांना स्वतःला व्यक्त करण्याच्या, मदतदेखील मागण्याच्या संधी मिळण्याची गरज आहे आणि तितकीच गरज पालक व मुलांमधील संवाद अधिक जागरूकपणे आणि मोकळेपणे घडून येण्यासाठी पालकांना तयार करण्याची आहे.
नातेसंबंधांच्या त्यांच्या ह्या प्रवासाच्या कथा कुठल्या रचित कथेपेक्षा कमी विलक्षण नव्हत्या. नाती जुळणे, त्यातील अनुभव, ती तुटणे, ह्यास जोडून येणारे आणि याच्या अवतीभवतीचे काहीच सरळसोट, एकांगी, एकरंगी नाही.
क्रमशः
मैत्रेयी, तरुण मुलामुलींसमवेत त्यांच्या लैंगिक व मानसिक स्वास्थ्यासाठीचे काम करतात.
COMMENTS