२३ वर्षानंतर निर्दोष : तीन काश्मिरींची सुटका

२३ वर्षानंतर निर्दोष : तीन काश्मिरींची सुटका

“ १९९६मध्ये महुआ व दिल्लीतील बॉम्बस्फोट प्रकरणात मला अडकवल्याचे ऐकून धक्काच बसला. माझ्या मदतीसाठी कोणीही नव्हते. कोणीही माझ्याशी बोलत नव्हते. मीडियाने मला दहशतवादी ठरवले होते. आता मी मीडियाला विचारू इच्छितो की तुम्ही माझी माफी मागणार का? मला गेलेली २३ वर्षे परत मिळतील का?”

नोबेल पुरस्कार विजेत्याला पुतीन यांची वेगळ्या तऱ्हेने धमकी
देशात केवळ १७,९१४ मुले रस्त्यावर राहतात; महाराष्ट्रात संख्या अधिक
पंजाबात भाजप ६५ जागा लढवणार

श्रीनगर : गुरुवारी लतिफ अहमद बाजा (४२) त्याच्या घरात आला तेव्हा त्याचे स्वागत करण्यासाठी नातलग, मित्र परिवार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू  होते. सुमारे दोन दशके तुरुंगात काढल्यानंतर कोणताही आरोप सिद्ध न होता लतिफची राजस्थान उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता झाली होती.

खुद्ध लतिफला विश्वास बसत नव्हता की त्याची सुटका झाली आहे. गेले दोन दिवस सुटका होण्याच्या आनंदात तो झोपला नव्हता, जेवला नव्हता. लतिफच्या आईने नूर जहानने (५८) त्याला जवळ घेत तो घरी आल्याची  जाणीव करून दिली. कित्येक वर्षे नूर जहानने आपल्या मुलाची वाट पाहण्यात घालवली. परमेश्वरापुढे असंख्य प्रार्थना केल्या. अखेर लतिफच्या सुटकेमुळे आपल्या प्रार्थनेला फळ मिळालं अशी तिची भावना झाली होती.

लतिफच्या आसपासच्या कुटुंबांनी तो घरी आलाय म्हणून खास ‘खेवा’ व ‘वाजवान’ची डिश तयार ठेवली होती. लतिफला भेटायला येणाऱ्या सर्वांना ही िडश मिळत होती. लतिफचे घर फुलांनी सजून गेले होते. पण दुर्दैवाने या आनंदाच्या प्रसंगी लतिफचे वडील नव्हते. गेल्याच आठवड्यात ते निर्वतले.

जो गुन्हा केलाच नाही त्यासाठी लतिफने देशातल्या अनेक तुरुंगात २३ वर्षे काढली होती. २३ जुलै रोजी राजस्थान उच्च न्यायालयाने लतिफ व त्याचे दोन साथीदार अली भट्‌ट (४८), मिर्झा निसार (३९), दोडा जिल्ह्यातील अब्दुल गोणी (५७), आणि उत्तर प्रदेशातील आग्ऱ्याच्या रईस बेग (५६) या सर्वांची १९९६साली झालेल्या सामलेती बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष मुक्तता केली होती.

या तिघांची निर्दोष सुटका करताना उच्च न्यायालयाने या तिघांविरोधात सरकारकडून कोणतेही पुरावे उभे करता आले नाही असे स्पष्ट केले. पण सामलेती बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी डॉ. अब्दुल हमीद याची फाशीची शिक्षा मात्र न्यायालयाने कायम ठेवली आहे.

या तिघा काश्मिरींची सुटका होण्याच्या दोन वर्षे अगोदर दिल्ली न्यायालयाने मुहम्मद हुसेन फाझिली, मोहम्मद रफीक शहा यांची २००५मध्ये दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली होती. तर तिसरा आरोपी तारीक अहमद दर याला एका छोट्या गुन्ह्याखाली शिक्षा सुनावली होती.

पोलिसांकडून खोटे आरोप

लतिफ सांगतो, व्यवसायाच्या नििमत्ताने तो काठमांडूमध्ये गेला असताना एकेदिवशी नमाजावेळी पोलिसांचे एक पथक त्याच्या घरात घुसले आणि आम्हाला काही न सांगता एका वाहनातून पकडून नेले. लतिफचा दिल्ली व काठमांडूमध्ये काश्मिरी हस्तकलेचा व्यवसाय असल्याने तो सतत फिरतीवर असायचा.

लतिफ सांगतो, “पकडल्यानंतर पोलिस एक आठवडा आम्हाला बेदम मारहाण करत होते. पोलिसांनी आमच्याकडून एका कोऱ्या कागदावर सह्याही घेतल्या होत्या. पोलिसांच्या अशा बेदम मारहाणीने माझे पाय मोडले होते, त्याने चार महिने मी चालू शकत नव्हतो, मला जमिनीवर बसताही येत नव्हते. हे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी मला एक खुर्ची दिली. आमची १५ दिवस चौकशी करण्यात आली आणि माझ्या लक्षात आलं की माझ्यावर बॉम्बस्फोट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ”

“ १९९६मध्ये महुआ व दिल्लीतील बॉम्बस्फोट प्रकरणात मला अडकवल्याचे ऐकून धक्काच बसला. माझ्या मदतीसाठी कोणीही नव्हते. कोणीही माझ्याशी बोलत नव्हते. मीडियाने मला दहशतवादी ठरवले होते. आता मी मीडियाला विचारू इच्छितो की तुम्ही माझी माफी मागणार का? मला गेलेली २३ वर्षे परत मिळतील का?”

लतिफला नंतर जयपूरमध्ये नेण्यात आले नंतर गुजरातमध्ये त्याला दोन वर्षे ठेवण्यात आले. त्यानंतर दिल्लीतील तिहार तुरुंगात १३ वर्षे व नंतर पुन्हा ८ वर्षे जयपूरमध्ये ठेवण्यात आले.

आपल्या तुरुंगातल्या आठवणी सांगताना लतिफ म्हणतो, ‘‘अली आणि निसार हे नेहमी व्यायाम व प्रार्थना करायचे. निर्दोष असल्याने आम्ही कोणत्याही आशा सोडलेल्या नव्हत्या. पण आता विश्वास बसत नाहीये की कोणताही गुन्हा न करता आम्ही आयुष्यातील २३ वर्षे तुरुंगात काढली.”

“जयपूरच्या तुरुंगातील आठवणी मनाला वेदना देणाऱ्या होत्या. आम्हाला आमच्या धर्मावरून पोलिस जबर मारहाण करायचे. आणि आम्ही काश्मिरी आहोत हे पोलिसांना कळायचे तर त्यांची वागणूक लगेच बदलायची. पुलवामा प्रकरणानंतर त्यांनी आम्हाला फक्त ठार मारायचे शिल्लक ठेवले होतं. याच काळात एका पाकिस्तानी आरोपीला तुरुंगात काहींनी ठार मारले होते. खोट्या व बनावट आरोपांखाली हजारो मुस्लिम तरुणांना तुरुंगात डांबण्यात आले आहे.”

लतिफसारखेच मिर्झा निसार हुसेन याच्या घरातली वातावरण आनंदाचे वातावरण होते. मिर्झा निसार हुसेन श्रीनगरमधील फतेह कदाल येथे राहतो. मिर्झाला पाहण्यासाठी त्याच्या घराबाहेर मोठा समुदाय जमा झाला होता.

१९ वर्षाचा असताना मिर्झाला अटक करण्यात आली होती. आता त्याचे वय ३९ वर्षे आहे. तो घरी आला तेव्हा घरचे त्याला ओळखू शकले नाहीत. घरी आल्यावर डोळ्यात अश्रू आणून मिर्झा म्हणाला, ‘हे आता आपले नवे घर आहे. या घरातील हवेचा श्वास घेण्यासाठी मी अनेक वर्षे वाट पाहात होतो.’

‘मी तुरुंगात गेलो तेव्हा अतिशय लहान होतो. मी माझे निर्दोषत्व पटवण्याचा हरतऱ्हेने प्रयत्न केला पण माझे कोणी ऐकले नाही. आता मी मुक्त आहे पण माझ्या आयुष्यातील उमेदीची वर्षे निघून गेली आहेत.’

मिर्झाला दिल्ली न्यायालयाने व नंतर राजस्थान उच्च न्यायालयाने निर्दोष सोडले. अल्लाहच्या न्यायालयात न्याय आहे असे मिर्झा म्हणतो.

तिसरा काश्मीरी मुहम्मद अली भटचे आईवडिल तो तुरुंगात असतानाच मरण पावले. मुहम्मद तिहार तुरुंगात २०१४ पर्यंत होता नंतर त्याला जयपूरमध्ये हलवण्यात आले.

श्रीनगरमध्ये पोहचल्यानंतर मुहम्मद थेट आईवडिलांच्या कबरीजवळ गेला. ‘मला कुणाविषयी तक्रार नाही, संताप नाही. माझ्यामुळे माझ्या आईवडिलांना खूप वेदना झाल्या त्याबद्दल मला अपराधी वाटतेय. आम्ही मुस्लिम व काश्मिरी असल्याने आम्हाला अडकवलं जातेय आम्ही निष्पाप आहोत, असे मुहम्मद सांगतोय.

अकीब जावेद, श्रीनगरस्थित पत्रकार आहेत.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1