कालसुसंगत काम्यूचे मर्मग्राही मुक्तचिंतन

कालसुसंगत काम्यूचे मर्मग्राही मुक्तचिंतन

संशयित आरोपी वा गुन्हेगारांना दिल्या जाणाऱ्या झटपट न्यायास समाजमान्यता आणि सन्मान देणारा हा काळ आहे. त्यालाच अनुसरून जशा झुंडी रस्त्यावर उतरून हत्या करीत सुटल्या आहेत, तसेच कायद्याचे रक्षक असलेली पोलीस संस्थाही बिनदिक्कत बनावट चकमकी घडवून परस्पर न्याय देऊ लागल्यात. नागरी समाजांना लाजशरम आणणाऱ्या या कायदेसंमत वा कायदेबाह्य देहदंडाच्या कृतीला नकार देत यामागील वृत्ती-प्रवृत्तीची सखोल चिकित्सा करणारा ‘रिफ्लेक्शन ऑन गिलोटिन’ हा नोबेल पुरस्कारप्राप्त लेखक आल्बेर काम्यूलिखित दीर्घ निबंध वैश्विक विचारविश्वात एकेकाळी खूप गाजला होता. विसाव्या शतकाच्या मध्यावर प्रकाशित झालेला हा निबंध आणि या निबंधास पूरक जोड असलेल्या लेखांचे पत्रकार-लेखक शेखर देशमुख यांचे पुस्तक ‘शिरच्छेद, फाशी आणि आल्बेर काम्यूचा चिंतननामा’ या नावाने ‘लोकवाड्मय गृह’तर्फे नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे. त्यावरील हे टिपण...

महाराष्ट्राची सुनावणी लांबणीवर
आरे कारशेडच्या कामाला स्थगिती
बेगिन, बालाकोट, बुश आणि अंधारातील अधेली

लोकशाही राष्ट्रांमध्ये जनमत आणि जनभावनेच्या रेट्यातून चांगल्या-वाईट अर्थाने व्यवस्था परिवर्तन घडून येत असले तरीही, कायदा आणि सुव्यवस्थेच्या क्षेत्रात या दोन घटकांनी अलीकडच्या काळात अनावश्यक ताणही निर्माण केला आहे. यातूनच जनमत वा जनभावनेच्या आवरणाखाली पोलीस यंत्रणेनी खोट्या चकमकी घडवून आरोपींना वा गुन्हेगारांना परस्पर शिक्षा देण्याचे प्रकार वाढले आहेत. याच जनभावनेच्या रेट्यातून झुंडीनी येऊन राजकीय विरोधकांच्या, असहमतीदारांच्या हत्या हे तर नित्याचेच चित्र होऊन बसले आहे. ‘कलेक्टिव्ह कॉन्शन्स ऑफ दी सोसायटी’ या संज्ञेचा अपप्रभाव न्यायदानावरही पडू लागल्याचे निर्भया आदी प्रकरणात आपल्याकडे दिसले आहे. देहदंडाची शिक्षा हा या साऱ्याचा उद्देश राहिला आहे. याच कायदेसंमत आणि कायदेबाह्य देहदंडाची शिक्षा बजावण्याच्या कृतीला आव्हान देत सखोल चिंतनात्मक मांडणी असलेला आल्बेर काम्यूचा ‘रिफ्लेक्शन ऑन गिलोटिन’ या नावाचा दीर्घ निबंध विसाव्या शतकाच्या मध्यावर प्रकाशित झाला आणि जगाच्या वैचारिक विश्वात गाजलाही. या निबंधाला संदर्भ होता, तोवर युरोपीय देशांत प्रचलित असलेल्या गिलोटिनखाली गुन्हेगारांचा सर्वांसमक्ष शिरच्छेद घडवून आणण्याच्या कायदेसंमत शिक्षेचा आणि या शिक्षेचा समाजमनावर होणाऱ्या दुष्परिणामांचा. याच निबंधाचा पत्रकार-लेखक शेखर देशमुख यांनी केलेला मराठी अनुवाद ‘शिरच्छेद, फाशी आणि आल्बेर काम्यूचा चिंतननामा’ या शीर्षकांतर्गत लोकवाड्मय गृह प्रकाशनातर्फे नुकताच प्रकाशित झाला आहे. काम्यूच्या मूळ निबंधाला पुराणकाळापासून देहदंडाची विविध धर्मांत आणि देशांत असलेली परंपरा, २०१५ मध्ये लॉ कमशिन ऑफ इंडियातर्फे प्रकाशित देहदंडविषयक अहवाल आणि जगप्रसिद्ध चित्रपटकार क्रित्झॉफ किस्लोव्हस्की यांच्या ‘शॉर्ट फिल्म ऑन किलिंग’ या चित्रपटावरील टिपणाचीही जोड देण्यात आली आहे.

स्वतंत्र विचारांना थारा न देता एकच एक विचाराचे वर्चस्व प्रस्थापित होण्याच्या या काळात माणसाची विचारक्षमता हेच मोठे वैगुण्य मानून वैचारिक विरोधकांना शत्रूवत वागणूक देण्याचा, अविचारी व्यक्तीने सामूहिक झिंगेत सामील होण्याचा आता प्रघात पडत चालला आहे. सार्वजनिक व्यवहारांतून सामूहिक शहाणीव नाहीशी होत गेल्यासारखी अशी साधारण स्थिती पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या अलीकडच्या-पलीकडच्या काळात युरोपात होती. कायदेसंमत वा कायदेबाह्य हत्येला सार्वजनिक प्रतिष्ठा मिळण्याचाही तो कालखंड होता. वजनदार गिलोटिनखाली सार्वजनिक ठिकाणी गुन्हेगारांचा शिरच्छेद घडवून आणणे ही तर त्याकाळच्या युरोपातली नित्य घटना होती. त्याही आधी अगदी खिसेकापूंपासून ते दुर्मिळातला दुर्मीळ गुन्हा करणाऱ्यांचा इंग्लंड आणि फ्रान्समध्ये सार्वजनिक ठिकाणी शिरच्छेद घडवून आणला जात असे. या कृतीची आणि इतर स्वरुपातल्या देहदंडाच्या शिक्षेची सखोल चिकित्सा काम्यूचा हा निबंध करतो. चिकित्सा करताना मानवी बुद्धिमत्ता आणि मानवी प्रज्ञा या दोहोंवरचा गाढ विश्वास काम्यूच्या प्रत्येक युक्तिवादातून झळकत राहतो. समाज, व्यक्ती, धर्म, रुढी-परंपरा यांच्या देहदंडाच्या शिक्षेशी असलेल्या प्रभावमूलक संबंधांवर प्रकाश टाकतानाच, देहदंडाच्या शिक्षेचा राजकारणाशी असलेला संबंध, देहदंडाच्या शिक्षेमागचे मानसशास्त्र, देहदंडाची शिक्षा नाकारणारे उदारमतवादी तत्त्वज्ञान आणि शिक्षेची अमलबजावणी करणाऱ्यांच्या नैतिकतेपुढे प्रश्नचिन्ह उभे करणारे आधुनिक नीतिशास्त्रदेखील या निबंधातून उलगडत जाते. देहदंडाच्या शिक्षेचे एकेकाळी होणारे जाहीर प्रदर्शन आणि अलीकडच्या काळातले चारभिंतीआड जाणे या दोन्हींतले शासनसत्तांचे अत्यंस्थ हेतू लेखक काम्यू तपासतोच, त्याचबरोबर शिक्षेचा कायदा अतिकडक करत जाणारे लोकप्रतिनिधी, शिक्षा ठोठावणारा न्यायाधीश, प्रत्यक्ष शिक्षेची अमलबजावणी करणारा जल्लाद वा कसाई, गुन्हेगाराची अखेरच्या क्षणी इच्छापूर्ती करण्याच्या उद्देशाने सोबत करणारा पाद्री वा कोणी धर्मप्रचारक, शिक्षा बघायला जाणारे सामान्य बघे आदींच्या नजरेतून देहदंडाच्या शिक्षेची भयावहतादेखील या निबंधातून पुढे आणतो.

‘क्रूर भ्याडपणा’ असे वर्णन केली गेलेली देहदंडाची प्रक्रिया आणि त्यातले निबंधात नमूद केलेले बारीकसारीक तपशील अंगावर काटे आणतातच, पण शिक्षेतला फोलपणा आणि परिणामशून्यताही याद्वारे वाचकांपर्यंत पोहोचते. हे सगळे मांडताना लेखक काम्यू अर्थातच समाज आणि शासनसत्तेच्या वर्तनातल्या विसंगती-विसंवादावरही नेमकेपणाने बोट ठेवत जातो. देहदंड हीच सर्वोच्च महत्त्वाची शिक्षा आहे, असे मानणारी शासनसत्ता आणि या शासनसत्तेला शरण जाणाऱ्या दुतोंडी समाजघटकांचे ढोंगही त्यातून उघड होत जाते.

एखाद्याचा सूड वा बदला घेण्याची भावना सजिवांचा निसर्गभाव आणि सजिवांच्या अंतःप्रेरणेशी निगडित आहे. कायद्याशी नव्हे- Retaliation is related to nature and instinct, not to law. Law, by definition, cannot obey the same rule as nature. हे काम्यूचे या निबंधातले केंद्रीय विधान आहे. त्या विधानाच्या पुष्ट्यर्थ तो युक्तिवाद करतो, तेव्हा तो माणूस हिंस्र का होतो, माणूस मग तो शोषक असो शोषित परपीडानंदात का सुख मानतो याची चिकित्सा करत माणसाच्या आदिम प्रेरणा आणि कालानुगते विद्ध्वंसक होत गेलेल्या मानवी वृत्तींचा माग काढतो. तेव्हा ‘मानसा मानसा कधी व्हशीन मानूस’ हा बहिणाबाई चौधरींनी कधीकाळी कवितेतून विचारलेला सवाल आपल्या पद्धतीने काम्यूने या निबंधाद्वारे विचारलेला असतो.

‘दी आउटसायडर’, ‘दी फॉल’, ‘दी मिथ ऑफ सिसिफस’ या अभिजात गणल्या गेलेल्या साहित्यकृतींचा हा नोबेल पुरस्कारप्राप्त लेखक आजही अनेक अर्थाने कालसुसंगत ठरतो, तो त्याच्या मानवताकेंद्री विचारांमुळे आणि त्या विचारांतील अर्थपूर्णतेमुळे. आज पुन्हा एकदा सबंध जगात तुटलेपण, हिंसा, नफेखोर बाजारपेठ आणि युद्धखोरांचे वर्चस्व यामुळे वैयक्तिक आणि सामूहिक विचारशक्तीला ग्रहण लागल्याचे चित्र आहे. त्याचा परिणाम देशोदेशीच्या शासनसत्ता आणि समाजांच्या वर्तनातून दिसतो आहे. अस्थिरता आणि अस्वस्थता या दोन अवस्थांतून सध्याचे जग चालले आहे. माहिती-तंत्रज्ञानाने एका बाजूला जगाला जोडले असले, तरीही परस्परांवर वर्चस्व गाजवण्याच्या महत्त्वाकांक्षेतून युद्ध-नागरी युद्ध लादले जात आहे. हिंसा आणि प्रतिहिंसा हाच जणू नियम असल्यागत माणूस माणसाला भिडताना दिसतो आहे, अशा या सर्दावलेल्या काळात हा काम्यूलिखित अनुवादित निबंध वाचकांस बौद्धिक समाधान देतोच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, माणसाला आपल्यातल्या माणूसपणाची तीव्रतेने जाणीवही करून देतो. पुस्तकात आशयानुरुप आलेली छायाचित्रे वाचकांना आशय-विषयाशी दृश्य रुपाने जोडण्यास मदत करतात. संवेदनशील वाचक त्यातून पुढे येणारी भयावहता आणि त्याचे दुष्परिणाम आजच्या काळाशी सहज ताडून पाहू शकतो. म्हणूनही माणसाच्या मन आणि बुद्धीला स्पर्शून जाणारे हे काम्यूचे मुक्तचिंतन आजच्या समाजातल्या विवेकी मंडळींपर्यंत पोहोचावे, पुढे जाऊन या विवेकी मंडळींनी काम्यूचे मानवकेंद्री विचार इतरांपर्यंत न्यावे, हा अनुवादकाने आपल्या मनोगतात उल्लेखिलेला उद्देश अस्थानी वाटत नाही.

शिरच्छेद, फाशी आणि आल्बेर काम्यूचा चिंतननामा
लोकवाड्मय गृह
अनुवादः शेखर देशमुख
किंमतः२०० रुपये  

(पुस्तक लोकवाड्मय गृहचे संकेतस्थळ आणि अॅमेझॉनवर उपलब्ध आहे.)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0