न्यू नॉर्मल की, कोरोनाच्या नवीन लाटेकडे?

न्यू नॉर्मल की, कोरोनाच्या नवीन लाटेकडे?

एकीकडे जगभरातील अनेक देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट येऊन पुन्हा जनजीवन लॉक डॉऊनमध्ये अडकले असताना आपल्याकडे मात्र उलटी स्थिती दिसत आहे.

२०२१ च्या फेब्रुवारीपर्यंत भारतात कोरोना आटोक्यात येणार…असे वृत्त आले आणि याचवेळी कोरोना रुग्णांचे आकडे अचानक कमी होऊ लागले. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये परमोच्च आलेख गाठलेली कोरोना रुग्ण संख्या निम्याहून कमी संख्येत दिसू लागली. न्यू नॉर्मलच्या चित्रात सर्व दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू होऊ लागले. जीवनाचे रहाट गाडगे पुन्हा सुरू झाले खरे पण खरोखरच न्यू नॉर्मल स्थिती आली का ? एकीकडे जगभरातील अनेक देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट येऊन पुन्हा जनजीवन लॉक डॉऊनमध्ये अडकले असताना आपल्याकडे मात्र उलटी स्थिती दिसत आहे. हे खरंच आहे की निव्वळ धूळफेक याबाबत सांगोपांग चर्चा होणे गरजेचे आहे.

कोरोनाच्या वावटळीत जगभरातील सर्वच देश सापडले आहेत. शक्तिशाली अमेरिकाने या छोट्या विषाणूपुढे शरणागती पत्करली आहे. स्पेन, इटली, ब्राझील, रशिया, ग्रेट ब्रिटन, दक्षिण तसेच उत्तर कोरिया , या बरोबरच आशिया मधील सर्व देश कोरोनाच्या या महामारीत अडकले आहेत. इतर राष्ट्रांच्या तुलनेने कोरोनाचा प्रसार भारतात फेब्रुवारीपासून सुरू झाला असल्यास तरी त्याचा परमोच्च आकडा जाण्यासाठी सप्टेंबर महिना उजाडला. मुळातच १३५ कोटी जनतेच्या या अवाढव्य लोकसंख्येत हा विषाणू आणि त्याचा संसर्ग आस्ते कदम झाला असला तरी त्याचे सातत्य मात्र कायम राहिले.

भारतीयांची प्रतिकारशक्ती मुळातच चांगली असल्याने कोरोनाचा संसर्ग हा मोठ्या प्रमाणात होणार नाही तसेच हार्ड इम्युनिटीमुळे समूह संसर्गाचा धोका कमी असेल असा वैद्यक क्षेत्रातील काही तज्ज्ञांचा दावा होता. पण त्याला छेद देणारे आकडे आले आणि मग सगळेच यावर ब्रह्मास्त्र ठरणाऱ्या लसीची वाट पाहू लागले.

जून ते सप्टेंबर महिन्यातील कोरोनाच्या रुग्णवाढीचा विचार केला तर असे दिसते की समुह संसर्गाचा प्रसार आस्तेकदम सुरू होता. रोजच्या आकड्यात होणारी वाढ ही रुग्ण संख्याचा गुणाकार करणारी दिसत होती. त्यामुळे हाऊसफुल्ल झालेली रुग्णालये, खाटाचा अभाव, वाढते मृत्यू यामुळे समाजमन भयकंपित झाले. त्यातच जीवनाचे रहाट गाडगे थांबल्याने रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला. त्यातून आलेली अस्वस्थता, नैराश्य आणि उद्विग्नता यामुळे विचित्र स्थिती निर्माण झाली.

अर्थव्यवस्थतेला चालना देण्यासाठी अन लॉकअंतर्गत टप्प्याटप्प्याने कुलूपबंद असलेले व्यवहार सुरू करण्यात आले. पण त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांची नियमावली आखून देण्यात आली. तोंडावर मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सातत्याने हात धुणे या त्रिसूत्रीचा अवलंब अनिवार्य करण्यात आला. न्यू नॉर्मलचा सूर्य उगवताना त्याची प्रकाश किरणे पडल्यानंतर जी टवटवी येते त्याचेच जणू रूप पाहतोय असे काही.

सप्टेंबरमधील उच्चतम गेलेला आकडा अचानक ऑक्टोबरमध्ये कमी येऊ लागला आहे. सप्टेंबरमध्ये दिवसा ९५ ते ९८ हजार असलेली रुग्णवाढ आता ४० ते ४५ हजारावर येऊन ठेपली आहे. खरोखरच विषाणूचा जोर ओसरू लागला की अन्य काही कारणे यामागे आहेत ?

काही वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञांशी याबाबत चर्चा केली असता धक्कादायक माहिती मिळाली. सरकारने चाचण्यांचे प्रमाण कमी केले आहे त्यामुळे आकडे कमी दिसत असल्याचे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मुळातच आपल्याकडे पहिली लाट सुरू आहे आणि दुसऱ्या लाटेचा धोका हा १०० टक्के आहेच. त्यातच हिवाळ्यात लोकांची प्रतिकारशक्ती कमी होते त्याचा मोठा फटका बसण्याची भीती सुद्धा व्यक्त होत आहे. याचा अर्थ पुढील तीन महिने आपण सर्वच या चक्रात राहणार आहोत. कोरोनाचा हा विषाणू स्वतःमध्ये अंतर्गत मूलभूत बदल (जेनेटिक चेंज) करत असल्याने त्यांच्या लक्षणातही बदल सातत्याने होत आहेत. एका सर्वेक्षण नुसार हा विषाणू किमान २५ हजार वेळा आपल्यात मूलभूत बदल करू शकतो. असे असेल तर मग भविष्यात येणारी लस कोणत्या बदलावर अवलंबून आहे हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. विदेशातील अनेक देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याने नाईलाजास्तव पुन्हा लॉक डॉउन करण्याची वेळ आली आहे. पण आपल्याकडे असेच झाले तर पुन्हा लॉक डाऊन होणार ? या एकाच वाक्याने सर्वांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे.

न्यू नॉर्मल च्या नावाखाली जवळपास सर्वच सुरू झाले आहे. त्यामुळे लहान स्वरूपाचे स्नेहसंमेलन काही ठिकाणी विवाह समारंभ अथवा अन्य कारणास्तव सुरू झाले आहे. पण हीच ठिकाणे आता कोरोनाची सुपर स्प्रेडर म्हणून उदयास येत आहेत. त्यामुळे भविष्यात हे मोठे आव्हान सर्वांसमोर असणार आहे.

माझे कुटुंब .. माझी जबाबदारी ही जाणीव करून देत शासनाने कोरोनाच्या संकटापासून दूर राहण्यासाठी सातत्याने हात धुवा.. मास्क वापरा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा असे सांगितले असले तरी सद्यस्थितीत हे नियम केवळ कागदोपत्री राहिले आहेत. मुंबईपासून ते थेट पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण, उत्तर महाराष्ट्र अशा कोणत्याही भागात फेरफटका मारला तरी सर्वत्र एकच चित्र दिसते ते म्हणजे … मास्क लावला असेल तर तो केवळ हनुवटीवर, अन्यथा अनेकांना त्या मास्कचे काही घेणे देणे नाही, सोशल डिस्टन्स तर खूप दूरची गोष्ट आता झाली आहे, आणि गर्दी करणे तर आम्हाला भारीच प्रिय.. सारंच कसे अगदी न्यू नॉर्मल पण सर्वच बेफिकीरीत असलेले.

पुनश्च हरि ओम म्हणत मार्च पासून सुरू असलेल्या लॉक डॉउनमध्ये जवळजवळ ९० टक्के क्षेत्रात शिथिलता आली आहे. रोजच्या दैनंदिन व्यवहाराला न्यू नॉर्मल स्थितीत येण्यासाठी प्रयत्न सुरू असला तरी कोरोनाची टांगती तलवार अजूनही डोक्यावर आहे. किराणा दुकानापासून ते थेट कपडे विक्री तसेच इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, हार्डवेअर अशी सर्वच दुकाने सुरू आहेत. बाजारात गर्दीचा आलेख वाढतच असताना मार्गदर्शक तत्वे, नियमावली याला सर्वत्र मुक्तपणे तिलांजली दिली जात आहे. मेडिकल विक्री करणाऱ्या दुकानापासून जवळपास सर्वच दुकानामधील सुरुवातीला खूपच उत्साहात ठेवण्यात आलेल्या सॅनिटायझरच्या बाटल्या आता गायब झाला आहेत. भाजी पासून ते जीवनावश्यक वस्तूची खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष केले जात आहे. रिक्षा किंवा तत्सम वाहनातून प्रवास करणारे अनेक महाभाग चालत्या वाहनातून गुटखा अथवा पान खाऊन रस्त्यावर थुंकताना दिसत आहेत. आणि सर्वात कहर म्हणजे पाणीपुरी , भेळपुरी आणि वडा विक्री करणाऱ्या गाड्या अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारीवर लावलेल्या आहेत. त्याच अस्वच्छता वातावरणात पदार्थांची विक्री होत आहे. रिक्षा टॅक्सीमधील सुरक्षतेसाठी लावण्यात आलेली प्लास्टिकची जाळी नाहीशी झाली असून काही ठिकाणी तर चक्क वडाप पद्धतही सुरू झाली आहे. या सर्व घटकांना मार्गदर्शक तत्वे माहीत आहेत की नाही की असा प्रश्न पडतो. हे सर्व सुखनैव सुरू असताना प्रशासन आणि त्यांचे अधिकारी यांचा मागमूस सुद्धा कुठे नाही.

कोरोनाचे काळेकुट्ट ढग अजूनही आपल्या भोवती घोघावत असताना न्यू नॉर्मलच्या नावाखाली सर्व प्रकारच्या नियमाला फाट्यावर मारत वावरणे म्हणजे आपणहून कोरोनाच्या त्या पेटलेल्या लाव्हा रसाकडे जाणे .. किमान ती खबरदारी तरी सर्वानी घेतली पाहिजे..

COMMENTS