न्यूझीलंडः जेसिंदा अर्देन यांच्या लेबर पार्टीला बहुमत

न्यूझीलंडः जेसिंदा अर्देन यांच्या लेबर पार्टीला बहुमत

वेलिंग्टनः सार्वत्रिक निवडणुकांत दणदणीत विजय मिळवल्यानंतर न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंदा अर्देन यांनी येत्या तीन आठवड्यात सरकार स्थापन केले जाईल असे स्पष्ट केले पण हे सरकार घटक पक्षांना सोबत घेऊन करणार की स्वतःच्या पक्षाचे स्थापन करणार याबाबत मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

शनिवारी अर्देन यांच्या लेबर पार्टीला १२० जागांपैकी ६४ जागा मिळाल्या आणि न्यूझीलंडच्या इतिहासात १९९६ नंतर प्रथमच एखाद्या पक्षाला एवढे बहुमत मिळाले आहे. त्यांच्या या विजयाने लेबर पार्टी स्वतःच्या पक्षाचे सरकार स्थापन करणार की नाही यावर आता न्यूझीलंडमध्ये चर्चा सुरू झाली आहे. कारण गेली तीन वर्षे अर्देन यांच्या लेबर पार्टीची ग्रीन पार्टी व नॅशनलिस्ट न्यूझीलंड फर्स्ट पार्टी या दोघांशी युती होती. आता लेबर पार्टीला बहुमत मिळाल्यानंतर या मित्र पक्षांबाबत अर्देन काय भूमिका घेतात यावर सर्वांचे लक्ष होते. अर्देन यांनी आपल्याला मिळालेले बहुमत महत्त्वाचे आहे, जनतेचा कल समजून घेतला पाहिजे, पुढील आठवड्यात ग्रीन पार्टीशी चर्चा केली जाणार आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

ग्रीन पार्टीला ७.६ टक्के मते मिळाली पण न्यूझीलंड फर्स्ट पक्षाला संसदेत आपले सदस्य आणण्याइतपत मते मिळालेली नाहीत. न्यूझीलंडमधील भूमीपूत्रांच्या माओरी पार्टीने संसदेत पुनरागमन केले आहे. माओरींची लोकसंख्या १५ टक्के आहे.

अर्देन यांना मिळालेले अभूतपूर्व यश त्यांनी हाताळलेली कोविड-१९ महासाथ असून त्यांच्या कारकीर्दीत न्यूझीलंडमध्ये एका माथेफिरूने मशीदीवर हल्ला करून ५१ भाविकांना ठार मारले होते. त्यानंतरची परिस्थिती अर्देन यांनी समर्थपणे सांभाळली होती.

अर्देन यांनी महिला सबलीकरण, सामाजिक न्याय व बहुसांस्कृतिकता हे प्रश्न योग्यरित्या सांभाळल्याने त्यांना आंतरराष्ट्रीय समुदायाचाही पाठिंबा आहे.

कोविड-१९ महासाथीचे न्यूझीलंडमधील बळी केवळ २५ असून १५०० जणांना या साथीची लागण झाली आहे.

मूळ बातमी

COMMENTS